घरफिचर्सपाटलीण बाय!

पाटलीण बाय!

Subscribe

पाटलीण बायने त्यावेळी साधना, आशा पारेखचे सिनेमे बघितले होते की माहीत नाही; पण नट्यांनाही लाजवेल, अशा मादक पद्धतीने ती साडी नेसत असे. तोकड्या कपड्यात नाही तर साडीतही बाई कशी उठून दिसते, हे बायकडे बघून कळत असे. कपाळावर ठसठशीत लाल कुंकू. गळ्यात बेंबीपर्यंत लोंबणारे साखळदंडासारखे भलेमोठे मंगळसूत्र. हातात सोन्याच्या जाड पाटल्या, बांगड्या आणि त्यात दिसतील न दिसतील अशा हिरव्या बांगड्या. कानात मोठ्या फुलांसारखी कुडी. पाठीवर कमरेपर्यंत झुलणारी लांबसडक केसांची वेणी आणि वेणीत गजरा. डोक्यात एखादे फूल बायने कधी घातले नाही, असे कधी झाले नाही. वस्तीची ती पद्मा चव्हाण होती…

सायन चुनाभट्टीत सत्तरीच्या अखेरीस आणि ऐशीच्या दशकात मी पाहिलेली माणसे अजून मनात घट्ट उभी आहेत आणि ती खरी आहेत. सत्य कथेसारखी! स्वदेशी मिलच्या डोंगरावरील त्या झोपडपट्टीत मिल कामगारांच्या वस्तीत माझे वडील, काका तसेच कोकणातील माणसांबरोबर आगरी कोळीही राहत होते. खरंतर सायन, चुनाभट्टी, चेंबूर, माहुल हा सारा परिसर आगरी कोळ्यांचा. गाववालेच ते, भूमिपुत्र. जीवाला जीव देणारे. पण, सटकली तर तोच जीव घेणारे. मागे पुढे न पाहणारे. याच कुळातून आलेली आमच्या वस्तीत एक बाई होती. पाटलीण बाय. ती बाई होती की पुरुष हा चर्चेचा विषय होता. कारण तिचे शरीर बाईचे होते; पण देहबोली पुरुषाची. पुरुषातील सर्व हिमकतीचे गुण या बाईत होते. तिला बाई म्हणायचे ते फक्त तिने चार मुलींना जन्म दिला म्हणून. अन्यथा एखाद्या खमक्या पुरुषाला लाजवेल असा बायचा रुबाब होता. उलट तिचा नवरा पाप्याचे पितर वाटायचा. बाय भरभक्कम, केसांपासून पायापर्यंत. चालायला लागली की चार माणसांनी वळून न बघितली तर ती बाय कसली. गोरापान वर्ण, पुरुषासारखी उंची, भरगच्च देह आणि या देहावर झुळझुळणारी फुलाफुलांची साडी. तीसुद्धा अशा काही नजाकतीने नेसलेली की कुठल्याही कोनातून बेंबी सताड उघडी दिसली पाहिजे. बायने त्यावेळी साधना, आशा पारेखचे सिनेमे बघितले होते की माहीत नाही; पण नट्यांनाही लाजवेल, अशा मादक पद्धतीने ती साडी नेसत असे. तोकड्या कपड्यात नाही तर साडीतही बाई कशी उठून दिसते, हे बायकडे बघून कळत असे. कपाळावर ठसठशीत लाल कुंकू. गळ्यात बेंबीपर्यंत लोंबणारे साखळदंडासारखे भलेमोठे मंगळसूत्र. हातात सोन्याच्या जाड पाटल्या, बांगड्या आणि त्यात दिसतील न दिसतील अशा हिरव्या बांगड्या. कानात मोठ्या फुलांसारखी कुडी. पाठीवर कमरेपर्यंत झुलणारी लांबसडक केसांची वेणी आणि वेणीत गजरा. डोक्यात एखादे फूल बायने कधी घातले नाही, असे कधी झाले नाही. वस्तीची ती पद्मा चव्हाण होती…

- Advertisement -

बायचा नवरा कुठल्यातरी खाजगी कंपनीत होता. मिल कामगारांपेक्षा थोडा जास्तीचा पगार. पण, या पाटील घराचा रुबाब काही और होता. फक्त ते झोपडपट्टीत राहत होते इतकेच. खरेतर त्यांनी आपले घर पक्के भिंतीचे करून घेतले होते. मिल कामगारांची आमची सार्‍यांची घरे पत्र्याची. बायच्या घरात त्यावेळी टीव्ही, फ्रीज होता. काही कमी नव्हते. चारही मुली बायसारख्या देखण्या. त्यातली तीन नंबरची मुलगी नंदा तर थेट मुमताजसारखी दिसायची. मोठी सुमन दिसायला देखणी; पण कमी उंचीची. वडिलांसारखी. गुणही बाबासारखे. थोडेसे लाजाळू. कमी बोलणारी. शाळेत जाताना खाली मान घालून जाणारी. दुसरी जया, आईपेक्षा उंच. बारीक चणीची; पण रूपाने उजवी. तिच्यात नूतनचा भास व्हायचा. स्वभावही साधा, सरळ. तीन नंबर नंदा, मात्र पाटीलणीची सेम टू सेम कॉपी होती. पाटलीणीला झाकावी आणि नंदाला बाहेर काढावी, अशी. तिच्या रूपाचीही ख्याती अशीच तिच्या आईसारखी सर्वत्र पसरलेली. धाकटी राधाही आईसारखीच देखणी; पण कमी उंचीची. पाटलीण बाय आणि तिच्या मुलींचे सौंदर्य हा काही फक्त आमच्या वस्तीचा विषय नव्हता, तर त्याची कीर्ति चुनाभट्टीची वेस ओलांडून पसरली होती…

खात्यापित्या घरचे पाटील कुटुंब फक्त एकट्या पाटलांच्या पगारावर चालत नव्हते. तर, बाय हे घर मोठ्या रुबाबात चालवत होती, आपल्या जोरावर! बाय दारू विकायची. संध्याकाळ झाली की बायच्या दारात तळीरामांची रांग लागे. पिचलेले, दमलेले कामगार नवटांग, पावशेर मारायला उभे राहत. काहीजण एक दोन ग्लास मारत तोंडाला मीठ, लिंबू, चणे लावत आल्या पावलांनी निघून जात. काही मात्र झिंगेपर्यंत पीत आणि बायच्या दारात लोळत पडलेले असत. बायचा सर्व रोखीचा धंदा होता. आधी पैसे, मग दारू. बायचे पैसे कोणी ठकवले, असे कधी झाले नाही. ठकवणार्‍याची गचांडी पकडून पैसे कसे वसूल करायचे हे तिला पक्के ठाऊक होते. बाय दारूच्या फुग्याच्या पिशव्या सायन धारावीतून आणत असे. दोन पोलीस स्टेशनच्या नाकासमोरून मोठ्या ठेचात ही बाई दारू नेत असे आणि हे माहीत असूनही पोलीस न बघितल्यासारखे करत असत. बायचा हफ्ता ठरलेला होता. मुख्य म्हणजे पोलीस स्टेशनच्या इंचार्जला बायने खिशात टाकलेले असे. कोणी बदली करून अधिकारी आला की बाय त्याला असा काही पटवत असे की बदली करून तो गेला तरी तिची ओढ लागून तो परत आलाच पाहिजे. अंगभूत देखणेपण कधी आणि कुठे वापरायचा याची बायला उपजत जाण होती…

- Advertisement -

हिकमती बाय फक्त दारूचा धंदा करून स्वस्थ बसलेली नव्हती. ती सावकारीही करत असे. व्याजाने पैसे देण्याचा तिचा आणखी एक छुपा व्यवसाय होता. पठाणी पद्धतीने महिन्याला ती व्याज वसूल करायची. मिल कामगारांनी अडीअडचणीला, मुख्य म्हणजे आपले गावचे घरभाट चालवण्यासाठी पाटलीणीकडून पैसे घेतलेले असत. गावचा भाऊ घरदार सोडून मुंबईला येऊ नये आणि घरचा दिवा विझू नये, यासाठी त्यांचा जीव तुटत असे. या तुटण्यातूनच हे चक्रव्याज पैसे काढलेले असत. मिलच्या कापसाने छातीचा पिंजरा झाल्याची काळजी नाही; पण गावघर चालले पाहिजे. अशी प्रचंड आंतरिक ओढ यामागे असे… मी ती वडिलांच्या आणि काकांच्या डोळ्यांत पाहिलेली होती. अण्णा काका नेहमी म्हणत, ‘रे झिला आपण आपलो गाव सोडून पोट भरूक मुंबईक इलो असलो तरी आपण गावकार असव. आपण गावर्‍हाटी चालवतो. गाव, देव सर्व आपलो आसा. आपण ते उभे केलव. ही र्‍हाटी चलका व्हयी. देवी सातेरी बघता सर्वाक… कोणाचा खोटा करता नये आणि आयुष्यात दारयेच्या घोटाक हात लायता नये. आपल्या कुळाचाराक चलना नाय’. काकांचे बोल अजूनही कानात पक्के बसले आहेत. कदाचित काका, वडिलांची ती ओढ माझ्यात भरून उरली असेल. याच माझ्या काका आणि वडिलांनी पाटलीणीकडून अनेकदा व्याजाने पैसे काढलेले असत. फार मोठी रक्कम नसे; पण व्याज भयंकर असे. मिल कामगारांचे 10 तारखेला पगार व्हायचे. बाबा रात्रपाळीला असले की रात्री माहिमचा हलवा, म्हातारीचे केस ( सुतारफेणी), शेवगाठी आणत. रात्री 1 वाजता त्यांच्या येण्याची वाट बघत आम्ही जागे राहू. खाऊ घेतल्यानंतर आमच्या डोळ्यातील आनंदापुढे त्यांना त्यांच्या छातीच्या पिंजर्‍याची काळजी नसे. खोकल्याची मोठी उबळ येई आणि ते मटकन खाली बसत…थोडा वेळ शांत झाले की विचार करत. त्यांच्या डोळ्यात मला पाटलीणीच्या व्याजाची काळजी दिसे आणि घर कसे चालणार या भीतीने आधीच तोळामासा झालेला त्यांचा जीव आणखी घाबराघुबरा झालेला असे… आईला लक्षात येई, ओ, असे काय करतास. कशाक घाबरतास. मी जातंय उद्यापासून चार घरची भांडी घासूक. होताला सगळा बरा’. त्या खोकल्याच्या उबळीतही बाबांमधील गावकार उसळून उठे. ‘गो मी अजून मेलय नाय. जितो असय. काय एक कोणाची भांडी घासूक जाव नको’.

दुसर्‍या दिवशी बाय दारात उभी… तोच दिलखेच रुबाब. बाबा मात्र तिच्याकडे न बघता निमूट व्याजाचे पैसे देऊन मोकळे झाले की ही बाई नटीसारखी खळखळून हसे आणि ‘परबानू लागले तर सांगा पैसे. तुम्ही आपली माणसे आहात’, असे सांगत झुळझुळणार्‍या साडीच्या पडलेल्या पदराची फारशी काळजी न करता बाय मागची वेणी पुढे आणत नटीसारखी निघून जाई… आणि आमची आई, ‘शिरा पडली याच्या तोंडार. लोकांच्या रगताचे पैसे खावन कधी भला होवचा नाय, रांडेचा’, असे मालवणी ठेच्यात बोलत असे. कदाचित ते बायने ऐकलेले असेलही; पण तिला त्याची पर्वा नसे. बायच्या या डबल व्याजाने आमची काकी धाय मोकलून रडलेली मी पहिली आहे. काकांचे व्याजाचे हफ्ते थकले होते. एके दिवशी बाय दारात उभी, ‘अण्णा, व्याजाचे काय झाले. आता मी गप्प बसणार नाही’. ‘बाय पुढच्या महिन्यात देतो. थोडी कळ काढ’. बाय दारातून वस्तीला ऐकायला जाईल अशा जोरात मग सांगे, ‘आता खूप झाले. मला पैसे पाहिजेत. नाय जमत तर समोर बायको आहे ना, तिच्या गळ्यातले मंगळसूत्र द्या’. आणि काकांनी काकीच्या गळ्यातून काढून मंगळसूत्र बायला दिलेले वस्तीने पाहिलेले असे… मात्र बायला काही फरक पडत नसे. सौंदर्य, पैसा आणि बायगिरीचे तिचे दिवस टॉपवर होते. पोलीस, परिसरातील पैसेवाले, भाईलोक बायने आपल्या झुळझुळणार्‍या साडीत लपेटले होते. दुपार तापार, रात्री अपरात्री कधीही हे चार पैसे खिशात असणारी माणसे बायकडे येत. बायच्या नवर्‍याला हे माहीत असे… आणि तो पोरींना घेऊन बाहेर वेळ काढी. नवर्‍याने बायचे हे खेळ निमूट मान्य केले असले तरी पोरी मात्र आता वयात आल्या होत्या. त्यांना हे कळत असे आणि बायच्या पावलावर पाऊल ठेवून त्यासुद्धा आता बिनधास्त वागू लागल्या होत्या.

बायच्या मोठ्या सुमनचे ठरवून लग्न झाले. मात्र लग्न झाल्यानंतर जावई आणि सुमनने पुन्हा कधी घरात पाऊल टाकले नाही. जावयाला कदाचित बायच्या म्हणजे सासूच्या पडलेल्या पदराची भीती वाटत असावी. दुसरी जयाही बर्‍या घरात लग्न होऊन गेली होती. पण वर्ष दोन वर्षात तिचा नवरा वारला. जयाही नंतर कधी बायकडे आलेली फारशी दिसली नाही. नंदा आणि राधाने मात्र बायप्रमाणे आपल्या देखणेपणावर वस्ती आणि परिसर नाचवला. त्यांना कोणतीच भीती नव्हती. बायला त्या सरळ उडवून लावत… ‘तू काय दिवे लावलेस, ते आम्हाला शहाणपण शिकवतेस. जास्त आवाज करू नको. आम्हाला हवे तसे वागणार’. आणि बायच्या नाकावर टिच्चून नंदा आणि राधा बिनधास्त जगत होत्या. त्यांचे दोस्त, मित्र वर्षागणिक बदलत होते. कपडे बदलल्यासारखे. जवानी ऐन रंगात होती आणि वस्तीच्या अंधारात, सुनसान जागेत बायच्या मुलींचे खेळ रंगात आले होते… त्यांना घरची, दारची भीती नव्हती. पाटील नेहमीप्रमाणे चिडीचूप होते, तर बाय कधी नव्हे ती हताश झालेली आम्ही पाहिली. नंदाने आपल्या अनेक मित्रांपैकी एकाशी लग्न करून घराबाहेर पडली. मात्र काही वर्षातच तिने स्वतःला जाळून घेतले आणि त्यात ती गेली. धाकट्या राधानेही अशाच स्वतःच बघितलेल्या मुलाबरोबर लग्न करून गेली खरी; पण एक मूल झाल्यावर नवर्‍याशी काडीमोड घेऊन पुन्हा बायच्या घरी आली… बायचे चलतीचे दिवस आणि उतरती कळा, असा दोन्ही काळ आमच्या वस्तीने पाहिला. आता ती शेवटच्या घटका मोजतेय…पण मरण काही तिला तिच्या ठेचात चालायला तयार नाही. तिच्या हातात आता काही उरलेले नाही. ना शरीर, ना पैसा. राधा कसेबसे घर चालवते खरे; पण तो बहारीचा काळ आता संपल्याची कळ बायच्या डोळ्यात स्पष्ट दिसते… नियतीने बायवर उगावलेला तो सूड असावा! माझ्या आईचे ते वाक्य आजही माझ्या कानात भरून आहे… रांडेचा कधी भला व्हवचा नाय!

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -