घरफिचर्सआजचे मेलडीचे सावत्र नातेवाईक!

आजचे मेलडीचे सावत्र नातेवाईक!

Subscribe

रिदम फक्त कानांचा कब्जा घेतो तर मेलडी घेते काळजाचा ठाव. रिदम अधेमधे पायही थिरकवतो; पण मेलडी कधी कधी शरीरातली हृदयाची जागा दाखवून देते. रिदम तात्कालिक असतो, वर्तमानापुरता आणि वर्तमानातच जगणारा-रमणारा असतो. मेलडी मात्र वर्तमान जगून भविष्यातही अगरबत्तीच्या धुरासारखी ऐकणार्‍याच्या मनात तरंगत राहते, तरळत राहते. रिदम धसमुसळा असतो, मेलडी स्थितप्रज्ञ असते. रिदमचा कधी कधी खळखळाट असतो. मेलडी मात्र प्रवाही असते, शांत असते.

हे सगळं सांगण्यामागचं कारण आजचं धडाम धडाम रिदमने व्यापलेलं बहुतांश संगीत. आजची गाणी, आजचं संगीत काळाच्या कसोटीवर टिकत का नाही? असा प्रश्न जेव्हा कुणी चिकित्सकपणे किंवा खोडसाळपणे विचारतं तेव्हा त्याचं खरं उत्तर असतं ते आजच्या बहुतांश गाण्यांचा मेलडीशी असलेला छत्तीसचा आकडा! आजच्या सिनेमा-नाटकांतल्या, इतकंच कशाला अगदी जिंगल्स करणार्‍या संगीतकारांनाही मेलडी नकोशी असते. आजचे संगीतकार एखादी चाल करताना त्या चालीत जरा जरी जास्त मेलडी सळसळली तरी त्यांना गुदमरल्यासारखं होतं. त्या मेलडीत थोडा जरी कारूण्याचा अंश आढळला तरी त्यांना जीव नकोसा होतो. त्यांचं गाणं करणं म्हणजे तेवढ्यापुरतं सण साजरं करणं असतं. आपलं गाणं टिकावं, ते प्रदीर्घ काळ लोकांच्या आठवणीत राहावं, लोकांच्या ओठांवर ते पुढेही गुणगुणलं जावं, ते अजरामर व्हावं, असंही ह्या नव्या दमाच्या संगीतकारांना वाटतं की नाही, अशी शंका यावी असं हल्लीच्या संगीतातलं पर्यावरण आहे.

आजची प्रसिध्द गायिका श्रेया घोषालने दिलेली एक मुलाखत अलिकडेच वाचनात आली होती. जुन्या काळातली, मेलडीवर आधारलेली गाणी ऐकायलाही खूप छान वाटतात आणि गायलाही छान वाटतात असं म्हणता म्हणता ती त्या मुलाखतीत म्हणाली होती, आजच्या काळात अशी मेलडीवर आधारलेली गाणी होत नाहीत.

- Advertisement -

मेलडीला सावत्रभावाने वागवणार्‍या आजच्या युगाबद्दल श्रेया घोषालने व्यक्त केलेली खरंतर ती एक प्रकारची खंत आहे. पण ती खंत मनावर घेण्याच्या मनस्थितीत आजच्यापैकी कुणी असेल अशी आजची परिस्थिती नाही. जो तो आपल्याच धुनकीत आहे. आलेला क्षण रेचक घेऊन उरकल्यासारखा उरकून टाकावा असं ज्याचं त्याचं नव्या दमाचं तत्वज्ञान आहे. अशा सगळ्या धिटांग वातावरणात मेलडीची कुणाला काय पडलेली असणार!…आणि कशी ह्यांची गाणी टिकणार!

ह्या ठिकाणी अशोक पत्की ह्या ज्येष्ठ संगीतकाराचं उदाहरण देता येईल. सुमन कल्याणपुरांच्या काळापासून ते संगीत देताहेत. ‘केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर’ हे त्यांचं कितीतरी जुनं गाणं आजच्या पिढीलाही भुरळ घालतंच, पण आजच्या घडीला अगदी ‘आभाळमाया’पासून ’तुला पाहते रे’पर्यंत कित्येक मालिकांची त्यांची शीर्षकगीतंही लोकांना मंत्रमुग्ध करून टाकताहेत, ती लोकांच्या कायम लक्षात राहताहेत. स्वत: अशोक पत्की त्यांच्या ह्या गाण्यांच्या ह्या लोकप्रियतेचं श्रेय त्यांच्या गाण्यातल्या मेलडीला देतात…आणि हे खरंच आहे की मेलडी हा अशोक पत्कींच्या गाण्यांचा स्थायीभाव आहे. ‘आभाळमाया’, ‘तुला पाहते रे’ ही त्यांनी केलेली शीर्षकगीतं ऐकताना ती मनाला आतून भिडतात. कारण त्यांच्या गाण्यातल्या वळणावळणावर भेटीला येणारी मेलडी ऐकणार्‍याला जागच्या जागी स्तब्ध करते. अशोक पत्की हे त्या काळातले मेलडीचं महत्त्व जाणणारे शिलेदार आहेत…आणि आजचे संगीतातले फक्त जमादार आहेत, हा आजच्या आणि तेव्हाच्या काळातला नेमका फरक आहे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -