घरफिचर्स‘गुल' मोहरलेला उन्हाळा !

‘गुल’ मोहरलेला उन्हाळा !

Subscribe

धगधगत्या उन्हाळ्यात गुलमोहर आणि बहावा असे अफाट कसे फुलतात ना ! झाड ही एक अत्यंत हुशार प्रजाती आहे. फुलांचा बहर ही झाडाची जाहिरात असते फक्त. आपापल्या जगण्याचा एकेकाचा धर्म असतो. जेव्हा झाडांचा धर्म फुलणं असतो तेव्हा झाडं हा धर्म फारच प्रामाणिकपणे निभावतात.

आपल्याकडचा लांबलचक उन्हाळा सुसह्य करायला काही गोष्टी निसर्गात असतात. चैत्रापासून नवीन हिरवीलालस, लसलसती बाळपालवी लेऊन हजारो हात हलवत बोलवणारा पिंपळ असतो. पाठीमागून येतात गुलमोहर आणि सोनमोहर (बहावा) आणि नीलमोहर(जॅकरांडा). परवाच रणरणत्या उन्हात रस्त्यावरून भटकताना एक गुलमोहर आणि एक बहावा एकमेकांना लगटून उभे असलेले दिसले. लख्ख सोनसळी आणि लालकेशरी प्रकाशाने सावली रंगीत झाली होती. आभाळाच्या तुकड्यात या दोन झाडांचा रंगोत्सव सुरू होता. चमचमत्या पिवळ्या आणि लालकेशरी रंगाच्या वस्त्रांत लपेटलेल्या दोन देवताच जणू उभ्या असाव्यात आणि साधकाने त्यांच्या सौंदर्याची नजरेनेच पूजा बांधावी. ही अशी साधना करायला मला फार आवडतं. मग मी दुचाकी चार क्षण गुल्लूच्या सावलीखाली थांबवून डोळ्यांनी हे सौंदर्य पिऊन घेतलं. गुलमोहराला मी प्रेमाने ‘गुल्लू’ म्हणते. तर, ‘गुल्लू’ला बघून सहजच शब्द स्फुरले,

- Advertisement -
Gulmohar
बहरलेला गुलमोहर

गुलमोहर
लालशेंदरी
धमाल पिवळे ऊन
जिवंत होऊन
आलेले समोर
हात पसरून उभे
सर्वांगाने
कवेत घ्यायला
आणि
एक-एक
पाकळी होऊन निःसंग ढळायला
तू…तलम अग्नीची पातच जणू , गुलमोहरा ! 

कायम पुण्यासारख्या शहरात राहिले तरी दौंड आणि उरुळी कांचन या दोन गावांमध्ये लहानपणीच्या अनेक सुट्ट्या घालवल्या. त्यामुळे झाडं ओळखीची झाली. दुर्गा भागवतांचं ‘ऋतुचक्र’ वाचल्यावर एक विलक्षण समाधान लाभलं. पुढे चित्रं काढू लागल्यावर झाडांनी झपाटून टाकलं. एका झाडात अनेक चित्रांच्या शक्यता दडलेल्या असतात हे जाणवत राहिलं. लहानपणी मावशीकडे उरूळीकांचनला उन्हाळ्यात जायचे तेव्हा कॉलनीतल्या रस्त्यावर गुलमोहराची अनेक झाडं असायची. झाडाचा स्वत:चा एक खास स्पर्श असतो. खोडाची त्वचा खरबरीत जाड लागते. ‘गुल्लू’ची फुलं सहजी खाली गळून पडणारी. त्या पाकळ्यांच्या खालच्या नख्या बोटांवर लावून आम्ही लहान मुलं एकमेकांना घाबरवत असू. या फुलांना चार लालचुटूक पाकळ्या असतात आणि एक पाकळी मात्र पांढरी आणि लाल अशी नक्षीदार असते. चार पाकळ्या राण्या आणि पांढरी नक्षीदार पाकळी म्हणजे राजा असं कुणीतरी सांगितलं. या असल्या गोष्टी माणसाच्या पिल्लांना कोण शिकवतं कोण जाणे. ‘राणी का राजा?’ असं काहीतरी ठरवून ती पाकळी खायची असे. ‘डेलोनिक्स रेजिया’ असं इंग्रजी नाव असणारा गुलमोहर अजून एक नाव मिरवतो; फ्लेम ट्री. अगदी यथायोग्य नाव आहे. अग्नीच्या पातीचं झाड. गुलमोहर हा विश्वाचा नागरिक आहे. काही ठिकाणी त्याच्यावर गाणीही रचली गेली आहेत. एका दंतकथेनुसार येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढवलं तेव्हा लगतच्या एका झाडाच्या फुलांवर त्याचं रक्त पडलं आणि तेव्हापासून त्या झाडाची फुलं अशी धारदार रक्तवर्णी झाली. ते हेच गुलमोहराचं झाड होतं….
धगधगत्या उन्हाळ्यात गुलमोहर आणि बहावा असे अफाट कसे फुलतात ना ! झाड ही एक अत्यंत हुशार प्रजाती आहे. फुलांचा बहर ही झाडाची जाहिरात असते फक्त.
या तीव्र उन्हाळ्यात हा उष्ण रंगांचा उत्सव माणसाला फार सुखावतो .
सूर्याच्या सहस्त्र किरणांनी मऊ , मुलायम, लोलकांचं नाजूक रूप घेतलं की होतो अमलताश म्हणजे बहावा. त्याचे सुरेख पिवळेधम्म लोलक आकर्षित करतात. ‘कॅशिया फिश्चुला’ असं इंग्रजी नाव असणारा बहावा ‘गोल्डन रेन ट्री’ या रोमँटिक नावानेही ओळखला जातो. बहावा अस्सल भारतीय उपखंडाचा निवासी आहे. ‘अमलताश’ असं देखणं उर्दू नाव तो मिरवतो. उर्दू भाषेच्या नजाकतीला हे साजेसंच आहे. याचं संस्कृत नाव ‘अरग्वदवृक्ष’.
या भारतीय उन्हाळ्यात अंगावरचं एकही पान न ठेवता भन्नाट फुललेला सोनसळी बहावा पाहिला की ‘सोनेरी पावसाचं झाड’ असं त्याचं नाव योग्य आहे हे जाणवतं. संपूर्ण फुललेल्या अमलताशचं सौंदर्य इतकं अपरंपार असतं की अवघ्या शरीराचे डोळे व्हावेत आणि ते सौंदर्य पिऊन टाकावं असं वाटतं. मग आपसूक शब्द येतात,
बहावे

- Advertisement -

 

cassia-fistula-golden-shower-tree-bahava
बहावा

ओल्या तप्त
लख्ख कठोर
उन्हाचे वितळले थेंब
एक एक पाकळीतून
जिवंत, लोभस, सोनेरीपिवळा रंगअंगी
ते गर्द सोनसळे उन्हाळे
झाले त्यांचे बहावे
वहावे … बहावे

ताम्हण याच काळात फुलतो. हा सुंदर गुलाबीजांभळट फुलांचा वृक्ष आहे. ताम्हण महाराष्ट्राचं राज्य पुष्प आहे. पलाश म्हणजे पळस लालभडक फुलांची ज्वाला उमलवत धगधगत असतो. पण पळस तसा गावाबाहेर अधिक दिसणारा वृक्ष. त्याच्या सोबतीला काळसरलाल फुलं असणारी काटेसावरही सोबतीला असते . बरेचदा शहरांत मात्र गुलमोहर आणि बहाव्याचं साम्राज्य असतं. अधूनमधून रंगसंगतीत बदल म्हणून ताम्हण आणि जॅकरांडा असतात. जॅकरांडा हा फिकट जांभळ्या रंगाचा आविष्कार आहे. जांभळा आणि हिरवा ही रंगसंगती अतिशय सुखद दिसते हे निसर्गालाही पटलेलं असावं. जॅकरांडाला मराठीत नीलमोहर म्हणावं, छान वाटतं. हा जॅकरांडाही जगाचा नागरिक आहे. या मोसमात उग्रगोड मोहरलेल्या, कैऱ्यांनी लगडलेल्या आम्रवृक्षावर तर लिहावं तितकं कमीच आहे.
आता माणूस विरुद्ध निसर्ग अशी विभागणी झालेली असली तरी माणूस हा शेवटी निसर्गाचाच एक भाग. सृष्टीतील बदल माणसावरही परिणाम करतात. आपण राहतो त्या परिसरातील झाडं आपल्याला आपलीशी वाटायला हवीत. निसर्गाचा हा साजशृंगार, निसर्गाची ही चित्रकला, निसर्गाची ही शिल्पकला. निसर्गाची ही इन्स्टॉलेशन्स झाडांमध्ये ठळक दिसतात. फक्त पाहायची नजर हवी. कुठल्याही फुलांचं सौंदर्य तर सहजी नजरेत भरतंच; पण नीट पाहिलं तर अतिरेखीव आणि नाजूक अशी गुलमोहराची पानंही किती सुंदर आहेत हे दिसतं. बहाव्याच्या बहरातून घट्ट लांबलचक, मळकट हिरव्या आणि नंतर गडद चॉकलेटी होणाऱ्या शेंगा तयार होतात. या शेंगांचाचा स्पर्शही सुखावणारा असतो. खोडांची स्पर्शसुख देणारी शिल्पं हात लावूनच अनुभवायची असतात. कुणीच न ठरवता गुल्लू आणि बहावा शेजारी उभे राहून भरगच्च फुलतात तेव्हा ते एक अप्रतिम देखणं इन्स्टॉलेशन असतं. आपापल्या जगण्याचा एकेकाचा धर्म असतो. जेव्हा झाडांचा धर्म फुलणं असतो तेव्हा झाडं हा धर्म फारच प्रामाणिकपणे निभावतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -