घरफिचर्सनृत्य आणि संगीताचा संगम : सागर संगमम्

नृत्य आणि संगीताचा संगम : सागर संगमम्

Subscribe

‘सागर संगमम’ या चित्रपटात कमल हासनने बालूची भूमिका अतिशय प्रभावीपणे केली आहे. अभिनयाबरोबरच त्याच्या नृत्यकौशल्याचाही प्रभाव जाणवतो. मद्यधुंद अवस्थेतच तो विहिरीच्या काठावर जे नृत्य करतो ते खरोखच अप्रतिम वाटते. माधवीच्या भूमिकेत जयप्रदा आहे आणि तिच्या नृत्याची झलकही पाहण्यास मिळते. त्याच्याविषयी वाटणारे प्रेम आणि काळजी तिने उत्कटतेने दाखवली आहे.

साधारण एक (गैर)समज असा असतो, की मनोरंजन करणारा चित्रपट काही दर्जेदार नसतो. हा समज अर्थातच खोटा आहे हे वेगळे सांगायला नको. आम्हाला चांगले म्हणा म्हणून कितीही सांगितले तरी आणि केवळ प्रेक्षक फिरकले नाहीत, म्हणून काही तो चित्रपट दर्जेदार होत नाही. तसे असते तर अनेक फ्लॉप चित्रपटांची गणना दर्जेदार चित्रपटांतच करावी लागली असती. प्रेक्षकांंना समजेल अशा प्रकारे चित्रपट बनवण्यात आला नसेल, तर प्रेक्षक त्याच्याकडे पाठ फिरवणारच. आणि खरोखरच चांगला चित्रपट असेल तर भाषेची अडचण न येता त्याला गर्दी होणारच. चित्रपट प्रेक्षकांना समजला नाही, असे म्हणणे तसे सोपे असते. पण आपल्याला प्रेक्षकांना नीटपणे विश्वासात घेऊन सांगता आले नाही, हा आपलाच कमीपणा आहे, हे मान्य करणे अनेकांना जड जाते. सत्यजीत राय, अकिरा कुरुसोवा, डी सिका, स्पिलबर्ग किंवा डेव्हिड लीन आणि अर्थातच शांताराम, गुरुदत्त इत्यादींचे चित्रपट दर्जेदार, श्रेष्ठ म्हणावेत असे होते, तरीही ते सर्वत्र लोकप्रिय झाले, ते समजायला सोपे होते आणि त्यामुळेच प्रेक्षकांना भावत होते.

याच गटात मोडणार्‍या ‘शंकराभरणम’ या शास्त्रीय संगीतप्रधान चित्रपटानंतर दोनच वर्षांनी शास्त्रीय नृत्याला प्राधान्य असलेला ‘सागरसंगमम्’ हा चित्रपट आला. कला ही अमर असते, असा संदेश हा चित्रपट देतो. शंकराभरणमचे ख्यातकीर्त दिग्दर्शक के. विश्वनाथ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे आणि कथाही त्यांचीच आहे. शंकराभरणम प्रमाणेच या चित्रपटानेही भरघोस यश मिळवले आणि समीक्षकांची वाहवादेखील! त्याबरोबरच दोन राष्ट्रीय पुरस्कार, तीन फिल्मफेअर पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नंदी पारितोषिक आणि सी.एन.एन-आय.बी.एन यांनी तयार केलेल्या 100 अव्वल भारतीय चित्रपटांमध्ये स्थानही मिळवले.

- Advertisement -

मुळात तेलुगुमध्ये निर्माण करण्यात आलेला हा चित्रपट तामिळ आणि मल्याळममध्ये डब करण्यात आला आणि तेथेही त्याला मोठे यश मिळाले. मुद्दाम सांगायची गोष्ट म्हणजे हा चित्रपट रशियन भाषेत डब करण्यात आला आणि तो मॉस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, आशिया पॅसिफिक फिल्म फेस्टिव्हल आणि ए.आय.एस.एफ.एम. फिल्म फेस्टिव्हलमध्येही दाखवण्यात आला होता. 1984 च्या भारतातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, 2011 मध्ये सिंहावलोकन (रिट्रॉस्पेक्टिव्ह) विभागात, तर 2014 मध्ये सेलिब्रेटिंग डान्स इन इंडियन सिनेमा, म्हणून दाखविण्यात आला होता.

ही कथा आहे, एका अत्यंत गुणी, परंतु आर्थिक हलाखी असलेल्या नर्तकाची. त्याचे नाव बालकृष्ण, परंतु लोक त्याला बालू म्हणूनच ओळखतात आणि प्रेमाने तसेच संबोधतात. विशेष सांगायची गोष्ट म्हणजे त्याला भारतातील शास्त्रीय नृत्याचे कुचिपुडी, भरतनाट्यम, कथक असे अनेक प्रकार चांगल्यापैकी अवगत असतात. अगदी साधा, गरीब स्वभावाचा आणि प्रामाणिक असला, तरी त्याला आर्थिक अडचणींमुळे व्यावसायिक यश मिळवणे अधिकच कष्टाचे बनलेले असते. कारण नृत्याच्या सरावासाठी आवश्यक पुरेसा वेळ तो देऊ शकत नाही. तरीही जमेल तेव्हा, जमेल तसा आणि वेळ मिळेल तेव्हा, अगदी एकतानतेने त्याने, आपला नृत्याचा सराव चालूच ठेवलेला असतो. त्याच्यातील हे गुण हेरून, नृत्याबद्दल प्रेम आणि जिव्हाळा असलेली माधवी ही श्रीमंत तरुणी, तिच्या छायाचित्रणाच्या हौसेमुळे चाललेल्या भ्रमंतीत एकदा त्याला नृत्य करताना पाहते आणि त्याच्या नृत्य-कौशल्याने प्रभावित होते. त्याच्या नकळत त्याची अनेक छायाचित्रेही घेते. आणि त्याला चांगले यश प्राप्त व्हावे म्हणून त्याला उच्च दर्जाच्या नृत्य महोत्सवात भाग घेण्याची संधी मिळवून देते. त्याच नृत्य महोत्सवाची कार्यक्रम पत्रिका घेऊन बालू मोठ्या उत्साहाने घरी येतो. केवळ दोन दिवसांनीच तो महोत्सव होणार असतो.

- Advertisement -

पण घराजवळ येताच तेथे वेगळेच काहीतरी वाढून ठेवले आहे, असे त्याला जाणवते. घाईघाईने तो घरात शिरतो. त्याची आई अत्यवस्थ असते. अतिश्रम, गरीबी आणि अशक्तपणामुळे आबाळ झाल्याने, ती खूपच आजारी असते. बालू मात्र आता तिला आपल्याला मिळालेल्या या संधीच्या बातमीने मोठ्या अपेक्षेने उत्साह वाटेल या समजुतीने तिला ती कार्यक्रम पत्रिका आणि तिच्यातला स्वतःचा फोटो तिला दाखवतो. ती जेमतेम तो बघते इतकेच. ती पत्रिका हातात असतानाच ती हे जग सोडून जाते. आईच्या प्रेमावरच वाढलेला बालू तिच्या मृत्यूने खचून जातो आणि मानसिकदृष्टीने अगदी उद्ध्वस्त होतो. त्याच्या भावनाच जणूकाही नाहीशा झालेल्या असतात. अशा वेळी माधवी त्याला आधार आणि नृत्यकला सुरू ठेवण्यासाठी हरप्रकारे उत्तेजन देते. तिच्या आपल्याबद्दलच्या या आपुलकीने बालू भारावून जातो आणि त्याला ती आवडू लागते. दोघांची जवळीक वाढू लागते. तिच्याबद्दल त्याला प्रेम वाटू लागते. मात्र आपल्या परिस्थितीमुळे वाटणार्‍या संकोचाने तो आपले प्रेम प्रकट करत नाही. मात्र आपल्या भावनांना ती प्रतिसाद देते आहे, हे त्याला जाणवते, तेव्हा मग धाडस करून तो आपले प्रेम व्यक्त करतो. त्याचवेळी त्याला समजते की, माधवी विवाहित असून तिच्या पतीपासून विभक्त झाली आहे. मात्र तिचा नवरा तसा समजूतदार आणि समंजस आहे. तो माधवीकडे येऊन त्या दोघांनी एकत्र राहावे यासाठी प्रयत्नही करतो. पण बालू केवळ लग्नसंस्थेचा मान राखण्यासाठी आपल्या प्रेमावर पाणी सोडतो.

आपल्याच या निर्णयामुळे माधवी दुरावल्याने भावनिकरीत्या उद्ध्वस्त झालेला बालू मद्यपानाच्या आहारी जातो आणि जणू काही त्यायोगेच सतत वास्तवापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. तो एका वर्तमानपत्राचा कला समीक्षक म्हणूनही काम करत असतो. पण तेथेही तडजोड करण्याची वृत्ती नसल्याने, त्याच्या पदरी निराशाच येत असते. दरम्यान माधवीचा नवरा मरण पावतो. तिला बालूची सध्याची अवस्था समजते आणि त्याची कलेची आवड आणि जगण्याची इच्छा जागृत व्हावी म्हणून प्रयत्न करते. ती त्याचा मित्र रघूमार्फत त्याला वैद्यकीय सहाय्यही करायला लागते. आपल्या मुलीचा, शैलजाचा नृत्य शिक्षक होण्यासाठी त्याने तयार व्हावे यासाठी त्याची मनधरणी करते. मध्ये काही वर्षे जातात. नैराश्याने ग्रासलेला बालू आता पट्टीचा मद्यपी बनलेला असतो. तरीही तो शैलजाला अभिजात नृत्याचे शिक्षण देत असतो.

शैलजाच्या नृत्याचा कार्यक्रम ठरतो आणि आजारी, प्रकृती पूर्णपणे खालावलेल्या बालूला चाकाच्या खुर्चीवरून तो पाहण्यासाठी आणले जाते. कार्यक्रम बघत असतानाच बालू मरण पावतो आणि चाकाच्या खुर्चीतून रघू त्याला घेऊन जात असतानाच पाऊस येतो आणि माधवी त्याला पाऊस लागू नये, म्हणून छत्री बालूच्या डोक्यावर धरून त्यांच्याबरोबर जात असतानाच, पडद्यावर समाप्त-द एंड अशी अक्षरे पडद्यावर येतात, पण त्यानंतर कला कधीच संपत नाही, (देअर ईज नो एंड टु आर्ट) अशी अक्षरे उमटतात.

कमल हासनने बालूची भूमिका अतिशय प्रभावीपणे केली आहे. अभिनयाबरोबरच त्याच्या नृत्यकौशल्याचाही प्रभाव जाणवतो. मद्यधुंद अवस्थेतच तो विहिरीच्या काठावर जे नृत्य करतो ते खरोखच अप्रतिम वाटते. माधवीच्या भूमिकेत जयप्रदा आहे आणि तिच्या नृत्याची झलकही पाहण्यास मिळते. त्याच्याविषयी वाटणारे प्रेम आणि काळजी तिने उत्कटतेने दाखवली आहे. रघू (रघुपती)च्या भूमिकेत शरदबाबूने या दोघांना तितकीच परिणामकारक साथ दिली आहे. तो बालूवर प्रेमही करतो आणि त्याच्या अवस्थेमुळे त्याच्यावर रागावतोही. शैलजाची भूमिका त्याच नावाच्या अभिनेत्रीने केली आहे. तिचा तोरा आणि नृत्यातील कौशल्य आणि बालूविषयीचा आदर हे सारे तिने योग्य प्रकारे दाखवले आहे. हास्यनिर्मितीसाठी असलेल्या नुकतेच बालपण सरलेल्या उत्साही आणि उतावीळ मुलाची भूमिका चक्री तोलेतीने स्मरणात राहीत अशी केली आहे. मोहन शर्माने माधवीच्या समजुतदार नवर्‍याची भूमिका केली आहे, तर मंजू भार्गवी शास्त्रीय नर्तकीच्या लहानशा भूमिकेत आहे.

ई. नागेश्वर राव यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन के. विश्वनाथ यांचे आहे आणि संगीत इलैयाराजा यांचे आहे. अनेक ठिकाणी दाद द्यावी असे छायाचित्रण पी. एस. निवास यांचे आहे. चित्रपटातील हलकी फुलकी दृश्ये विश्वनाथ यांनी छान खुलवली आहेत. छोटा छायाचित्रकार अतिशय आत्मविश्वासाने छायाचित्रणाचे काम करत असतो. पण प्रत्यक्षात ते किती हास्यास्पद होते ते त्यांनी दाखवले आहे आणि त्याच बरोबर छायाचित्रणाची हौस असलेली माधवी त्या दोघांच्या नकळत बालूची छायाचित्रे कशी घेत असते ते त्यांनी प्रभावीपणे दाखवले आहे. बालूला चित्रपटात काम मिळण्यासाठी आधी प्रत्यक्षिक दाखवण्यासाठी सांगण्यात येते आणि तो शास्त्रीय नृत्यांचे प्रकार दाखवतो. पण हे चालणार नाही असे म्हणून त्याला लोकांना आवडते तसे काहीतरी कर म्हणून सांगतात. तेव्हा तो अगदी थिल्लर प्रकारचे नृत्य करतो तेव्हा ते अचंबित होतात. पण बालू तशी भूमिका करणे शक्य नसते. हा सारा प्रसंग बरेच काही सांगणारा आहे.

बाह्य चित्रणासाठी निवडलेल्या जागाही भूल पडावी अशाच आहेत. एकीकडे नृत्याची आवड आणि दुसरीकडे व्यसनापासून मुक्तता करून घेण्याची इच्छा नसलेल्या बालूची द्विधा मनस्थिती त्यांनी चांगली टिपली आहे. माधवी नवर्‍यावेगळी राहात आहे हे माहीत असूनही पावसामुळे तिचे कुंकू वाहून जाऊ नये म्हणून धुंदीत असला तरी बालू कशी काळजी घेतो हे सारेच स्मरणात राहणारे झाले आहे. इलैयाराजा यांचे संगीत कथेला अनुकूल असेच आहे आणि गाणी अतिशय सोप्या चालीत आणि चटकन लोकप्रिय होतील अशीच आहेत. भाषा कळली नाही, तरी सुरांची भाषा मोह घालणारीच आहे. नृत्याची आवड असलेल्यांना हा चित्रपट आवडेलच पण इतरांनाही नृत्याची गोडी वाटायला लावेल असा हा चित्रपट आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -