घरफिचर्सबाबा, तू आहेस ना?

बाबा, तू आहेस ना?

Subscribe

कृत्रिम थाटामाटापेक्षा नैसर्गिक लय, अकृत्रिम गती आणि दैवदत्त डौल शेवटी खरी छाप टाकू शकतात. या सर्व गोष्टी हळूहळू कळतात. सुरुवात होणे महत्त्वाचे असते. कोणीतरी सोबत असणे गरजेचे असते आणि हलका धक्का मिळणे जरुरी असते बस!

नवीकोरी सायकल दाराबाहेर येऊन उभी राहते. लाल रंगाची. त्याला कॅरिअर बास्केट नि काय काय छोट्याछोट्या एक्सेसरीज. मग धीर निघत नाही.

- Advertisement -

बाऽऽबा… जाऊयाऽऽऽ?
बाबा मुद्दाम अजाणपणा पांघरून म्हणतो ‘आंऽ, कुठे जाऊया?’
‘असं काय रे… सायकल चालवायला. चल ना, ऊठ ना’ बाबाच्या हाताला खेच बसते.’ ऊऽऽठ ना’

बाबाच्या चेहऱ्यावर मंद हास्य येतं. बाबाला पंचवीस वर्षांपूर्वीचा तो स्वतः आठवतो. चलचल जाऊया बाबा आणि लेकाची स्वारी निघते सायकलसवारीला. छोटीशी सायकल. नवंकोरं रुपडं ल्यालेली. लेकाचे पाय जेमतेम पायडलपर्यंत पोहोचतात. त्याची सायकलवर बसण्याची धडपड. अहंऽऽ जमत नाही. पहिलीच वेळ असते. त्याच्या डोळ्यात घाई आणि मदतीची हाक एकाच वेळी उमटते .

- Advertisement -

बाबा बुटक्या लेकाला उंच सायकलीवर विश्वासाने बसवतो …नव्हे उचलूनच ठेवतो.
आणि सायकलला पाठून धरत हलका ‘पुश’ देतो. सायकल सुरु होते. हॅण्डल डगमगतं.
पहिला घाबरा व्याकुळ शब्द उमटतो बाबाऽऽ

हं चल … मी धरलंय
बाबा सोडू नको हं.. नाहीतर मी पडेन…
अरे चल बिनधास्त, मी धरलंय पाठून…

बाबा ..बाबा गजर चालू राहतो. बाबाऽऽ धरलंयस ना ?

हो रे. तू फक्त पाय मार

भीतीने भरलेले मन… ‘बाबा पाठी आहे’ या जाणीवेने हळूहळू हलके होत जाते … मग तर काय पंखच फुटतात.

दुसऱ्या दिवसापासून मग सायकल बाहेर काढण्यासाठी थोडी खटपट होते; पण स्वतः स्वतःची सायकल काढण्यातली गंमत नवा उत्साह देऊन जाते. सायकलला इंधन लागत नाही तरीही मनातलं आनंदाचं, आत्मविश्वासाचं इंधन शिगोशीग भरून घेऊन लेक निघतो. घरच्यांचे डोळे लुकलुक बघत राहतात. आनंदाची भावना सांसर्गिक असावी… लेकाच्या विश्वात घराचं विश्व सजतं!

पहिला, दुसरा, फारतर तिसरा दिवस. लेक बेफाम सायकल हाकू लागतो. खरंतर आता बाबांनी धरण्याची गरज उरलेली नसते. तरीही बाबा सुरुवात करून देतो. लेक मधेच म्हणतो बाबा सोडू नको बरं
बाबा फक्त हसत असतो, त्याने खरंतर पहिल्या दिवशीच पाचसात मिनिटांनंतर सायकल सोडून दिलेली असते. अवघ्या काही घटकाच लेकाला आधार दिलेला असतो. पण मी आहे या बाबाच्या दोन शब्दांवर स्वतःचं सगळं अस्तित्व पेलत तो लहानगा जीव खुशाल झोकून देत निघतो.

सुरुवातीला पाऊल डगमगू शकतं, तोल जाऊ शकतो, मनात भीती दाटून येऊ शकते. बरंच काही होऊ शकतं. पण आधार देणारं कोणी आहे या तंतूला धरून मग त्या सगळ्या वाटण्यावर मात केली जाते. सायकल लेक आणि बाबा प्रतिकं मात्र.

नव्या गोष्टीची नव्या वस्तूची भुरळ पडायचीच, तो तर निसर्ग नियम आहे. फक्त कोणी धाडस करू जातो, कोणी मला कसं जमेल म्हणत मागे येतो. कधी आत्मविश्वास आणि धडाडी एकत्र चालतात, कधी आधाराची गरज लागते. प्रत्येक व्यक्तीच्या खोल आत एक धाडसी जीव लपलेला असतो. कधी तो स्वतः बाहेर येतो. कधी त्याला बाहेर काढावं लागतं. सायकलीच्या गोष्टीतल्या बाबासारखा मग कोणीतरी येतो. सायकल पाठून धरतो. अगदी हलके त्याला गती देतो. बस काम झालेलं असतं. हल्ली वेल बिईंग, पॉझिटिव्ह थिंकिंग, मोटिव्हेशन वगैरे शब्द वरचेवर ऐकू येतात. संकल्पना जुन्याच असतात फक्त त्याची रूपं बदलून बदलून त्या आपल्या समोर येत राहतात. माध्यमांचा मारा, वेळेची कमतरता, जगण्यातले ताणतणाव,‘सगळं झटपट हवं’चा गजर असं बरंच काही. नावं निरनिराळी पण काम एकच असतं ‘पुश पाहिजे’ एक हलकासा धक्का. जगण्याला, विचारांना, कृतींना, नात्यांना एकूणच.

‘सगळं आहे पण काही नाही’ अशी माणसाची बरेचदा गत असते किंवा एखादी गोष्ट मी करू शकेन की नाही याबाबत साशंकता. अशा वेळी या दोलायमान स्थितीतून माणसाला बाहेर काढणाऱ्या कोणाचीतरी गरज असते. बरं बाहेर काढल्यानंतर पुढे जाण्यासाठी उभारी देण्याचीसुद्धा. नाहीतर सावरलेला तोल, गोळा केलेला धीर ढासळायला वेळ लागत नाही, म्हणूनच ‘तू फक्त हातपाय मार, बाकी सगळं माझ्यावर सोड’ एवढे धीराचे चार शब्दसुद्धा चमत्कार घडवून आणू शकतात.

लेकाच्या सायकलीला ब्रेक आहेत, छोटा दिवा आहे, कॅरिअर आहे, पायडल आहे, बास्केट आहे, गती जास्तकमी करायला गिअर आहेत. अगदी हेच सगळे घटक आपल्याही आयुष्यात असतात अगदी आसपास. कधी ते दिसतात कधी दिसत नाहीत. कधी दिसतात; पण वापरायचे कसे हे उमजत नाही. म्हणूनच जगताना, वागता-बोलताना थांबायचं कधी आणि कसं हे सांगणारं शिकवणारं कोणीतरी असावं लागतं. मनावर जिभेवर, हातावर, नजरेवर ब्रेक्स कधी मारायचे याचं तारतम्य यावं लागतं. दिवे असतातच.

कधी अपर डिपर मारायचा, कधी स्वतःपुरता उजेड सांडायचा, कधी आपल्या उजेडाने समोरच्याचे डोळे दिपवायचे कळावं लागतं. कॅरिअर असतात पण त्या कॅरिअर्सची क्षमता ओळखावी लागते. कुठे कधी आणि किती लोड टाकायचा हे भान यावं लागतं. सजावटीसाठी खोटी फुलं, प्लास्टिकचे हारतुरे-गुच्छ भारंभार मिळतात. मात्र यातलं काय निवडून आपली सायकल, आपलं आयुष्य सजवायचं हे अनुभवांती कळत जातं. आणि हेही कळतं, की कृत्रिम थाटामाटापेक्षा नैसर्गिक लय, अकृत्रिम गती आणि दैवदत्त डौल शेवटी खरी छाप टाकू शकतात.

या सर्व गोष्टी हळूहळू कळतात. सुरुवात होणे महत्त्वाचे असते. कोणीतरी सोबत असणे गरजेचे असते आणि हलका धक्का मिळणे जरुरी असते बस! बाकी वाहन आपले असते, वारा आपल्या दिशेने फिरवता येतो, हॅण्डल आणि पायडल सावरण्याचं कसब साधत जातं. तोल साधला गेला, की बस आयुष्य झुळझुळ वाहू लागतं. मग बाबाला फक्त विचारायचं ‘बाबा, तू आहेस ना?’

बाबा अनेक रूपात आपल्या आसपास वावरत असतो, मंद हसत असतो , म्हणत असतो ‘तू चल बाळा … मी आहे. जगणं सुगंधी लयदार होऊन जातं!

 


स्मिता गानू-जोगळेकर
(लेखिका बँकेत अधिकारी आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -