घरफिचर्सअसे होणारच होते !

असे होणारच होते !

Subscribe

जगातील अनेक देशांना सध्या करोना विषाणूचा विळखा पडला आहे, तो दिवसेंदिवस अधिक घट्ट होत जात आहे. करोना विषाणू हा मानव निर्मित आहे की, निसर्ग निर्मित यावर पुढील बराच काळ चर्चा होत राहील; पण एक गोष्ट मात्र नक्कीच आहे. या विषाणूने सगळ्यांना स्थानबद्ध केले आहे. एकाच जागी स्वत:ला बंदिस्त करून आत्मचिंतन करायला लावले आहे. जगाचा प्रचंड वाढलेला वेग त्याने शून्यावर आणलेला आहे. जगातील वाढते प्रदूषण, वाढते तापमान आणि सगळ्याच बाबतीतला बेफाम वेग याकडे नव्याने पहायला लावले आहे. त्यामुळे ‘ये तो होनाही था’, असे म्हणण्यावाचून पर्याय उरत नाही.

सध्या करोना विषाणूने जगभरातील विविध देशांमध्ये थैमान घातले आहे. करोना विषाणू हा संसर्गातून वेगाने पसरत असल्याने सगळे जग त्याच्या विळख्यात येईल की काय अशी भीती निर्माण झाली आहे. या विषाणूपासून स्वत:ला वाचवायचे असेल तर स्वत:ला आपल्या घरात बंदिस्त करून घ्या, समाज संपर्क टाळा, स्वच्छता राखा, हेच सध्या उपाय आहेत. करोना जेव्हा चीनमध्ये थैमान घालत होता तेव्हा तो इतर देशांमध्ये पसरेल असे सुरुवातीला वाटत नव्हते. पण पुढे मात्र त्याची भयावहता वाढत गेली. भारतामधील शहरी भागात याची सुरुवात होऊन तो आता छोटी शहरे आणि ग्रामीण भागांपर्यंत पसरत आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासन यांची चिंता वाढू लागली आहे. कारण चीन, इटली आणि अमेरिका देशांमध्ये करोनाचा प्रसार ज्या वेगाने झाला, इटली आणि अमेरिका या देशांमध्ये ज्या प्रमाणात लागण होत आहे आणि बळी जात आहेत, ते पाहिले की, भारताची चिंता वाढत आहे.

पण त्यातही एक समाधानाची बाब म्हणजे ज्या प्रमाणात करोनाने युरोप आणि अमेरिकेतील नागरिकांना ग्रासले आहे आणि तेथील नागरिकांचे बळी जात आहेत. तशी स्थिती सुदैवाने भारतामध्ये आलेली नाही. पण तशी स्थिती येऊ नये यासाठी काळजी घ्यावी लागेल. भारतामध्ये या विषाणूने शिरकाव करून अनेकांना बाधित केले आहे. काही जणांचा त्यात मृत्यू झाला आहे. त्यात वयोवृद्ध माणसांचे प्रमाण जास्त आहे. त्यातही मुळात असे वयोवृद्ध अगोदर श्वसन संस्थेविषयीच्या काही आजारांनी त्रस्त असतात.त्यात पुन्हा करोनाच्या विषाणूची लागण झाली की, त्यांंची प्रकृती खालावते आणि त्यात त्यांचा मृत्यू होतो. त्याचसोबत भारतात दुसरी सकारात्मक आणि नवी आशा निर्माण करणारी गोष्ट आहे ती म्हणजे करोनाची लागण झाल्यानंतर त्यातून बरे होणार्‍यांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. अशा बर्‍या झालेल्या व्यक्तींना आपल्या घरी सोडण्यातही आलेले आहे. फक्त घरी गेल्यावर त्यांना काही काळ घरातच राहण्याची सूचना करण्यात आलेली आहे.

- Advertisement -

करोनाची नेमकी उत्पत्ती कशी झाली याविषयी सध्या अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. त्याचा उपद्रव चीनमधील वुहान या प्रांतात सुरू झाला. काहींच्या मते चिनी लोक विविध प्राण्यांचे भक्षण करतात, त्यामुळे वटवाघुळामधून हा करोना विषाणू माणसात आला. तिथून मग त्याची अनेकांना लागण झाली. त्याचा वेगाने प्रसार झाला. काहींच्या मते चीनने तयार केलेले हे जैविक अस्त्र आहे. त्याची गळती झाली आणि त्याचे परिणाम चीनसह जगाला भोगावे लागत आहेत. चीनला करोनाचा प्रचंड फटका बसला असला तरी आता तिथे या विषाणूचा प्रसार नियंत्रणात आणण्यात चीनला यश आले आहे. इतकेच नव्हे तर हा विषाणू चीनच्या अन्य कुठल्याच भागात पसरलेल्या दिसत नाही. भारतात मात्र सुरुवातीला केरळमध्ये या विषाणूचा रुग्ण आढळला. अर्थात, तो देशाबाहेरून आलेला होता. त्यानंतर महाराष्ट्रात पुण्यात या विषाणूची लागण झालेली दिसून आली. आता आणखी काही राज्यांमध्ये या विषाणूची लागण झालेले रुग्ण दिसू लागले आहेत.

करोना हे चीनने तयार केलेले जैविक अस्त्र आहे, असा थेट आरोपच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अर्थात, या गोष्टीला राजकीय अंग आहे, असे मानले तरी चीन हे एक महत्त्वाकांक्षी राष्ट्र आहे, त्यांंना सगळ्या जगात आपला प्रभाव आणि दबाव वाढवायचा आहे. चीनच्या विस्तारवादाचा अनुभव सगळ्या देशांना येत आहे. चीन हा ‘द फॅक्टरी’ म्हणून अलीकडच्या काळात जगभरात ओळखला जात आहे. विविध प्रकारच्या अनेक वस्तू आणि आधुनिक तंत्रज्ञान कमी किमतीत चीन उपलब्ध करून जगाच्या बाजारपेठांमध्ये पाठवत आहे. जगाच्या बाजारपेठा रस्त्यांच्या माध्यमातून जोडून चीनमधील माल तिथपर्यंत पोहोचविण्याची चीन जोरदार तयारी करीत आहे. चीनला जागतिक महासत्ता व्हायचे आहे.

- Advertisement -

त्यासाठी त्यांचा सगळा आटापिटा सुरू आहे. त्यांना अमेरिकेला मागे टाकायचे आहे. त्यासाठी त्यांच्याकडे असलेल्या एकपक्षीय दमन यंत्रणेचा ते हवा तसा वापर करत आहेत. लोकभावना आणि मानवाधिकार हा तिथे गौण आहे. तिथे सरकारचा अधिकार हाच महत्त्वाचा आणि अंतिम शब्द आहे. चीनमधील कम्युनिस्टांच्या लोखंडी पडद्यावर जगभरातील अनेक लोकशाहीवाद्यांनी आपली डोकी आपटली, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यांची डोकी फुटली पण चिनी राज्यकर्त्यांच्या डोक्यावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. आतादेखील करोना विषाणू चीनमधून पसरला, आज जगभरात त्याचा फैलाव होत आहे. अनेक देश त्यामुळे बेजार झाले आहेत. पण चीनला ना त्याचा खेद आहे ना त्याची खंत आहे.

काही विशिष्ट कालावधीनंतर जगाला व्यापणारी संकटे येत असतात, हेही तितकेच खरे आहे. हा विषाणू चीनच्या प्रयोगशाळेत निर्माण झाला आहे की चिनी लोकांच्या वटवाघूळ खाण्याच्या सवयीतून आला आहे, हे येणार्‍या काळात दिसून येईल. करोनाची उत्पत्ती नेमकी कशी झाली हा संशोधानाचा विषय आहे, पण सध्या जगभरातील सगळे जीववैज्ञानिक या करोनाला रोखणारी आणि नष्ट करणारी लस शोधण्याच्या मागे लागले आहेत. आजवरचा इतिहास पाहिला तर मानवाने अशा अनेक संकटांचा सामना करतच प्रवास केलेला आहे. अर्थात, त्यात काही जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. त्यामुळेच याही विषाणूला नियंत्रित करणारी लस उद्या शोधून काढली जाईल. मानव या संकटावर मात करेल.

करोना नेमका कसा उद्भवला, त्याचा इतका वेगाने जगभर प्रवास कसा झाला, याचा शोध आणि तर्कवितर्क सुरू राहतील. पण एक गोष्ट खरी आहे की, करोना या विषाणूच्या या जागतिक हल्ल्यामुळे जगाची दिशा बदलणार आहे, इतके मात्र नक्कीच. गेल्या शतकभरात जगात झालेल्या आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञानाच्या विकासामुळे मानवी जीवनाची गती अतिशय वाढली आहे. घंटों का काम मिनिटों में, आता तर मिनिटों का काम सेकंदो में, अशी स्थिती होऊन बसली आहे. प्रत्येकजण आधुनिकतेच्या वाघावर बसलेला आहे. थांबायलाही कुणाला वेळ नाही, इतकेच काय कुणालाच कुणासाठी वेळ नाही. प्रत्येकजण आधुनिक तंत्रज्ञानातून निर्माण झालेल्या साधनांमध्ये बसून पळत आहे. जगभरातील कारखाने आणि वाहने यांच्यातून बाहेर पडणारे रासायनिक सांडपाणी आणि धूर यामुळे जागतिक तापमान वाढत आहे. पृथ्वीभोवती असलेले ओझोनचे सुरक्षा कवच पातळ होत आहे.

अनेक शहरांमधील हवेचे प्रदूषण वाढले आहे. ते कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न अपुरे पडत आहेत. संयुक्त राष्ट्रांमध्ये जागतिक प्रदूषण रोखण्यासाठी करार होतात, पण त्यावर अंमलबजावणी करायला कुणी तयार नाही. अशा स्थितीत करोना विषाणूच्या उत्पत्ती आणि प्रसाराने जगातील मानवजातीला विळखा घालून स्थानबद्ध केले आहे. आहात तिथेच थांबा, नाही थांबलात तर मी तुम्हाला कायमचे थांबवीन, अशी धमकी हा विषाणू जगातील मानवाला देत आहे. या विषाणूपासून वाचण्यासाठी जगातील अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. सगळे मोठे व्यवहार ठप्प पडले आहे. सगळे आपापल्या घरांमध्ये बंदिस्त झालेले आहेत. हा विषाणू मानव निर्मित आहे की, निसर्ग निर्मित आहे, हा वादाचा विषय असला तरी तो मानवाला बरेच काही नव्याने शिकवत आहे हे मात्र नक्की !

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -