दर ७२ वर्षांनी बदलते संक्रांतीची तारीख !

नवीन वर्ष सुरू झाले की येणारा पहिला सण म्हणजे संक्रांत. आपले सगळे सण आणि उत्सव हे निसर्गाशी आणि ऋतूंशी जोडलेले आहेत. त्यापैकी संक्रांत हा अगदी सरळसरळ खगोलशास्त्राशी जोडलेला सण. आपल्याकडचे बहुतेक सर्व सण हे चांद्र पंचागाप्रमाणे आहेत पण संक्रांत हा मात्र सूर्याशी जोडलेला आहे. या काळात थंडी पडलेली असते आणि त्यामुळे सूर्य देवतेला नमस्कार करणे हे शहाणपणाचे ठरते. सूर्याच्या उष्णते बरोबर तीळ आणि गुळ यांचा वापरही भरपूर केला जातो. सूर्य हा आपल्या दैनंदिन जीवनाचा फक्त भाग नाही तर तो आहे म्हणून आपला दिवस, खरा म्हणजे या जीवसृष्टीचा दिवस सुरू होतो. याने उपकृत होऊन त्याला देवता मानून त्याचा आदर करण्याचा हा सण आहे, फक्त हळदी कुंकू आणि हलवा खाण्याचा नाही.  सूर्य हा त्याचे सहा महिन्याचे आयन बदलतो, किंवा संक्रमण करतो आणि उत्तर आयन म्हणजेच कर्क वृतामध्ये तो प्रवेश करतो.

nashik

नवीन वर्ष सुरू झाले की येणारा पहिला सण म्हणजे संक्रांत. आपले सगळे सण आणि उत्सव हे निसर्गाशी आणि ऋतूंशी जोडलेले आहेत. त्यापैकी संक्रांत हा अगदी सरळसरळ खगोलशास्त्राशी जोडलेला सण. आपल्याकडचे बहुतेक सर्व सण हे चांद्र पंचागाप्रमाणे आहेत पण संक्रांत हा मात्र सूर्याशी जोडलेला आहे. या काळात थंडी पडलेली असते आणि त्यामुळे सूर्य देवतेला नमस्कार करणे हे शहाणपणाचे ठरते. सूर्याच्या उष्णते बरोबर तीळ आणि गुळ यांचा वापरही भरपूर केला जातो. सूर्य हा आपल्या दैनंदिन जीवनाचा फक्त भाग नाही तर तो आहे म्हणून आपला दिवस, खरा म्हणजे या जीवसृष्टीचा दिवस सुरू होतो. याने उपकृत होऊन त्याला देवता मानून त्याचा आदर करण्याचा हा सण आहे, फक्त हळदी कुंकू आणि हलवा खाण्याचा नाही.  सूर्य हा त्याचे सहा महिन्याचे आयन बदलतो, किंवा संक्रमण करतो आणि उत्तर आयन म्हणजेच कर्क वृतामध्ये तो प्रवेश करतो.
संक्रांती आणि आरोग्य विज्ञान याचाही जवळचा संबंध आहे. थंडीमध्ये सांधेदुखी आणि यासारखे त्रास अनेक जणांना होतात आणि यापासून संरक्षण म्हणून तीळ आणि गुळ खाल्ला जातो. याने खोकलादेखील येत नाही.
सूर्याचे मकर राशीतून संक्रमण म्हणून मकर संक्रांती हे नाव या सणाला आले. आपल्याकडे कापणीच्या हंगामांपैकी हा एक हंगाम असतो. भारतामधील भौगोलिक विविधतेमुळे हा सण ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आणि नावाने साजरा होतो.
या काळात हंगाम बदलत असल्यामुळे या बदलाला खूप महत्व आहे. बर्‍याच प्रदेशांमध्ये संक्रांती या नावानेच हा सण साजरा होतो तर, राजस्थान आणि गुजरात मध्ये उत्तरायण नावाने साजरा होतो. हरयाणा, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये माघी, तामिळनाडू मध्ये पोंगल, आसाम मध्ये माघ बिहू किंवा भोंगली बिहू नावाने साजरा होतो. काश्मीरमध्ये शिशुर सेन्क्रात, केरळमध्ये मकरा विलाक्कू या नावाने साजरा होतो. भारताबरोबर नेपाळ, थायलंड, लाओस, कंबोडिया, माय्नमर या देशांमध्ये देखील संकांती साजरी केली जाते.
याला सामाजिक, सांस्कृतिक आयाम तर आहेतच पण खगोलशास्त्रीय दृष्टीने खूपच महत्व आहे. पृथ्वीचा अक्ष झुकलेला आहे. याला आयनांश असेही म्हणतात. पृथ्वीवर अनेक बले काम करीत असतात आणि त्यामुळे पृथ्वीला वेगवेगळ्या गती आहेत. जसे, स्वतःभोवती ती फिरते, ती सूर्याभोवती फिरते. तशीच पृथ्वीला परांचन गती देखील आहे. ही झुकलेल्या अक्षामुळे आहे. यामध्ये पृथ्वी एखाद्या भोवर्‍यासारखी देखील फिरते. यामुळे त्याचा एक परांचन कक्षा तयार होतो. यावर अनेक तारे आहेत. जेंव्हा पृथ्वीचा उत्तर अक्ष परांचन कक्षेवरील ज्या तार्‍याकडे रोखलेला असतो तो त्या वेळी पृथ्वीचा ध्रुव तारा असतो. ही परांचन कक्षा पृथ्वी २६००० वर्षांमध्ये पूर्ण करते. साधारण ५००० वर्षांपूर्वी आपला ध्रुव हा ठुबान तारा होता. पुढे १२००० वर्षांनी आपला ध्रुव अभिजित तारा असेल. यात दोन महत्वाचे शब्द आहेत. एक म्हणजे मकर, जो एक तारकासमूह आहे आणि संक्रांत किंवा संक्रमण, म्हणजे स्थित्यंतर.
संक्रांत ही सर्वसाधारणपणे १४ जानेवारी किंवा १५ जानेवारीला येते. पण ही स्थिती सध्याची आहे. कायम राहणारी नाही किंवा पूर्वी देखील नव्हती. लीप वर्षामध्ये ही १५ जानेवारीला येते आणि एरवी १४ जानेवारीला. म्हणजे १४, १४, १४, १५ जानेवारी हे चक्र चालू राहते. गेली ४० वर्षे आपण ह्याच पद्धतीने संक्रांत आलेली पाहत आहोत. परंतु आता मात्र २००९ – २०१२ या चक्रामध्ये बदल दिसून आलेला आहे. २००९ आणि २०१० मध्ये १४ जानेवारी आणि २०११ व २०१२ मध्ये १५ जानेवारी अशा तारखांना संक्रांत आहे. हे चक्र पुढील ४० वर्षे चालू राहील. २०४९ ते २०५२ या चक्रामध्ये संक्रांत क्रमाने १४ – १५ – १५ – १५ जानेवारीला अशी असेल. पुन्हा ४० वर्षांनी २०८९ – २०९२ मध्ये १५ – १५ – १५ – १५ – १५ जानेवारी अशी संक्रांत असेल. २१०० मध्ये अजून वेगळेच काहीतरी घडणार आहे. जरी २१०० हा आकड्याला ४ ने पूर्ण भागाकार होत असला तरी हे लीप वर्ष नसेल. ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे जर एखाद्या वर्षाला १०० ने भाग जात असेल आणि जर ४०० ने पूर्ण भागता येत असेल तरच ते लीप वर्ष असू शकते. याचा अर्थ असा की २१००, २२००, २३०० आणि १९०० ही लीप वर्षे नाहीत. पण २०००, २००४ मात्र आहेत. ज्या अर्थी २१०० हे वर्ष लीप वर्ष नाही, यात जास्तीचे दिवस मोजले जाणार नाहीत. आणि यामुळे संक्रांती ही एक दिवसाने पुढे जाणार आहे. २१०१ ते २०१४ या वर्षांमध्ये संक्रांती १६ – १६ – १६ – १६ जानेवारी अशी येईल. हा असाच बदल १०० वर्षांनी होईल, पण केंव्हा?, जेव्हा वर्षाला १०० ने भाग जातो पण ४०० ने नाही. आणि हे १०० वर्षांचे चक्र आणि ४० वर्षांचे चक्र एकाच वेळेस चालू राहते. आणि या दोन्हीचा परिणाम होऊन संक्रांतीच्या म्हणजेच सूर्य संक्रमणाच्या तारखा बदलत जातील. या बदलाची गती पहिली तर ७२ वर्षांनी एक दिवस संक्रांत पुढे जाते.
२१ डिसेंबर हा सर्वात लहान दिवस. नंतर हळूहळू हा मोठा होत जातो. याच वेळेस सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. म्हणजे खरे उत्तरायण हे २१ डिसेंबरला सुरु होते. आणि पूर्वी हीच मकर संक्रांतीची तारीख होती. परंतु पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने झुकलेला आहे आणि विषुववृत्त सरकण्यामुळे आयने होतात. म्हणूनच ही तारीखही बदलत गेली. हजार वर्षांपूर्वी संक्रांती ३१ डिसेंबरला होत असे. आणि या वर्षी १५ जानेवारी आहे. अजून पाच हजार वर्षांनी ही फेब्रुवारीच्या अखेरीस असेल तर ९००० वर्षांनी जूनमध्ये येईल.

sujata babar

– सुजाता बाबर, खगोल अभ्यासक, नाशिक.

पुढील काही वर्षांमध्ये संक्रांत अशा तारखांना असेल-

वर्ष            जानेवारीमधील संक्रांत

२०२१ – २०२४     १४ – १४ – १५ – १५
२०४९ – २०५२     १४ – १५ – १५ – १५
२०८९ – २०९२     १५ – १५ – १५ – १५
२१०० – २१०४     १६ – १६ – १६ – १६
२१२५ – २१२८     १६ – १६ – १६ – १७
२१६५ – २१६८     १६ – १६ – १७ – १७
२२०१ – २२०४     १७ – १८ – १८ – १८
२२४१ – २२४४     १८ – १८ – १८ – १८
२२८१ – २२८४     १८ – १८ – १८ – १९
२३०१ – २३०४     १९ – १९ – १९ – १९
२३१७ – २३२०     १९ – १९ – २० – २०
२३६१ – २३६४    १९ – २० – २० – २०
२३९७ -२४००     २० – २० – २० – २०