घरफिचर्सकडक निषेध

कडक निषेध

Subscribe

आरेच्या अभयारण्यी पक्षीनगरातील एका औदुंबराच्या झाडावर चिवचिवाट संघटनेची बैठक बोलवण्यात आली आहे. कडकनाथ कोंबडीच्या विषयावर चर्चा सुरू आहे. राजकारण्यांनी विधानसभेच्या राजकारणांसाठी कडकनाथाला वेठीस धरल्याबद्दल या बैठकीत निषेधाचा ठराव करण्यात आला आहे. बैठकीचे अध्यक्ष ज.रा. मोरे, सचिव व.र. बगळे, सदस्य का. व. कावळे, चिमणे, बुवा साळुंखे, घुबडकर मास्तर अशी मंडळी जमली आहेत.

चिमणे – तर पक्षी मित्रांनो, आपल्या सोईनुसार पक्ष्यांतर करून एका पक्षातून दुसर्‍या पक्षात नेहमीच उडत जाणार्‍या राजकारणी नावाच्या माणसाने आपल्यालारख्या पक्षांच्या उडण्यालाही बदनाम केले आहे. गेलास उडत….उडत जा…उडवून लावणे…लई उडायला लागलाय, आमच्यावर उडू नगंस..असे शब्द वापरून आपलं उडणं बदनाम करणार्‍या माणसांनी त्यांच्या राजकिय गटांचं नावही पक्ष असे ठेवू नये, असा ठराव मी मांडत आहे. कृपया अनुमोदन द्यावे…

- Advertisement -

बुवा साळुंखे- खरं आहे…चिमणे माणसांच्या मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश नावाच्या कुठल्याश्या यात्रेसमोर कडकनाथाला उडवण्याचा प्रयत्न निषेधार्ह आहेच…कडकनाथा तू आपलं मत मांडावं, इथं तुला कुणाच्याही सुर्‍याची भीती नाही.

कडकनाथ- माझ्यासारख्या काळाकुट्ट पक्षाची व्यथा मांडण्यासाठी रंगिबेरंगी आणि बगळेभाऊंसारख्या शुभ्र पक्षांनीही मला संधी दिलीत यासाठी मी आपला आभारी आहे. माणूस नावाच्या द्विपाद प्राण्याने मला मारून कुकरच्या ४० शिट्ट्यांमध्ये शिजवून माझे अनंत हाल केले आहेत. माझेच नाही, माझ्याच जातकुळातील पक्षांनाही रोजच मारले कापले जात आहे. आम्ही कोंबडीकुळात जन्म घेतला तोच मुळात माणसाच्या ताटातून त्याच्या पोटात जाण्यासाठी…हे समजून आम्हाला आमच्या जगण्यामरण्याचे सार्थक वाटत आले होते. मात्र परवाच्या घटनेत त्यांच्या राजकीय हितसंबंधासाठी मुख्यमंत्री नावाच्या माणसाचा निषेध करण्यासाठी आम्हाला वेठीस धरून कुठल्याश्या बस नावाच्या वाहनासमोर आम्हाला उडवण्यात आले, माझे काही भाऊबंद त्या अजस्त्र वाहनाखाली चिरडले गेले, जे उडून पळून गेले, ते बचावले मात्र त्यांनाही शोधून ताटातून पोटात सारायची तयारी काही माणसांनी केली आहे…खरंच माणसासारखी उलटी जमात या जगात नाही.

- Advertisement -

बगळेबुवा- खरं आहे..मित्रा, मलाही त्यांनी असंच बदनाम केलंय…रंगेल आणि संधीसाधू राजकारण्यांना मानवी समुदायात बगळा म्हटलं जातं. सकाळच्या रम्य वेळी नदीतीरावर एक पाय दुमडून मी ध्यान करत असतो, त्यावेळी मी माशांना भक्ष्य बनवण्यासाठीच हा साळसूद बनाव केल्याचा आरोप माणसांनी माझ्यावर कायमच केला आहे.

का. व. कावळे- खरं खरंच…सध्या सुरू असलेल्या पितृपक्षात माझी गरज त्यांना वाटते. मात्र इतर वेळी कावळा म्हटला की चोर, राजकारणी, लबाड, संधीसाधू असंच चित्र माझं रंगवलं जातं. माझ्या डोक्यावर गांधीटोपी चढवून मला त्या राजकारण्यांच्या पातळीवर आणलं जातं, ज्यात माझा दोष नसतोच मित्रांनो.

कडकनाथ- खरंच, कावळे भाऊ…मी कधीही मला विकत घ्या, असं शेतकरी मित्रांना सांगितलं नव्हतं, माझ्यावर एखादी आर्थिक योजना बनवून माझा बाजार मांडण्याचेही मी कधीच कुणापुढे बोललो नाही. पैशांच्या हव्यास बाळगणार्‍यांनी माझा बळी दिलाय…माझ्या आधी आपला विदेशी मित्र इमूच्या बाबतीतंही माणसांनी असंच केलं होतं, त्याच्या नावावरही फसवणुकीचा धंदा माणसांनी चालवला होता.

इमू- होय..हे खरं आहे. इमूपालनातून लाखो कमवा, कडकनाथ पाळा लखपती व्हा…अशा जाहिराती माणसांनीच केल्या होत्या…त्यात आमचा काय दोष?

पोपटराव- मित्रांनो मी आपली वेदना समजू शकतो, निवडणुकीआधी गोड बोलणारे नेते असतात, गोडबोले हे नावही माणसांतच असतं, आपल्यात अशी नावं कधीच नसतात..तरीही पोपटासारखं गोड बोलतोस…अशी टिंगल टवाळी माझीही कायम केली जाते.

घुबडकर मास्तर- मित्रांनो मला आणि वटवाघूळकरांना रात्री दिवसा दिसत नाही..म्हणून आम्ही रात्री भक्ष्याच्या शोधात फिरतो, पण माणसांनी आम्हाला निशाचर म्हणून बदनाम केलंय. भूत, जादूटोन्याच्या नावाखाली आम्हालाही वेठीस धरलं जातं.

मोरे- पक्षी मित्रांनो मी आपलं बोलणं ऐकलं आहे…माणूस हा निश्चितच अज्ञानी, विचित्र, संधीसाधू, क्रूर आणि धूर्त, स्वार्थी, हव्यासी प्राणी आहे. या आपमतलबीपणाच्या चिखलातून बाहेर पडून त्याला पक्षीजिवांचे मोल समजण्याची गरज आहे. या आपमतलबीपणाला त्याने राजकारण हे गोंडस नाव दिले आहे. मात्र त्यातून माणूस माणसाला फसवत आहे. ही फसवणूक माणसाला भविष्यात फार मोठ्या आरिष्टाला कारण ठरणार आहे. यातून सुटका होण्यासाठी मानवाला देवाने सुबुद्धी द्यावी…अशी प्रार्थना आपण सर्वांनी करावी आणि मानवी वस्तीपासून शक्य तेवढे दूर रहावे, हा ठराव मी आदेशीत करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -