स्वराज युगाचा अंत!

Mumbai
Sushma_Swaraj
माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज

देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांची दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात प्राणज्योत मालवली. भारतीय जनता पक्षाच्या पट्टीच्या नेत्यांमध्ये स्वराज यांची गणना होत होती. एक चतु:रस्त्र व्यक्तिमत्व, ओजस्वी वक्त्या, आदर्श संसदपटू, सुस्वभावी व सुसंस्कृत राजकारणी अशा नाना बिरूदांनी सजलेल्या या व्यक्तिमत्वाची समस्त राजकारण्यांमध्ये असलेली आदराची भावना सर्वश्रुत आहे. साधारण दोन वर्षांपूर्वी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून त्या सक्रिय राजकारणापासून दूर होत्या. प्रकृती साथ देत नसल्याने स्वराज यांनी आताची लोकसभा निवडणूक लढण्यास नम्रपणे नकार दिला होता. सुषमा यांचे निवर्तणे अवघ्या भारतवासीयांच्या मनाला चटका लावणारे आहे. राजकारणी चेहरा असूनही त्यांनी कधी हेवेदाव्यांना स्थान दिले नाही. स्वराज यांच्या राजकीय प्रवासाचा श्रीगणेशा साधारणत: साडेचार दशकांपूर्वी झाला. वयाच्या पंचवीसाव्या वर्षी त्या हरियाणाच्या कामगारमंत्री झाल्या. सर्वात कमी वयाच्या कॅबिनेटमंत्री म्हणून त्या देशभर चर्चेत आल्या होत्या. पुढे दोनच वर्षांनी भाजप हरियाणा प्रदेशाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे चालून आले. भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील पहिल्या महिला प्रवक्त्या, पहिल्या महिला मुख्यमंत्री, पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या आदी पदांच्या माध्यमातून त्यांनी देशाच्या राजकीय क्षितीजावर ठसा उमटवला. विशेष म्हणजे ज्या पदांवर त्या कार्यरत राहिल्या, त्याठिकाणी त्यांची कामगिरी लक्षवेधक राहिली. आपल्या राजकीय वाटचालीत त्या सात वेळा खासदार तर तीन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांनी लौकिक राखला. २०१४ मध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सरकार अस्तित्वात आल्यानंतर स्वराज यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर देशाचे परराष्ट्र मंत्रालय सांभाळणार्‍या स्वराज ह्या दुसर्‍याच महिला राजकारणी होत्या. मोदी यांच्या विश्वासाला पात्र ठरत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करताना आपल्या पदाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आपल्या प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर स्वराज यांनी संसदेत, संसदेबाहेर, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठ गाजवले. संसदेत त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाची विरोधकांनाही भुरळ पडत असे. संयुक्त राष्ट्रसंघात (युनो) आक्रमक भाषणातून मुद्दे मांडत त्यांनी पाकिस्तानचा बुरखा फाडण्याचे काम केले. गेल्या मार्च महिन्यात अबुधाबी येथे झालेल्या इस्लामिक देशांच्या परिषदेत त्यांनी केलेले भाषण प्रचंड गाजले होते. ‘इस्लामच्या नावे राज्यशकट हाकणारा देश जर हिंसाचाराचा आधार घेत असेल, दहशतवादाला सक्रिय मदत करत असेल, तर इस्लामी देशांच्या संघटनेने त्याची दखल घ्यायला हवी’, हे निक्षून सांगत स्वराज यांनी पाकिस्तानला नाव न घेता खडे बोल सुनावले होते. यावेळी तिथे उपस्थित कडव्या धार्मिक व पुरुषधार्जिण्या देशांतील म्होरक्यांना स्वराज यांचा स्पष्टवक्तेपणा भावला होता. गतवर्षी सप्टेंबरमधील ‘युनो’च्या भाषणातदेखील त्यांनी निसर्गाचा र्‍हास करून प्रगती साधलेल्या देशांना फैलावर घेत ते आपली जबाबदारी टाळू शकत नाहीत, असे सुनावले होते. मंत्रीपदावर असताना स्वराज यांचे पाय जमिनीवर होते. परदेशात एक ना अनेक कारणांनी अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना केवळ ट्विट करून सोडवल्याची त्यांच्या काळातील अनेक उदाहरणे आहेत. यासंदर्भात जातपात, धर्म, पंथ, लिंग या श्रेणींत त्यांनी कधीही भेदाभेद केला नाही. यामुळेच त्यांच्या राजकीय पर्वाला संस्मरणीयतेची किनार लाभते. ट्विटरवरून संवाद साधणार्‍या प्रत्येकाला त्या सकारात्मक प्रतिसाद देत. या मुद्याची देशभर चर्चा होत राहिल्याने राजकारणातील एक आश्वासक चेहरा म्हणून त्यांना लौकिकता प्राप्त झाली. भाजप सत्तेमध्ये असो अथवा विरोधात, सुषमा स्वराज नावाचे बेट सतत प्रकाशमान राहिले.
साथी जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. देशात फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात सुषमा स्वराज यांचा सक्रिय सहभाग असायचा. इंदिरा गांधींनी देशात लागू केलेल्या आणिबाणीविरोधात जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील ‘संपूर्ण क्रांती’ आंदोलनात त्यांनी स्वत:ला पूर्णत: झोकून दिले. पुढे जनता दलाच्या प्रयोगात त्या सहभागी झाल्या आणि अंबाला या हरयाणातील विधानसभा निवडणुकीत त्या उभ्या राहिल्या. चौधरी देवीलाल यांच्या सरकारमध्ये त्या मंत्री बनल्या. १९९९च्या निवडणुकीत त्यांनी कर्नाटकमधून बेल्लारी मतदारसंघातून निवडणूक लढवली ती चक्क काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात. केवळ सात टक्क्यांच्या फरकाने त्या पराभूत झाल्या. पण पुढे २०००मध्ये त्यांना पक्षाने राज्यसभेत पाठवलं. १९७५मध्ये त्या स्वराज कौशल यांच्याशी विवाहबध्द झाल्या. कौशल हे तेव्हा राज्यसभेचे सदस्य होते. कौशल हे मिझोरामचे राज्यपालही होते. सर्वात कमी वय असलेले कौशल हे देशातील एकमेव राज्यपाल ठरले. दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून सुषमा आणि सर्वात तरुण राज्यपाल स्वराज कौशल अशा या जोडगोळीचे नाव लिम्का बुकमध्येही नोंदले गेले.
विरोधी पक्षनेत्या म्हणून स्वराज यांनी केलेली भाषणे अभ्यासपूर्ण, सत्ताधार्‍यांच्या त्रुटी निदर्शक पण आक्रमक असत. अर्थात, त्यांच्या शब्दफेकीमुळे कोणी दुखावले गेल्याचा एकही प्रकार चार दशकीय राजकीय वाटचालीत झाला नसावा. सुषमा स्वराज यांच्याबद्दल अनेक प्रसंग सांगता येतील, जिथे त्यांच्या कर्तृत्वाची मोहोर उमटली. स्वराज यांच्या जाण्याने भाजपचे जेवढे नुकसान झाले आहे, तेवढीच क्षती भारतीय राजकारणाची झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एका उत्कृष्ट संसदपटूच्या जाण्याने तेजोमय युगाचा अंत झाला आहे. एका शालीन राजकारणी सबलेला भावपूर्ण श्रध्दांजली !!