घरफिचर्सउन्हाळ्यातल्या साठवणी...

उन्हाळ्यातल्या साठवणी…

Subscribe

उन्हाळ्यात वाढती उष्णता आपल्याला जाचक ठरते तशी ती संपूर्ण जीवसृष्टीसाठीच कसोटी ठरते. पाणवठे आटतात, वणवे पेटतात, जणू आगडोंब उसळतो. पण अस्तित्व टिकवण्याचं आव्हान कसं पेलायचं हे निसर्गाने प्रत्येकाला शिकवलं आहे. त्यामुळेच एकीकडे अग्निकुंड धगधगत असताना दुसरीकडे आगामी पर्जन्यकाळाच्या पार्श्वभूमीवर हे विश्व सर्जनाच्या, नवी पिढी जन्माला घालण्याच्या तयारीत गुंग असतं…

निसर्गाचा समृद्ध खजिना रिता होत असताना जैवविविधता जपणं ही तुम्हा-तुम्हा सर्वांचीच जबाबदारी आहे. जागतिक जैवविविधता दिनाच्या निमित्ताने प्रत्येकानं या गोष्टीची दखल घ्यायला हवी. जगातल्या 21 देशांमध्ये अधिक प्रमाणात जैवविविधता असल्याची नोंद आहे. अशा देशांना ‘मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्रीज’ म्हणून ओळखलं जातं. या यादीतील देशांमध्ये भारताचा अकरावा क्रमांक असणं ही आपल्यासाठी अभिमानाची बाब म्हणावी लागेल. इथल्या जैवविविधतेचं प्रमाण एकूण विविधतेच्या आठ टक्के इतकं आहे. पण भारतातील सगळ्या भागांत ही विविधता सारख्या प्रमाणात आढळते असं नाही. मुख्यत: ईशान्येकडील राज्यं, पश्चिम घाट आणि अंदमान-निकोबार ही ठिकाणं जैव विविधतेच्या दृष्टीने संपन्न आहेत. निसर्गातलं हे वैविध्य टिकून रहावं, या प्रती सजगता निर्माण व्हावी या उद्देशाने दर वर्षी जागतिक जैवविविधता दिन साजरा केला जातो. त्यामुळे प्रत्येकानेच हे महत्त्व जाणून निसर्गाच्या समीप जाण्याचा, निसर्गरक्षणाचा प्रयत्न करायला हवा.
मी निसर्ग अगदी जवळून अनुभवतो.

- Advertisement -

वर्षाच्या वेगवेगळ्या काळात त्याची वेगवेगळी रुपं समोर येतात. ती निरखणं, त्याचा अभ्यास करणं हे कामदेखील अत्यंत रंजक ठरतं. आपल्याकडे साधारणत: जानेवारीच्या अखेरपासून वातावरण बदलायला लागतं. थंड वारे उबदार होऊ लागतात. मार्चपासून उन्हाळा तीव्र होतो. पण गेल्या दहा वर्षांमध्ये फेब्रुवारीच्या अखेरपासूनच तापमानात वाढ होताना दिसत आहे. स्वाभाविकच वनस्पती आणि प्राण्यांच्या जीवनचक्रावर याचा परिणाम दिसून येत आहे. उदाहरण घ्यायचं तर पळस साधारणत: जानेवारीअखेर फुलतो. पण, यंदा फुललेला पळस डिसेंबरच्या अखेरीसच दृष्टीस पडला. एका बाजूला काही वनस्पतींची फुलं लवकर फुललेली दिसतात तर काही वनस्पतींबाबत मात्र एकदम उलटा अनुभव येतो. डिसेंबरमध्ये नाताळच्या सुट्ट्या असतात. या काळात ट्रिप घेऊन मी बरेचदा फणसाड अभयारण्यात गेलो आहे. तिथे डिसेंबरची अखेर ते जानेवारीचा मध्य या काळात अंजनी वृक्ष फुललेला पहायला मिळतो. या वृक्षावर अतिशय सुंदर दिसणारी जांभळ्या रंगाची फुलं लगडतात. पण यंदा हा वृक्ष मोठ्या प्रमाणात फुललेला दिसला नाही. मात्र अलिकडेच मी ताम्हिणी प्लस व्हॅली परिसरात गेलो होतो. त्या ठिकाणी मात्र या रणरणत्या उन्हात अंजनी वृक्ष फुललेला पहायला मिळाला. हा बदल नोंद घेण्याजोगा म्हणायला हवा. असेच बदल पशुपक्ष्यांच्या वागणुकीमध्येही पहायला मिळत आहेत.

मी डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांमध्ये ‘लिटल रण ऑफ कच्छ’ आणि ‘ग्रेटर रण ऑफ कच्छ’ या ठिकाणी सहली घेऊन गेलो होतो. यापूर्वीच्या सहलींमध्ये या महिन्यांमध्ये तिथे हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो पहायला मिळायचे. दर वर्षी मी ते पहात आलो आहे. मात्र या वर्षी ‘लिटल रण ऑफ कच्छ’ मध्ये केवळ 50 ते 100 फ्लेमिंगोंचा एक थवा बघायला मिळाला. ‘ग्रेटर रण ऑफ कच्छ’मध्ये तर एकही फ्लेमिंगो बघायला मिळाला नाही. हे पक्षी पाकिस्तान सीमेजवळील ग्रेटर रणच्या परिसरात अंडी घालायला जातात. दर वर्षी साधारणत: मार्चच्या मध्यात अथवा अखेरीस ते तिथे जातात. पण यंदा ते फेब्रुवारीच्या अखेरीस तिकडे गेल्यामुळे त्यांचं दर्शन होत नसल्याचं स्थानिक मार्गदर्शकांनी आम्हाला सांगितलं. फ्लेमिंगोंच्या सवयींमध्ये अचानक असे बदल का झाले, याविषयी घाईघाईने अंदाज व्यक्त करता येणार नाही. सलग दोन-तीन वर्षं निरीक्षण केल्यानंतरच आपण ठोस निष्कर्षाप्रत येऊ शकू. मात्र, वन्य जीवनावर हवामान बदलाचे छोटे-मोठे परिणाम होत आहेत याची गांभीर्याने नोंद घेण्याची वेळ आता आला आहे.

- Advertisement -

उन्हाळ्यात सगळीकडे रणरण असते. जंगलही याला अपवाद नाही. मात्र वाढती उष्णता हा भाग बाजूला ठेवला तर जंगलामध्ये प्राणी आणि पक्षांचं दर्शन घडण्याचा हाच हमखास काळ आहे. या काळात जंगलामधील छोटे पाणवठे आटलेले असतात. ठराविक मोठ्या पाणवठ्यांमध्येच पाणी शिल्लक असतं. प्राणी आणि पक्ष्यांना तहान भागवण्यासाठी दिवसातून एकदा तरी या पाणवठ्यांना भेट देणं गरजेचं ठरतं. त्यामुळेच या काळात त्यांच्या दर्शनाची शक्यता वाढते. उन्हाळ्यात एका बाजूला अन्नाची कमतरता असते तर दुसरीकडे येऊ घातलेल्या पावसाळ्यामध्ये अन्नाची उपलब्धता वाढणारही असते. पावसाळ्यात नवी पिढी जन्माला आल्यास त्यांच्या अन्नाचा प्रश्न सुटणार हे निसर्गाने या मुक्या जीवांना शिकवलेलं असतं. म्हणूनच या काळात वृक्ष बीजधारण करून बीजप्रसारणाच्या तयारीला लागलेले असतात. पक्षीगण जोडीदार शोधून पुढच्या पिढीला जन्म देण्याच्या तयारीला लागलेले असतात. म्हणूनच जंगलात जाऊन ही सगळी धांदल अनुभवणं अत्यंत आनंददायी ठरतं.

सध्या जंगलांमध्ये फोटो काढण्याची क्रेझ वाढत आहे. मुख्य म्हणजे मोठ्या कॅमेèयांपासून मोबाईलमधील कॅमेèयापर्यंतचे पर्याय आता उपलब्ध आहेत. पूर्वी केवळ महागड्या लेन्सच्या साह्याने ही दृश्यं चित्रीत करता येत असत. त्यामुळे मोजक्या पर्यटकांना ही संधी मिळायची. पण आता मोबाईलमध्येही चांगल्या क्षमतेचे, दर्जाचे कॅमेरे आल्यामुळे सर्वांना फोटोग्राफीचा आनंद घेता येतो. पण काही वेळा यामुळेच अपघात घडण्याची शक्यता बळावते. अलिकडेच उत्तराखंडातील कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये असा एक अनुभव आला. मी ग्रुप घेऊन तीन दिवसांच्या सहलीसाठी या अभयारण्यात गेलो होतो. इथे दोन जिप्सींमधून आम्ही जंगल सफारीचा आनंद लुटला. कॉर्बेटमध्ये वाघ असला तरी तो दिसणं ही खूप अवघड गोष्ट आहे. जंगलातून वाहणारी रामनदी आणि डोंगरात वसलेलं हे जंगल यामुळे वन्यप्राणी दिसणं तसं अवघड ठरतं. पण, इथे हिमालयातील सुंदर पक्षी मात्र मोठ्या संख्येने दिसतात. मुख्य म्हणजे इथे हत्तींची संख्या बरीच जास्त असल्याने ते सहज दिसतात. हे सगळं माहीत असल्यामुळे वाघ दिसणार नाही, अशी मनाची तयारी करुनच आम्ही आत शिरलो होतो. पण जंगल सफारीच्या पहिल्या अर्ध्या तासातच आम्हाला एका देखण्या वाघानं दर्शन दिलं.

त्यानंतर तिन्ही दिवसांमध्ये आम्हाला वाघांचं दर्शन होत राहिलं. त्यामुळे सगळे आनंदी होते. भराभर फोटो घेत होते. असंच जंगलात फिरत असताना जंगलवाटेच्या कडेला आम्हाला एक हत्तीण दिसली. अगदी जवळून तिचे फोटो काढता आले. फोटो काढण्याच्या नादात वेळेचं भानच हरपलं होतं. हत्तीण पुढे जात होती तसतसे आम्ही तिच्या मागे जात होतो. पर्यटक फोटो घेण्यात गुंग होते. इतक्यात जवळच्या दाट झाडीतून तिचं पिल्लू बाहेर आलं. दरम्यान, आमच्या दोन जिप्सींमध्ये थोडं अंतर पडलं होतं. हत्तीच्या पिल्लाने या दोन वाहनांमधून रस्ता ओलांडला. आता रस्त्याच्या एका बाजूला हत्तीण, दुसऱ्या बाजूला पिल्लू आणि मध्यभागी आमच्या दोन गाड्या अशी स्थिती निर्माण झाली. इतक्यात हत्तीण पिल्लाकडे जाणार याची जाणीव होऊन पुढे असणाऱ्या माझ्या जीपमधील मार्गदर्शकाने चालकाला वेगाने जीप पुढे घेण्याची सूचना दिली. खाणाखुणा करून त्याने मागील जीपच्या चालकालाही तसा इशारा दिला. त्यानुसार आमच्या चालकाने जिप्सी वेगाने पुढे घेतली. पण वेगाने पुढे घेण्याच्या धांदलीत काही तरी गडबड झाली आणि मागची जिप्सी थोडी पुढे येऊन बंद पडली. चालकाने दोन-चारदा प्रयत्न करूनही सुरू होईना. दरम्यान, हत्तीण जिप्सीच्या अगदी जवळ येऊन ठेपली आणि पिलू जवळ असल्यामुळे आमच्यापासून त्याच्या जीवला धोका निर्माण होईल असं वाटून तिने जोरात डोकं खाली केलं आणि जिप्सीला पुढून जोरात रेटा दिला. तिच्या त्या जोरदार धडकेने जिप्सी चांगली 10-12 फूट मागे ढकलली गेली. नशीब बलवत्तर म्हणून ती उलटली नाही आणि हत्तीणीनं पुन्हा हल्ला करण्याचा पवित्रा घेतला नाही. ती वळली आणि शांतपणे पिल्लाकडे गेली. त्यानंतर मायलेकराची ती जोडी बाजूच्या जंगलात दिसेनाशी झाली. पण या धक्क्यातून सावरायला आम्हाला बराच वेळ लागला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -