घरफिचर्सडोळ्यात सूर्य उतरलेला माणूस

डोळ्यात सूर्य उतरलेला माणूस

Subscribe

खरं तर ते एकाच भागात राहतात. एकाच बसने कॉलेजला येतात. एकाच क्लासेसला जातात. त्यांची बर्‍यापैकी मैत्री आहे. तिच्या मैत्रिणी याला ओळखतात. याचे मित्रही तिच्या परिचयाचे आहेत. पण या दोघांचं नातं बरचंस अस्वस्थ आणि मूक आहे. ती कमालीची अबोल आहे. हा पण फारसा बोलका नाही.

जूनची प्रसन्न सकाळ आहे. चिखलाने भरलेल्या रस्त्यावरून एसटी महामंडळाची लाल परी आगारात शिरते. सकाळीच पाऊस पडून गेला आहे आणि आता कोवळं ऊन आहे. बसच्या खिडकीच्या गजांवर पावसाचे थेंब आहेत. बाभळी अजूनही भिजलेल्या आहेत. बसमध्ये ओलसर वास, टपटपणारे छत. कधीकधी फुटक्या पत्र्यातून पाणी थेट तुमच्या चेहर्‍यावर येऊ शकते. ही बस आहे की वॉटर पार्क असा प्रश्न पडेल इतका ओलावा आणि घामेजून जावे इतकी गर्दी. बस खचाखच भरलेली आहे. पुष्कळ मुलेमुली दाटीवाटीने बसली आहेत. काही उभी आहेत. पोरींची चिवचिव सुरू आहे तर पोरांच खिदळण.

तो मित्रांसोबत पाठीमागे उभा आहे आणि ती थोडीशी समोर मैत्रिणींबरोबर बसली आहे. तो तिला थोड्याथोड्या वेळाने पाहत राहतो. पण तिला वळून पाहणं शक्य नाही. पण तरीही तिचं मन त्याच्याच आसपास रुंजी घालत राहतं. काही दिवसांपूर्वीच त्यांची थोडीशी मैत्री झाली आहे. एखाद्या रविवारी सकाळी तो तिच्या दारासमोरून जातो, तेव्हा ती कपडे वाळत घालत असते. त्याला पाहून ओळखीचे हसते. या इवल्याशा धूळभेटीचे तुकडे दिवसभर त्याला पुरतात. मग तो सोमवार येण्याची वाट पाहतो. सकाळी सकाळी तयारी होऊन तिच्या अगोदर बस स्टॉपवर पोहचतो. तेव्हा समोरच्या जुनाट उडपी हॉटेलात ताजा चहा वाफाळत असतो. आजही सगळी झाडे प्रसन्न दिसत आहेत. तिथल्या शांततेत पाटाच्या पाण्याचा आवाज मिसळला आहे. बसची वाट पाहणारे मुलांचे घोळके आणि एखाददुसरा बिडी पिणारा म्हातारा किंवा कमरेत वाकलेली कडक आवाजाची म्हातारी बसची वाट पाहत आडोशाला उभे आहेत.

- Advertisement -

मग ती बसस्टॉपकडे मैत्रिणीसोबत येताना दिसते. त्याचा चेहरा खुलायला लागतो. आणि त्याला बघून ती पण बहरायला लागते. त्याला वाटतं की हा क्षण इथेच थांबून रहावा. फक्त ती आणि मी असावं. फक्त दोघांनी सोबत प्रवास करावा. तिच्याशी बोलावं. बोलावं. बोलावं. सगळी मुलं बसमध्ये चढतात आणि त्याच्या विचारांची साखळी तुटते. तो भानावर येतो. मग सर्वात शेवटी बसमध्ये शिरतो.

भिजर्‍या शेतातल्या ओल्या डांबरी रस्त्याने प्रवास सुरू होतो. सगळीकडे हसण्याचे आवाज, टिंगलटवाळी, गोंधळ आणि धिंगाणा. एखादा पोरगा आपलं पुस्तक घेऊन मुकाट्याने वाचत राहतो. आणि सगळ्या मित्रांसाठी थट्टेचा विषय होतो. कॉलेज येऊ नये, ती नजरेच्या समोरून जाऊ नये, असंच त्याला वाटत राहतं. पण नागमोडी वळणे घेऊन बस शेवटी तालुक्याच्या शहरात पोहचते. आगरात पाण्याची तळी साचली आहेत. हातगाड्यावर पोहे, शिरा खाणार्‍यांची वर्दळ आहे. मधूनच अगरबत्तीचा वास घुमतो आहे. कळकट कपड्यातला प्रसन्न पोरगा अगदी मन लावून चहा बनवत आहे. पेपर स्टॉलच्या भिंतीला चिकटून एक भिकारीन निवांत झोपली आहे.

- Advertisement -

त्याला वाटत की अजून थोडा वेळ तरी प्रवास सुरू राहायला हवा होता. तो तिच्या पाठीमागून सावकाश सगळ्यात शेवटी बसमधून उतरतो. आज तिने आकाशी रंगाची पंजाबी घातला आहे. तिची लांब आणि शिडशिडीत बोटं उन्हात चमचमत आहेत. तिच्या पायात फ्लॅट चप्पल आहेत. केसांची लांब वेणी घातली आहे आणि कानाजवळ काळ्या पिना खोवल्या आहेत. ती खूप सुंदर दिसते आहे आणि तिचा चेहरा भलताच प्रसन्न वाटतो आहे. तिच्या गालावर बारीक तरुण्यपिटीका आहेत. त्यामुळे त्याला ती अधिक आवडते. तो सतत तिच्या मागावर असतो. पण याचा तिला त्रास नाही. आणि त्याचा पाठलाग करणही इतक शांत की ते कुणालाही जाणवत नाही.

खरं तर ते एकाच भागात राहतात. एकाच बसने कॉलेजला येतात. एकाच क्लासेसला जातात. त्यांची बर्‍यापैकी मैत्री आहे. तिच्या मैत्रिणी याला ओळखतात. याचे मित्रही तिच्या परिचयाचे आहेत. पण या दोघांचं नातं बरचंस अस्वस्थ आणि मूक आहे. ती कमालीची अबोल आहे. हा पण फारसा बोलका नाही. दोघेही मोकळेपणाने काही बोलत नाहीत. पण आतली घालमेल चेहर्‍यावर कधीतरी दिसूनच जाते. डोळ्यातल्या भावना लपत नाहीत. ओढ दोघांमध्येही आहे. आतल्याआत काहीतरी धुसमसत आहे. कधीही भडका होऊ शकतो.

संध्याकाळी ती मैत्रिणींसोबत धरणावर फिरायला जाते. तेव्हाही तो तिच्याच डोळ्यातून सूर्य मावळताना पाहतो. दिवस असा मावळतीला येत असतो, तेव्हा धरणाच्या पाण्यावर मावळतीचं सूर्यबिंब आणि तिच्या भुरभुरणार्‍या केसांवर सोनेरी उन्हं असतात. मासेमारी करणारी माणसे किनार्‍यावर येत आहेत. पाखरांना घराची ओढ आहे. पण हे मुलामुलींचं टोंळक रेगाळत आहे. सगळे मुलंमुली गप्पा मारतात. बसमधल्या गमतीजमती, कॉलेजचे लेक्चर्स, अभ्यास असे विषय रंगत आहे. मग हळूहळू ते गर्दीतून थोडे बाजूला होतात.

आता तिने भिंतीला पाठ टेकली आहे. तो तिच्या अगदी समोर आहे. आता उन्ह त्याच्या चेहर्‍यावर रेंगाळत आहे. त्याच्या मनात घालमेल पण चेहर्‍यावर मंद हसू. तिच्या चेहर्‍यावर नेहमीसारखी शांतता आणि वेदना प्यालेलं उदास हसू. तो काहीतरी बोलता बोलता अचानक तिला म्हणतो, ’’मला तू आवडतेस.’’ तिला हे अपेक्षित आहे आणि अनपेक्षितही. ती चेहर्‍यावर येऊन भुरभुरणारे केस बोटांनी सावरते. त्याला दिसते की या क्षणी तिच्या डोळ्यात आभाळ आहे, ढग आहेत आणि पाऊस आहे. स्वत:ला सावरून ती म्हणते, ‘मलाही तू आवडतोस. पण हे सांगायची मला गरज वाटत नाही.’ त्याच हृदय धडधडू लागते. तळहाताना घाम येतो. त्याला वाटत की पाणी प्यायला हव. वाढणार्‍या श्वासाची गती नियंत्रात करून आणि एक दीर्घ श्वास घेऊन तो म्हणतो, ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे.’ ती थोडा वेळ त्याच्या डोळ्यांकडे एकटक पाहत राहते आणि उत्तरते, ‘आपण मित्र म्हणून ठीक आहोत. येणार्‍या संकटांना सामोर जाण्याची ताकद माझ्यात नाही.’
आता या क्षणी तिच्या डोळ्यात किंचित पाणी आहे. आणि त्याच्या डोळ्यात अख्खा सूर्य उतरला आहे.



-अरुण सीताराम तीनगोटे

एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -