घरफिचर्सउंच पुतळे आणि छोटी माणसे!

उंच पुतळे आणि छोटी माणसे!

Subscribe

सरदार पटेल, आम्हाला माफ करा

ज्या मुजोर, अय्याशी संस्थानिकांच्या हातून जहागिरी काढून घेऊन त्यांना विशाल भारतात समाविष्ट करून शोषित, शेतकरी, मजूर यांना स्वतंत्र झाल्याचा आपण आनंद मिळवून दिलात त्या समाजाच्या शेवटच्या घटकातील माणसे आज आपल्या पुतळ्याखाली तशीच गरीब अवस्थेत पडली आहेत. त्यांचे अश्रू पाहू नका. सरदार पटेल, आम्हाला माफ करा…!

…..चर्चगेट, सीएसटी, मंत्रालय आणि विधानभवन परिसरात नेहमीचा फेरफटका असतो… येथे पुतळेच पुतळे दिसतात. छोटे पुतळे, मोठे पुतळे, उभे पुतळे, बसलेले पुतळे, वाट पाहणारे पुतळे, पक्ष्यांच्या विष्ठेने पांढरेफेक झालेले पुतळे, मोडलेले पुतळे, वर्षाने एकदा गळ्यात हार पडलेले पुतळे, भिकार्‍यांचे आश्रयस्थान असलेले पुतळे, गर्दुल्ले ठाण मांडून बसलेले पुतळे, अतिगरिबांनी प्लस्टिकचे छप्पर घालून संसार मांडलेले पुतळे आणि आपल्याला उभारणार्‍यांच्या नावाने कडकडा बोटे मोडून चार शिव्या हासडणारे पुतळे… आणि बाबांनो, यात आणखी भर टाकू नका असे दिन होऊन सांगणारे पुतळे. पण, आमचे नेते अशा निर्जीव पुतळ्यांना काय चालले आहे, असे थोडेच विचारत बसणार… येथे हाडामासाच्या जिवंत माणसांना आम्ही विचारत नाही. तेथे पुतळे किस झाड की पत्ती! पण, आम्ही पुतळे बांधणार… धरणावर बांधणार, समुद्रात बांधणार आणि समुद्र किनारी बांधणार. कारण लोकशाहीत लोकांना मूर्ख बनवण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे. तुम्ही पुतळे बघा आणि आनंद घ्या…

- Advertisement -

अन्न,वस्त्र आणि निवारा या काय अनादी कालापासूनच्या चालत आलेल्या गरजा आहेत, त्या सत्ताधार्‍यांनी पूर्ण केल्याच पाहिजे, असे काही बंधन नाही…आम्ही पुतळे बांधणार. उंच उंच पुतळे, जगातील सर्वात उंच पुतळे. सरदार पटेल, कृपया आम्हाला माफ करा. लवकरच तुमच्या पुतळ्याच्या उंचीचा विक्रम मोडीत निघणार आहे. तुम्ही नर्मदेच्या काठावर उभे असाल तर जरा मुंबईतल्या अरबी समुद्राकडे पाहा… शिवाजी महाराजांचा पुतळा तुमच्यापेक्षा उंच उभारला जाणार आहे. ज्या मुजोर, अय्याशी संस्थानिकांच्या हातून जहागिरी काढून घेऊन त्यांना विशाल भारतात समाविष्ट करून शोषित, शेतकरी, मजूर यांना स्वतंत्र झाल्याचा आपण आनंद मिळवून दिलात त्या समाजाच्या शेवटच्या घटकातील माणसे आज आपल्या पुतळ्याखाली तशीच गरीब अवस्थेत पडली आहेत. त्यांचे अश्रू पाहू नका. सरदार पटेल, आम्हाला माफ करा…!

सरदार पटेल, आपण ज्या नर्मदा घाटीच्या साधू बेटावर उभे आहात ती घाटी म्हणजे आदिवासींना उध्वस्त केलेले नर्मदा सरोवर आहे. तेथे उभे राहून आपण खूश आहात का? आपला पुतळा जसा जगातील सर्वात उंच पुतळा आहे, तसाच आपला पुतळा जेथे उभा आहे ते नर्मदा धरण हे सुद्धा जगातील सर्वात उंच धरण आहे आणि त्या धरणाखाली हजारो आदिवासींनी जिवंत समाधी घेतली आहे… तुमचा जीव तीळ तीळ तुटेल. पण तसे करू नका. तुम्हाला पाहायला जगभरातून माणसे येतील तेव्हा हसतमुखाने त्यांना सामोरे जा… भारताचे नाव जगात गेले पाहिजे! आदिवासी धरणात बुडून मेले आहेत. मरू दे. आणखी मरतील मरू दे, आज त्यांच्या कुशीत पाणी आहे, पण एक थेंब त्यांना मिळत नाही, मरू दे. धरणाला जागा देऊनही नीट पुनर्वसन झालेले नाही… आदिवासी मेला पाहिजे, गरीब छोटाच राहिला पाहिजे… पण, पुतळे मोठे व्हायलाच हवेत!

- Advertisement -

याच नर्मदेतील आदिवासींसाठी मेधा पाटकर यांनी आपले आयुष्य पणाला लावले. त्या मेधा यांनी आपल्या पुतळ्याचे अनावरण होताना आपल्याला एक अनावृत्त पत्र लिहिलंय. ती सांगते, ‘माननीय पटेलजी, आपला पुतळा जेथे उभा आहे त्या नर्मदा धरणाच्या आदिवासींचे गुजरात सरकारने नीट पुनर्वसन केले आहे का? हे एकदा विचारा. आधी पुनर्वसन, मग धरण, असा जागतिक मापदंड ठरवत नर्मदा धरण बांधायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी मिळाली होती. पण, तसे झालेले नाही. नर्मदेच्या पाण्यावर त्याचा पहिला हक्क असताना तो मात्र तहानलेला आहे. त्याने एक हंडा पाण्यासाठी कुठे जावे. मला उत्तर द्या’. दोन दशकांपेक्षा अधिक काळ आदिवासींची लढाई मेधा लढली. पण तिच्या अथक संघर्षाच्या लढाईने पुनर्वसनाचे निकष बदलेले तरी लालफितीत अडकलेल्या लोकशाहीने आदिवासींचा गळा दाबला आहे आणि त्यांचा आवाज सरदार पटेल यांच्यापर्यंत पोहचलेला नाही. आता तर त्यांना खूपच उंचीवर नेऊन ठेवले आहे.

बरेचसे पुतळे ती मोठी माणसे मरून गेल्यानंतर काही वर्षांनी घडतात. पण, जगभराच्या मापात बोलायचे तर राजकीय इच्छाशक्ती पाठीशी उभी राहिल्याशिवाय प्रचंडच काय तर लहानसहान असे पुतळेही उभे राहू शकत नाही. महात्मा गांधींचे आपल्या देशात अगणित आणि परदेशातही पुतळे वा स्मारके आहेत. पण, गांधींचे विचार या देशातील किती नागरिकांनी घेतले, हा मोठा प्रश्न आहे. उलट गेल्या काही वर्षांत गांधीजींचे विचार कसे या देशाला मारक ठरले हे विविध मार्गाने सांगितले जात आहे, अगदी ठरवून. उलट गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसे किती महान आहे, हे सांगण्याची स्पर्धा सुरू आहे. महान माणसांचे विचारच आता कोणाला आचरणात आणायचे नसतील तर पुतळ्यांकडे तरी कोण ढुंकून बघणार आहे. महात्मा गांधी, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि थोर नेत्यांच्या पुतळ्यांची विटंबना करून या देशात जातीय दंगली घडवण्याचे प्रकार तर सातत्याने होत असतात.यात लोकांचे जीव जातात, अनेक लोक जखमी होतात, सामान्य माणसांची घरे, त्यांच्या आयुष्याची पुंजी सार्‍याची राखरांगोळी होते. त्यावेळी बाकीचे निर्जीव पुतळे शांत असतात आणि ज्यांनी आपले राजकीय हिशोब चुकवलेले असतात ते हसत असतात…

2014 साली देशात भाजप सत्तेवर आल्यावर जनसंघाचे नेते दीनदयाळ उपाध्यायांचे पुतळे बसवायचा धडकाच सुरू झाला. पुतळे बांधले की विचार पसरवता येतात, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला वाटत असावे. प्रत्येकाने नेते, महापुरुष आणि पुतळेही वाटून घेतले आहेत. गांधीजी काँगेसचे, शिवाजी महाराज शिवसेनेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, डाव्या कम्युनिस्ट पक्षाचे स्टॅलिन आणि आता दीनदयाळ उपाध्याय यांचे पुतळे हे भाजपचे. आले आपले सरकार की बांधा पुतळे आणि करा उत्सव. मग दुसर्‍यांच्या विचारांची कत्तल आणि पुतळे तोडले तरी बेहत्तर. भाजपची त्रिपुरात सत्ता येताच तेथे स्टॅलिनचा पुतळा खाली खेचण्यात आला. पुतळ्यांचे राजकारण भराला येण्याचा काळ आता सोकावला आहे.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -