घरफिचर्सगे...आये!

गे…आये!

Subscribe

वारसा, परंपरा, मूल्ये आणि आपलेपण कुठे आभाळातून पडत नाही. ती तुमच्या समोर असतात, समोरच्या हाडामासाच्या माणसांतून ती दिसत असतात... ती आम्हाला दिसली ती आयेतून! तिने आपल्या मुलांबरोबर जावांची मुले मोठी केली. आपल्या आयांपेक्षा आम्हाला सर्वांना आये हीच आमची आई वाटायची. गे आये... ही हाक मारायची खोटी, बस्स...! मुले आणि गाई म्हशींप्रमाणे घरातील दोन चार मांजरे, कुत्रेही आयेच्या पायाभोवती सतत घुटमळत. घराच्या भोवती हे सर्व उभे आणि वर छपरावर कावळे आणि पोपट. भाकरी तुकडा आणि धान्य खायला... भूक लागली की जोरात कल्ला करणार. ‘मेल्यानो कशाक आरडतास. दितय. जीव घालव नको’ असा तिचा आवाज आला की ती शांत होत.

गे… आये! माझी हाक तिच्या कानी जातेय, पण ती काहीच प्रतिसाद देत नाही. डोळे टक्क उघडे, त्या डोळ्यात मी माझ्या मोठ्या काकीला शोधतोय… जिने आपल्या मुलांपेक्षा दिरांची मुले निगुतीने वाढवली, त्यांच्या आईंपेक्षा जास्तीचे प्रेम दिले. दिरांना, भावजयांना भाऊ आणि बहिणींप्रमाणे माया केली. घरात कर्ता पुरुष असतो, असा सर्वसामान्य समज मुळासकट फेकून देत ती कर्ती बाई झाली. पंधरा एक माणसांचे आमचे गावचे कुटुंब तिने आपल्या हाताने एखादे रोपटे लावून मोठे झाड करतात तसे वाढवले. फक्त माणसे नाही तर प्राणी आणि पक्षांनाही जीव लावला. तिच्या मायेचा हात फिरल्याशिवाय, तिने हाक मारल्याबिगर हे मुके प्राणीही आनंदाने बहरलेले मी तरी पाहिलेले नाहीत… ती आनंदाचे झाड होऊन आमच्या घरावर अमृताचा वर्षाव करत राहिली… आणि आज ते झाड जिवंत आहे, पण असून नसल्यासारखे. शरीरात जीव आहे, पण मेंदू मृत झाला आहे.

वयाची नव्वदी पार करून जगण्याची शंभरी ती सहज पार करेल, असे तिचे रोगमुक्त शरीर. मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब आणि इतर कुठल्याच रोगाची तिच्या शरीराला हात लावण्याची हिंमत झालेली नाही. एक तपापेक्षा अधिक काळ ती झोपून आहे. शरीर आपला धर्म पाळताना अन्न मागते, आपली क्रियाकर्मही पार पडते, एखाद्या यंत्रासारखे! पण, मेंदू १२ वर्षांपूर्वी थांबला आहे. तिच्या नशिबाचा खेळ आहे का, असा विचार जरी आम्ही केला असता आणि तिचा मेंदू चालत असता तर धाडकन उठून तिने नशीब, प्राक्तन यांना फेकून देऊन श्रमावर विश्वास ठेवा, असे सुनावले असते. कारण मेंदू झोपी जाईपर्यंत ती जागी होती, दिवसरात्र काबाड कष्ट करून. एक घर तिने उभे केले… आणि आज गे… आये! अशी हाक मारूनही ती काहीच प्रतिसाद देत नाही हे पाहून जीव कासावीस होतो, डोळ्यात पाणी येते. तिचे मात्र डोळे उघडे असतात. कुठल्या तरी अज्ञात यात्रेला निघून गेल्यासारखे…

- Advertisement -

माझ्या वडिलांना ते धरून सात भाऊ आणि दोन बहिणी. शेतीभाती आणि थोडीबहुत बागायती. सर्व कुटुंब शेतीवर जगणारे. १९५० नंतर मात्र सात भावांपैकी सर्वात आमचे मोठे काका महादेव. त्यांना आम्ही दादा म्हणायचो. ते आधी मुंबईला जायला बाहेर पडले. आये ही त्यांची बायको. तिला तीन मुली. या मुली तिला आये म्हणून हाक मारतात म्हणून आम्ही सर्व भावंडे आमच्या आईला आये म्हणायचे सोडून तिला आईपण देऊन मोकळे झालेलो. बाकी माई, ताई, बाई, नानी, अनी, काकी… लालबागला गिरणगावात दादांचा मुक्काम होता. गिरणीत काम आणि लाँड्रीचा व्यवसाय. सोबतीला हळूहळू त्यांनी आपल्या भावांना वेंगुर्ल्याहून आणायला सुरुवात केली. पण, काही वर्षांतच त्यांना शरीर साथ देईना आणि ते गावी परतले. १९७३ च्या सुमारास ते गेले आणि तरुणपणी आमची आये विधवा झाली. त्याच सुमारास माझ्या सख्या धाकट्या भावाचा जन्म झाला आणि त्याला दादांचे महादेव नाव ठेवले. त्याला आम्ही सर्वजण टोपन नावाने निलेश म्हणून हाक मारतो खरे, पण महादेव या नावाने तो खरा सुखावतो.

मस्तीखोर निलेशचा जबाबदार महादेव होतानाचा त्याचा प्रवास आमच्या दादांचे कदाचित जाणतेपण घेऊन जन्माला आला असावा… दादा गेले तेव्हा त्यांचा सर्वात धाकटा भाऊ आम्ही ज्याला नाना म्हणतो मधुकर हा शाळकरी छोटा मुलगा होता. या आमच्या नाना काकाच्या जोडीने आयेने कुटुंब उभे केले. हा धाकटा दिर तिचा जणू मुलगा होऊन गेला. माझ्या वडिलांसकट तिचे बाकीचे दिर मुंबईत गिरणीत छातीत कापूस भरून जगण्याचा आटापीटा करत होते आणि आपल्याबरोबर वेंगुर्ल्यातील आपले वडिलोपार्जित घरही जिवंत राहील याची काळजी घेत होते. त्यांचे शरीर मुंबईत असले तरी मन मात्र निसर्गाने चारी हाताने मुक्त उधळण केलेल्या वेंगुर्ल्यात रमलेले मी त्यांच्या डोळ्यात पाहिलेले आहे. माझे तीन नंबरचे काका अण्णांना परिस्थितीने बरेच वर्षे गावाला जाता आले नाही. मी गावाला नेमाने जायला लागल्यापासून मुंबईत परतल्यानंतर त्यांना न चुकता भेटे आणि सोबत गावची भेट. माझा हात हातात घेऊन मग ते सारा गाव फिरून यायचे. त्यांना डोळ्याने अतिशय कमी दिसत होते, पण गावाची बातमी समजल्यानंतर त्यांच्या डोळ्यातील आनंद आणि शरीरातील कंप आजही मला लख्ख जाणवतो. ज्यांनी माझे नाव संजय ठेवले, त्यांना कदाचित माझ्या नजरेतून त्यांची जन्मभूमी बघायची होती असेल… या जर तरच्या गोष्टी झाल्या. माझी आई गावाला शेतीला असताना आमचे हे अण्णा काका आणि आमची ताई काकी माझी आई होऊन गेली होती.

- Advertisement -

ही माझी केवळ रक्तामासाची माणसेच नव्हे तर कोकणातील प्रत्येक घर उंबरठ्यातील मुंबईकर माणसांनी आपले घरभाट जगवले. गावच्या आपल्या माणसांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊ दिली नाही. भले आजही कोकण गरीब असेल, कोकणी माणसे पेज खाऊन दिवस काढतील, पण आत्मसन्मानाने जगतील. कर्ज काढून घरादाराच्या त्यांनी उद्धवस्त धर्मशाळा केल्या नाहीत. गरीबीतही मान वर करून जगता येते हे त्यांनी दाखवून दिले.

अशा गरिबीत दिवस काढताना फक्त शेतीवर मोठे कुटुंब जगणार नाही, हे लक्षात आल्यावर आयेने दुधाचा व्यवसाय सुरू केला. चार म्हशी घेऊन बाजारात तसेच दूध डेअरीवर दूध देणे सुरू केले. तिच्या म्हशीही गुणी सालस. शानू, मानू अशी काहीशी त्यांची नावे. सकाळी तिने सोडल्यानंतर आपणच चरायला जाणार आणि संध्याकाळी गोठ्यात जाण्यापूर्वी आमच्या घरात खिडकीसमोर येऊन आयेला त्यांच्या ‘हमा’ भाषेत काही तरी सांगणार आणि तिला ते कळल्यानंतर त्यांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवून भाकरी तुकडा दिल्यानंतर त्या गोठ्यात परतणार. आये दूध काढायला बसली की त्या आपल्या ओठीत असेल नसेल ते दूध तिला द्यायच्या. मात्र आयेला त्यांच्या पिल्लांनाही जगवले पाहिजे हे भान होते.

म्हणूनच तिने नव्या म्हशी कधी विकत घेतल्यात असे झाले नाहीत. आपल्या संसाराची गोठाही चाके आहेत, हे ती कायम लक्षात ठेवून होती. आये घर आणि गोठा सांभाळत असताना नाना, आमची आई आणि बाकी घरातले सर्वजण शेतीभाती, भाजीपाला, बागायतीवर लक्ष देऊन होते. आई आणि आमची दुसरी काकी नानी मळ्यातून वेंगुर्ले बाजारात भाजीपाला विकायला जात असत. दुपारी तीननंतर घरी परतल्यानंतर त्यांनी जेवण आणि आराम करायचा. आपल्या जावा पहाटे घराबाहेर पडल्या आहेत, त्यांना दुसर्‍या दिवशी कष्ट करण्यासाठी आराम हवा, हे आयेचे जाणतेपण एकत्र कुटुंब का टिकली याचे आमच्या सर्वांच्या समोर जिवंत उदाहरण होते. आणि तो वारसा आमच्या वडिलांनी, काकांनी आणि मीसुद्धा मुंबईत स्थिरस्थावर झाल्यावर पुढे चालवला. झोपडीत, चाळीत आणि नंतर ब्लॉकमध्ये राहूनही घेतला वसा सोडला नाही. काकांच्या मुलांना आधार देऊन त्यांना आपल्या पायावर मोठे केले. वारसा, परंपरा, मूल्ये आणि आपलेपण कुठे आभाळातून पडत नाही. ती तुमच्या समोर असतात, समोरच्या हाडामासाच्या माणसांतून ती दिसत असतात… ती आम्हाला दिसली ती आयेतून! तिने आपल्या मुलांबरोबर जावांची मुले मोठी केली.

आपल्या आयांपेक्षा आम्हाला सर्वांना आये हीच आमची आई वाटायची. गे आये… ही हाक मारायची खोटी, बस्स…! मुले आणि गाई म्हशींप्रमाणे घरातील दोन चार मांजरे, कुत्रेही आयेच्या पायाभोवती सतत घुटमळत. घराच्या भोवती हे सर्व उभे आणि वर छपरावर कावळे आणि पोपट. भाकरी तुकडा आणि धान्य खायला… भूक लागली की जोरात कल्ला करणार. ‘मेल्यानो कशाक आरडतास. दितय. जीव घालव नको’ असा तिचा आवाज आला की ती शांत होत. आयेला प्राण्यांची भाषा कळे का ठाऊक नाही, पण गाय किंवा म्हैस व्यायला आल्यानंतर त्यांच्या बाळंतकळा आधी आयेला ऐकू येत आणि रात्री अपरात्री धो धो पावसात, हातात कंदील घेऊन घरापासून थोडे लांब असलेल्या गोठ्यात जाऊन आये त्यांचे आईच्या मायेने बाळंतपण करत असे आणि दुसर्‍या दिवशी आम्हाला ते कळत असे. आमचा जीव खरवस खाण्यात अडकला असे आणि आयेला तिच्या गायी म्हशींची, तिच्या पिल्लांची काळजी असे…

आयेच्या तिन्ही मुलींना मुंबईत आणून त्यांची जबाबदारी आपली समजत तिच्या दिरांनी त्यांची लग्ने लावली. आज आयेच्या मोठ्या मुलीच्या थोरल्या मुलीचा मुलगा सातवीत आहे. ती पणजी झाली! गावातील जबाबदारी संपल्यानंतर, म्हातारपणी तिला आराम मिळावा म्हणून तिला तिच्या धाकट्या मुलीने उज्वलाने मुंबईत आणले. बरीच वर्षे मुंबईत ती धडधाकड होती, पण नंतर हळूहळू तिचा मेंदू काम करेनासा झाला.आणि मेंदूचे शरीरावरील नियंत्रण गेल्याने ते निपचित होऊन पडले. काहीच हालचाल नाही. शरीर जिवंत आहे, पण मृत असल्यासारखे. श्वास चालतो म्हणून जीव आहे, इतकेच. अशा परावलंबी जीवाला गेले एक तप जगवण्याचे मोठे काम उज्वलाने केले. ती नर्स असल्याचा खूप मोठा फायदा झाला. तिच्या शरीरातील प्रत्येक भागाची इतक्या वर्षात तिला बारीक माहिती झाली आहे. आयेची दिवसभर देखभाल करण्यासाठी तिने कायमची नोकरीच्या हॉस्पिटलमध्ये रात्रपाळी घेतली आहे. तिच्या दोन मुली आणि नवरा रात्री तिची काळजी घेतात. १२ वर्षे बेडवर राहून तिच्या शरीराला उज्वलाने साधी एक जखम होऊ दिलेली नाही. तिचे जेवण, औषधे अगदी वेळच्या वेळी.

वर्षातून एकदा दोनदा आये खूप गंभीर आजारी होती, आता ती जगते की नाही, असे वाटत असताना ती पुन्हा मरणाच्या दारातून परत आली. आता उज्वलालाही या सार्‍याची सवय झाली आहे. आयेला कदाचित मुलगे असते तर त्यांनीही केले नसते एवढे आयेला जगवण्याचे काम तिच्या मुलीने केले. एका दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या छोट्या बाळाला जगवतात, असे उज्वलाने आयेला जगवले आहे. आम्ही कधी भेटायला गेलो की ती आयेच्या शरीराला हलवते, जागे करते. ‘गे…आये! बाई आणि संजू इलो हा. बघ तरी. हस मगे’, असे करून जागे करण्याचा प्रयत्न करते. पण, ती शून्यात नजर लावून असते. गोरीपान, लांबसडक, भरपूर केसांची आमची आये एका तपापूर्वीची आहे तशीच दिसते. पण, आपण साद घालूनही ती प्रतिसाद देत नाही, म्हटल्यावर जीव कासावीस होतो…

गरीबीतही देवदेव, नशीब, धागेदोरे, अंगठ्या, जादूटोणे यापासून आमच्या घराला आयेने कायम दूर ठेवले आणि तिला ही शिकवण समाजवादी परंपरेच्या वेंगुर्ल्याने दिली, आसपासच्या परिसराने आणि कष्टकरी माणसांनी दिली. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील पुसटशी रेषा कशी ओळखायची याचे शाळेत न गेलेल्या आयेने आम्हाला शिकवले आहे. अशा या जीवनाचे धडे आपल्या वागण्यातून, जगण्यातून देणार्‍या माऊलीचा जीव शांतपणी का जात नाही, असा विचार करून उज्वलाने तिला वेंगुर्ल्यात खास गाडी करून नेली. तिने आपल्या रक्तामासाने वाढवलेल्या घरादारातील श्वास तिच्या कानात येऊन, ‘गे आये… आता सगळा बरा असा. तू काययेक काळजी करू नको’, असे कदाचित म्हणालाही असेल. पण, आयेची कुडी जीव सोडायला तयार नाही… ती अजून जिवंत आहे. मेंदू बंद पडला असून श्वास सुरू आहे आणि आमच्या हाती गे… आये! असे फक्त म्हणण्यावाचून दुसरा पर्याय उरलेला नाही!

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -