घरफिचर्सकथा अजबखान्याची

कथा अजबखान्याची

Subscribe

आपल्या सर्वसामान्य ज्ञानाचा परीघ वाढविण्यासाठी म्युझियम किंवा वस्तुसंग्रहालय, विज्ञान केंद्र मदत करतात. समाजात घडत असणारे नित्य नवे बदल आणि पूर्व इतिहास या संग्रहालयातील वस्तूंमधून ज्ञात होतात. एखाद्या विषयाशी संबंधित वस्तूंचा व्यवस्थितपणे संग्रह व प्रदर्शन करणारी संस्था म्हणजे संग्रहालय होय. काही संग्रहालयांत एकाहून अधिक विषयांशी संबंधित वस्तूही असतात. संग्रहालये ही वस्तू, शिल्प वगैरेंना असलेली ऐतिहासिक परंपरा, त्या वस्तूंच्या निर्माणकाळाची पुरातन संस्कृती व पार्श्वभूमी असा इतिहास जतन करण्यात मदत करतात. असा संग्रह करण्याची कल्पना प्राचीनकाळी ग्रीस देशात उदयास आली. इसवीसनपूर्व २८० या वर्षी पहिल्या टोलेमीने इजिप्तमधील अलेक्झांड्रिया नावाच्या शहरात पहिले वस्तू संग्रहालय स्थापले.

त्यात ग्रीक पंडितांचे पुतळे, शूर पुरुषांचे पुतळे, शल्यक्रियेची उपकरणे, विविध ग्रंथ, निसर्गातील चमत्कारिक वस्तू यांचा संग्रह करण्यात आला होता. पुढे युरोपात अशी अनेक खाजगी संग्रहालये निर्माण झाली. कालांतराने अशी वस्तू संग्रहालये ही मनोरंजनाची व ज्ञान साधनेची केंद्र मानली जाऊ लागली, त्यामुळे सार्वजनिक संग्रहालये स्थापण्याची कल्पनाही उगम पावली. भारतातील पहिले संग्रहालय डॉ. वॉलिस या डॅनिश शास्त्रज्ञाच्या प्रेरणेमुळे स्थापन झाले. त्यानंतर इ.स. १८५० च्या सुमारास मद्रासमध्ये दुसरे संग्रहालय उभे राहिले. इ.स. १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या कारकीर्दीचा अर्धशतसांवत्सरिक उत्सव झाला. त्यानिमित्ताने भारतातही अनेक ठिकाणी संग्रहालये सुरू करण्यात आली. आधुनिक युगात राजघराण्यातील किंवा उच्चभ्रू वर्गातील व्यक्तींनी आपापले खासगी संग्रह स्थापन करण्यास सुरुवात केली.

- Advertisement -

यात विविध कलात्मक वस्तू, ऐतिहासिक अवशेष, पुरातन काळातील वस्तू यांचे प्रमाण अधिक असे. विशेष म्हणजे ठरावीक मान्यवर व्यक्तींनाच या वस्तू पाहता येत असत. १९ व्या शतकात संग्रहालयाचे स्वरूप बदलू लागले. संग्रहालयातील वस्तूंचे वर्गीकरण होऊ लागले. वस्तूंच्या संरक्षण, जोपासना, संशोधन यांची काळजी घेण्यात येऊ लागली. मात्र, सामान्य जनतेला १९ व्या शतकातही संग्रहालयाची दारे बंदच होती. २० व्या शतकात मात्र परिस्थिती बदलू लागली. १९४६ मध्ये इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ म्युझियम्स ही आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन झाली. या संघटनेनुसार म्युझियम ही चिरंतन संस्था असून, समाजाशी संवाद साधणे व आपल्या सांस्कृतिक वर्षाचे जतन व संवर्धन करणे हे तिचे प्रमुख ध्येय आहे. खरे पाहता सुरुवातीच्या काळात संग्रहालयांचे महत्त्व हे केवळ धार्मिक आणि ऐतिहासिक स्तरावरच अधिक होते. मात्र, आज आधुनिक जीवनशैलीचे जीवन जगताना इतिहासाशी आपली नाळ कायम राहण्याच्या दृष्टीने ही संग्रहालये आपल्याला मदत करतात.

एका विशिष्ट काळातील किंवा देशातील किंवा समाजाचा एखादा ठरावीक घटक डोळ्यासमोर ठेवून त्याच्याशी निगडित पुरातन ऐतिहासिक वस्तूंचे, माहितीचे जतन करून, जनसामान्यांपर्यंत ती संग्रहालयांमार्फत पोहोचवणे हे संग्रहालयांचे मुख्य लक्ष्य असते. युनोस्कोने १८ मे हा दिवस जागतिक संग्रहालय दिन म्हणून घोषित केला आहे. आपल्या संग्रहालयातील ज्ञानभांडार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ही संग्रहालये करत असतात. आधुनिक काळात संग्रहालयांचे महत्त्व केवळ मनोरंजनाचे साधन किंवा पर्यटन स्थळ एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. उलट विद्यार्थी, उद्योजक, व्यावसायिक, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक या सर्वानी संग्रहालयातील माहितीचा लाभ घ्यावा या दृष्टीनेही प्रयत्न करण्याची गरज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -