‘द बर्निंग ट्रेन’ ची चाळीशी !

ऐंशीच्या दशकातल्या द बर्निंग ट्रेनमध्ये विनोद खन्ना, धर्मेंद्र, विनोद मेहरा, डॅनी,जितेंद्र, नवीन निश्चल, हेमा मालिनी, परवीन बाबी, नितू सिंग अशी कलाकारांची फौज घेऊन रवी चोप्रांनी पडद्यावर ही ‘आग’गाडी साकारली होती. २८ मार्च १९८० रोजी रिलिज झालेल्या द बर्निंग ट्रेनला अजून आठ दिवसांनी ४० वर्षे होतील. या सिनेमाचा रिमेकही लवकरच येणार आहे. चाळीस वर्षांपूर्वी व्ह्युजअल आणि साऊंड इफेक्ट्सना मर्यादा होती. चित्रपटातील अखेरचा मुंबई सेंट्रलचा खेळण्यातल्या ट्रेनचा प्रसंग वगळता संपूर्ण सिनेमाची हाताळणी दिग्दर्शक रवी चोप्रांनी चित्तथरारक अशीच केली होती.

Mumbai

पाकिजामध्ये राजकुमार ट्रेनच्या फर्स्टक्लास डब्यात निवांत झोपलेल्या मीना कुमारीविषयी म्हणतो… ‘आपके पाँव देखे…इन्हे जमीन पर मत रखिए…मैले हो जाएंगे’. दिलीप कुमार आणि शहारुखच्याही देवदासमध्येही चुनीलाल आणि देवदासच्या भेटीचा प्रसंग आगगाडीच्या डब्यातलाच. ‘द बर्निंग ट्रेन’ च्या दहा वर्षे आधी १९७० मध्ये दिग्दर्शक रवी ‘नागेचा’चा सस्पेन्स थ्रीलर ‘द ट्रेन’ येऊन गेलेला असतो. यात तत्कालीन सुपरस्टार राजेश खन्ना आणि नंदा हिरो-हिरॉईन असतात. या दोन्ही सिनेमांतली पडद्यावरची ट्रेनही एक जिवंत व्यक्तीरेखा असल्यासारखी स्थिती असते.

द बर्निंग ट्रेनमध्ये डॅनीने ‘दिन रात’ एक करून बनवलेल्या ट्रेनच्या मॉडेलला संचालक इफ्तीकार असलेल्या रेल्वेचे परिक्षण मंडळ नकार देते आणि विनोद खन्नाने बनवलेल्या सुपर एक्सप्रेसच्या मॉडेलला मंजुरी देते. निराशा, असूया, इर्ष्या, राग, आणि बदला अशा सर्वच नकारात्मक भावनांचा खलनायक डॅनी सुपर एक्सप्रेसमध्ये बॉम्ब स्फोट घडवतो. त्यानंतर या गाडीत लागलेल्या आगीतून वाचण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आणि वाढणार्‍या आगीसोबत मरणाशी केलेल्या चित्तथरारक सामन्याचे कथानक म्हणजे द बर्निंग ट्रेनची कथा…यात जितेंद्र-नितू आणि हेमा-धमेंद्रच्या प्रेमाचे उपकथानक जोडलेले आहे. ही सर्व कथानके जळणार्‍या गाडीच्या वेगासह पुढे उलगडत जातात.

रमेश सिप्पींच्या शोलेची सुरुवात आणि शेवटच्या दोन्ही प्रसंगाची साक्षीदार कोळश्याचे इंजिन असलेली आगगाडीच असते. नावं पडायला सुरुवात होते तेव्हा स्टेशनवर थांबलेल्या ट्रेनमधून उतरलेला जेलर दिसतो…त्याही पुढे मूळ कथानक सुरू होतं तिथं, जय आणि विरु यांना ठाकूरकडून जेलमध्ये नेले जात असताना डाकूंचा मालगाडीवर झालेला हल्ला….प्रेक्षकांवर विचारक्षमतेवर चित्रपटाच्या सुरुवातीलाच संपूर्ण ताबा मिळवण्यासाठी दिग्दर्शकाने या प्रसंगाचा चपखल आणि यशस्वी वापर केला होता. ही सुरुवात तर शोलेचा अखेरचा प्रसंगही महत्वाचा आहेच. जयचा मृत्यू झाल्यावर विरुला स्टेशनवर सोडायला आलेला ठाकूर आणि रेल्वेच्या डब्यात त्याची वाट पाहाणारी एकाकी थांबलेली बसंती…शोलेची सुरुवात आणि शेवटही ट्रेनच्या प्रसंगांनीच होतो.

कोळसा आगगाडीच्या भकभकीचाही पार्श्वसंगीतात वापर करणार्‍या पंचमने शोलेसाठी रेल्वे रुळांच्या धडधडीचाही प्रसंगाच्या अमिट परिणामासाठी वापर करून घेतला. निवडुंगाच्या झुडुपातून लावलेल्या कॅमेर्‍याच्या कोनातून शोलेतली आगगाडी भकभक करत पळताना दिसते. शोलेमध्ये होळी सणासारखाच आगगाडीचाही वापर कथानक उलगडण्यासाठी पुरेपूर केला जातो.

सुभाष घईंच्या विधातामधलं ‘हाथो की चंद लकिरो का…’ हे दिलीप कुमार आणि शम्मी कुमारचं मैत्रीगीत ट्रेनमध्येच शूट केलेलं असतं. तर १९७७ मध्ये गुलजारांचा किताब प्रदर्शित होतो. त्यातलं पंचमचं ‘धन्नो की आँखो मे..रात का सूरमा..’ हे आगगाडीत चित्रित झालेलं गाणं पंचमची ओळख बनून जातं. ऐंशीच्या दशकात मनमोहन देसाईंचा कुली पडद्यावर येतो. यात इक्बाल नावाचा अमिताभ कुली असतो. कुलीच्या पडद्यावरून अखिल भारतीय रेल्वे सेवेचे दर्शन देसाईंकडून घडवले जाते. यातली बहुतेक एकही फ्रेम अशी नसते, ज्यात रेल्वेची सीट, रूळ किंवा स्टेशनच्या परिसर किंवा संदर्भ नसतो. भारतीय रेल्वे हिरो-हिरॉईनच्या प्रणयाराधनेसाठीही ओळखली जाते. इथं शक्ती सामंतांच्या आराधनामधलं ‘मेरे सपनो की रानी कब आयेगी तू…’ गाणं आजही आठवलं जातं.

गुलजारांचा १९८७ मध्ये रिलिज झालेला नासिर आणि रेखाचा ‘इजाजत’ हा संपूर्ण सिनेमा पावसाळलेल्या रेल्वे स्टेशनवरच्या वेटींग रुममध्ये बनवलेला असतो. नासिर आणि रेखाच्या केवळ आठवणींचा पट उलगडण्यापुरता या चित्रपटाचा कॅमेरा स्टेशनबाहेरच्या भूतकाळी जगात फिरून येतो…बाकी सर्व सिनेमा रेल्वे स्टेशनवरच सुरू होतो आणि संपतो. या सिनेमात संपूर्ण स्टेशनच एक व्यक्तीरेखेसारखे उलगडत जाते.

संशयी वृत्तीमुळे आपलं सर्वस्व हरवलेला राजेश खन्ना ‘जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम…म्हणत रेल्वेच्या खिडकीतून शून्यपणे बाहेरच्या जगाकडे पाहातो. त्यावेळी आनंद बक्षींच्या गाण्यांच्या शब्दांप्रमाणेच रेल्वेच्या गाडीतून काळाचं एकेक स्टेशन मागे पडत जातं आणि तरुण राजेश खन्ना वयस्कर होत जातो. एका ट्रेनच्या प्रवासात चित्रपट ‘आपकी कसम’ २० वर्षे पुढं जातो. रेल्वेच्या गाडीचं हिंदी पडद्याला आकर्षण त्यावेळीही होतंच आजही आहेच. नव्वदच्या दशकात आलेल्या ’कभी हा कभी ना’ मध्ये बुके घेऊन ‘आना’ची वाट पाहाणारा राहुल म्हणजेच शहारुख त्यानंतर दिलवाले दुल्हनिया…मध्ये सिमरनची भेट घेतो ते पंजाबधल्या एका रेल्वे स्टेशनवर त्याआधी ही दोन्ही मंडळी परदेशातल्या रेल्वे स्टेशनवरच्या ट्रेनमध्ये भेटलेली असतात. दोन्ही वेळेस काजोलला शहारुखने चालू ट्रेनच्या डब्यात हात देऊन खेचून घेतलेलं असतं, त्यावेळी ट्रेनमागे पळणार्‍या काजोलसाठी डब्याचा दुसरा दरवाजा शहारुखच्या दरवाज्यापेक्षा जास्त जवळ असतो, मात्र ती त्या डब्यात का जात नाही, असले प्रश्न भारतीय प्रेक्षकांना पडलेले नसतात…थिएटरात स्पेशल साऊंड इफेक्टमुळे ऐकू येणार्‍या ट्रेनच्या शिट्टी आणि धडधडीची ही कमाल असते.