गणेशोत्सवातील ते संगीत!

आजचा गणेशोत्सव आणि आजच्या गणेशोत्सवाच्या मंडपातील माहौल बदलून गेलेला आहे. गीतसंगीताच्या मैफलीचा तो माहौल आता राहिलेला नाही. आजच्या काळात गणेशोत्सवाच्या मंडपात गाणंबजावण्यासाठी, नाचगाण्यासाठी पूर्वीच्यासारखा मंच उभारला जात नाही. खरंतर तो मंच त्या काळात कलाकारांच्या कलागुणांसाठी असायचा. पण आता त्याची गरजच वाटेनाशी झाली आहे. परिणामी, गणेशोत्सवातले आजचे मंडप पूर्वीच्या काळाच्या तुलनेत कलेच्या बाबतीत रिते आणि म्हणूनच सुने सुनेच झाले आहेत.

Mumbai

१९६६-६७ सालची गोष्ट. अशाच गणेशोत्सवाच्या दिवसांत आम्ही काही मित्रमंडळी आमच्या ठाण्यातल्या गल्लीबोळांतून रात्रीचे फिरायचो. ते आमचं शाळकरी वय होतं. गणपतीच्या या मंडपातून त्या मंडपात फिरणं हा आमचा त्या दिवसांतला आवडता छंद असायचा. गणपतीची सजावट पाहण्यासाठी घराबाहेर पडण्यातल्या, त्या काळातल्या त्या मजेला खरोखरच तोड नव्हती. त्या काळात असंख्य चॅनेल्स पोटात साठवलेल्या टीव्हीने आपली जागा अडवलेली नव्हती. आवळलेल्या मुठीत मोबाइल आलेला नव्हता. थोडक्यात, रेडिओचा सन्माननीय अपवाद सोडला तर मनोरंजनाची साधनं आसपास उपलब्ध नव्हतीच. अशा वेळी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे त्या काळातल्या लोकांसाठी मनोरंजनासाठी अपूर्व संधी असायची.

ही संधी कलाकारांसाठीही असायची आणि रसिकांसाठीही. अशाच त्या काळात आम्ही मित्रमंडळी ठाण्यातल्या गल्लीबोळात फिरता फिरता ठाण्यातल्या गावदेवी मैदानात आलो तर तिथल्या मंडपात जो गायक कलाकार गात होता ते बघून आम्हा मित्रमंडळींना सुखद धक्का बसला. अगदी शुभ्र धोतर नेसलेली ती व्यक्ती जे गाणं गात होती त्या गाण्याचे शब्द होते – ना मांगु ये सोना चांदी, मांगे दर्शन देवी, तेरे द्वार खडा एक जोगी!…आणि हे गाणं गाणारी व्यक्ती होती साक्षात हेमंतकुमार! त्यांच्या पुढ्यातल्या टेबलावर तिथे हार्मोनियम होती आणि त्या हार्मोनियमवर बोटं फिरता फिरता त्यांच्या गळ्यातून साकार होणारं त्याचं गाणं हा गणेशोत्सवाच्या त्या मंडपातल्या लोकांसाठी अतिशय दुर्मीळ नजराणा होता. लता मंगेशकर, आशा भोसले, मुकेश, महंमद रफी, किशोरकुमार, महेंद्रकुमार अशा तोडीस तोड गायकांच्या त्या काळातलं हेमंतकुमार हे एक त्याच तोडीचं नाव होतं. ते गायक होते आणि प्रतिभावान संगीतकारही होते. कोहरामधलं ‘सुन बेकरार दिल, हो चुका हैं मुझ को आंसु ओं से प्यार’ हे त्यांच्या संगीतातलं गाणं आम्हा मित्रमंडळींपर्यंत तोपर्यंत पोहोचलं नव्हतं. साहजिकच, हेमंतकुमार हे आमच्यासाठी त्या काळातले मोठे स्टार होते…आणि ते आम्हाला गणेशोत्सवाच्या साध्यासुध्या मंडपात दिसल्यानंतर आम्ही मित्रमंडळी भुवया उंचावून एकमेकांकडे पाहू लागलो. हेमंतकुमारांनी पुढचं गाणं सुरू केल्यानंतर तर आम्ही मित्रांनी मंडपात सरळ बैठक मारली आणि हेमंतकुमारांच्या त्या मुलायम खर्जातल्या रेशमी आवाजातल्या गाण्यांचा अक्षरश: आनंद लुटला.

आजच्या गणेशोत्सवात ही आठवण सांगण्याचं कारण आहे आजचा गणेशोत्सव आणि आजच्या गणेशोत्सवातच्या मंडपातला बदलून गेलेला तो माहौल! आज गीतसंगीताच्या मैफलीचा तो माहौल आजच्या गणेशोत्सवात राहिलेला नाही. आजच्या काळात गणेशोत्सवाच्या मंडपात गाणंबजावण्यासाठी, नाचगाण्यासाठी पूर्वीच्यासारखा तो मंच उभारला जात नाही. खरंतर तो मंच त्या काळात कलाकारांच्या कलागुणांसाठी असायचा. पण आता त्याची गरजच वाटेनाशी झाली आहे. घरात अवतरलेला टीव्ही आणि त्यावर घरबसल्या होणारं आयतं मनोरंजन यातून घर सोडून, मंडपाच्या दिशेने जाणारी वाट वाकडी करून जायची तसदी आता कुणी घेत नाही. परिणामी, गणेशोत्सवातले आजचे मंडप पूर्वीच्या काळाच्या तुलनेत कलेच्या बाबतीत रिते आणि म्हणूनच सुने सुनेच झाले आहेत.

तेव्हाच्या काळातल्या गणेशोत्सव मंडळांच्या त्या स्मरणिका आज कुणाकडे मिळाल्याच तर त्या चाळून पहा, गणेशोत्सवातल्या त्या सलग दहा रात्री नाटक-सिनेमा, भावगीत-भक्तीगीतांच्या मैफली, ऑकेस्ट्रा असायचे. काही गणेशोत्सव मंडळं पैशाअडक्याने जरा धष्टपुष्ट असायची, त्यांच्याकडे तशीच तालेवार कलावंत मंडळी यायची आणि त्यांची तालेवार कला पेश करायची. पैशाअडक्याने थोडी पिछाडलेली मंडळं त्यांच्या पध्दतीचे कार्यक्रम ठेवायची. पण बहुतेक मंडळांच्या स्मरणिकेत ऑर्केस्ट्राने जागा घेतलेली असायचीच. अशोककुमार सराफांचा मेलडी मेकर्स, प्रमिला दातारांचा सुनहरी यादें, महेशकुमार अ‍ॅन्ड हिज पार्टी, दिदार सिंग अ‍ॅन्ड हिज पार्टी, विनोद गिध यांचा झंकार, त्यामागून आलेला झपाटा ही त्या काळातली आघाडीच्या ऑर्केस्ट्रांची नावं होती. ती एरव्ही वर्षभरात तर बुक झालेली असायचीच, पण गणेशोत्सवात तर त्यांची एकही तारीख मिळेनाशी व्हायची इतकं त्या एका काळात लोक गणेशोत्सवाच्या मंडपातल्या गाण्यासाठी, संगीतासाठी, ऑर्केस्ट्रासाठी जीव टाकायचे.

मेलडी मेकर्स या ऑर्केस्ट्राची सुरूवात तर फारच लक्षवेधी व्हायची. पडदा उघडण्याआधीच ‘जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती हैं बसेरा, वो भारत देश हैं मेरा’ या महंमद रफींच्या गाण्याआधीची ‘गुरू ब्रम्हा, गुरू विष्णू, गुरू देवो महेश्वरा, गुरू साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरूवेनम:’ ही प्रार्थना भारदस्तपणे रफींच्या त्याच थाटात गायली जायची. त्याने प्रेक्षकांमध्ये छान मंगलदायक, शुभदायक वातावरण निर्माण व्हायचं आणि मगच पडदा उघडला जायचा. गणेशोत्सवातल्या कार्यक्रमातही त्यांच्या ऑर्केस्ट्राची सुरूवात तशीच केली जायची. त्यामुळे गणेशोत्सवातलं वातावरण पूर्णपणे भारावून जायचं. या ऑर्केस्ट्राचं हे बहारदार वैशिष्ठ्य असायचं. हिंदी-मराठी सिनेमांतली गाणी त्यातल्या अगदी सूक्ष्म जागा, सूक्ष्म बारकाव्यांसह या ऑर्केस्ट्रांमधून गायली जायची. एक अनोखी आणि आकर्षक अशी शिस्त या ऑर्केस्ट्रात दिसायची. खरंतर तो जमाना आजच्यासारखा तंतोतंत वेळापत्रकाप्रमाणे अंमलात आणल्या जाणार्‍या इव्हेंट्सचा नव्हता. पण तरीही मेलडी मेकर्स हा ऑर्केस्ट्रा एखाद्या काटेकोर इव्हेंट्ससारखा व्हायचा. या ऑर्केस्ट्रात सुदेश भोसले, बेला सुलाखे गायचे. पण त्यांच्यासोबत मॅन्युअल फ्रान्सिस नावाचे एक गायक गायचे ते तर कमाल करून जायचे. मुकेशदांच्या अनुनासिक सुरांत ते ‘मेरा नाम जोकर’ मधलं ‘जाने कहाँ गये वो दिन’ हे दर्दभरं गाणं गायचे तेव्हा तर ते आणि त्यांचा तो आवाज तमाम श्रोत्यांना मोहिनी घालायचा. त्या गाण्यातून ते शिवरंजनी राग असा काही साकार करायचे की गाणं संपल्यावर श्रोत्यांमधून एक सरसरून टाळी यायची आणि पुढच्याच क्षणी वन्समोअर यायचा. हेच मॅन्युअल फ्रान्सिस ‘चढता सुरज धीरे धीरे’ ही अझिझ नाझांची सुप्रसिध्द कव्वाली गायचे त्यातही श्रोते रममाण व्हायचे. कधी कधी तर गणेशोत्सवात हा ऑर्केस्ट्रा कुठे असणार आहे याचा लोक शोध घ्यायचे आणि त्या गणेशोत्सवाच्या मंडपापर्यंत रात्री-अपरात्री पोहोचायचे. अपरात्री म्हणण्याचं कारण, तेव्हाच्या गणेशोत्सवात गाण्यांंच्या वन्समोअरमुळे ऑर्केस्ट्रांसारखे कार्यक्रम कधी कधी रात्रीची बाराची वेळ पार करून एक वाजता संपायचे. पण तोपर्यंतही गणेशोत्सवाच्या मंडपात लोक दाटीवाटीने बसलेले असायचे.

प्रमिला दातारांच्या ‘सुनहरी यादे’ या ऑर्केस्ट्रालाही गणेशोत्सवात मागणी असायची. प्रमिलाताईंनी त्यांच्या ऑर्केस्ट्राचं कायम एक घरंदाजपण जपलेलं असायचं. धडाम धडाम धिंगाणेबाज गाणी त्यांच्या ऑर्केस्ट्रात वर्ज्य असायची. गणेशोत्सवातल्या एका कार्यक्रमात त्यांना ‘ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळं’ या दादा कोंडकेंच्या टिपिकल डबल मिनिंग गाण्याची फर्माइश आली. प्रमिलाताईंच्या संस्कारशील कोष्टकात ते गाणं अजिबात बसणारं नव्हतं. त्यांना त्यांच्या स्टेजवरही वेडीवाकडी हुल्लडबाजी चालायची नाही आणि समोर बसलेल्या प्रेक्षकांतही. पण तरीही त्या दिवशी ‘ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळं’ या गाण्याची मागणी काहीशी हुल्लडबाजी करत प्रेक्षकांनी लावून धरली. फारच झालं तसं प्रमिलाताई प्रेक्षकांना म्हणाल्या, हे पहा, माझ्या ऑर्केस्ट्राची काही शिस्त आहे, त्याप्रमाणे आम्ही काही नियम आमच्यासाठी आखले आहेत, त्या नियमांप्रमाणे आम्ही कोणत्याही प्रकारची डबल मिनिंग गाणी गात नाही, तेव्हा मी आपल्याला नम्र विनंती करते की तुम्ही फर्माइश करत असलेलं हे गाणं मला या ऑर्केस्ट्रात घेता येणार नाही, त्याबदली मी तुमच्याच परवानगीने आपल्या सर्वांच्या लाडक्या दादा कोंडकेंच्याच सिनेमातली एक सुंंदर लावणी साजरी करते…आणि पुढच्याच क्षणी त्यांनी ‘घ्याल का हो राया एक शालू बनारसी’ ही नखरेबाज लावणी गायला सुरूवात केली. गंमत अशी की प्रमिलाताईंनी ती गायला सुरूवात करताच त्या लावणीवर टाळ्या-शिट्ट्यांचा वर्षाव झाला, त्या टाळ्या-शिट्ट्यांच्या नादात लोक आपली आधीची ‘ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळं’ या गाण्याची मागणी विसरूनही गेले. आज हे सगळं गणेशोत्सवायण सांगताना आजच्या गणेशोत्सवात गाणंबजावण्याची, गीतसंगीताची ती मौजमजा राहिली नाही याचं शल्य मनात दडून राहतंच…आणि जसजसा गणेशोत्सव जवळ येतो तसतसा तो जमाना आठवतोच!