घरफिचर्सतळीराम, मळीराम आणि लॉकडाऊन!

तळीराम, मळीराम आणि लॉकडाऊन!

Subscribe

करोना विषाणूला आवर घालण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दिवसातून काही वेळ उघडी ठेवण्याची मुभा देण्यात आली, पण मद्य जीवनावश्यक या व्याख्येत बसत नसल्यामुळे त्याची विक्री करणारी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. ती ४ मेपासून काही प्रमाणात उघडण्यास परवानगी देण्यात आली, त्यामुळे मद्यपींचा आनंद गगनात मावेनासा झाला, पण मुंबईत तळीरामांनी तोबा गर्दी केल्यामुळे मद्य दुकाने पुन्हा बंद करण्यात आली. आता ऑनलाईन मद्यविक्रीचा पर्याय खुला करण्यात आलेला आहे. दुसर्‍या बाजूला पानाच्या गाद्या बंद असल्यामुळे पान-तंबाखू खाणार्‍यांची कोंडी झालेली आहे. तळीराम आणि मळीराम यांची लॉकडाऊनमध्ये ही अशी अवस्था झालेली आहे, त्यामुळे ते लॉकडाऊन उठण्याची आतुरतेने वाट बघत आहेत.

करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात किराणा, दूध आणि औषध अशा अत्यावश्यक गोष्टींना मोकळीक देण्यात आलेली होती, पण अन्य वस्तूंची दुकाने बंद करण्याचे आदेश दिलेले होते. रेल्वे, मेट्रो बंद करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेच्या गाड्या वगळता रस्त्यावरील वाहतूकही बंद करण्यात आलेली आहे. मद्य आणि पानगाद्या या अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत येत नाहीत. त्यातील मद्य विक्रीची दुकाने उघडण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. शहराच्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी ऑनलाईन मद्यविक्रीचा पर्याय खुला करण्यात आला आहे. पानगाद्या अजूनही बंद ठेवण्यात आलेल्या आहेत.

मद्य पिण्याची सवय असलेल्यांची मोठी कुचंबणा झालेली होती. त्यामुळे त्यांच्याकडून दारूची दुकाने उघडण्याची मागणी होत होती. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासारख्या राजकीय नेत्यानेही लॉकडाऊनमुळे सरकारचे उत्पन्न घटले असल्यामुळे मद्याची दुकाने उघडण्यात यावीत, अशी सूचना राज्य सरकारला केली होती. त्यात त्यांनी नैतिकतेचा बाऊ करू नका, असे म्हटले होते, पण लॉकडाऊनमध्ये उत्पन्नांचे सगळे स्त्रोत थंडावले असल्यामुळे मद्यपी मंडळी आपल्या कुटुंबाच्या खाण्या जेवण्याच्या गरज लक्षात न घेता दारूवर पैसे उडवतील. त्यातून कौटुंबिक हिंसाचारात वाढ होईल, अशी भीती होती. त्यामुळे मद्यविक्रीची दुकाने उघडताना सरकारला अनेक वेळा विचार करावा लागत होता. अनेक गावांमध्ये आणि शहरांमधील गरीब वस्त्यांमध्ये यापूर्वी दारुबंदीसाठी अनेक मोहिमा राबवण्यात आल्या होत्या, पण त्यांना मिळणारे यश हे अल्पकालिक होते, पण करोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांना दारूच उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे त्यांची दारू पिण्याची सवय नाईलाजाने का होईना, कमी झालेली दिसली. त्यामुळे जे अट्टल दारुडे होते आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला तसेच शेजार्‍या पाजार्‍यांना त्रास होत असे त्यांनी मात्र सुटकेचा आणि समाधानाचा नि:श्वास टाकला होता.

- Advertisement -

छोटी शहरे आणि गावपातळीवर काम करणार्‍या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने उघडण्याला विरोध केला होता, पण शेवटी वाढत जाणारा लॉकडाऊनचा कालावधी, मद्यपींची मानसिक स्थिती, सरकारला असलेली महसुलाची गरज या सगळ्या गोष्टींचा विचार करून केंद्र आणि राज्य सरकारांना मद्याची दुकाने उघडण्याचा निर्णय घ्यावा लागला.

लॉकडाऊनच्या कालावधीत अनेक दिवसांचा उपवास सहन करणार्‍या मद्यप्रेमींनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आणि मदिरालयांसमोर भर उन्हात रांगा लावल्या. बर्‍याच ठिकाणी प्रामाणिकपणे अंतर राखून मद्यप्रेमी उभे असले तरी काही ठिकाणी हुल्लडबाजी झाली. त्यामुळे पोलिसांना काठीचा वापर करावाच लागला. काही ठिकाणी तर उसळलेल्या गर्दीमुळे दुकाने बंद करावी लागली. काही मद्यप्रेमींनी तर असा दावा केला की, दारू सुरू करा. मग बघा करोनाही जाईल. कारण तुमच्या हातांना करोनामुक्त ठेवणार्‍या सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असते. असो काहीही असो, पण लॉकडाऊनमध्ये शेवटी दारूच्या दुकानांची लॉक उघडली आणि मद्यप्रेमींच्या आनंदाला उधाण आले, पण तो आनंद मद्यप्रेमींच्या अतिउत्साहामुळे फार काळ टिकला नाही. मुंबईत मद्यविक्रीची दुकाने बंद करावी लागली.

- Advertisement -

मद्य पिणे हे जाहीरपणे प्रतिष्ठेचे मानले जात नसले तरी त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. जगात मद्य न पिणार्‍यांची संख्या ही मद्य पिणार्‍यांच्या संख्येच्या तुलनेत खूपच कमी आहे, यात शंकाच नाही. असे म्हटले जाते की, मद्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत असले तरी मद्याच्या टेबलावर अनेक प्रश्न चुटकी सरशी सुटतातही, अनेक वादळे मद्याच्या पेल्यात शांत होतात. मद्य हा विषय तसा थट्टेचा करण्यात आला असला तरी अनेक कवी, शायर यांनी मद्य किंवा सुरा यांचा महिमा त्यांच्या कविता, गझल, शायरीमधून गायलेला दिसतो. त्याचा आस्वाद मद्य न पिणारेही भरभरून घेताना दिसतात.

हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला’ या कविता संग्रहाने एकेकाळी अनेकांना विशेषत: तरुणांना अक्षरश: वेड लावले होते. त्यावरून अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. तुमच्या अशा काव्यामुळे तरुणाई वाया जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली. दारू पिण्याला तुम्ही उगाचच प्रतिष्ठा मिळवून देऊ नका, त्याचे उदात्तीकरण करू नका, असे अनेकांनी हरिवंश राय यांना सुनावले, पण त्यांची ‘मधुशाला’ खूप गाजली. त्यात ते म्हणतात,‘मंदिर मस्जिद भेद मिटाती मधुशाला’, सगळ्या जातीधर्माचे भेद जर कुणी नष्ट करत असेल, तर ती मधुशाला आहे. हे त्यांचे म्हणणेही खरेच आहे. मदिरालय कितीही बदनाम असले तरी तिथे जाणारा कुणी कुणाची जात धर्म विचारत नाही. सगळे एकाच ठिकाणी एकरुप होऊन जातात.

करोना हा असा विषाणू आहे की, त्याने मानवी इतिसाहात मानवाला अनेक दिवस दारू आणि पान-तंबाखूपासून दूर रहायला लावलेे. दोन महायुद्धे झाली तेव्हाही दारूची आणि पान-तंबाखूची दुकाने अशी बंद नव्हती. लॉकडाऊनमधून दारूला मोकळीक मिळाली आहे, पुढील काही दिवसात पान-तंबाखूच्या गाद्याही सुरू होतील, अशी अपेक्षा आहे. सध्या ५ रुपयांची तंबाखूची पुडी ५० रुपयांना काळ्या बाजारात विकली जात आहे. तंबाखू आरोग्याला कितीही घातक असली तरी ती घातकता चघळण्याचा छंद अनेकांच्या जीवाला जडलेला आहे.

चाळीस दिवस उलटून गेल्यावर राज्यात काही अटी घालून मद्य विक्रीची दुकाने उघडण्यात आली होती. ती खरेदी करण्यासाठी लोकांना रांगेत उभे राहताना एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे अपेक्षित होते. ते सुरुवातीला काही काळ पाळण्यात येते, पण काही वेळानंतर मनाचा तोल ढळतो, आपल्याला मिळणार की नाही, की, आपला नंबर येईपर्यंत सगळी संपून जाणार, अशी अनिश्चितता मनात निर्माण झाली. मग सुरक्षित अंतर बाजूला पडून रेटारेटी सुरू झाली, पण अशी गर्दी आणि रेटारेटी सध्या करोनाच्या काळात घातक आहे. त्याचसोबत दुसरी गोष्ट म्हणजे पान, तंबाखू, चुना खाण्याची ज्यांना सवय आहे, त्यांना तल्लफ आली की, ती त्यांना हवी असते. तंबाखू हातावर घेऊन त्याला चुना लावून तो चांगला मळून चारपाच वेळा ठोकून त्याची गोळी तोंडात ठेवल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. त्यामुळे तळीराम आणि मळीराम यांची या लॉकडाऊनने चांगलीच परीक्षा घेतलेली आहे. लॉकडाऊनचा कालावधी हा खरे तर त्यांच्यासाठी आत्मचिंतनाचा कालावधी आहे. त्यात ते काही सकारात्मक विचार करतील का?

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -