घरफिचर्स‘द डेथ ऑफ स्टॅलिन’ : एक उत्तम राजकीय उपहासपट

‘द डेथ ऑफ स्टॅलिन’ : एक उत्तम राजकीय उपहासपट

Subscribe

‘द डेथ ऑफ स्टॅलिन’ या अर्मांडो लन्युसी दिग्दर्शित चित्रपटातील घटनाक्रम जोसेफ स्टॅलिनच्या (अ‍ॅड्रियन मॅकलोफिन) मृत्यूच्या एक दिवस आधी सुरू झाला तरी राजकीय-सामाजिक परिस्थितीचं सार्थ दर्शन मोजक्याच, पण परिणामकारक दृश्यांमधून होतं. जागतिक राजकारणात एकाधिकारशाही थाटात कारभार चालवणार्‍या सत्ताधीशांची रेलचेल असतानाच्या सद्य:स्थितीत हा चित्रपट जरूर पहायला हवा.

सोव्हिएत युनियनमध्ये १९२४ मध्ये व्लादिमिर लेनिनच्या मृत्यूनंतर लिऑन ट्रॉट्स्की आणि जोसेफ स्टॅलिनमध्ये सत्तासंघर्ष सुरू झाला, आणि त्यातून स्टॅलिन सत्तेत आला. त्यानंतर एकाधिकारशाही कारभाराची सुरुवात झाली. मार्क्स-लेनिनने समोर ठेवलेल्या विचारांचा सोयीस्करपणे अर्थ लावला जाऊन लेनिन सत्तेत असताना महत्त्व बाळगून असणार्‍या ट्रॉट्स्कीसारख्या नेत्याला देशातून पळ काढावा लागला अशी परिस्थिती निर्माण झाली. स्टॅलिन सत्तेत आल्यावर सुरुवातीच्या काळात तरी वरवर पाहता देशाच्या आर्थिक, सामाजिक विकासाच्या दृष्टीने हितकारक असे निर्णय घेतले जात होते. प्रत्यक्षात मात्र एकाधिकारशाहीत घडणं साहजिक असलेल्या गोष्टी घडून येत सत्ता अबाधित राखण्यासाठी आपल्या हातात असलेलं सगळं काही केलं जात होतं. विरोधकांची, विरोधी मतांची गळचेपी होऊ लागली, तसेच लोकांची हत्यासत्रं सुरु झाली होती. कालांतराने पूर्णतः डाव्या विचारसरणीच्या स्टॅलिनने जर्मनीतील उजव्या विचारसरणीच्या हुकूमशहा हिटलरला समर्थन देण्यासारख्या घटना घडून जगाने दुसर्‍या महायुद्धाकडे वाटचाल केली.

दुसर्‍या महायुद्धाच्या समाप्तीनंतर स्टॅलिनचं सत्ता गमावण्याचं भय उत्तरोत्तर वाढत जाऊन देशात अराजकता माजली. प्रत्येक जण आपल्याविरुद्ध कट रचू पाहत आहे असा स्टॅलिनचा समज होऊ लागला. त्याच्या मंत्रिमंडळात असलेल्या लोकांना त्याची मर्जी बाळगून त्याच्या मनातील आपली प्रतिमा बिघडणार नाही याची काळजी घ्यावी लागत होती. केवळ एखादी क्षुल्लक चूकसुद्धा मोठ्यात मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीला मृत्यूच्या दारात नेऊन उभी करू शकेल असा काळ होता.

- Advertisement -

‘द डेथ ऑफ स्टॅलिन’ या अर्मांडो लन्युसी दिग्दर्शित चित्रपटातील घटनाक्रम जोसेफ स्टॅलिनच्या (अ‍ॅड्रियन मॅकलोफिन) मृत्यूच्या एक दिवस आधी सुरू झाला तरी वर उल्लेखलेल्या राजकीय-सामाजिक परिस्थितीचं सार्थ दर्शन मोजक्याच, पण परिणामकारक दृश्यांमधून होतं. चित्रपटाची सुरुवात एकाच वेळी घडत असलेल्या तीन निरनिराळ्या प्रसंगांच्या माध्यमातून आलटून पालटून समांतरपणे सुरु असणार्‍या घटनांच्या माध्यमातून होते. एका प्रेक्षागृहात कॉन्सर्ट सुरू असते, तर त्याचवेळी तिचं रेडिओवर थेट प्रक्षेपणदेखील सुरु असतं. इतक्यात तिथलं कामकाज पाहणार्‍या व्यक्तीला थेट जनरल सेक्रेटरी स्टॅलिनचा फोन येतो, आणि स्टॅलिन त्या कॉन्सर्टची रेकॉर्डिंग आपल्याला हवी असल्याचा आदेश सुनावतो. कॉन्सर्ट रेकॉर्ड केलेली नसल्याने त्याला तात्काळ ती कॉन्सर्ट पुन्हा रेकॉर्ड करावी लागते. त्या धावपळीत स्टॅलिनची जनमानसात असलेली प्रतिमा आणि भीती दिसून येते. दरम्यान याच दृश्यानंतर पुढे जाऊन घडणार्‍या राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वाच्या ठरणार्‍या उत्प्रेरकाचा समावेश केला जातो.

दुसरीकडे स्टॅलिन आणि त्याच्या जवळच्या मंत्र्यांची पार्टी सुरू असते. त्या दृश्यात अगदी राजकीयदृष्ठ्या महत्त्वाच्या असणार्‍या लोकांच्या मनातही स्टॅलिनची असलेली भीती दिसून येते. निकिता ख्रुश्चेव (स्टीव्ह बुशेमी), लाव्हरेंटी बेरिया (सिमोन रसेल बीएल), जॉर्जी मॅलेनकोव्ह (जेफ्री टॅम्बोर), इत्यादी तत्कालीन सरकारच्या केंद्रीय समितीतील महत्त्वाची मंडळी स्टॅलिनची मर्जी संपादन करण्यात मश्गूल असल्याचं दिसतं. तर तिसरीकडे स्टॅलिनने शहरातील एका भागातील बर्‍याचशा नागरिकांची हत्या करण्याचे आदेश दिलेले असल्याने त्या भागात सुरू असलेली नागरिकांची धरपकड, त्यांची कत्तल यासारख्या घटना घडताना दिसतात. पार्टी संपल्यानंतर स्टॅलिन परराष्ट्रमंत्री व्याचेस्लाव्ह मोलोटॉव्हचा (मायकल पेलिन) समावेश आपल्या शत्रूंच्या यादीत करतो, परिणामी त्याला स्टॅलिनच्या महतीनुसार रातोरात गायब केलं जातं.

- Advertisement -

दुसर्‍या दिवशी अनपेक्षितपणेच स्टॅलिनचा मृत्यू होतो, आणि जणू इतिहासाची पुनरावृत्ती घडत राजकीय खलबतं सुरु होतात. लेनिनच्या मृत्यूनंतर सोव्हिएत युनियनमध्ये जशी राजकीय पर्यायाची पोकळी निर्माण झाली होती, तसंच पुन्हा घडून येतं. फरक इतकाच की यावेळी सत्ता संपादन करण्याच्या स्पर्धेत असलेल्या लोकांची संख्या अधिक असते. त्यामुळे तत्कालीन केंद्रीय समितीमधील प्रत्येक व्यक्ती सुरुवातीला स्टॅलिनच्या मुलांचं आदरातिथ्य करीत त्यांची मर्जी संपादन करण्यात, तर त्यानंतर स्टॅलिनंतर सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नांत मग्न होते. एकमेकांना साथ किंवा दगा देणं या गोष्टींना सुरुवात होते.

लेखक-दिग्दर्शक लन्युसी त्याच्या चित्रपटांतील उपहासात्मक विनोदासाठी प्रसिद्ध आहे. ‘द डेथ ऑफ स्टॅलिन’मध्येही तो तत्कालीन सोव्हिएत युनियनमधील सामाजिक-राजकीय घडामोडींकडे पाहताना उपरोध आणि विनोदाचा वापर करतो. अर्थात स्टॅलिनच्या राजवटीत आणि त्याच्या मृत्यूपश्चात तिथे घडून येणारी हिंसा तितक्याच गंभीरपणे समोर येईल याचीही काळजी तो बाळगतो. स्टॅलिनचा मृत्यू हे राजकीय घडामोडी, सत्ता संघर्ष आणि त्यातील सावळ्या गोंधळाच्या चित्रणासाठीचं फक्त एक निमित्त ठरतं. लन्युसी या सगळ्या घडामोडी गडद विनोदाच्या माध्यमातून चितारतो. चित्रपटातील कलाकारांची अप्रतिम फौज लेखक-दिग्दर्शकांनी दिलेल्या मजकुराचा दर्जा अधिक उंचावून ठेवते.

‘द डेथ ऑफ स्टॅलिन’च्या शेवटी येणारी श्रेयनामावली म्हणजे एकूण चित्रपटाच्या परिणामाचा, त्यातील उपहासाच्या शैलीचा स्तर कित्येक पटींनी वाढवणारी आहे. स्टॅलिनने सध्या प्रचलित असलेलं फोटोशॉपचं तंत्र त्याच्या जवळपास एका शतकाआधीच्या राजकीय कारकिर्दीत कित्येकदा वापरलं होतं. तो इतिहासात फेरफार करण्यासाठी, स्वतःच खून घडवून आणलेल्या लोकांसोबत काढलेले स्वतःचे फोटो मॉर्फ करत त्यातून मृत लोकांना काढून टाकण्यासाठी प्रसिद्ध होता. चित्रपटकर्ते हीच गोष्ट त्यांनी चित्रपटभर वापरलेल्या उपहासात्मक शैलीत समोर काही छायाचित्रं ठेवत कधी त्यातील एखाद्या व्यक्तीला छायाचित्रातून पूर्णतः गायब करत, तर कधी त्याच्या चेहर्‍यावर ओरखडे पाडत किंवा काही वेळा थेट त्याच्या चेहर्‍याची चौकट कापून टाकण्यासारखे प्रकार घडवून आणतात. एखाद्या चित्रपटाची श्रेयनामावली याहून अधिक समर्पक होणं शक्य नाही.

‘द डेथ ऑफ स्टॅलिन’ म्हणजे जागतिक राजकारणात एकाधिकारशाही थाटात कारभार चालवणार्‍या सत्ताधीशांची रेलचेल असतानाच्या सद्यस्थितीत आलेला एक उत्तम राजकीय उपहासपट आहे. तो अगदी आवर्जून पहायला हवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -