सस्पेन्स कायम!

सोळाव्या लोकसभेचा बिगुल वाजण्याच्या उंबरठ्यावर पवार यांनी नाशिक जिल्हा दौरा केला. या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात असलेल्या नाशिक आणि लगतच्या दिंडोरी लोकसभा क्षेत्रांसाठी उमेदवारीबाबत ते काहीतरी वाच्यता करतील, संकेत देतील, अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र, आपल्या स्वभावाला अनुसरून पवारांनी सर्वांना हुलकावणी दिली आणि राजकीय सस्पेन्स कायम ठेवला.

Nashik
saripat Logo

अवघ्या मराठी मुलखाची नाडी ज्ञात असलेल्या शरद पवार यांच्या स्वभावातील अनिश्चिततेचा तळ त्यांच्या परिवारातील सदस्यांना देखील गाठता येत नसल्याचे सांगितले जाते. पवार एखाद्याकडे पाहून स्मितहास्य केले, त्यांनी कुणाच्या खांद्यावर हात ठेवला अथवा कुणाशी कानगोष्टी केल्यात तरी त्याचे राजकीय अर्थ काढले जातात. एकूणच राजकीय सस्पेन्स निर्माण करण्यात त्यांचा कुणी हात धरू शकेल, अशी सध्यातरी परिस्थिती नाही. सोळाव्या लोकसभेचा बिगुल वाजण्याच्या उंबरठ्यावर पवार यांनी नाशिक जिल्हा दौरा केला. या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात असलेल्या नाशिक आणि लगतच्या दिंडोरी लोकसभा क्षेत्रांसाठी उमेदवारीबाबत ते काहीतरी वाच्यता करतील, संकेत देतील, अशी अटकळ बांधण्यात येत होती. त्यापोटीच सलग दोन दिवस उभ्या जिल्हावासियांसह माध्यमकर्मीही कान टवकारून होते. मात्र, आपल्या स्वभावाला अनुसरून पवारांनी सर्वांना हुलकावणी दिली आणि राजकीय सस्पेन्स कायम ठेवला.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पवार यांचा नाशिक दौरा सर्वार्थाने महत्वाचा होता. भाजपविरोधी महाआघाडीला बहुमत मिळाल्यास आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या नावाला विरोध झाल्यास एक सर्वमान्य म्हणून पवारांचे नाव पुढे येऊ शकते, अशी हवा अगदी दिल्लीतही निर्माण करण्यांत आली आहे. म्हणूनच राजकीय अनिश्चितता व प्रकृतीचे सबळ कारण असूनही पवार माढ्यातून निवडणूक रिंगणात उतरल्याची पुस्ती त्यासाठी जोडली जातेय. त्यांच्या भावी पंतप्रधानपदाच्या प्रतिमेचा लाभ नाशिकमधील उमेदवाराला मिळू शकतो. याशिवाय, नाशकातील उमेदवारीसाठी नाव घेण्यात येणाऱ्या भुजबळ काका-पुतण्याच्या तुरूंगवारीचे पक्षांतर्गत भांडवल कोणी करून नये, यासाठीच्या नैतिक रेट्यासाठीही हा दौरा फलदायी ठरल्याचे मानण्यात येते. आपल्या दोन दिवसीय दौऱ्यात पवार ना नाशिकच्या ना दिंडोरीच्या उमेदवारीबद्दल काही बोलले. नाशिक जिल्ह्यापुरते बोलयचे झाल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसची सुत्रे गेल्या वीस वर्षांपासून भुजबळ यांच्याकडे आहेत. अगदी मध्यंतरी ते कारावासात असतानाही पक्षाशी निगडीत कोणताही निर्णयं त्यांच्याशी मसलत केल्याविना घेतला जात नव्हता, ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्या अनुपस्थितीत पक्षाचे काही ठिकाणी बुरूज ढासळले खरे. भुजबळ यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचाही काहींकडून प्रयत्न झाला. या असंतुष्टांच्या भुजात मुंबईतील काही नेत्यांनी बळ देण्याचाही प्रयत्न केला. तथापि, भुजबळ यांनी पक्षांतर्गत विरोधकांना काबूत ठेवत आपले शिखरस्थान कायम ठेवण्यात यश मिळवले.

नाशिक लोकसभेसाठी कोणत्या दिग्गजांमध्ये लढत होणार, याबद्दल चर्चा रंगता आहेत. युतीच्या वतीने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी कथित निष्ठावंतां गोडसेंच्या पक्षनिष्ठेवर आक्षेप घेत त्यांच्याऐवजी इतर कोणालाही उमेदवारी देण्याचे ‘मातोश्री’कारांना साकडे घातले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीची चर्चा स्वाभाविकपणे भुजबळ काका-पुतण्याच्या नावाभोवती फिरते आहे त्याबद्दल पक्षाध्यक्ष शरद पवार काही बोलतील, ही अपेक्षा व्यर्थ ठरली. मात्र, पक्ष मेळाव्यात समीर भुजबळ यांचे नावही न घेणाऱ्या पवार यांनी वेगळाच संकेत दिल्याची चर्चा ‘आत’मध्ये रंगते आहे. कारण पवार यांची पाठ फिरताच समीर भुजबळ पक्षाची नाशिकमधून उमेदवारी करणार, यावर खमंग चर्चा सुरू आहे. खरे तर गतवेळीही समीर यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडेल, असे सांगण्यात येत होते. मात्र, अंतिम क्षणी छगन भुजबळ मैदानात उतरले. आताही तशाच चर्चा सुरू असून जोपर्यंत छगन भुजबळ त्याबाबत वाच्यता करीत नाहीत, तोपर्यंत खरे काय ते समजणार नाही. गेल्या निवडणूकीतील दारूण पराभव, दोन वर्षे तुरूंगवारी, भ्रष्टाचाऱाच्या आरोपांमुळे देशभर मलीन झालेली प्रतिमा या आणि इतर अनेक कारणांमुळे यंदाची निवडणूक भुजबळ यांच्यासांठी कमालीची प्रतिष्ठेची राहणार आहे. काहीही करून जिंकायचेच, या निश्चयाने पेटेलेल्या भुजबळ यांनी गेल्यावेळी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेऊन ‘निवडणूक व्यवस्थापन’ कौशल्य पणाला लावले आहे. सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी समाज माध्यमांसह पोस्टरबाजी करून ‘हवा’ तर निर्माण केली आहे. तथापि, प्रत्यक्षात ते निवडणूक रिंगणात उतरतात की ऐनवेळी माघार घेतात, यावर निकालाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

शिवसेनेतील दुही, कोकाटेंची उडी, भुजबळांचे एकला चलो रे आणि बदललेली राजकीय समीकरणे या बाबींवर कटाक्ष टाकला तर नाशिकच्या निकालाचे आडाखे बांधणे तूर्तास तरी शक्य नाही. मूळात निवडणूक दुरंगी होते की तिरंगी, हेदेखील अजून निश्चित नाही. बहुधा याच कारणामुळे शरद पवार यांनी अंतिम उमेदवारीचे संकेत दिले नसावेत. घोडामैदान जवळ आहे. एक मात्र निश्चित की ही निवडणूक ना गोडसे, ना भुजबळ, ना कोकाटे यांना सोपी आहे. त्यासाठी सर्वार्थाने घाम गाळावा लागणार आहे. कारण कोणतीही लाट नसल्याने मतदारांची मानसिकता काय ठरते, याकडे उमेदवारांना डोळे लावून बसावे लागणार आहे, इतकेच.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here