घरफिचर्ससिबिल क्रेडिट स्कोअर

सिबिल क्रेडिट स्कोअर

Subscribe

एक मार्गदर्शक माहिती व्यवस्था

व्यापार करणार्‍या पार्टीजच्या आर्थिक पार्श्वभूमीची माहिती असणे आवश्यक असते. जसे आपण डॉक्टरकडे गेल्यावर आपली व्यक्तिगत माहिती, तसेच कौटुंबिक इतिहास सांगतो तसेच काहीसे आर्थिक व्यवहार व क्षमता याबाबत कळण्यासाठी क्रेडिट-विषयक संस्था कार्यरत असतात. ‘सिबिल’ ही एक अग्रगण्य संस्था, तिच्या स्थापनेपासून ते आजतागायत कोणत्या प्रकारे माहिती पुरवली जाते व त्याचा व्यक्ती आणि व्यापारी संस्था-कंपन्या यांना कशाप्रकारे उपयोग होतो हे आपण पाहणार आहोत.

एकदा आपण क्रेडिट रेटिंगबद्दल माहिती करून घेतली होती, पण आपल्याकडे प्रचलित असलेल्या ‘सिबिल’ची माहिती असणे आवश्यक आहे. आज आपण त्याबाबत नेमके समजून घेणार आहोत. कोणत्याही देशातील अंतर्गत व आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यापार-व्यवसाय हा संख्येने जसा वाढला पाहिजे, तसा गुणात्मक स्तरावर विकसित झाला पाहिजे. तरच अर्थव्यवस्था सुदृढ होते आणि जागतिक पातळीवर देशाचा नावलौकिक वाढतो. हे जगन्मान्य व्यावसायिक सत्य आपणही मान्य केले, म्हणूनच आपल्या बँकिंग-फायनान्स क्षेत्रांत अनेकविध बदल व सुधारणा अंगिकारल्या. सिबिल ही अशीच एक आधुनिक व्यापारी विश्वाची गरज असलेली कार्यपद्धती. आपण नेमकी कधी व कशी सुरू केली व आजच्या घडीला नेमके कशाप्रकारचे काम केले जात आहे, हे पाहणार आहोत.

- Advertisement -

पार्श्वभूमी – व्यापार संबंध प्रस्थापित होत असताना परस्परांना अपरिचित अशा दोन पार्टीज विक्री-व्यवहार करत असतात. विकणारा आणि घेणारा दोघेही आपापली कर्तव्ये जबाबदारीने पार पाडेल अशी जरी सार्वत्रिक अपेक्षा असली तरी तसे पालन होईलच याची हमी कोणी देऊ शकत नाही. कधी जेन्युईन अडचणी येतात, तर काहीवेळा हेतुपूर्वक टाळाटाळ केली जाते. असे काही होऊ नये, पेमेंट मिळण्याची धास्ती वाटू नये, म्हणून काही यंत्रणा असतात, पैकी एक म्हणजे व्यापार करणार्‍या पार्टीजच्या आर्थिक पार्श्वभूमीची माहिती असणे. जसे आपण डॉक्टरकडे गेल्यावर आपली व्यक्तिगत माहिती, तसेच कौटुंबिक इतिहास सांगतो तसेच काहीसे आर्थिक व्यवहार व क्षमता याबाबत कळण्यासाठी क्रेडिट-विषयक संस्था कार्यरत असतात. ‘सिबिल’ ही एक अग्रगण्य संस्था, तिच्या स्थापनेपासून ते आजतागायत कोणत्या प्रकारे माहिती पुरवली जाते व त्याचा व्यक्ती आणि व्यापारी संस्था-कंपन्या यांना कशाप्रकारे उपयोग होतो हे आपण पाहणार आहोत.

क्रेडिटबाबतच्या माहितीचे महत्व काय –
1) कर्जदाराबाबत आर्थिक व्यवहारांची माहिती असणे अगदी आवश्यक
2) आगामी काळात बुडीत कर्जाचे डोंगर तयार होऊ नयेत, म्हणून एक जरुरीची अशी प्रक्रिया
3) प्रत्येक कर्जदारासाठी त्याची पार्श्वभूमी पाहून त्यांच्यासाठी ‘क्रेडिट लिमिट’ निश्चित करणे
4) विविध प्रकारच्या कर्जाचे व कर्जदारांचे वर्गीकरण करणे
5) विविध प्रकारच्या कर्जांवर व्याजदर निश्चित करण्यासाठी उपयोग होतो.

- Advertisement -

अशी एखादी यंत्रणा असण्याची गरज काय ?- असंख्य संभाव्य कर्जदार जेव्हा अर्ज करतात, तेव्हा त्यांची व्यक्तिगत माहिती, आर्थिक पार्श्वभूमी म्हणजे उत्पन्नाचा सोर्स, खर्चाची विविध तोंडे अशी तपशीलवार माहिती कळणे महत्वाचे आहे. एखाद्या व्यक्तीची किंवा संस्थेची कर्ज घेणे व फेडणे याबाबत आजवरचा इतिहास कळल्याने फेडण्याची क्षमता, चुकवण्याची प्रवृत्ती असे ‘कल’ आधीच समजले तर क्रेडिट म्हणजे कर्ज देणारी बँक-बिगर बँकिंग कंपनी वा वित्त संस्था यांना मूलभूत असा निर्णय घेणे किंवा धोरणात्मक कृती करणे सोयीचे होते. आपल्या व्यवसायाची सद्यकालीन व भविष्यातील कामकाजाची दिशा ठरवणे फार महत्वाचे असते.

प्रत्येक बँक वा वित्त संस्था काही देशभरातील लोकांच्या किंवा कंपनीची आर्थिक व्यवहाराची माहिती गोळा करणे व त्याचे एनेलीसीस उपलब्ध करणे हे काही सोप्पे काम नाही. एखादा नवीन कर्जदार ‘लोन ’ मागायला आल्यावर लागलीच त्यासंदर्भात ‘आर्थिक कुंडली’ मांडणे व्यावहारिक दृष्टीने कठीण असते. म्हणून एखादी तटस्थ, निःपक्षपातीपणे इतिहास, वर्तमानकालीन माहितीचा संचय करून त्याबाबतचा अहवाल तयार करणे फार जरुरीचे असते. आपल्या देशाची भौगोलिक व्याप्ती पाहता तशी यंत्रणा असावी या संकल्पनेतून ‘सिबिल’ अस्तित्वात आलेली आहे. असे काम एखादी बँक किंवा रिझर्व्ह बँक करू शकते, पण त्यावर अधिक सखोलपणे पाहण्याची एक स्वतंत्र सोय जरुरीची म्हणून स्वायत्त संस्था.

सिबिल स्थापना व कामाबद्दल माहिती- आपल्याकडे 2000 मध्ये ट्रान्स युनिअन सिबिल स्थापित झाली, त्याआधी क्रेडिट इन्फर्मेशन या नावाने कामकाज चालू होते. अशी एखादी राष्ट्रीय स्तरावरील संस्था असावी, अशी शिफारस रिझर्व्ह बँकेने नेमलेल्या सिद्दीकी समितीने केली होती,त्यानुसार वरील संस्था अस्तित्वात आली. एकूण व्यापाराची गरज पाहून त्यांच्या कामात बदल करण्यात आले आणि 2004 मध्ये कन्झ्युमर ब्युरो तर 2006 मध्ये कमर्शिअल ब्युरो असे दोन विभाग सुरु करण्यात आले. 1991 च्या आर्थिक सुधारणा व दरम्यानच्या काळातील जागतिकीकरण यांचे पडसाद देशांतर्गत व परदेशी व्यापारावर उमटत होतेच, व्यापार करणार्‍या मंडळींच्या आर्थिक गरजा व क्रेडिट पार्श्वभूमीचा मागोवा घेणे हे जरुरीचे बनले. मागणी व गरज यातून नवनवीन पद्धती विकसित होत राहिल्या. पुढे 2007 साली ‘सिबिल स्कोअर’ ही देशातील पहिली स्कोअर-पद्धती कार्यरत झाली.

ज्याप्रमाणे व्यापारात स्थित्यंतरे घडत होती, कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल घडत होते, त्यानुसार काही परिवर्तन अपेक्षित होते. प्रभावी अशा कार्यप्रणालीद्वारे एकूण उद्योगाला व अर्थव्यवस्थेला पूरक व प्रोत्साहित करण्याचे व अनेक प्रकारच्या जोखमांपासून सुरक्षित करण्याचे काम केले जात आहे. प्रतिवर्षी काही नवीन सोयी-सुविधा निर्माण केल्या जात आहेत. उदाहरणार्थ – 2010 मध्ये सिबिल डिटेकट व सिबिल मॉडगेज चेक-अशा दोन आधुनिक प्रणाली अस्तित्वात आल्या. अधिक जोखमींबाबतचे वर्गीकरण व मॉडगेजसंबंधात मोठ्या प्रमाणावरील डेटाबेस निर्माण केला गेला. तर 2011 पासून ‘सिबिल ट्रान्स युनिअन स्कोअर’ हा व्यक्तिगत कंझ्युमर्ससाठी वापरात येऊ लागला. व्यापाराच्या गती व मागणीनुसार योग्य प्रकारची माहिती संशोधन करून उपलब्ध करणे व त्याद्वारे व्यापार-व्यवहाराचा दर्जा उंचावण्याचे कार्यच अशा सेवा-सुविधांतून केले जात आहे.

सिबिलचे कार्य -कोणासाठी –
1) बँका व बिगर बँकिंग कंपन्या म्हणजेच एनबीएफसीज
2) इन्शुरन्स कंपनीज
3) टेलिकम्युनिकेशन्स कंपन्या
4) फिनटेक कंपनीज
5) मायक्रो-फायनान्स कंपनी

कोणकोणत्या प्रकारच्या सेवा -सुविधा मिळतात –
संपूर्ण पार्श्वभूमी -एखादी कंपनी कधी स्थापन झाली, प्रवर्तक कोण? संचालक मंडळ कसे आहे? त्यांचे त्या विवक्षीत व्यवसायातील पूर्वानुभव आणि तज्ञ म्हणून कार्य-कर्तृत्व. कंपनीच्या स्थापनेपासून ते चालू अर्थ वर्षात केलेली व्यावसायिक कामगिरी, देशांतर्गत बाजारपेठ, आयात-निर्यातबाबतची अद्ययावत आकडेवारी, उत्तम प्रगतीची ठळक वैशिष्ठ्ये आणि समजा एखाद्या विभागाची किंवा पूर्ण कंपनीचे नुकसान किंवा अपेक्षित कामगिरी झाली नसेल, तर त्याची कारणमीमांसा, स्पष्टीकरण कळणे जरुरीचे आहे. शिवाय देशाच्या, परराष्ट्राच्या बदलत्या आर्थिक व राजकीय धोरणांचा परिणाम सोसण्याची क्षमता आहे की नाही? असे अनेक मुद्दे माहीत झाले तर कंपनीचे आर्थिक आरोग्य कळू शकते व त्यांचे धोरण व संचालक मंडळी आपली कमिटमेंट पूर्ण करू शकेल का? याचा अंदाज करू शकतात व त्या हिशेबाने निर्णय घेणे सुकर होऊ शकते.

व्यक्ती म्हणून उत्पन्नाचे साधन, आजवरची कर्जे व त्यांची वेळेवर केलेली परतफेड याबाबतची माहिती मिळाली की, नवे कर्ज देण्याबाबतचा निर्णय घेणे सोप्पे होते. एखाद्या व्यक्तीची कर्ज बुडवण्याची प्रवृत्ती असेल, तर तीही अशा रिपोर्टमधून प्रतिबिंबित होते. मग पुढे जायचे की नाही? जोखीम घेण्याबाबत व्यवस्थापकीय धोरण व निर्णय घेता येतो.

क्रेडिट रिपोर्टिंग – एखाद्या कंपनीचे सप्लायर्स कोण आहेत ? त्यांच्याशी व्यावहारिक संबंध कशा पातळीवर आहेत? त्याचा उपयोग बिझनेस-वृद्धीसाठी होतो की नाही? कंपनीच्या अडीअडचणीच्याकाळात ते पुरवठादार पाठीशी राहतील का? अशी चाचपणी करता येते. कंपनी जर उत्पादन क्षेत्रात असेल तर गेल्या काही वर्षांचा टर्नओव्हर, नफ्याचा-ग्राफ आणि आगामी काळातील संभाव्य उत्पादन व नफ्याची अंदाजे आकडेवारी मागवली जाते. त्यांच्या उत्पादनांचे मोठे ग्राहक कोण आहेत? त्यांची आर्थिक स्थिती व मागणीचा कल पहिला जातो. कंपनीची पत तपासताना असे अनेक मुद्दे बघितले जातात आणि त्यावरून भूतकाळ, वर्तमानकालीन प्रगती व भविष्यातील परिस्थिती याचा नीट आढावा घेतला जातो. आजवरची कर्ज-स्थिती, परतफेडीची सद्य:स्थिती अजमावून नवीन कर्ज पुरवठा करण्याबाबतचा निर्णय घेणे सोयीचे होते. व्यावहारिक पातळीवरील निर्णय घेण्याची प्रक्रिया ही जास्तीत जास्त निर्दोष पद्धतीने वस्तुनिष्ठपणे झाली पाहिजे. अभ्यास करून व सर्व बाजूंचा विचार करून निर्णय घेणे ही आता काळाची व व्यवसायाची गरज झालेली आहे.

फ्रॉड्ससंदर्भात – कंपनी पातळीवर किंवा व्यक्तिगत स्तरावर काहीवेळा फसवणूक करण्याचे प्रकार घडत असतात. आपला देश मोठा असल्याने एकीकडे घडलेली गोष्ट दुसरीकडे किंवा सर्वत्र समजणे गरजेचे असते. अन्यथा फसवणुकीची साखळी थांबणे अशक्य होते. आताचे युग हे जलद संपर्काचे असल्याने अशी माहिती तातडीने उपलब्ध झाली तर पुढचा अनर्थ टाळता येऊ शकतो. कर्जबुडवे मंडळींची ‘काळी यादी’ तयार केली गेली, तर मागच्यास ठेच पुढचा शहाणा या म्हणीनुसार चांगला फरक पडू शकतो. फ्रॉडच्या घटनांनी कर्ज देणार्‍यांना सावधानतेचा इशारा मिळू शकतो आणि एकूणच कर्ज देवाण-घेवाण प्रक्रिया चांगल्या पद्धतीने चालू राहणे हे व्यवसाय व अर्थव्यवस्था सुव्यस्थितपणे कार्य करू शकेल.

कस्टमर अ‍ॅॅक्विझिशन – क्रेडिट रेटिंग व स्कोअर हे फक्त कर्ज घेण्याबाबतच उपयोगी पडतात असे नाही, परंतु अन्य व्यवसायातदेखील अशी माहिती असलेला डेटाबेस इफेक्टिव्ह ठरू शकतो. उदाहरणार्थ मोबाईल कंपन्या किंवा अन्य ग्राहकोपयोगी वस्तू विकणार्‍या कंपनीज जेव्हा हफ्त्यांवर आपले उत्पादन देऊ करतात. तेव्हा त्यांच्याकडे अर्ज करणार्‍या नवीन ग्राहकाला तशी सुविधा द्यायची की नाही? हा व्यावसायिक निर्णय घेण्याआधी संभाव्य ग्राहकाची पूर्ण माहिती विशेषतः आर्थिक व्यवहार कळले तर तसे ठरवणे सोप्पे होते. पगारदार ग्राहक असेल तर तो कुठे जॉब करतो, उत्पन्न काय आहे? आजवर काही कर्जे घेतली आहेत का?अशी माहिती नवीन वस्तू कर्जावर देण्यास मार्गदर्शक ठरू शकते. एखादा बिझनेसमन असेल तर त्याच्या उत्पन्नाची माहिती व आजवरची हिस्ट्री अतिरिक्त आर्थिक बोझ्यास पात्र आहे का? हे ठरवता येते. रोखीने विक्री व्यवहार करताना अशी काही माहिती कळली नाही तर चालते कारण पैसे दिल्यावरच वस्तू किंवा सेवा पुरवली जाते. पण जेव्हा क्रेडिट पद्धतीने पेमेंट होते तेव्हा असे निकष पडताळणे मस्ट असते. अनेक हप्त्यांत पेमेंट मिळवायचे असेल तेव्हा घेणार्‍याची आर्थिक स्थिती व परतफेडीची नीती यांचे अवलोकन करणे आवश्यक असते.

नवीन ग्राहक स्वीकारताना अशा कंपनीने अशी जर खबरदारी घेतली तर व्यवसाय-चक्र विनाअडथळा सुरू राहू शकेल आणि उधारी म्हणजेच क्रेडिटवर केलेल्या विक्रीचे पैसे थकले अशी परिस्थिती उद्भवणार तरी नाही. अनोळखी ग्राहकांना वस्तू विकताना जोखीम कमी करण्यासाठी अशा साधनांचा जरूर सकारात्मक उपयोग होतो आहे, म्हणून अनेक नामांकित कंपन्यांची अशी माहिती घेणे विक्रीतील आवश्यक पायरी आहे असे मानतात.

पोर्टफोलिओ व्यवस्थापन – हे काम जेव्हा व्यावसायिक पातळीवर केले जाते, तेव्हा कस्टमरच्या आर्थिक कामगिरी व व्यवहारांची पार्श्वभूमी ज्ञात असली तर व्यवस्थापन सुलभ व नफादायी होऊ शकते.

सिबिलचे कार्य आणि कामकाज पद्धती-
1) संपूर्ण देशातील व्यक्ती आणि कंपनी यांच्या आर्थिक कारभाराची अद्ययावत माहिती गोळा करणे, असे करणे हे तसे सोपे नाही, कारण एकतर परिपूर्ण सर्वांगीण अशी माहिती मिळाली पाहिजे तीही एकदम वेळेवर. याकरिता यंत्रणा व टेक्नॉलॉजी फार प्रभावी असली पाहिजे. तरच क्रेडिट रेटिंग कंपनीची विश्वासार्हता वादातीत राहू शकते.
2) त्याकरिता बँक्स व एनबीएफसी यांच्यातर्फे नियमित पद्धतीने माहिती मागवून घेणे आणि त्याचा सुविहित असा ‘डेटाबेस’ तयार करणे.

मुळात सिबिलकडे मोठ्या प्रमाणावर ग्राहक माहितीचा अद्ययावत साठा म्हणजे डेटाबेस आहे. जो कुशलतेने व परिश्रमपूर्वक तयार केला जातो. त्यात ताजे तपशील असतात. बँक्स व वित्त संस्था यांच्याकडून येणारा माहितीचा ओघ नीटपणे मांडून ग्राहकांच्या आर्थिक कुवतीचा यथायोग्य अहवाल तयार करणे हे बारकाईने व विश्वासाने केले जाते आहे.

आज सिबिलची ख्याती आहे ती अत्याधुनिक माहिती तीही जागतिक स्तरावर दिली जाते तशी देण्यात येते. वैयक्तिक ग्राहकाची संपूर्ण क्रेडिट हिस्ट्री देणे की, ज्याचा वापर बँक्स व पर्सनल लोन्स देणार्‍या कंपन्या करतात. व्यापारी व व्यावसायिकांसाठी अतिरिक्त सेवा म्हणजे प्रभावी माहितीसंदर्भातील सोल्युशन देणे, सर्वसमावेशक असा माहितीचा साठा मिळवून देणे. ज्यामुळे ‘पद्धतशीर निर्णय’ घेणे शक्य होते, हे उत्पादन-सेवा व बिझनेस क्षेत्राला पूरक आहे.

क्रेडिटबाबतची अधिक माहिती पुढील प्रकारे मिळू शकते-एखाद्या संभाव्य कर्जदाराची -व्यक्ती वा कंपनीबद्दल नेमकी कोणत्या स्वरूपाची माहिती मिळू शकते हे आपण पाहणार आहोत, महत्वाचे विभाग :-
1) नोकरीबाबत – एखाद्या व्यक्तीने कोणकोणत्या ठिकाणी नोकर्‍या केल्या आहेत, त्याचा तपशील अशा रिपोर्टमध्ये मिळू शकतो. त्यातून काही निष्कर्ष काढता येतात, उदाहरणार्थ – नोकर्‍या बदलण्याचे प्रमाण, नोकरीत कर्ज उचलण्याचे प्रमाण, नोकरी चेंज करण्याची फ्रिक्वेन्सी, पगारवाढ -बढती अशी काही माहिती ज्यातून त्याच्या आर्थिक प्रगतीचे स्टेट्स कळू शकते. एकीकडून दुसरीकडे जाताना आधीचे व्यवहार पेंडिंग नाहीत ना? हेही तपासता येते. नोकरींद्वारे शाश्वत इन्कम किती आहे व इतर खर्च वजा जाता, उरलेल्या पगारातून घरखर्च व ताज्या लोनचे हप्ते फेडता येतील का? हे पाहता येते.
2) खात्याबाबतची माहिती – खाते वापराचा कल नेमके काय सूचित करतो? नियमित उत्पन्न व नित्य खर्च कळतात व सद्यकालीन कर्जाचे तपशील कळू शकतात. आर्थिक आरोग्य कसे प्रवाहित आहे हेही जाणवते. खाते नीट नसेल वापरले जात तर त्याची बिनधास्त प्रवृत्ती कळू शकते. त्याचा उपयोग निर्णय प्रक्रियेसाठी होऊ शकतो.
3) संपर्क माहिती- संभाव्य कर्जदाराचा कायमचा पत्ता, नोकरीचे ठिकाण अशी व थेट संपर्क साधण्याची माहिती उपलब्ध होऊ शकते.
4) व्यक्तिगत माहिती – व्यक्तीची माहिती- वय, शिक्षण, कुटुंबाची माहिती कळण्यास नक्कीच मदत होते.
5) विशिष्ट माहिती -एखाद्याबद्दल विशिष्ट प्रकारची माहिती हवी असेल तर तीही अशा रिपोर्ट्सच्या माध्यमातून मिळू शकते.

एखाद्याला-व्यक्ती किंवा कंपनीला आपली ताजी माहिती किंवा सुधारित माहिती द्यायची असेल तर, ते नक्कीच करता येते- अनेकदा जुना रिपोर्ट हा मागील कामगिरीवर आधारीत असतो, त्यानंतर समजा व्यक्ती आणि कंपनीच्या आर्थिक उलाढालीत लक्षणीय प्रगती झाली, तर ते कळवणे व त्यानुसार रिपोर्टात फेरबदल करता येतो. म्हणजे एखाद्याच्या मागील क्रेडिट रिपोर्टिंगमध्ये सुधारणा झाली हे इतरांना कळू शकते, त्याचा सर्व संबंधितांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

आपली अर्थव्यवस्था निकोप व निर्दोष होण्याच्यादृष्टीने व्यापार-आंतरराष्ट्रीय व्यापार हा अधिकाधिक प्रमाणात सुविहित असायला हवा. त्याकरिता क्रेडिट रिपोर्टिंग व क्रेडिट स्कोअर ही आधुनिक साधने असायला पाहिजेत. उद्योग-विश्वाची विश्वासार्हता जपण्यास व वाढवण्यासाठी असे प्रागतिक टप्पे जरुरीचे आहेत. सिबिलच्या माध्यमातून हे उपलब्ध आहे हेच सर्व संबंधितांना कळावे हीच आर्थिक साक्षरता आहे.

-राजीव जोशी -बँकिंग व अर्थ अभ्यासक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -