घरफिचर्सरंगल्या रात्री अशा ः संगीताचा त्रिवेणी संगम

रंगल्या रात्री अशा ः संगीताचा त्रिवेणी संगम

Subscribe

राजा ठाकूर हेे नामवंत दिग्दर्शक. त्यांच्या डोक्यात या तिन्ही प्रकारांचा संगम घडवायची कल्पना आली. पण अशा या संगीतप्रधान आणि ते संगीतही वेगवेगळ्या प्रकारचे असलेले असे कथानक त्यांना हवे होते आणि अचानक त्यांना रणजीत देसाई यांची आठवण झाली. रणजीत देसाई यांना ही कल्पना आवडली आणि त्यांनी कथा लिहिली. तिच्यावर चित्रपट काढायचे ठाकूर यांनी नक्की केलेे आणि रणजीत देसाई यांनाच पटकथासंवाद लिहायला सांगितले.

मराठी माणसाला कीर्तन आणि तमाशा हा पूर्वीपासूनच प्रिय. त्याची सांस्कृतिक ठेवच आहे ती. एकोणिसाव्या शतकात नाटकांना सुरुवात झाल्यानंतर तो नाटकांचा चाहता बनला. त्यातही तेव्हा संगीत नाटके म्हणजे त्याचा जीव की प्राण. चित्रपटांच्या आगमनानंतर त्यांच्याकडेही ओढा वाढला तरी आधीच्या आपल्या या प्रेमांना रसिक विसरला नाही. सिनेमांबरोबरच हिंदीतील मुजरा, गजल, कव्वाली इ. प्रकारांनीही रसिकांना भुरळ घातली. दादू इंदुरीकर, काळू-बाळू, राधाबाई बुधगावकर इ. तमाशा कलावंत; केशवराव भोसले, बालगंधर्व, दीनानाथ मंगेशकर असे नाट्य कलाकार आणि बेगम अख्तर, मेहदी हसन, गुलाम अली असे गजल गायक इत्यादींनी प्रेक्षकांना जिंकले. नाट्य संगीताला तर शास्त्रीय संगीताच्या बैठकींमध्ये खास स्थान मिळू लागले. साधारण सर्वांनाच हे सर्व प्रकार आवडत असले तरी वैयक्तिक पसंती वेगवेगळी असते. तशी ती असणारच. पण त्यावरून दुसर्‍या प्रकाराला नावे ठेवली जात नाहीत. उलट कुणी आग्रह केला तर त्या प्रकारांनाही हजेरी लावली जाते आणि भरभरून दाद दिली जाते. चित्रपटांतही त्यांना मानाचे स्थान मिळते, हे ओघानेच आले. कारण प्रेक्षकांची नाडी रुपेरी पडदावाल्यांना ठाऊक असते. फक्त तिच्यावरून परीक्षा बरोबर व्हायला हवी. तसे झाले की, चित्रपटाला हमखास यश मिळते, याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे.

- Advertisement -

राजा ठाकूर हेे नामवंत दिग्दर्शक. त्यांच्या डोक्यात या तिन्ही प्रकारांचा संगम घडवायची कल्पना आली. पण अशा या संगीतप्रधान आणि ते संगीतही वेगवेगळ्या प्रकारचे असलेले असे कथानक त्यांना हवे होते आणि अचानक त्यांना रणजीत देसाई यांची आठवण झाली. रणजीत देसाई यांना ही कल्पना आवडली आणि त्यांनी कथा लिहिली. तिच्यावर चित्रपट काढायचे ठाकूर यांनी नक्की केलेे आणि रणजीत देसाई यांनाच पटकथासंवाद लिहायला सांगितले. प्रत्येक प्रकारच्या संगीतासाठी वेगळ्या संगीत दिग्दर्शकाची निवड करण्यात आली आणि त्या त्या प्रकारातील अव्वल असे वसंत पवार, छोटा गंधर्व आणि दत्ता डावजेवर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. पार्श्वगायन खुद्द छोटा गंधर्व, आशा भोसले आणि सुलोचना चव्हाण यांचे. संगीतप्रधान चित्रपट असल्याने त्यात बरीच साधारण अकरा गाणी होती. (खरे तर त्याकाळी तेवढी गाणी साधारण असायचीच. चार दोन इकडे तिकडे. पण आजच्या काळात ती जास्त वाटतात.)

तमाशा जास्तीत जास्त खरा वाटावा यासाठी राधाबाई बुधगावकर यांचा फडच कामावर ठेवण्यात आला होता. नायक यशवंत म्हणून अरुण सरनाईक, नायिका राधा-सीमा, नायकाचा जिवलग मित्र लख्या म्हणून वसंत शिंदे, नाट्य कलाकार आणि कंपनीचे मालक श्रीरंग ऊर्फ नाना-शाहू मोडक, सारंगिया दादूमियाँ म्हणून शरद तळवलकर, कोठीवाली गायिका छबेलीबाई म्हणून मिनू मुमताझ अशी प्रमुख पात्रयोजना झाली आणि प्रत्येकानेच आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला. नायकाच्या तोंडी गाणे नाही; पण नानांच्या तोंडी सारी नाट्यगीते आणि शेवटचा अभंग ‘पतीत पावन नाव ऐकुनी’ ही गाणी आहेत. खेबुडकरांच्या ‘तरुणपणाचं कौतुक म्हणून मी किती नटू, तुमचा नि माझा एक काढा फोटु; नावगाव का हो पुसता, आहे मी कोल्हापुरची, मला म्हणतात हो लवंगी मिरची’ या लावण्या आजही लोकांच्या ओठांवर आहेत. छटा गंधर्व यांची गीते हे नाट्य रसिकांसाठी खास आकर्षण होते तीच गोष्ट मीनू मुमताझच्या तोंडच्या गाण्यांची.

- Advertisement -

चित्रपटाची सुरुवातच राधाबाई बुधगावकर यांच्या तमाशा बारीनं होते. सुरुवातीच्या छेडाछेडीनंतर नाच करण्याची फर्माईश होते तेव्हा ती नर्तकी म्हणते मी नाचीन पण ढोलकीवाला कुठं हाये? आणि हा काय असे लख्या म्हणतो आणि यशवंत रंगमंचावर येतो. प्रेक्षकांची प्रचंड दाद पाहूनच त्याची लोकप्रियता कळते आणि लावणीबरोबर चित्रपट रंगत जातो. त्या प्रयोगाच्या वेळी राजवैभव नाटक कंपनीचे मालक-नट नाना आलेले असतात आणि ते यशवंताच्या ढोलकीवर खूश होतात. ते त्याला त्यांच्या कंपनीत येण्याचे आमंत्रण देतात. तो त्यानुसार तेथे जातो, तेव्हा तेथे रियाझ सुरू असताना नाना आज गाणे जमत नाही म्हणतात, त्यावर तेथे आलेला यशवंत ताल बदलून बघा असे सुचवतो. त्यावर जुना तबलजी रागावतो. पण नाना यशवंतला साथीला बसवतात आणि गाणे रंगते. सारंगिया दादूमियाँबरोबर यशवंतची दोस्ती जुळते. यशवंत तबलजी म्हणून कंपनीत राहातो. त्याच्या आगमनामुळे आणि स्वतःचे महत्त्व राहणार नाही म्हणून भांडून जुना तबलजी सोडून जातो. दौरे करत कंपनी मुंबईत येते. तेथेही प्रचंड यश मिळते. दरम्यान एकदा तो गावी जातो आणि लख्याच्या आग्रहाखातर तमाशातही ‘मला हो म्हणतात लवंगी मिरची’ या लावणीच्या साथीला ढोलकी वाजवतो. राधा त्याला तो आता बाप होणार असे सांगते. तो परतच जात नाही म्हणतो; पण ती त्याला जायला सांगते. इथे मी आईला बोलावले शिवाय लख्याभाऊजी आहेतच काळजी घ्यायला, असे म्हणून त्याची समजूत काढते.

मुंबईला परत आल्यानंतर एकदा नाटकाच्या प्रयोगानंतर तो झोप लागत नाही, म्हणून तळमळत बिछान्यावर पडलेला असताना, दादूमियाँ त्याला गाणे ऐकायला कोठीवर चल म्हणतात. सुरुवातीला तो आढेवेढे घेतो. पण तेथे एकदा गाणे ऐक तर म्हणून दादूमियाँ त्याला तयार करतो. तेथे कोठेवाली त्याच्यावर खूश होते. तोही तिच्या प्रेमात पडतो. त्यानंतर अर्थातच तेथेच त्याचा जास्तीत जास्त वेळ जात असतो. तिच्या प्रेमात वेडा झालेला असल्यामुळे यशवंत मुलगी झाल्याची तार आल्यानंतरही कामाचे निमित्त करून गावी घरी जात नाही. नाना मात्र या बातमीमुळे कंपनीत पेढे वाटतात. नाटक कंपनीकडे दुर्लक्ष होऊ लागते. नानांच्या ध्यानात ही बाब आणून देण्यात येते. तरीही यशवंत नाटकाच्या वेळेवरही जात नाही आणि अखेर त्याला कंपनीतील नोकरी गमवावी लागते.

दरम्यान, नाना कोठेवालीच्या गाण्याला येत असतात आणि ती त्यांच्यावरही भूल टाकते. त्यांची ही जवळीक पाहून यशवंत रागावतो. तिला हे बरोबर नाही वगैरे सांगायला लागतो. पण ती त्याला तू माझ्यावर हक्क गाजवू नकोस असे ठणकावून सांगते. त्याला त्यावर काहीच बोलता येत नाही आणि कोठेवालीचा राग त्याला येतो. तो दारूच्या आहारी जातो. आपल्या हातात आता कला उरलेली नाही म्हणून निराश होऊन मद्यपी बनतो. त्याची घसरण चालूच राहते. तिकडे कंपनीत नाना आता तबल्याच्या साथीला यशवंत नाही. त्यामुळे गायला मजा येत नाही, असे सांगून कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतात. देवाच्या कृपेने मी खूप कमावले आहे, आता गाण्यातून त्याचीच सेवा करीन असे ठरवतात. दादूमियाँ यशवंतचा शोध घेत असतो. त्याला तो जात असताना रेल्वे पुलाजवळ गर्दी दिसल्याने तो डोकावतो व कोण पडले आहे, ते पाहतो. तेथे यशवंतच पडलेला असतो. अशा प्रकारे अचानक त्याला यशवंतचा शोध लागतो; पण त्याची पार दैनावस्था असते आणि तो आजारीही असतो.

शेवटी कोठेवालीच त्याला आसरा देते, सांभाळ करते. तेथे दादूमियाँकडे तो नानांची चौकशी करतो. दादूमियाँ त्याला घेऊन नाना देवळात पतीत पावन नाव ऐकुनी… हा अभंग गात असतात तेथे नेतात. तेथे ते त्याला उपदेशाचे चार शब्द सांगतात. तो त्यांचा परत घरी जाण्याचा सल्ला मान्य करतो आणि निघतो. तोच नाना त्याला अडवतात आणि साथीला बसायला लावतात. ‘पतीत पावन नाव ऐकुनी आलो मी दारा, पतीत पावन न होसि म्हणुनी जातो माघारा’ हा अभंगच पुढे सुरू करतात. तोही खुशीत बसतो आणि आपली कला अद्यापही जिवंत आहे हे त्याला कळते. पार्श्वभूमीवर अभंग सुरूच राहतो. घरी मुलगीच त्याचे स्वागत करते आणि आईला बोलावते. ते काय बोलायचे हे सुचत नसल्याने केवळ एकमेकांकडे बघत राहतात. राधा मुलीला लख्यामामाला बोलावून आणायला सांगते आणि ते एक-दुसर्‍याच्या मिठीत जातात. चित्रपट संपतो. प्रेक्षकांवर त्याचा चांगलाच प्रभाव पडतो.

आधीच सांगितल्याप्रमाणे कलाकारांनी आपल्या भूमिकांना पूर्ण न्याय दिला आहे. अरुण सरनाईकने आधीचा उत्साही आणि नंतर निराश आणि अपयशाने घेरलेला यशवंता अचूक दाखवला आहे, सीमाची भूमिका लहान असूनही लक्षात राहते. शाहू मोडक यांना मोठी भूमिका आहे आणि नाटकांतील पदांच्यावेळीही त्यांनी योग्य अभिनयाची जोड दिली असल्याने ती अधिकच रंगतदार झाली आहे. शरद तळवलकर यांनी दादूमियाँ संस्मरणीय केला आहे. मिनू मुमताझने कोठेवाली तिच्या नेहमीच्या ढंगात सादर केली आहे आणि अर्थातच त्यात तिचा प्रभाव पडला आहे, विशेष म्हणजे भावनोत्कट प्रसंगही तिने छान खुलवून आपण अभिनयातही कुठे कमी नाही, हे सिद्ध केले आहे. तर विनोदमूर्ती वसंत शिंदे यांनी नेहमीप्रमाणे खुमासदार प्रसंग छान रंगवले आहेतच; पण गंभीर प्रसंगातही आणि कुठेच कमी पडत नाही, हे सिद्ध करून दाखवले आहे. इंदिरा चिटणीस छोट्याशा भूमिकेत नेहमीचा ठसका दाखवतात, तसे सालोमालो भागवत हेही जुन्या तबलजीचा तोरा लक्षणीय करतात.

राजा ठाकूर यांचा हा वेगळा प्रयोग. पण तो त्यांनी शिताफीने हाताळलेला आहे. चांगली कथा आणि कलाकारांची आणि साथीदारांची योग्य निवड हे त्याचं रहस्य. संगीत तर त्या त्या प्रकारातल्या दर्दींचं. त्यामुळे तक्रारीला जागाच नाही. गाणीही अशी जमली आहेत की पुन्हा ऐकावीशीच वाटतात. नाट्यसंगीतही थोडक्यात न आटोपता खर्‍या प्रयोगाप्रमाणे सविस्तर घेतले आहे, त्यामुळे छोटा गंधर्व आणि शाहू मोडक या दोघांनाही आपले कसब दाखवायला चांगली संधी मिळाली आहे. एक गोष्ट मुद्दाम नोंदवायला हवी. उस्ताद अल्लारखाँ यांचे तबलावादन योग्य प्रकारे वापरण्यात आल्याने ते पूर्ण समाधान देते. उगाचच थोडा वेळ देऊन बंद केलेले नाही, त्यामुळे मनमुराद आस्वाद घेता येतो. अशा या रंगलेल्या रात्री. संगीताच्या त्रिवेणी संगमाचा समृद्ध अनुभव देऊन जातात.

-आ. श्री. केतकर.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -