४४ वर्षांच्या प्रतीक्षेचा समारोप !

Mumbai
skynews-england-cricket-world-cup_4718477

क्रिकेटचे माहेरघर असणार्‍या इंग्लंडला तब्बल ४४ वर्षे वाट पाहिल्यानंतर अखेर विश्वचषकावर आपले नाव कोरण्यात यश आलेच. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणार्‍या लॉर्ड्सवर झालेल्या थरारक अंतिम सामन्यात त्यांनी न्यूझीलंडवर मात केली. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि ५० षटकांत ८ बाद २४१ अशी धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करणार्‍या इंग्लंडलाही ५० षटकांत २४१ धावाच करता आल्याने सामन्याचा निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हरचा अवलंब करण्यात आला. यातही दोन्ही संघांनी १५-१५ धावा केल्याने या सामन्याचा विजेता सर्वाधिक चौकार-षटकार लगावणार्‍या संघाला घोषित करण्यात आले. त्यामुळे इंग्लंडने न्यूझीलंडला २६-१७ या फरकाने पराभूत करत पहिल्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. एखाद्या संघाने जास्त चौकार-षटकार लगावल्यामुळे विश्वविजेता होणे कितपत योग्य होते, हा खरंच प्रश्न आहे. या नियमामुळे माजी खेळाडू, क्रिकेट समीक्षक, चाहते या सर्वांनीच आयसीसीवर टीकास्त्र सोडले. आता पुढील विश्वविजेता संघ जास्त चौकार-षटकार लगावल्यामुळे ठरणार नाही हीच अपेक्षा.

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांना संयुक्त यजमानपद मिळालेल्या २०१५ च्या विश्वचषकात इंग्लंड संघाचे प्रदर्शन अतिशय निराशाजनक होते. ६ साखळी सामन्यांपैकी केवळ २ सामने जिंकता आल्याने त्यांना बाद फेरीही गाठता आली नव्हती. इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटला विशेष महत्त्व असल्याने त्यांचे एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटकडे दुर्लक्षच झाले होते. मात्र, २०१५ च्या विश्वचषकानंतर त्यांनी इयॉन मॉर्गनच्या नेतृत्त्वात आणि प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांच्या मार्गदर्शनाखाली नवा, युवा संघ बांधण्यास सुरुवात केली. तसेच त्यांनी आक्रमक पद्धतीने खेळण्यास सुरुवात केली. त्यामुळे मागील चार वर्षांत त्यांना ३०० ची धावसंख्या अगदी सहजपणे पार करण्याची सवयच लागली. याचदरम्यान त्यांनी एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्याही उभारली. मागील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४८१ धावांची मजल मारत त्यांनी विक्रम प्रस्थापित केला. त्यामुळे ते घरच्या मैदानावर होणार्‍या विश्वचषकात ५०० ची धावसंख्याही पार करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, तसे त्यांना करता आले नाही. परंतु, या विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्याही इंग्लंडनेच उभारली. अफगाणिस्तानविरुद्ध त्यांनी ३९७ धावांचा डोंगर उभारला, ज्यात कर्णधार मॉर्गनच्या ७१ चेंडूत १४८ धावांचा समावेश होता. मॉर्गनने या खेळीत १७ षटकार लगावत नवा विक्रम प्रस्थापित केला. या विश्वचषकात इंग्लंडने सुरुवातीचे ७ पैकी ३ सामने गमावले, पण त्यानंतर त्यांनी आपला खेळ उंचावला आणि सलग ४ सामने जिंकत (२ साखळी, उपांत्य फेरी, अंतिम फेरी) पहिल्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. यंदाचा विश्वचषक जिंकण्यासाठी इंग्लंडसोबतच भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांना प्रमुख दावेदार मानले जात होते. मात्र, या दोन्ही संघांना उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने त्यांचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न अधुरेच राहिले.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या भारतीय संघाने मागील काही काळात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे, मग ते भारतात असो की भारताबाहेर. इंग्लंडमध्येच २०१७ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यांना अंतिम फेरी गाठण्यात यश आले होते, पण हा विश्वचषक सुरू होण्याआधी भारतीय संघ निवडीबाबत काही प्रश्न उपस्थित केले जात होते. अनुभवी अंबाती रायडूऐवजी विजय शंकरची निवड, इंग्लंडमध्ये स्पर्धा होत असतानाही संघात केवळ तीनच प्रमुख वेगवान गोलंदाज, दिनेश कार्तिकला संघात स्थान याबाबत बरीच चर्चा झाली. मात्र, कोहली, रोहित, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनीसारखे फलंदाज आणि बुमराह, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, चहल यांसारखे गोलंदाज संघात असल्यामुळे इंग्लंडमधील विश्वचषक भारत जिंकेल, अशी आशा चाहत्यांना होती. शिखर, भुवनेश्वर, विजय शंकर या खेळाडूंना दुखापत होऊनही भारताने सातत्यपूर्ण कामगिरी करत ९ पैकी ७ साखळी सामने जिंकले. केवळ विजेत्या इंग्लंडलाच त्यांच्यावर मात करण्यात यश आले. भारताचा सलामीवीर रोहित शर्माने या विश्वचषकात विक्रमी कामगिरी केली. रोहितने ९ सामन्यांत सर्वाधिक ६४८ धावा काढल्या. यामध्ये ५ शतकांचा समावेश होता. त्यामुळे त्याने एका विश्वचषकात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केला. मात्र, मोक्याच्या क्षणी त्याला आणि कर्णधार कोहलीला चांगली कामगिरी करता आली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत या दोघांनाही १-१ धावच काढता आल्याने मधल्या फळीवर दबाव आला.

विश्वचषक सुरू होण्याआधीपासूनच भारताच्या मधल्या फळीवर प्रश्नचिन्ह होते आणि अव्वल तीन फलंदाजांना चांगली कामगिरी करता न आल्यास ते भारताला सामना जिंकवून देण्यात असक्षम आहेत हे न्यूझीलंडविरुद्ध पुन्हा एकदा सिद्ध झाले. रिषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनी संघ अडचणीत असल्यामुळे आपला नैसर्गिक आक्रमक खेळ न करता संयमाने खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र, चेंडू आपल्या टप्प्यात पडल्यास तो मैदानाबाहेर फेकण्याची सवय त्यांना महागात पडली. फिरकीपटू सँटनरच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याच्या नादात हे दोघेही बाद झाले. यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि जाडेजा यांनी झुंजार अर्धशतकी खेळी करत भारताला जिंकवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात ते अपयशी झाले. अनुभवी धोनीवर मागील काही काळात त्याच्या संथ फलंदाजीमुळे बरीच टीका झाली आहे आणि टीका मोडून काढण्यात धोनीला विश्वचषकात यश आले नाही. विश्वचषकानंतर धोनी निवृत्त होणार असे संकेत होते, पण अजून त्याने अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, त्याची खेळाबाबतची समज आणि त्याचा अनुभव लक्षात घेता तो निवृत्त झाल्यानंतर भारताला नक्कीच त्याची कमी भासेल.

यंदाचा विश्वचषक हा आतापर्यंतचा सर्वात कठीण आणि मनोरंजक असेल अशी अपेक्षा वर्तवली जात होती, याला कारण होते की या स्पर्धेत सर्वोत्तम दहा संघांचाच समावेश होता, पण इंग्लंड, न्यूझीलंड, भारत आणि ऑस्ट्रेलिया वगळता इतरांना चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. त्यामुळे या स्पर्धेत चुरशीचे सामने पाहण्यासाठी उपांत्य फेरीपर्यंत वाट पहावी लागली. मात्र, भारत-न्यूझीलंड उपांत्य फेरीचा सामना आणि इंग्लंड-न्यूझीलंड अंतिम सामन्यात सहभागी संघांनी केलेला खेळ व दाखवलेली जिद्द खरोखरच वाखाणण्याजोगी होती. या विश्वचषकाला पंचांचे काही निर्णय आणि मुख्यतः पाऊस यांनी काहीसे गालबोट लावले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. इंग्लंडमध्ये एक-दीड महिना एखादी स्पर्धा झाली आणि त्यात पावसाने व्यत्यय आणला नाही, असे झाले असते तरच नवल. पावसामुळे या स्पर्धेतील ४ सामने रद्द करावे लागले. परंतु, हा विश्वचषक इंग्लंडमध्ये होणार हे २००६ मध्येच ठरवण्यात आल्याने आता आयसीसीला दोष देणे योग्य नाही. मात्र, अंतिम सामन्याचा निकाल सर्वाधिक चौकार-षटकार या निकषावर लावणे या नियमामुळे आयसीसीला नक्कीच दोष देता येईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here