घरफिचर्सकोरोना नंतरची ‘कोविड’ कम्युनिटी

कोरोना नंतरची ‘कोविड’ कम्युनिटी

Subscribe

मी ज्या कोविड कम्युनिटीबाबत बोलत आहे, ती कम्युनिटी रुग्णावर आलेला ताण आणि सामाजिक बहिष्काराचे फलित असू शकेल. क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोना रुग्णांचा डान्स किंवा रुग्ण क्रिकेट खेळतायत असे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर आले असतील. ज्यांना कोरोना नाही, अशा लोकांना कदाचित हे विचित्र वाटलं असेल. मात्र कोरोना वॉर्डात उपचार घेणार्‍यांसाठी ती एक प्रकारची मानसिक थेरपी असते. या आजाराकडे बघण्याचा जो पूर्वग्रहित दृष्टीकोन समाजाचा झालेला आहे, त्या तणावातून बाहेर पडण्यासाठी अनेक ठिकाणी कोरोना वॉर्डात नाच-गाण्याचे कार्यक्रम रुग्ण उत्स्फूर्तपणे घेतात. अर्थात हे सर्व लक्षणे नसलेले रुग्ण आहेत.

गेले काही महिने आपल्या सर्वांचेच जग कोविड आणि कोरोना या दोन शब्दांभोवती फिरतंय. लॉकडाऊन, क्वारंटाईन, आयसोलेशन, व्हॅक्सिन, इम्युनिटी अशा काही इंग्रजी शब्दांनीही जनमानसाच्या मनाचा ताबा घेतलाय. जगाच्या ७.८ अब्ज लोकसंख्येच्या एक टक्काही लोकसंख्येला कोरोना विषाणूची बाधा अद्याप झालेली नाही. मात्र तरीही या विषाणूने जगाला वेठीला तर धरलेच. त्याशिवाय नागरी जीवनात आतापर्यंत मानवाने जे ठोकताळे विकसित केले होते, त्या अनेक ठोकताळ्यांची आता नव्याने मांडणी करायला आपल्याला भाग पाडले आहे. जगभरात किंवा भारतासारख्या जाती व्यवस्था असलेल्या देशात एखादी कम्युनिटी तयार व्हायला वेळ लागत नाही. एका विचाराचे, समान उद्देशाचे किंवा काहीतरी वेगळेपण असलेले लोक एकत्र येऊन कम्युनिटी तयार करतात. ही कम्युनिटी कधी कधी फक्त मानसिक आधारासाठी किंवा एकमेकांना धीर देण्यासाठी असू शकते. LGBTQ कम्युनिटीच घ्या… त्याप्रमाणेच आता कोविड कम्युनिटीचाही उदय झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

कोरोना विषाणूने आधीच सामाजिक जीवन गुंतागुंतीचे करुन ठेवले आहे. माझ्या मागच्या ‘कोरोनानंतरची अस्पृश्यता’ या लेखाद्वारे कोरोनाबाधित रुग्णांना रिकव्हर झाल्यानंतरदेखील ज्याप्रकारच्या सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे लागले आहे, त्याबद्दल माहिती दिली होती. मात्र या लेखात कोरोनाबाधितांचा एकमेकांच्या व्यवहार आणि संबंधावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे. भारताबाबत बोलायचे झाल्यास आतापर्यंत ९ लाख ७४ हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. हा लेख छापून येईपर्यंत ही संख्या १० लाखांपर्यंत पोहोचलेली असेल. कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या आहे ६ लाख १४ हजार तर उपचार घेणारे रुग्ण आहेत ३ लाख ३४ हजार. दुर्दैवाने २५ हजार रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

- Advertisement -

भारताच्या लोकसंख्येचा विचार केल्यास ती १३८ कोटींच्या आसपास आहे. संसर्ग झालेल्यांची संख्या १० लाख असून एकूण लोकसंख्येच्या एक टक्क्याच्याही कितीतरी खाली आहे. हा आकडा इथेच थांबावा, अशी प्रार्थना करुयात. कोरोना विषाणूमुळे आर्थिक, सामाजिक अडचणी निर्माण झालेल्या आहेतच. ज्यांना याचा संसर्ग झालेला नाही, त्यांना देखील मोठ्या आर्थिक हानीला सामोरे जावे लागत आहे. आर्थिक विवंचनेत असलेले अनेकजण कुटुंबासहित आत्महत्या करत असल्याच्या बातम्याही आपण रोज वाचत असू. क्लेषदायक अशी ही परिस्थिती आहे. या परिस्थितीत कोरोनातून मुक्त झालेल्यांची वेगळीच अवस्था आहे. आपण कोरोनासारख्या विषाणूच्या तावडीतून सुटलो खरे; पण त्याचे भविष्यातील परिणाम, आर्थिक भार, समाजातून मिळत असलेली वेगळी वागणूक याचा मोठा मानसिक ताण कोरोनाग्रस्तांवर आहे.

मी ज्या कोविड कम्युनिटीबाबत बोलत आहे, ती कम्युनिटी रुग्णावर आलेला ताण आणि सामाजिक बहिष्काराचे फलित असू शकेल. क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोना रुग्णांचा डान्स किंवा रुग्ण क्रिकेट खेळतायत असे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर आले असतील. ज्यांना कोरोना नाही, अशा लोकांना कदाचित हे विचित्र वाटलं असेल. मात्र कोरोना वॉर्डात उपचार घेणार्‍यांसाठी ती एक प्रकारची मानसिक थेरपी असते. या आजाराकडे बघण्याचा जो पूर्वग्रहित दृष्टीकोन समाजाचा झालेला आह, त्या तणावातून बाहेर पडण्यासाठी अनेक ठिकाणी कोरोना वॉर्डात नाच-गाण्याचे कार्यक्रम रुग्ण उत्स्फूर्तपणे घेतात. अर्थात हे सर्व लक्षणे नसलेले रुग्ण आहेत.

- Advertisement -

मला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या एका क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. कोरोनाबाबत आपण ज्या बातम्या पाहतो, रोजची आकडेवारी पाहतो, त्यामुळे कोरोनाबाबतची एक भीती आपल्या मनात बसलेली आहे. ती भीती घेऊनच आपण क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल होतो. तोपर्यंत आपण पॉझिटिव्ह झालोय, म्हणजे काहीतरी जगावेगळं घडलंय. हे आपल्याला शेजारच्यांनी त्यांच्या लक्षणातून दाखवून दिलेलं असतं. मात्र क्वारंटाईन सेंटरमध्ये इतर रुग्णांकडून वेगळीच वागणूक मिळते. तिथे सगळेच पॉझिटिव्ह असतात. त्यामुळे रुग्ण म्हणून दुजाभाव नसतोच. उलट एकमेकांना मदतीची भावना जास्त दिसून आली. पालिका क्वारंटाईन सेंटरमध्ये बेड, औषधे आणि जेवण उपलब्ध करून देते; पण नव्या रुग्णांना धीर आणि समुपदेशन देण्याचे मोठे काम आधी भरती झालेले रुग्ण करताना दिसतात. जुने रुग्ण नव्या रुग्णांना ‘कुछ नही होता रे, बिनधास्त रहने का’ हा कॉन्फिडन्स पहिल्या दिवसापासून देतात. जेवणाच्या व्यतिरिक्त इतर गोष्टी काय हवं नको ते पाहतात. स्वतःकडे असलेली जास्तीची फळे इतरांना देतात. एकत्र चहा-बिस्किट खातात. मी ज्या वॉर्डात होतो, तिथे तर डिस्चार्जच्या आदल्या दिवशी फेअरवेल पार्टी देण्याचाही प्रघात होता. ज्या रुग्णाचा डिस्चार्ज असे, तो बाहेरचे चमचमीत पदार्थ मागवत असे.

समान दुःख असलेले लोक चटकन एकमेकांचे मित्र होतात किंवा जवळ येतात. मानवी भावविश्वातली ही आदिम प्रेरणा आहे. अनेक ठिकाणी कोरोनाचा उपचार घेत असताना रुग्णांनी त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केले आहेत. आमचाही एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप झालेला आहे. या ग्रुपवर अजूनही एकमेकांच्या तब्येतीची विचारपूस केली जात आहे. त्याव्यतिरिक्त कोरोनासंबंधी महत्त्वाची माहिती शेअर केली जाते. फेसबुक सारख्या सोशल मीडिया साईटवरही लोक आता खुलेपणाने स्वतःच्या संसर्गाबद्दल माहिती देऊ लागले आहेत. आपला अनुभव शेअर करत आहेत. त्याला इतर कोरोनाबाधितांचा पाठिंबा मिळताना दिसतो.

फेसबुकवर या चर्चांचे निरीक्षण केल्यावर दिसतंय की, भारतात ९० टक्क्यांच्यावर कोरोनाबाधित रुग्णांना सामाजिक बहिष्कारासारख्या प्रथेला बळी पडावे लागले आहे. मित्र-परिवार, नातेवाईक आणि शेजारीपाजारी यातील काही अपवाद वगळता बरेच जण रुग्णांपासून सोशल डिस्टन्सिंग पाळून राहतात. हे सोशल डिस्टन्सिंग महिनोन्महिने सुरु आहे. कोरोनाची महामारी संपेपर्यंत कदाचित ही वागणूक कमी अधिक प्रमाणात मिळत राहील. मात्र या काळात कोरोना रुग्णांचा इतर रुग्णांशी असलेला सॉफ्ट कॉर्नरही दिसून आला.

अमिताभ बच्चन यांचे उदाहरण घेऊयात. बच्चन यांचे कुटुंब कोरोनाबाधित झाल्यानंतर संबंध जगभरातून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली गेली. ते महानायक असल्यामुळे त्यांना वेगळी वागणूक मिळणार हे ओघाने आलेच. उलट अमिताभ बरे झाल्यानंतर त्याची मिसाल बनेल. पन्नाशीच्या वरच्या रुग्णांसाठी ही मिसाल नक्कीच सकारात्मक परिणाम घडवू शकते. दुसर्‍या बाजूला अमिताभ यांच्यावर टीकाही झाली. नानावटीच्या आर्थिक संबंधावरून हा फार्स असल्याची टीका झाली. मात्र कोरोनाबाधित असलेल्या रुग्णांनी अमिताभ यांच्याबाबतीत उथळ कमेंट केलेल्या नाहीत. कारण या आजारासमोर पैशाची ताकद चालत नाही. अमेरिका, इटलीमध्ये पैसे असून, चांगली आरोग्य सुविधा असूनही मृतांची संख्या वाढते आहे. या आजारातून बरे होण्यासाठी ज्याप्रकारे रोगप्रतिकारशक्ती महत्त्वाची आहे. तसेच मानसिक खंबीरताही तेवढीच महत्त्वाची आहे. ही मानसिक खंबीरता इतर कोरोनाबाधित रुग्णांच्या अनुभवातून मिळतेय.

हॉलिवूडचा दिग्दर्शक स्टिव्हन स्पिलबर्ग यांनी दुसर्‍या महायुद्धाच्या दरम्यान जर्मनीतील ऑस्कर शिंडलर या उद्योगपतीवर एक चित्रपट काढलेला आहे. ‘शिंडलर्स लिस्ट’ असे त्याचे नाव आहे. या ऑस्कर शिंडलरने काही हजार ज्यू नागरिकांना नाझींच्या नरसंहारापासून वाचविले होते. त्याचा हेतू काहीही असला तरी त्याच्या हातून नकळत एक महान कार्य होऊन गेले. पुढे हिटलरचे पतन झाल्यानंतर या वाचलेल्या ज्यूंनी स्वतःला ‘शिंडलर ज्यू’ म्हणवून घ्यायला सुरुवात केली. ज्यामुळे इतिहासातील हा प्रसंग आजही जिवंत राहिला आहे. त्याप्रमाणेच सध्या जग ज्या परिस्थितीतून जात आहे. त्यातून जर कोविड कम्युनिटी उभी राहिली तर आश्चर्य वाटायला नको.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड

एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -