घरफिचर्सपुरेशी झोप उत्तम आरोग्याचे रहस्य

पुरेशी झोप उत्तम आरोग्याचे रहस्य

Subscribe

शरीरस्वास्थ्याचा विचार करता, अवेळी झोप घेणे, फार वेळ झोपणे व कमी वेळ झोपणे या तीनही गोष्टी शरीराचे आरोग्य बिघडवतात. अवेळी झोप घेणे म्हणजे दुपारी जेवल्यानंतर झोपणे किंवा रात्री उशिरा झोपणे. दिवसा जेवल्यानंतर झोपणे याला आयुर्वेदाने ‘दिवास्वाप’ ही संज्ञा दिली आहे.

आयुर्वेदाने आहार, निद्रा व ब्रह्मचर्य या तीन घटकांना शरीररूपी इमारतीला धारण करणारे त्रयोपस्तंभ मानले आहे. या तीन उपस्तंभाचा शरीरस्वास्थ्य रक्षणात पर्यायाने कॅन्सरसारख्या व्याधीप्रतिबंधात महत्त्वाचा सहभाग असतो. यापैकी मागील लेखात आपण आहार या उपस्तंभाची सविस्तर माहिती जाणून घेतली. आजच्या लेखात आपण निद्रा या आधारभूत उपस्तंभाबद्दल जाणून घेणार आहोत.

- Advertisement -

निद्रा किंवा झोप ही आपल्या सर्वांच्याच आवडीची गोष्ट. शरीराचे व मनाचे आरोग्य टिकवण्यासाठी या झोपेची अत्यंत आवश्यकता असते. रात्री १०.०० ते १०.३० च्या दरम्यान गाढ झोप लागून पहाटे ५.३० ते सकाळी ६.०० च्या दरम्यान आपोआप जाग येणे ही स्वाभाविक झोप होय.

वयानुसार झोपेचा विचार करीत असता, लहान मुलांमध्ये बारा ते वीस तास झोप दिसून येते. ही झोप त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी अत्यावश्यक असते. मध्यम वयात साधारणत: सहा ते आठ तास झोप पुरेशी असते. वृद्धापकाळात शरीरात स्वभावत: वात दोष वाढला असल्याने कमी झोप व निद्रानाश ही समस्या दिसून येते.

- Advertisement -

आयुर्वेदाने निद्रेस अधारणीय वेगात म्हणजेच धारण करण्यास अयोग्य अशा नैसर्गिक क्रियेत अंतर्भूत केले आहे. झोप आल्यास न झोपता झोपेची संवेदना अडवून ठेवल्यास जांभया येणे, अंग दुखणे, डोळ्यावर झापड येणे, डोके जड होणे या तक्रारी उद्भवतात.

शरीरस्वास्थ्याचा विचार करता, अवेळी झोप घेणे, फार वेळ झोपणे व कमी वेळ झोपणे या तीनही गोष्टी शरीराचे आरोग्य बिघडवतात. अवेळी झोप घेणे म्हणजे दुपारी जेवल्यानंतर झोपणे किंवा रात्री उशिरा झोपणे. दिवसा जेवल्यानंतर झोपणे याला आयुर्वेदाने ‘दिवास्वाप’ ही संज्ञा दिली आहे. दिवास्वापामुळे शरीरातील कफ दोषाची वाढ होऊन डोकेदुखी, पडसे, शरीराला जडपणा, भूक मंदावणे या तक्रारी निर्माण होतात. म्हणूनच आयुर्वेदाने दिवसा झोप घेणे अयोग्य म्हटले आहे. अपवाद आहे तो फक्त ग्रीष्म ऋतूचा! ग्रीष्म ऋतूत (मे ते जून महिने) रात्र लहान असल्यामुळे व हवेतील रुक्षता स्वभावत:च वाढल्यामुळे दिवसा झोपणे हितकारक आहे. तसेच वृद्ध व्यक्ती, बालके, अशक्त व्यक्ती यांनीही दिवसा झोपल्यास हरकत नाही. यामुळे त्यांच्या शरीराला विश्रांती मिळाल्याने थकवा दूर होतो व शरीराचे पोषण होते. दुपारी जेवल्यानंतर झोप अनावर होत असल्यास खुर्चीत बसून डुलकी काढणे श्रेयस्कर. शिफ्टड्युटी तसेच रात्रपाळीत काम करणा-यांनी दिवसा झोप घ्यायची असल्यास दुपारी जेवणापूर्वी झोपावे.

सध्याच्या आधुनिक जीवनशैलीत बरेचदा रात्री उशिरापर्यंत जागरण करण्याची सवय आढळते. रात्री जागरण करणे किंवा रात्री उशिरा झोपणे हेदेखील शरीरास अपायकारक आहे. रात्रीच्या जागरणामुळे शरीरातील रुक्षता वाढते. त्यामुळे दिवसभर चिडचिड, अनुत्साह जाणवतो. रात्री उशिरापर्यंत चित्रपट, टी.व्ही मालिका, मॅच पहाणे , कॉप्युटरवर काम करणे इ. गोष्टी टाळाव्यात.

जास्त प्रमाणात झोप घेणे हे देखील शरीरस्वास्थ्याच्या दृष्टीने अहितकर आहे. यामुळे शरीरात कफाची अतिरिक्त वाढ होऊन मेदाची संचिती होते. शरीराला जडपणा येऊन आळस व अनुत्साह निर्माण होतो. अतिस्थूलतेसारख्या तक्रारी निर्माण होतात. यासाठी आहारात लाह्या, मूग व मसूर डाळीचे कढण, भाज्यांचे सूप यासारखे पचनास हलके पदार्थ घ्यावेत. नेहमीपेक्षा अर्ध्या मात्रेत घनाहार घ्यावा. आहारात कडू, तिखट व तुरट चवीचे पदार्थ अधिक असावेत. अधिक गोड पदार्थ, वडा,भजी, सामोसा, पुरी यासारखे तेलकट पदार्थ, रबडी, मिठाई,पेढे इ. दुग्धजन्य पदार्थ कटाक्षाने टाळावेत. वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचकर्म चिकित्सा करावी. रोज सकाळी चालणे, सूर्यनमस्कार यासारखे व्यायाम तसेच योगशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगासने फायदेशीर ठरतात.

आज झोपेबाबत आढळणारी प्रमुख समस्या म्हणजे निद्रानाश. निद्रानाशामुळे शरीराचे व मनाचे आरोग्य बिघडते. निद्रानाशाची तक्रार असणा-यांनी झोपेच्या गोळ्यांची सवय करून घेऊ नये. त्याऐवजी आहारात

विशेषत: म्हशीचे दूध, लोणी, तूप, बासुंदी यासारखे पदार्थ ठेवावेत. तसेच साठीसाळी तांदुळाचा भात, गूळ, साखर, पीठ व गुळापासून तयार केलेले पदार्थ, उडदाचे पदार्थ आहारात अधिक असावेत. रात्रीच्या जेवणात, पांढर्‍या कांद्याची, म्हशीच्या दुधापासून केलेल्या दह्याची कोशिंबीर, वांग्याचे भरीत असावे. मांसाहारी व्यक्तींनी रात्रीच्या जेवणात मांसरसाचा (चिकन सूप, मटण सूप) समावेश करावा. संपूर्ण शरीरास किंचित कोमट केलेल्या तेलाने मालिश करावे. नंतर सुगंधी द्रव्यांचे उटणे लावून सुखोष्ण पाण्याने स्नान करावे. विशेषत: डोके व तळपायांना नियमित मालिश करावे. तळपायांना तेल वा तूप लावून काशाच्या वाटीने चोळल्यास डोळ्यांचा थकवा कमी होऊन शांत झोप लागण्यास मदत होते. कानात तेल घालावे. डोळ्यावर दुधाच्या घड्या ठेवाव्यात. निद्रानाशामागे मानसिक ताण हे कारण असल्यास मनाला आल्हाददायी असे सुमधुर संगीत ऐकावे. मनाला प्रिय वाटणार्‍या वाचन इ. गोष्टी कराव्यात. मनावरचा ताण कमी करणारी शवासनासारखी आसने करावीत. एखाद्या रोगामुळे निर्माण झालेल्या अस्वास्थ्याने किंवा वेदनेने निद्रानाश झाला असेल तर वैद्यांकडून रोगाची चिकित्सा करुन घ्यावी.

अशाप्रकारे योग्य प्रकारे, योग्य वेळी व योग्य प्रमाणात घेतलेली झोप शरीराचे बल वाढविणारी, आरोग्यदायी व स्वास्थ्यरक्षक ठरते.

-वैद्य स. प्र. सरदेशमुख
-ए. व्ही. पी., पीएच्. डी. (आयुर्वेद)
-संचालक, इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, वाघोली, पुणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -