घरफिचर्सथंडा - थंडा.. कुल- कुल : शिमला- मनाली ट्रिप

थंडा – थंडा.. कुल- कुल : शिमला- मनाली ट्रिप

Subscribe

पांढर्‍या शुभ्र बर्फाची दुलई पांघरलेला डोंगर. त्यावर सूर्यकिरणं पडल्याने जणू काही हिरे चमचम करत असल्याचा भास होत होता. डोळ्यांचे पारणे फिटावे असा हा क्षण.

सरजी खाना खाओ और मस्त सो जाओ सुबह आपको solang valley जाना है, ड्रायव्हरने सांगितले. ड्रायव्हरच्या या शब्दांनी उत्सुकता अधिक ताणली गेली. केव्हा एकदा रात्र संपतेय असं वाटू लागलं. चित्रांमध्ये पाहिलेले, टीव्हीवर पाहिलेले आणि नातेवाईकांकडून ऐकलेले शिमला – मनाली पाहण्याची संधी अखेर आली होती. शिमला – मनालीची ती थंडा – थंडा कुल कुल अशी ट्रिप! क्या मोसम था! आहा! बर्फाचे उंच – उंच डोंगर आणि ती थंडी. वेगळाच अनुभव. सकाळी ११ वाजता चंदीगड एअरपोर्टला उतरल्यानंतर मनालीसाठी प्रवास सुरू झाला. मुंबईतून निघाल्यापासून असलेली उत्सुकता आता मिनिटा गणिक ताणत होती. केव्हा एकदा मनालीला पोहोचतोय असं झालेलं.

चंदीगडपासून जवळपास १० तासांचा प्रवास. आत्ता मात्र थंडी लागायला सुरूवात झाली. स्वेटर घालण्याशिवाय काही पर्यायच नव्हता. रात्री हॉटेलला पोहोचल्यानंतर जेवण – खाणं झालं. पण, solang valley पाहायची या उत्सुकतेपोटी डोळ्याला डोळा काही लागेना. सकाळी प्रवास सुरू झाला तो solang valleyचा. उत्सुकतेपोटी ड्रायव्हरला प्रश्न विचारून अक्षरश: भंडावून सोडले. ड्रायव्हर देखील दिलदार माणूस. तो देखील सर्व माहिती न कंटाळता सांगत होता. मिलेक्टरी कॅम्प, सफरचंदाची झाडं, लाकडी पूल. घरांची विशिष्ट अशी रचना या सर्वांचा आनंद घेत अखेर solang valleyला पोहोचलो. बर्फापासून रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेले कपडे अंगावर चढवून घोड्यावर मान टाकून निघालो. समोरचं दृश्य पाहून मन प्रसन्न होत होतं. पांढर्‍या शुभ्र बर्फाची दुलई पांघरलेला डोंगर. त्यावर सूर्यकिरणं पडल्याने जणू काही हिरे चमचम करत असल्याचं भास होत होता. व्वा! लाजवाब!! डोळ्यांचे पारणे फिटावे असा हा क्षण. आयुष्यात पहिल्यांदा अनुभवत होतो. निसर्गाची किमया या ठिकाणी अनुभवत होतो. बर्फामध्ये फिल टु धम्माल करत निसर्गाच्या सानिध्यात पहिला दिवस गेला.

- Advertisement -

दुसर्‍या दिवशीचा दिवस उजडला आणि आम्ही river rafting केली. त्यानंतर मनाली मार्केट फिरणं. मंदिरं पाहणं, संध्याकाळी हिमालय Culture अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरमध्ये जाऊन डान्स आणि धम्माल. जेवणाची पद्धत आणि संस्कृती सारं काही अनुभवनं हा आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण होता. त्यानंतर प्रवास सुरू झाला तो शिमल्याच्या दिशेने. तब्बल ८ तासांचा प्रवास. पण, निसर्गाच्या बाहेरचं निसर्ग न्याहाळत सुरू झालेला हा प्रवास क्षणोक्षणी उत्सुकता ताणत होता. डोंगर आणि त्यातून वाहणार्‍या नद्या हा नजारा काही औरच! हॉटेलला पोहोचल्यानंतर डोंगरमाथ्यावर वसलेल्या घरांना केलेली विद्युत रोषणाई पाहण्याचा अनुभव देखील सुंदर होता. रात्र गेल्यानंतर सकाळी गेलो ते शिमलाला.

kufri या ठिकाणी घोड्यावर बसून फिरायची एक वेगळीच मज्जा!! घोड्यावर बसताना मनात थोडी भीती नक्की होती. पण त्यामागे एक शान देखीव होती. मन काही काळ इतिहासात रमलं. सफरचंदाची बाग, दुर्बिणीतून शिमला पाहणं, पॅराशूटमधून आकाशात झेपावणं हा देखील एक वेगळाच अनुभव होता.

- Advertisement -

त्यानंतर पहाटे Jakhoo हनुमानच पाहणं हा देखील सुंदर अनुभव होता. जवळपास १५०० फुटावर हे मंदिर आहे. त्यात रामभक्त हनुमानाची मुर्तीची उंची तब्बल १०८ फुट. त्यावेळी लक्ष्मणासाठी संजीवनी आणायला जाताना हनुमान इथेच उतरले होती अशी अख्यायिका सांगितली गेली. त्यावेळी बालपणी पाहिलेले रामायणातील क्षण काही काळ डोळ्यासमोर आले. या सार्‍या गोष्टी डोळ्यात साठवत मज्जा, मस्ती आणि धम्माल करत पूर्ण दिवस गेला.यानंतर प्रवास सुरू झाला तो मुंबईच्या दिशेने. डोळ्यांत आणि मनात साठवलेल्या शिमला – मनालीच्या आठवणी घेऊन.

 


रोशन मोरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -