घरफिचर्सगरज स्वायत्तता कॉलेजांची

गरज स्वायत्तता कॉलेजांची

Subscribe

मुंबईसह राज्यात सध्या मिशन अ‍ॅडमिशनसाठी विद्यार्थी पालकांची नवी लढाई सुरू झालेली आहे. सध्या मुंबईतील स्वायत्तता दर्जा प्राप्त कॉलेजांकडे विद्यार्थी अधिक प्रमाणात वळत आहेत. मुंबईत एकूण कॉलेजांची संख्या लक्षात घेता स्वायत्तता कॉलेजांची संख्या एकूण कॉलेजांच्या संख्येच्या तुलनेत कमी असल्याने पुन्हा एकदा स्वायत्तता कॉलेजांची संख्या वाढवावी अशी ओरड ओरडली जात आहे. त्यामुळे उच्च शिक्षणाचा दर्जा अधिक सुधारता यावा यासाठी खर्‍या अर्थाने स्वायत्तता कॉलेजांची गरज नेमकी का आहे, याबाबत घेतलेला हा आढावा...

विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतेच देशातील काही दिवसांपूर्वी 60 विद्यापीठे व महाविद्यालये यांना स्वायत्तता प्रदान केल्याची घोषणा केली होती. यावेळी स्वायत्तता कॉलेजांच्या दर्जात ही अनेक बदल करीत काही कॉलेजांना आर्थिक स्वायत्तता देण्याची ही घोषणा करण्यात आली होती. केंद्र सरकारची ही घोषणा देशाच्या उच्च शिक्षणाच्या जागतिकीकरणाच्या स्पर्धेत एक अनमोल दिशा देणारे महत्त्वाचे पाऊल आहे. देशाच्या दक्षिण भागामध्ये स्वायत्ततेचे मूळ बर्‍याच वर्षांपासून रुजलेले आहे व त्यानुसार त्या क्षेत्रातील महाविद्यालये खर्‍या अर्थाने प्रगल्भ झालेली दिसतात. आतापर्यंत विद्यापीठ अनुदान आयोगाने देशामध्ये 6९५ महाविद्यालयांना स्वायत्तता बहाल केली आहे त्यात तामिळनाडू सर्वात ज्यास्त म्हणजे 1९१ महाविद्यालये, त्यानंतर आंध्र प्रदेश १०१ महाविद्यालये व त्याखालोखाल कर्नाटक 70 महाविद्यालये यांना स्वायत्तता बहाल केली आहे. महाराष्ट्रामध्ये ही संख्या जवळजवळ ८३ च्या घरात आहे.

पुणे विद्यापीठ, नागपूर, औरंगाबाद यासारख्या विद्यापीठांमध्ये संलग्नित महाविद्यालयांची संख्या जवळजवळ 700 ते 800 च्या घरात आहे. या विद्यापीठांच्या प्रशासनावर अनुचित परिणाम दिसून येत आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी अ‍ॅक्ट 2016 यामध्ये सुद्धा उत्कृष्ट महाविद्यालयांना स्वायत्तता देण्यात यावी जेणेकरून त्या महाविद्यालयांचा शैक्षणिक विकास वेगाने होईल व विद्यापीठांवरील प्रशासनाचा भार कमी होईल. या नवीन गॅझेटमुळे निश्चितच अशा महाविद्यालयांना प्रोत्साहन मिळणार आहे. ऑटोनॉमी गॅझेट 2018 यानुसार स्वायत्त महाविद्यालयांना त्यांचे शिक्षणक्रम व अभ्यासक्रम यात नावीन्य आणता येईल आणि गरजेनुसार त्यात बदल करता येतील. तसेच अशा महाविद्यालयांना स्वतःचा नवीन अभ्यासक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार तयार करता येईल. त्याचप्रमाणे परीक्षा आणि त्यांचे मूल्यांकन व निकाल यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात येईल व ही यंत्रणा निश्चितच फास्टट्रॅकवर असेल. तसेच अशा महाविद्यालयांची स्वतंत्र गव्हर्निंग बॉडी, अकॅडमिक कौन्सिल, बोर्ड ऑफ स्टडीज, परीक्षा समिती, फायनान्स समिती असतील.

- Advertisement -

स्वायत्त महाविद्यालय व विद्यापीठापुढील आव्हाने:
जेवढी जास्तीत जास्त महाविद्यालये त्या त्या विद्यापीठांतर्गत स्वायत्त होतील अशा महाविद्यालयांचा शैक्षणिक विकास वेगाने होईल तो निश्चितच महाविद्यालयांना एक वेगळी प्रतिष्ठा मिळवून देणारा आहे. हे एक प्रकारचे आव्हान त्या त्या विद्यापीठात असेल. आपला दर्जा टिकवणे, परीक्षा व निकाल वेळेवर लावणे ही आव्हाने विद्यापीठासमोर असतील. तसेच विद्यापीठाने autonomic gazetee 2018 च्या तरतुदीनुसार विद्यापीठाने ‘एक खिडकी पद्धत’ सारखी अद्ययावत यंत्रणा राबवावी लागणार आहे. जेणेकरून एक महिन्याच्या आत गरज असलेली प्रक्रिया पूर्ण करून प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोग यांच्याकडे पाठवावा लागेल. त्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करणे अपरिहार्य असेल. स्वायत्त महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा हा उच्च ठेवण्यासाठी त्या त्या व्यवस्थापनाला निश्चितच विविध धोरणांचा वापर करावा लागेल. त्यामध्ये योग्य सोयीसुविधा पुरवणे, काळानुसार शैक्षणिक संस्थांमध्ये महत्त्वाचे बदल करणे, तसेच स्वायत्तता प्राध्यापकांना एक प्रकारचे आव्हान आहे जेणेकरून त्यांच्या विचारांची प्रगल्भता, नवनवीन शैक्षणिक आव्हाने, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना सर्वतोपरी सहाय्य करणे आणि शिक्षणक्रम व अभ्यासक्रम सतत अद्ययावत ठेवणे अशी अनेक आव्हाने प्राध्यापकांसमोर असणार आहेत.

विद्यार्थ्यांना स्वायत्त महाविद्यालयापासून त्यांच्या शैक्षणिक आव्हानाची बरीच पूर्तता होण्यात मदत होईल. चॉईस बेस्ड सिस्टिम पासून अद्ययावत शिक्षणक्रम व अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकायला मिळणार आहेत. स्वायत्त महाविद्यालये त्यांचे अभ्यासक्रम वेळोवेळी पुनर्विलोकन करू शकतील त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणक्रम व अभ्यासक्रम शिकायला मिळणार आहेत. स्वायत्तता लक्षात घेता स्वामी विवेकानंदांच्या वाक्याची आठवण येते की, शिक्षण हे केवळ मनात असलेला माहितीचा संचय नव्हे, तर उच्य शिक्षणाचा वापर हा आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाचा उलघडा करण्यासाठी व्हावा.

- Advertisement -

जेव्हा महाविद्यालयांची संख्या फारच कमी होती तेव्हा संलग्न महाविद्यालयांची पद्धत विद्यापीठांमध्ये सुरू झाली. त्यानंतर विद्यापीठ हे केवळ परीक्षा व पदवी प्रदान करण्यासाठी व विद्यापीठांतर्गत महाविद्यालयाचा कारभार सुरळीत करणारी यंत्रणा होती. तथापि जसजशी महाविद्यालयांची संख्या वेगाने वाढत गेली तेव्हा मात्र विद्यापीठांचे महाविद्यालयांवर असलेले नियंत्रण सुटत गेले. सध्या विद्यापीठांना त्यांच्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयाच्या गरजेची वेळेत पूर्तता करणे केवळ अवघडच झाले आहे. जरी विद्यापीठे शिक्षणाची उच्य प्रत ठेवण्यासाठी प्रत्यन करते, तरीसुद्धा सध्याची यंत्रणा तसे करण्यासाठी कमी पडत आहे. सध्यातरी विद्यापीठ हे फक्त हजारो विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या अभ्यासक्रम व विषयांची परीक्षा घेणारी, पेपर मूल्यांकन करून घेणारी व निकाल लावणारी संस्था ठरत आहे. फार जुने असलेले सध्याचे अभ्यासक्रम व परीक्षेबाबत होणारे अव्यवहार्य घटनाक्रम हेच दिसून येतात.

सद्यस्थितीत महाविद्यालयांना विद्यापीठाने घालून दिलेले अभ्रासक्रम व शैक्षणिक दिनदर्शिकेनुसार काम करावे लागते. महाविद्यालयांना वेगवेगळ्या ठिकाणानुसार, निगडित गरजेनुसार अथवा भौगोलिक परिस्थितीनुसार व इच्छेनुसार त्यांचे अभ्यासक्रम पुनर्जीवित करण्याचे अधिकार नाहीत. तथापि स्वायत्त महाविद्यालयाला असे अधिकार दिले गेले आहेत. स्वायत्त महाविद्यालयातील शिक्षक त्या ठिकाणी असलेल्या उद्योगक्रमांचा, सामाजिक गरजांचा, विद्यार्थ्यांचा, संशोधकांचा व त्यांच्या विचारांचा अभ्यास करून, अद्ययावत तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून, एक विशिष्ट सर्वसमावेशक असा अभ्यासक्रम तयार करते की जेणेकरून त्याचा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, त्यांच्या योग्यतेनुसार व इच्छेनुसार करण्यासाठी वापर करता येईल.

जरी महाविद्यालये नवनवीन उच्च शिक्षणाचे उच्च प्रतीचे अभ्यासक्रम राबवू शकते अथवा सुरू करू इच्छिते तरीसुद्धा विद्यापीठांच्या प्रशासकीय किचकट नियमामुळे ती महाविद्यालये तसे करू शकत नाहीत. म्हणूनच सध्याचा अभ्यासक्रम पुनर्जीवित करण्याचा, नवनवीन उच्च दर्जाचा अभ्यासक्रम तयार करण्याचा, प्रभावी अद्ययावत तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्याचा, शिक्षणाला अनुसरून पूरक असे अभ्यासक्रम चालू करण्याचा आणि एक स्वतंत्र अशी परीक्षा, पेपर तपासणी व निकाल लावण्याची यंत्रणा तयार करून हे राबवण्यासाठी स्वायत्त महाविद्यालयांना अधिकार असतो. सध्याचा विद्यापीठाचा शिक्षण दर्जा वाढण्यासाठी, संशोधनासाठी, प्रयोगशाळा व ग्रंथालय, इमारत व इतर व अशा भौतिक बाबींवर, असलेली नजर ही कमी पडते असे दिसते, परंतु स्वायत्त महाविद्यालय हे अशा सर्व उपलब्ध गोष्टींचा पुरेपूर वापर करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करू शकते. स्वायत्त महाविद्यालयाचे मूळ उद्धिष्ट हे विद्यार्थ्यांचा सांगोपांग शैक्षणिक विकास उज्ज्वल करणे हा असतो. शिक्षणाचा उच्च दर्जा वाढवण्याचा विद्यार्थ्यांचा कल, मूलतः शिस्तीत वाढ, चांगला शिक्षक, शिक्षकेतर वृंद तसेच विद्यार्थ्यांबरोबर सुसंवाद आणि विद्यार्थ्यांना काम मिळण्याची कुवत, या विविध अडचणी किंवा आव्हाने स्वायत्तते संदर्भात उभी ठाकली आहेत.

शैक्षणिक स्वायत्तता ही काळाची गरज :
एकूणच स्वायत्तता ही काळाची गरज होत चालली आहे, त्यायोगे सध्याच्या संलग्नित महाविद्यालयांच्या संख्येत जी संख्यात्मक वाढ होत आहे त्यामुळे विद्यापीठांवर पडलेला भार, परीक्षांमधील अव्यवस्था, निकाल वेळेवर न लागणे व त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान या सर्व बाबी स्वायत्त महाविद्यालयामुळे कमी होण्यास मदत होईल, परंतु ज्या महाविद्यालयांनी आपली गुणवत्ता नॅक गुणांकाने प्रस्थापित केली आहे आणि ज्यांचा शिक्षण क्षेत्रात नावलौकिक आहे व ज्यांना स्वायत्तता प्रदान केली आहे तसेच जी महाविद्यालये स्वायत्ततेसाठी इच्छुक आहेत अशी महाविद्यालये निश्चितच या स्वायत्ततेच्या आव्हानाचे शिवधनुष्य पेलण्याचे सामर्थ्य सिद्ध करतील व विद्यार्थ्यांना जागतिकीकरणाच्या स्पर्धेत निश्चितच सक्षम करतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -