घरफिचर्सवर्क फ्रॉम होममधली ‘सुपरवूमन’

वर्क फ्रॉम होममधली ‘सुपरवूमन’

Subscribe

कोरोना महामारीच्या काळात जग बंद झालं तसं पैसे देऊन घेतल्या जाणार्‍या सेवा बंद झाल्या. पाळणाघरं बंद झाली, मुलांच्या शाळा बंद, मोलकरणीना सुट्टी आणि नकळतपणे या सार्‍या गोष्टी घरातली बाई करणार हे गृहीत धरलं गेलं. घरातली सगळी माणसं घरात असतांना घरगुती कामांचा भार वाढला. सुरुवातीचे काही दिवस आपण पुरुषांनी स्वयंपाक करण्याचे, वेगेवेगळे पदार्थ करून पाहण्याचे किंवा घरकामाचे फोटोज सोशल मीडियावर पाहिले आणि कसं पुरुष बायकांना कामात मदत करताय अशा चर्चा केल्या. पण आता लांबलेल्या लॉकडाऊनने हे सगळंच हौशी होतं हे दाखवून दिलं. काही ठराविक वर्गातले आणि गटातले पुरुष जरी हे सगळं करत असले तरी बहुतांश घरात हा भार बायकांवरच पडतो आहे.

कोरोनाच्या जंजाळात आपण सारेच सध्या घरात लॉकडाऊन आहोत. या लॉकडाऊनने आपल्या सार्वजनिक आयुष्याच्या विस्तार खूपच निमुळता झाला. आणि घराशिवाय (ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी) दुसरा कुठला पर्याय आपल्याकडे विसाव्यासाठी उरला नाही. आता हळूहळू अनलॉकिंग करत आयुष्य पूर्वपदावर येण्याची शक्यता आपल्याला दिसतेय. पण त्या शक्यतेची शक्यता आता कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने आणखीच अंधुक होतेय. जवळजवळ गेल्या चार महिन्यापासून ऑफिसेस बंद आहेत. आणि आपण सारे भारतीय आपल्याला फारशी सवयीची नसलेली अशी वर्क फ्रॉम होमची अनोळखी कार्यपद्धती अवलंबतो आहोत. ह्यातले तोटे-फायदे ह्यांच्याशी आता आपला बर्‍यापैकी परिचय होत चाललाय. या सगळ्या वर्क फ्रॉम होमच्या नव्या प्रयोगात नोकरी करणार्‍या पण आता घरी बसून काम करणार्‍या बायका कुठे आहेत, ह्याचा त्यांच्या आयुष्यावर कसा परिणाम होतोय आणि त्यांच्या आयुष्याचा वर्क फ्रॉम होमवर कसा परिणाम होतोय हे पाहणं महत्वाचं.

काही दिवसांपूर्वी ऑफिसच्या पुढच्या झूम मिटिंगची वेळ ठरवत असताना एक महिला सहकारी म्हणाली की, संध्याकाळी 5 वाजेची वेळ मला चालणार नाही, त्या वेळात घरात स्वयंपाकाची गडबड सुरु होते, पाणी येतं आणि सार्‍यांच्या संध्याकाळच्या नाश्त्याचीही वेळ होते. यासाठी तेव्हा मिटिंगची वेळ बदलली खरी पण महिलांचे श्रम, त्याचा मोबदला, त्याकडे बघण्याची दृष्टी, त्याला मिळणारे प्राधान्य या सगळ्या चर्चेला वर्क फ्रॉम होमच्या संकल्पनेने आणखी एक आयाम दिलाय हे लक्षात आलं. घरी राहून काम करणं म्हणजे घरातल्या सगळ्यासाठी पूर्णवेळ उपलब्ध नसणं हे आपल्याला समजायला अजून फार वेळ लागणार आहे. त्यातल्या त्यात बायकांचं वर्क फ्रॉम होम म्हणजे तर त्या पूर्णवेळ घरातल्या सगळ्या कामांसाठी उपलब्ध आहेत असा अर्थ घेऊन चालणार नाही हे समजायला आपल्याकडे युगं लोटावी लागतील. बायकांनी नोकर्‍या करायला घराबाहेर पडणं हेच ‘बाई म्हणजे चूल आणि मुल’ या स्टेटमेंटला मोठा धक्का देणारं होतं.

- Advertisement -

घरातली सगळी कामं ज्यांचा मोबदला पैशांच्या स्वरूपात मिळत नाही आणि जी कामं कमी महत्वाची मानली जातात अशी सगळी बायकांनीच करावी या प्रवाहात बायकांचं नोकरी करणं आल्याने मग घरातली कामं कोण करणार हा मोठा प्रश्न तयार झाला. पण बाईच्या नोकरीतून होणारा आर्थिक फायदा या जोरावर बायका नोकरी करायला लागल्या. कामासाठी घराबाहेर पडायला लागल्या. हे सगळं करतानासुद्धा त्यांनी नोकरी आणि घर अशा दोन्ही आघाड्यांवर बाजी मारली तरच त्या यशस्वी आहेत अशा समजाचा पायंडा आपण पाडला. आणि या दोन्ही मैदानांवर उत्तम खेळी करणार्‍या बायकांचे आदर्श आपण पुढे आणायला सुरुवात केली. नंतर नंतर शहरांमध्ये घरकामासाठी मोलकरणी आल्या, मुलं पाळणाघरात गेली आणि नवरा बायको दोघं स्वतंत्र कमावते झाले पण तरीही बायकांची नोकरी आणि त्यांच्यावर असलेली बिर्‍हाडाची जबाबदारी यांची गाठ सोडणं आपल्याला जमता जमत नव्हतं. त्यात वर्क फ्रॉम होमने आणखी गुंता केला.

कोरोना महामारीच्या काळात जग बंद झालं तसं पैसे देऊन घेतल्या जाणार्‍या सेवा बंद झाल्या. पाळणाघरं बंद झाली, मुलांच्या शाळा बंद, मोलकरणीना सुट्टी आणि नकळतपणे या सार्‍या गोष्टी घरातली बाई करणार हे गृहीत धरलं गेलं. घरातली सगळी माणसं घरात असतांना घरगुती कामांचा भार वाढला. सुरुवातीचे काही दिवस आपण पुरुषांनी स्वयंपाक करण्याचे, वेगेवेगळे पदार्थ करून पाहण्याचे किंवा घरकामाचे फोटोज सोशल मीडियावर पाहिले आणि कसं पुरुष बायकांना कामात मदत करताय अशा चर्चा केल्या. पण आता लांबलेल्या लॉकडाऊनने हे सगळंच हौशी होतं हे दाखवून दिलं. काही ठराविक वर्गातले आणि गटातले पुरुष जरी हे सगळं करत असले तरी बहुतांश घरात हा भार बायकांवरच पडतो आहे.

- Advertisement -

फक्त शारीरिक श्रमच नाही तर बायकांवर असलेल्या केअरवर्कचा भार हा बर्‍याचदा कर्तव्य किंवा भावनिक नात्याच्या मागे दडून कमी महत्वाचा मानला गेलाय. घरातली वृद्ध माणसं, लहान मुलं ह्यांची काळजी घेण्याची जबाबदारी बायकांवर असते. सध्याच्या या काळात तर ही जबाबदारी आणखी वाढली आहे. आजारी असलेल्या माणसांची विशेष काळजी घेणं, घरातील क्वारंटाईन केलेल्या सदस्यांची काळजी घेणं, शाळा बंद असल्याने मुलांची पूर्णवेळ काळजी घेणं या अतिरिक्त जबाबदार्‍यासुद्धा आता वाढल्या आहेत. आणि मग आपली नोकरी सांभाळून या सगळ्याकडे लक्ष देणं हे आपल्याला ‘सुपरवूमन’ चे लक्षण वाटत असले तरी हा कामाचा अतिरिक्त आणि लिंगभावामुळे येणारा विषम भार आहे, जो तिला प्रचंड दमवणारा असतो! या सगळ्याकडे दुर्लक्ष करायला आपल्याला ‘सुपर वूमन’ या एका गोंडस विशेषणाखाली मोठं पांघरून मिळतं.

आधीच कामाच्या ठिकाणी ‘बायका कमी कार्यक्षम असतात’ हा समज आत आत रुजलेला असतो, त्यामुळे आपापल्या ऑफिसांमध्ये आपली कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी सुरु असलेली एक वेगळी लढत या घरातल्या गोष्टींमुळे आणखीच आव्हानात्मक होते. पण घरातली ही वाढलेली कामं कोण करणार हे फक्त ‘चूल आणि मूल’ च्या एका इतिहासावरूनच ठरत नाही तर त्यासाठी इतर अनेक प्रश्नांची उत्तरं मदत करतात. कुणाला पगार कमी? त्यावरून कुणाचं काम कमी आणि कुणाचं जास्त महत्वाचं हे नकळतपणे ठरतं आणि मग कुणाच्या कामाची लवचिकता जास्त या शब्दकोड्याचं उत्तर बव्हंशी बायका हेच येतं.

भरीस भर म्हणजे सध्या खाजगी क्षेत्रात सगळीकडेच नोकर्‍यांमधून माणसं कमी करणं सुरु आहे. असलेल्या माणसांच्या पगाराची कपात करणं सुरु आहे. मग जेव्हा कुणाची नोकरी जाईल? या शब्दकोड्याचं उत्तर ठरवण्याची वेळ येते तेव्हा कुणाची कार्यक्षमता कमी, कुणावर इतर जबाबदार्‍या जास्त, कुणाच्या कामात लवचिकता जास्त आणि कुणाला कामावरून काढल्याने जास्त नुकसान होणार नाही या गणिताने ह्याचं उत्तर पुन्हा बव्हंशी बायका हेच येऊ शकतं. आणि वर्क फ्रॉम होमच्या दरम्यान बायकांच्या कामाला गंभीरतेने न घेण्याचा आणि सुपर वूमन म्हणत त्यांचं गौरवीकरण करण्याचा परिणाम म्हणून बायकांच्या नोकर्‍यांवर, त्यांनी नोकर्‍यांमध्ये भरती व्हावं, टिकावं यासाठीच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी फेरलं जाऊ शकतं. असं झालं तर हा या महामारीने स्त्रीचळवळीला दिलेला एक मोठा सेटबॅक असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -