घरफिचर्सआठवणीतील विद्यार्थी : उद्धव ठाकरे

आठवणीतील विद्यार्थी : उद्धव ठाकरे

Subscribe

शिक्षकी पेशातील लोकांना एक गोष्ट फायद्याची असते. त्यांच्या हाताखालून अनेक विद्यार्थ्यांच्या पिढ्या पुढे सरकत असतात. त्यापैकी कित्येक विद्यार्थी त्यांच्या भावी आयुष्यात वेगवेगळ्या क्षेत्रांत नावारूपाला येतात. चित्रकलेसारख्या नैपुण्य क्षेत्रात असलेले विद्यार्थी कलेच्या निरनिराळ्या दालनात आपले प्रावीण्य दाखवितात. यातले काही विद्यार्थी आपल्या शिक्षकांचे ऋण मानतात. कारण शिक्षकांनी त्यांच्यावर संस्कार घडवलेले असतात, त्यांना ज्ञानदान केलेले असते. काहीवेळा एखादा विद्यार्थी नावारूपाला आला की तो आपला विद्यार्थी होता असे एखादा शिक्षक त्याचे गुणगान गात असतो. पण काही विद्यार्थी मात्र त्यांच्या शिक्षकांच्या आयुष्यात केवळ अविस्मरणीय असतात.

आजच्या काळात एखाद्या मोठ्या व्यक्तीचा मुलगा अथवा मुलगी शाळेत अथवा महाविद्यालयात असेल तर तेथील काही विद्यार्थी व शिक्षकच त्यांना त्यांच्या मोठेपणाची जाणीव करून देत असतात, आणि त्या विद्यार्थ्याला देखील आपल्या घराण्याच्या मोठेपणावर, त्याला मिळणार्‍या मानाची कल्पना येते, आणि तो विद्यार्थीसुद्धा त्याप्रमाणे वर्तन करू लागतो.

पण यालाही अपवाद असलेले कैक विद्यार्थी आपल्या आयुष्यात येतात, आणि त्यांच्या सद्वर्तनाने आणि साधेपणाने कायमचे आपल्या स्मरणांत रहातात. त्यांचे एक प्रकारचे नातेच आपणाशी जडते.

- Advertisement -

मी सर जे.जे. उपयोजीत कला संस्थेत अध्यापक म्हणून कार्यरत असतांना माझ्या कानांवर आले की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आपल्या महाविद्यालयात शिकतो आहे. बहुदा ते १९७६ साल असावे. शिवसेना त्या काळात अत्यंत प्रभावी अशी संघटना होती. सेनाप्रमुखांच्या एखाद्या लहानशा गोष्टीचे पडसादही सर्वत्र उमटत असत. पण त्यांचा मुलगा आपल्या संस्थेत दोन वर्षे असूनही माझ्या प्रत्यक्ष पहाण्यात आला नव्हता. किंवा तो तसा बाकीच्या विद्यार्थ्यांमध्ये मिरवत नव्हता. अर्थात आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, विशेष करून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना वर्गकामातून डोके वर काढण्याचीही फुरसद मिळत नसते. त्यामुळे तो बाहेर दिसण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. नंतर कधीतरी गेट-टू -गॅदरच्यावेळी अचानक दिसला तेव्हा मला कळले की हाच तो बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा उद्धव! शरीरयष्टीने बारीक, उंचापुरा, वर्णाने गोरापान, डोळ्यावर चष्मा आणि चेहर्‍यावर सतत एक हास्य बाळगणारा असे त्याचे व्यक्तीमत्व होते.

दुसर्‍याच वर्षी म्हणजे द्वितीय वर्षाला उद्धव माझ्या वर्गात आला. त्याच्या मित्रमंडळीत आजूबाजूला होते ते सर्व विद्यार्थी कामात तसेच माहीर होते. उद्धवदेखील त्याच प्रवृत्तीचा होता. संजय सुरे, भूपाल रामनाथकर, अजित जयकर, भास्कर हांडे हे उद्धवचे मित्र होते. पण या सर्वांमध्ये चुरस असे ती कामाची. उपयोजित कलेमध्ये केवळ चित्रे काढून भागत नाही तर त्यामध्ये संवाद साधण्याची कल्पकता असावी लागते. त्यासाठी कलेसोबतच वाचन, निरीक्षण, काव्य, लेखन अशा सर्वच बाबींवर विचार करावा लागतो आणि येथेच विद्यार्थ्यांना शिक्षक मार्गदर्शन करतो. उद्धव माझ्या संपर्कात आला तेव्हा सर्वात महत्वाची बाब माझ्या लक्ष्यात आली ती म्हणजे त्याचे बोलणे.

- Advertisement -

एरवी अत्यंत अबोल वाटणारा उद्धव एखाद्या विषयावर बोलू लागला अथवा वादविवाद करू लागला, की संपूर्णपणे वातावरण बदलून टाकत असे. त्याचा गंभीर वाटणारा चेहरा नर्म विनोद पेरत असे, तेव्हा त्याच्या चेहर्‍यावर एक मिस्कील हास्य पसरत असे. शांतपणे त्याचे संभाषण चालू असे. आमच्या महाविद्यालयात संपूर्ण आठवडाभर बहुदा प्रात्यक्षिकच चालू असत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला खाली मान घालूनच काम करावे लागे. त्याचप्रमाणे उद्धवचेही काम चालू असे. सर्वांशीच मनमोकळेणाने वागणारा उद्धव प्रत्येक शिक्षकालाही अदबीने मान देत वागत असे. आपण केलेल्या कामावर शिक्षकांशी सांगोपांग चर्चा करून किती निरनिराळ्या तर्‍हेनी त्या कल्पना चित्रांकीत केल्या जातील याची तो चर्चा करे. शिक्षकही त्याला कधीच वेगळी वागणूक देत नसत. उद्धवची तशी अपेक्षाही नसे. शिक्षक जवळ आले की उठून उभे राहून तो नम्रपणे बोलत असे.

उद्धवचा वाखाणण्याजोगा गुण म्हणजे त्याचा वक्तशीरपणा व कामातील बैठक. कलानगर ते व्ही.टी. तो नेहमी हार्बरने येत असे. मग मुसळधार पाऊस असला तरी छत्री सावरत तो वेळेवर वर्गात हजर असे. वर्गात आल्यानंतरही आपली कामे पूर्ण करण्यातच त्याचा वेळ जात असे. राज्य कला प्रदर्शनाची वेळ जवळ आली की आम्ही सर्वच विद्यार्थ्यांना मुटकून कामाला लावत असू. त्यावेळी महावियालयीन वेळेव्यतिरिक्त आम्ही रोज विद्यार्थ्यांसोबत उशीरापर्यंत काम करीत बसत असू. उद्धवचा याबाबतीत पुढाकार असे. इलस्ट्रेशन हा उद्धवचा खास आवडीचा विषय. त्यात त्याची गतीही चांगली होती.

पण आपले इलस्ट्रेशन केवळ कामचलाऊ असू नये, तर ते सर्वांगदृष्ठ्या परीपूर्ण व्हावे याकडे त्याचा कटाक्ष असे. त्यासाठी त्याची सतत मेहनत, जोपासना व तपश्चर्या सुरूच असे. उन्हाळ्याच्या संपूर्ण सुटीत तो दादरला सुप्रसिध्द चित्रकार श्री. रवी परांजपे यांच्याकडे जाऊन उमेदवारी करत असे. विद्यार्थ्यांच्या कामाची बैठक पक्की असेल तरच परांजपे यांच्याकडे काम करण्याचा लाभ मिळत असे. अन्यथा तेथे कोणालाही थारा नसे. तेथे उद्धवने स्वतःचे ड्रॉईंग अधिक उठावदार, निर्दोष कसे करावे याचे पुरेपूर शिक्षण घेतले. एक वर्ष पुढे सरकले व तृतीय वर्षात हीच सर्व मुले पुन्हा माझ्याकडे आली. पुन्हा कामाची स्पर्धा सुरू झाली.

छायाचित्रण हा देखील उद्धवचा आवडीचा विषय. किंबहुना ड्रॉईंग चांगले असूनही छायाचित्रणाच्या आवडीने उद्धवने ती कलाही आत्मसात केली. त्यासाठी तो तासनतास कॉलेजच्या डार्करूममध्ये आणि नंतर दादरला जतकर सरांच्या डार्करूम मध्ये घालवीत असे. छायाचित्रणामध्ये निरनिराळे प्रयोग करणे, बाह्यचित्रण करणे, निसर्ग आणि प्राणी जीवनाचे चित्रण करणे हे उद्धवच्या खास आवडीचे असे विषय. पशू आणि पक्षांच्या सानिध्यात तो रमून जात असे. वर्गामध्ये अथवा बाहेरही त्याची चर्चा सतत या छायाचित्रण विषयावरच! फिल्टर, अपार्चर, डायफ्रॅम, लाईट असे विषय त्याचे जिव्हाळ्याचे असत. तो केवळ कॅमेर्‍याने चित्रण करीत नसे, तर त्याची सृजनशील दृष्टी ही सौंदर्य शोधून त्यातून तो चित्रनिर्मिती करीत असे. त्यामुळे त्याची छायाचित्रेही बोलकी होत असत. बघणार्‍यांशी संवाद साधत.

ही त्याची फोटोग्राफी बाळासाहेबांनाही मोहवून टाकीत असे. ते त्याच्या कडून अधून मधून वेगवेगळ्या लेन्स आणि त्यातील फरक यातील बारकावे समजून घेत. त्याने गच्चीवर बाळासाहेबांचा काढलेला फोटो मी माझ्या एका बाळासाहेबांवरील लेखासाठी वापरला होता. माझी बाळासाहेबांशी आधीची ओळख होतीच! पण उद्धवने त्यांना आपले शिक्षक म्हणून माझी जेव्हा खास ओळख करून दिली, तसेच माझ्या उपक्रमाविषयी तो अनेकदा त्यांच्याकडे बोले त्यामुळे मी साहेबांशी जास्तच जवळ आलो. त्यामुळे माझी कोणाशीही ओळख करून देताना ’ माझ्या उद्धवचे सर’ असे ते सांगत. एकदा ते म्हणाले, माझा त्या आर्ट स्कुलवर अजिबात विश्वास नाही. पण माझ्या मुलांना मात्र मी त्यांच्या आवडीची क्षेत्रे निवडण्याची मोकळीक दिली आहे.

बघता बघता अंतिम वर्ष आले. परीक्षा आटोपल्या. अंतिम वर्षाच्या परीक्षेत विशेष गुणवत्तेने उद्धव उत्तीर्ण झाला. परीक्षा होताच सर्व विद्यार्थी मोठमोठ्या जाहीरात संस्थेमध्ये काम करण्यास उत्सुक असतात. गुणवत्तेच्या जोरावर उद्धवलाही हे सहज शक्य होते. पण तेथेही त्याने अचूक निर्णय घेतला. कोठेतरी नोकरी करण्यापेक्षा त्याने स्वतःची जाहीरात संस्था सुरु करण्याचा निर्णय घेतला. ‘चौरंग’ हे समर्पक नाव तिला दिले. तेथे स्वतः कामे करत त्याने ती चालविली. जोडीला होता अजित जयकर. स्वतःच्या हाताने कला निर्मिती करणे आणि तिचा आस्वाद घेणे याचा काही वेगळाच आनंद असतो. तो केवळ कलाकारच जाणे! या कामात असताना फुरसतीच्या क्षणी उद्धवचे छायाचित्रण सुरूच होते. वन्य जीवांचे चित्रण करताना त्याला आलेले अनुभव ऐकताना अंग थरारून येत असे. वाघ पाण्यामधून जाताना त्याच्या शेपटीच्या फटकार्‍याने उडवलेल्या पाण्याचे चित्रण करण्यासाठी किती वेळ दबा धरून बसावे लागले या आणि अशा कैक गोष्टी ऐकतानाही सर्वांगावर रोमांच उठत असत.

आज उद्धवजी राजकारणात खूप पुढे गेले आहेत. प्रसिद्धीच्या शिखरावर पोचले आहेत. आता तर ते महाराष्ट्र भूमीचे मुख्यमंत्री म्हणून निवडले गेले आहेत. हा आम्हा सर्वांचा गौरवाचा, मानाचा आणि मांगल्याचा क्षण आहे. आता भेटीगाठी देखील दुर्मीळ होतील. त्यांच्या व्यस्त कामातून त्यांना स्वतःलाच वेळ देता येणार नाही. पण येवढे अमाप यश मिळवूनही उद्धव ठाकरे या प्रसिद्धीच्या कळसावर पोहोचलेल्या व्यक्तित्वात तोच उद्धव आहे. त्याच्या नम्र, विनयशील स्वभावाला अन शालिनतेला त्याने किंचितही मुरड घातलेली नाही. अथवा अहंकाराचा दर्प येऊ दिला नाही.स्वतःचे कर्तृत्व, चारित्र्याचे त्याने जतन केले आहे. स्वतःतील माणूस अन कलावंत यांची जपणूक केली आहे. असे म्हणतात की प्रत्येकजण आयुष्यात विद्यार्थीच असतो. उद्धव ठाकरे अजूनही ती भूमिका बजावत असतात. हे केवळ कौतुकास्पदच नव्हे तर अनुकरणीय आहे.

उद्धवजी, आपल्याला आठवतच असेल, सर जे.जे.उपयोजित कला महाविद्यालयात अच्युत पालव यांच्या सुलेखनाच्या प्रदर्शनावेळी आपण दोघेही होतो. त्यावेळी आपण एक आश्वासन सर्वाना दिले होते. ’जर का आमची सत्ता आली, तर या जे.जे.चे नाव मी जगाच्या नकाशावर नेईन’. उद्धवजी ती वेळ आता आली आहे, आपण मूलतः कलाकार आहात. जे.जे. आपली मातृसंस्था आहे. तिचे आधुनिकरण आपल्याच हाताने व्हावे ही कदाचित नियतीची इच्छा असेल. आज केवळ आपल्या हातात सत्ताच नाही तर सत्ताधीश होण्याचे भाग्य आपणास लाभले आहे. महाराष्ट्र आपण सुधारणार याची खात्री आहेच! पण आजवर प्रत्येकाने दुर्लक्षिलेल्या सर जे.जे. कला संस्थेला उर्जितावस्था आपणच प्राप्त करून देऊ शकता. आपल्याला पुढील यशस्वी आणि नेत्रदीपक वाटचालीसाठी आपणास लक्ष लक्ष शुभेच्छा!

-मं.गो.राजाध्यक्ष
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -