घरफिचर्सयोग्य आहार घ्या, त्रिदोष टाळा

योग्य आहार घ्या, त्रिदोष टाळा

Subscribe

जेवण योग्य प्रमाणात सेवन करावे. आयुर्वेदाने आमाशयाचे चार भाग कल्पून, दोन भाग घनान्न, एक भाग द्रवान्न व एक भाग वायुसाठी, पचनासाठी ठेवावा असे सांगितले आहे. योग्य मात्रेत सेवन केलेल्या आहाराने वात,पित्त, कफ या त्रिदोषांचा प्रकोप न होता पचन सुकरतेने होते. अति प्रमाणात जेवल्याने पचनशक्तीवर ताण पडल्याने अजीर्ण, आम्लपित्तासारखे व्याधी उद्भवतात.

मागील सदरात आपण केवळ कॅन्सर प्रतिबंधातच नव्हे तर स्वास्थ्य रक्षणातही महत्त्वपूर्ण भूमिका असणा-या आयुर्वेदोक्त आहार संकल्पनेविषयी माहिती घेतली. या सदरात आपण आयुर्वेद शास्त्राने सांगितलेली आहार नियमावली जाणून घेणार आहोत.

१) आहार षड्रसयुक्त म्हणजेच गोड, आंबट, खारट, तिखट, कडू व तुरट या सर्व चवींनी युक्त असावा. भात, वरण तसेच आमटी,मीठ,लिंबू, पोळी तसेच भाकरी, भाजी इ. पदार्थांनी व सर्व चवींनी युक्त भारतीय आहारपध्दती ही खरोखरच आदर्श आहे.

- Advertisement -

२) चवींनुसार प्रथम गोड पदार्थ नंतर आंबट, खारट व शेवटी तिखट, कडू व तुरट रसाचे पदार्थ खावेत.

३) सूप व मग मुख्य जेवण असे पाश्चात्य आहारसेवन शैलीचे अंधानुकरण न करता आयुर्वेदीय आहार सिध्दांतानुसार प्रथम घनान्न म्हणजे चपाती, भाकरी इ. खावे. नंतर वरण-भात व शेवटी ताकासारखे पातळ पदार्थ घ्यावेत.

- Advertisement -

४) जेवण शक्यतो गरम असावे. गरम-गरम जेवल्याने पचन सुलभतेने होते. जेवणाची चव वाढते. वातानुलोमन झाल्याने गॅसेसचा त्रास होत नाही.

५) जेवण कोरडे जेवू नये. जेवणात वरण, आमटी, सार, सूप, कढी, ताक अशा पातळ पदार्थांचा समावेश असावा. जीवनीय, बुध्दिवर्धक अशा अनेक गुणांनी युक्त गाईच्या तूपाचा योग्य मात्रेत आहारात समावेश करावा. जेवणात फुलका, पोळी, वरण-भात, मऊ भातावर गाईचे तूप घ्यावे. यामुळे पचनास मदत होते. शरीराची रूक्षता कमी होते. इंद्रियांना पुष्टी मिळून शरीराचे बल वाढते.

६) जेवण योग्य प्रमाणात सेवन करावे. आयुर्वेदाने आमाशयाचे चार भाग कल्पून, दोन भाग घनान्न, एक भाग द्रवान्न व एक भाग वायुसाठी, पचनासाठी ठेवावा असे सांगितले आहे. योग्य मात्रेत सेवन केलेल्या आहाराने वात,पित्त, कफ या त्रिदोषांचा प्रकोप न होता पचन सुकरतेने होते. अति प्रमाणात जेवल्याने पचनशक्तीवर ताण पडल्याने अजीर्ण, आम्लपित्तासारखे व्याधी उद्भवतात. कमी मात्रेत घेतलेले जेवण शरीराचे पोषण करत नाही.

७) पूर्वी घेतलेले जेवण पचल्यावरच परत आहार सेवन करावे. आधी घेतलेले जेवण पचल्याची खूण म्हणजे शुध्द ढेकर येणे, मलमूत्राचे उत्सर्जन नियमित व त्रास न होता होणे, कडकडीत भूक लागणे होय. भूक नसतानाही किंवा अजीर्णावस्थेत सेवन केलेले जेवण पचनाच्या विकारांना आमंत्रण देते. यासाठीच आयुर्वेदाने शक्यतो ३ तासांपेक्षा कमी काळामधे काही खाऊ नये तर ६ तासांच्या वर कधी उपाशी राहू नये असे सांगितले आहे.

८) आयुर्वेद शास्त्रानुसार काही आहारीय पदार्थ दुस-या आहारीय पदार्थात एकत्र करून सेवन केले तर ते शरीरावर अपायकारक परिणाम करतात, अशा मिश्र पदार्थांना आयुर्वेदात ‘विरूद्धान्न’ अशी संज्ञा आहे. यात शिकरण, फ्रूटसॅलड, मिल्कशेक, दूध व मांसाहार, दूध, दही, भात एकत्र इ. अनेक पदार्थांचा समावेश होतो. स्वास्थ्य रक्षणासाठी अशा विरूद्धान्नांचे सातत्याने व अधिक प्रमाणात सेवन टाळावे.

९) जेवताना आजूबाजूचे वातावरण मनोनुकूल व प्रसन्न असावे. आपल्या संस्कृतीनुसार, भोजनापूर्वी म्हणावयाचा वदनि कवळ घेता , नाम घ्या श्रीहरीचे ! हा श्लोक चित्त प्रसन्नता व एकाग्रता याचाच सूचक
आहे.

१०) अतिशय भरभर जेवू नये. भरभर जेवल्याने खाल्लेल्या अन्नाचे चर्वण नीट होत नाही. तसेच आमाशयात अन्न पुरेसा काळ न थांबल्याने पचन नीट होत नाही.

११) अतिशय मंदगतीनेही जेवू नये. हळूहळू जेवल्याने जेवण गार होते. जेवल्याचे समाधान होत नाही. पर्यायाने पचन सुकरतेने होत नाही.

१२) खाताना नेहमी चवीने, मन लावून खावे. जेवण जेवताना चित्त एकाग्र असणे आवश्यक आहे. दोष देत, उणेदुणे काढत, वाद-विवाद करत कधीही जेवू नये. टी.व्ही पहात, कॉम्प्युटरवर काम करत किंवा वर्तमानपत्र वाचत जेवणे इ. गोष्टी टाळाव्यात. थोडक्यात ज्या गोष्टींमुळे चित्त विचलित होऊन पचनावर परिणाम होतो त्या सर्व गोष्टी जेवताना टाळाव्यात. ही नियमावली लक्षात ठेवून चला तर आखूया आहाराचे वेळापत्रक ! शुभस्य शीघ्रम् !

वैद्य स. प्र. सरदेशमुख
ए. व्ही. पी., पीएच्. डी. (आयुर्वेद)
संचालक, इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, वाघोली, पुणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -