ब्रॅण्ड आपला आपला !

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचा ब्रॅण्ड हा ठाकरे ब्रॅण्ड आहे, त्याला सामूहिकपणे नष्ट करण्याचा काहीजणांचा प्रयत्न सुरू आहे. राज ठाकरे हेसुद्धा ठाकरे आहेत, त्यामुळे त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे, असे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाला राज ठाकरे यांच्या बाजूने अनुकूल प्रतिसाद देण्यात आला नाही. उद्धव ठाकरे यांना राज्य आणि केंद्रीय पातळीवरून टार्गेट केले जात असताना राज यांनी उद्धव यांच्या बाजूने बोलायला हवे, त्यांनी गप्प राहू नये, असेच राऊत यांना सूचवायचे होेते. उद्धव आणि राज ठाकरे यांना एकत्र आणण्याचा यापूर्वी बरेच वेळा प्रयत्न झाला, पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. एकाच म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, तसाच काहीसा हा प्रकार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना यापूर्वीही शिवसेेनेत पुन्हा येण्यासाठी किंवा शिवसेनेशी युती करण्यासाठी प्रयत्न झाले, पण नेतृत्वावरूनच ही उभी फूट पडलेली आहे हे लक्षात घ्यायला हवे.

राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हाच खरे तर महाराष्ट्रातील ठाकरे ब्रॅण्डला तडा गेला. त्यामुळे शिवसेनेला मानणारा मराठी माणूस दोन भागात विभागला गेला. आता जेव्हा निवडणूक काळात राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपले उमेदवार उभे करते आणि जोरदार प्रचार करते, त्यावेळी त्याचा फटका शिवसेनेला बसतो, कारण राज ठाकरे यांच्याकडे खेचला जाणारा मतदार हा मनसे आणि शिवसेनेतलाच आहे. थोडक्यात, राज ठाकरे शिवसेनेची मते फोडण्यात यशस्वी ठरतात. पण असे झाले तरी मनसेलाही निवडणुकांमध्ये यश येताना दिसत नाही. ठाकरे घराण्यात पडलेली ही फूट दोन्ही भावांसाठी तोट्याची ठरत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ठाकरे ब्रॅण्डचे नुकसान झाले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते, त्यावेळी महाराष्ट्रात ठाकरे ब्रॅण्डचा प्रभाव आणि दबदबा होता, पण पुढे जेव्हा राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा मराठी माणसांची मते विभागली गेली.

उद्धव आणि राज या दोन ठाकरे बंधूंनी स्वत:ला स्वतंत्रपणे पुढे आणण्याचा प्रयत्न केला, पण ते दोघे एकमेकांशी सलोखा करून सामंजस्याने वागले असते तर आज ठाकरे ब्रॅण्डला नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यासाठी राज ठाकरेंनीही पुढाकार घ्यावा, असे म्हणण्याची वेळ आली नसती. शिवसेना आणि भूमिपुत्र मराठी माणूस असे समीकरण आहे. मुळात भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतूनच पुढे शिवसेनेचा जन्म झाला, कारण संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती तर झाली होती, पण इथल्या भूमिपुत्रांच्या पोटापाण्याचे आणि भवितव्याचे काय, असा प्रश्न पडला. महाराष्ट्रात सत्तेत काँग्रेस होती, त्यांच्यात गट असायचे. त्यांची मुख्यमंत्रिपदासाठी चढाओढ लागलेली असायची. त्यात पुन्हा काँगेस ही दिल्लीच्या हुकूमानुसार चालत असे, त्यामुळे इथल्या सर्वसामान्य मराठी माणसांचे जे म्हणून हक्क आहेत, त्याविषयी त्यांच्यात उदासीनता दिसून येत असे.

कारण काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामुळे आपण राष्ट्राचा विचार करायला हवा, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे होते, पण इथला जो कमी शिकलेला सर्वसामान्य माणूस होता, भूमिपुत्र होता, त्याचं काय, हे काँग्रेस लक्षात घ्यायला तयार नव्हती. महाराष्ट्रातला हा जो उपेक्षित आणि नेतृत्वहीन मराठीजनांचा वर्ग होता, त्याला नेतृत्वाची गरज होती. प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक अग्रणी नेते होते. त्यामुळे त्यांनी पुढे त्यांचे पुत्र बाळासाहेब ठाकरे यांना या सर्वसामान्य मराठीजनांच्या न्याय्य हक्कासाठी पुढे आणले. तिथूनच महाराष्ट्रात ठाकरे ब्रॅण्डची सुरुवात झाली. ठाकरे ब्रॅण्ड प्रस्थापित करण्यासाठी शिवसेनाप्रमुख झालेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य मराठी माणसांच्या पोटापाण्याचे अनेक प्रश्न हाती घेतले, रस्त्यावरची आंदोलने केेली. त्यातून या सामान्य मराठी माणसांना सामाजिक आणि राजकीय व्यासपीठ मिळाले. त्यातून त्यांच्यात नवा आत्मविश्वास निर्माण झाला. शिवसेना राजकारणात उतरून महाराष्ट्रातील एक प्रमुख पक्ष झाला.

शिवसेनेने मराठी माणूस आणि त्याचे न्यायहक्क याच्यासाठी लढे देऊन राज्यभर विस्तार करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, पण शिवसेनेला राज्यात कधीही बहुमत मिळू शकले नाही. आपल्या मर्यादा लक्षात आल्यानंतर त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली आणि १९९५ साली महाराष्ट्रात युतीची सत्ता स्थापन केली. भाजपलाही महाराष्ट्राच्या सत्तेत पाय रोवण्यासाठी कुठल्यातरी समविचारी पक्षाची गरज होती. शिवसेनेशी युती झाल्यानंतर ती गरज पूर्ण झाली. भाजप आणि शिवसेनेची हिंदुत्वाच्या आधारावर युती झाली. आमची युती सत्तेसाठी नाही तर हिंदुत्वाच्या तत्वासाठी आणि सत्वासाठी आहे, असा दावा या दोन्ही पक्षांनी त्यावेळी केला. या दोन पक्षांमधील आजची स्थिती पाहिल्यावर त्यावेळी हिंदुत्वाच्या आणाभाका घेणारे हेच का ते पक्ष असा प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही. पुढे शिवसेना आणि भाजपमधील स्पर्धा अधिक तीव्र झाली. याचे मुख्य कारण होते, मुख्यमंत्रिपद. ते भाजप आणि शिवसेनेलाही हवे होते. पण दोघांना एकाच वेळी ते मिळणे शक्य नव्हते. पाच वर्षे सत्तेत राहून विरोध करत शिवसेनेने कसा तरी वेळ काढला.

पण पुढे पुन्हा २०१९ साली राज्यात विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळी मात्र शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसली. या अशा अडलेल्या परिस्थितीचा फायदा घेत नसतील तर मग ते शरद पवार कसले. आपल्याला आता राज्यात सत्ता स्थापण्याची संधी आहे, हे पवारांनी लक्षात घेतले. भाजप-शिवसेनेची तडजोड अशक्य आहे, हे लक्षात आल्यावर पवारांनी पक्षभेद विसरून बेरजेचे राजकारण केले. त्यांनी राजकारणात कायम विरोधात असलेल्या शिवसेनेशी महाविकास आघाडी केली, त्यासाठी काँग्रेसचा अशक्य वाटणारा पाठिंबा मिळवला. कारण शिवसेना हा जातीयवादी पक्ष असल्याचे काँग्रेसला वाटत असल्यामुळे केंद्रीय पातळीवरून त्यांंना पाठिंबा मिळणे अवघड होते. पण पवारांनी भाजपला महाराष्ट्राच्या सत्तेतून बाहेर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्चस्वाला शह देता येईल, हे सोनिया गांधींना पटवून दिले. कारण मोदी हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी समान विरोधक आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यातून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले.

खरे तर उद्धव ठाकरे यांना आपण कायम जातीयवादी म्हणून हिनवले आणि टीकेची झोड उठवली, त्यांनाच आपण खाद्यांवर घेतले आहे, याची बोच काँग्रेसच्या मनात नक्कीच असेल. संजय राऊत यांनी राज्यातील सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका पार पाडून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवले. असे असले तरी भाजपच्या हातातोंडाशी आलेली महाराष्ट्राची सत्ता गेल्यामुळे ते हरतर्हेने शिवसेनेला नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू, कंगना राणावत या विषयांंचा वापर केला जात आहे. त्यामुळेच शिवसेनाही बेजार झाली आहे. परिणामी त्यांना आता ठाकरे ब्रॅण्डची आठवण होत आहे, पण असे असले तरी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे यांनाही आपापला ब्रॅण्ड प्रिय असणारच. त्याचा आस्वाद आणि आनंद ते घेणारच. कारण काही काळासाठी एकमेकांचे ब्रॅण्ड्स मिसळून महाविकास आघाडीरूपी कॉकटेल केले, तरी ती काही काळासाठी केलेली तडजोड आणि सोय असते. दीर्घ काळासाठी ज्याला त्याला आपापला ब्रॅण्डच प्रिय असतो.