घरफिचर्सहत्तीणीचा मृत्यू अन् हळहळणारी मने !

हत्तीणीचा मृत्यू अन् हळहळणारी मने !

Subscribe

‘आई मी माणूस कधीही पाहू शकणार नाही गं..’ ‘ठिक आहे बाळा, माणूस न पाहिल्याने तुला आता पश्चाताप होणार नाही..’ समाज माध्यमांवर सध्या व्हायरल होणारी ही भावनिक पोष्ट. पोटात असलेले हत्तीचे पिलू तिच्या मातेशी संवाद साधत असल्याचा कल्पनाविलास. मानवतेला काळीमा फासणार्‍या केरळच्या घटनेने संपूर्ण भारतच नव्हे तर जग हळहळले. एका गर्भार हत्तीणीचा फटाके भरलेले अननस खाऊ घातल्याने मृत्यू झाला. स्फोटकांमुळे या हत्तीणीला इतक्या वेदना झाल्या की ती तीन दिवस वेलियार नदीत उभी होती. मदतीसाठी आलेेले पथक तिच्यापर्यंत पोहोचू शकले नाही. या हत्तीणीने सोंड आणि तोंड पूर्णवेळ पाण्यात बुडवून ठेवले होते. या हत्तीणीचा पाण्यात तरंगणारा मृतदेह मानवतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय.

निलंबूर येथील वन्य अधिकारी मोहन कृष्णन यांनी हा प्रकार समाज माध्यमांवर शेअर केला. ‘या घटनेने पुन्हा एकदा आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे का, याचा विचार नक्की करण्यास भाग पाडले आहे. अन्नाच्या शोधात ती गावापाशी आली. मनुष्याच्या स्वार्थी वृत्तीचा अनुभव येईल असे तिला वाटलेही नव्हते. गर्भवती असल्याने मनुष्य दया दाखवेल, असे तिला वाटले. त्यामुळे तिने त्या लोकांवर आंधळा विश्वास दाखवला आणि ते अननस खाल्ले. तिच्या डोक्यात फक्त पोटातील बाळाचा विचार होता.’ मोहन कृष्णन यांची ही पोष्ट वाचून अनेकांचे डोळे पाणावले. गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूची दखल आता केंद्र सरकारनेदेखील घेतली आहे. केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

पण खरे तर अशा प्रकारची क्रूरता एकाच घटनेतून समोर आली असे नव्हे. काही दिवसांपूर्वीच कुत्र्याचे चारही पाय बांधून त्याला नदीपात्रात फेकणार्‍यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याआधी कुत्र्याला गच्चीवरून खाली भिरकवतानाचा व्हिडिओ आला. गाढवाच्या शेपटीला फटाके बांधून त्याची केविलवाणी धडपड ‘एन्जॉय’ करणारी मंडळीही आपण पाहिली. डुकराचे हाल करून त्याला मारणार्‍यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात आले. पाण्याच्या हौदात विष टाकून वन्य प्राण्यांची हत्या करण्याचा प्रकारही गेल्यावर्षी जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये झाला होता. घटना कुणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून रातोरात जेसीबी यंत्राद्वारे खड्डा खोदून मृतदेह जमिनीत गाडून टाकले. अशा घटना घडल्यानंतर त्यावर काही दिवसांसाठी हळहळ व्यक्त करण्यात येते. दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई देखील होते; पण तरीही घटनांचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. प्रत्येक घटनेत प्राणी हत्या क्रूरतेची परिसीमा गाठलेली असते. केरळच्या घटनेनंतर आता चक्क घटनेच्या समर्थन करणार्‍याही पोष्ट व्हायरल होत आहे. अशा घटनांचे समर्थन होणार असेल तर भारतात प्राण्यांना जगण्याचा अधिकारच नाही असा अर्थ काढता येईल. मुळात कोणताही कायदा हा मानवासाठी तयार केलेला असतो.

प्राण्यांचे स्वत:चे कायदे वेगळे आहेत आणि ते त्यानुसार वर्तन करीत असतात. या निसर्गदत्त कायद्याला नाकारुन मानव स्वनिर्मित कायदा प्राण्यांवर लादू पाहत आहे. केरळमध्ये शेतीचे नुकसान करणार्‍या हत्तींचे दाखले देऊन तेथे अशा उपद्रवी हत्तींना मारणे गरजेचे असल्याचे मत आता काहींकडून व्यक्त केले जात आहे. असेच दाखले कुत्रे, माकडे, मांजरी यांच्याबाबतीतही दिले जातात. त्यांच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्याचे काम माणूस करतोय. म्हणजेच जो हक्क मानवाला निसर्गाने दिलेला नाही त्याचाही वापर माणूस करतोय. त्यातून प्राण्यांच्या हत्या करण्याचे क्रूर प्रकार वाढले आहे. खरे तर आपल्या देशात प्राण्यांविषयी असलेल्या क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० मध्ये मोठे बदल करणे आता क्रमप्राप्त झाले आहे. प्राण्यांची हत्या करून जर २०, ५० किंवा १०० रुपये इतका अत्यल्प दंड भरावा लागणार असेल तर असा पोकळ कायदा प्राणी हत्या करण्यापासून एखाद्याला कसा काय रोखू शकेल? प्राण्यांविरोधातील क्रूरता, हिंसाचार रोखायचा असेल तर सरकारने या कायद्यांतर्गतची शिक्षा कठोरात कठोर करावी लागणार आहे. शिवाय मानवालाही आता आपली भूमिका ठरवावी लागणार आहे.

- Advertisement -

भूतदया केवळ पाळीव प्राण्यांविषयी किंवा गोंडस दिसणार्‍या प्राण्यांविषयी बाळगून चालणार नाही. हत्ती, कुत्रे, मांजरी मारण्याच्या घटनांवर ज्याप्रमाणे हळहळ व्यक्त केली जाते, त्याचप्रमाणे डुक्कर, साप, तरस आणि अन्य प्राण्यांच्या बाबतीतही भूतदया दाखवणे गरजेचे आहे. उंदीर मारण्याच्या औषधाने खारी मेल्या तर आपण अश्रू ढाळतो. उंदीर मेल्यावर मात्र आपण आनंदोत्सव साजरा करतो. नॉनव्हेज प्रेमीही समाज माध्यमांवर व्हायरल होणार्‍या व्हिडिआेंनी अस्वस्थता दर्शवतात. एकीकडे प्राण्यांना मारून त्यांचा आहार म्हणून वापर करायचा आणि दुसरीकडे याच मंडळींनी जगभरातील हत्यांचा निषेध करायचा. हा कुठला न्याय? पिकांचे नुकसान करणार्‍या डुकरांना नेहमीच अतिशय क्रूरतेने मारले जाते. त्यांचे मांस शेतात टांगले जाते, जेणेकरुन त्या वासाने अन्य डुकरे शेतात येणार नाहीत. पण त्यावेळी अनेकांमधील प्राणी प्रेम आटलेले दिसते. अशा ढोंगी भूतदयेपोटी कायद्यांची कठोर अमलबजावणी होणे कठीण होऊन बसते.

मुक्या जीवांना मारून आनंद साजरा करणार्‍यांची विकृती समूळ नष्ट करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मानवी गरजांसाठी प्राणी मारण्याचे प्रकारही थांबणे तितकेच गरजेचे आहे. आज हत्तीची शिकार होते ती हस्तीदंतासाठी. त्याच्या कातडीचाही वापर होतो. त्यातून हत्यांचे उदात्तीकरण होते. देशात २०१७ मध्ये झालेल्या वन्यप्राणी गणनेत तब्बल २७ हजार ३१२ हत्ती आढळले. जगभरातील हत्तींच्या संख्येशी तुलना केल्यास हे प्रमाण तब्बल ५५ टक्के आहे. याच गणनेत ओडिशामधील हत्तींची संख्या एक हजार ९७६ एवढी नोंदवण्यात आली होती, मात्र आज वाढता मानवी हस्तक्षेप या गजवैभवापुढे न पेलणारे आव्हान बनून उभा ठाकला आहे. हे आव्हान एवढे महाकाय आहे, की त्यापुढे हे अवाढव्य जीवही हतबल झाले आहेत. हत्तीच्या शिकारीचा हव्यास केवळ हस्तिदंतांपुरताच सीमित राहिलेला नाही. हत्तींचा अधिवास असलेली वनंच रेल्वे मार्गानी दुभागून टाकली आहेत.

आपल्याच घरात निर्धास्तपणे विहार करणारे हत्तींचे कळपच्या कळप धडाडत जाणार्‍या रेल्वेपुढे मान टाकू लागले आहेत. कधी लोंबकळणार्‍या किंवा उघड्या पडलेल्या विजेच्या तारांचा स्पर्श होऊन गजराज बळी पडत आहेत. कधी विषबाधेमुळे, तर कधी चक्क नेहमीच्या वाटेत अचानक आडवी आलेली भिंत पाडण्याच्या प्रयत्नात हत्ती मृत्युमुखी पडू लागले आहेत. गेल्या पाच वर्षांत ओडिशात ३५३ हत्ती मृत्युमुखी पडले. त्यापैकी बहुतेकांच्या मृत्यूमागे मानवनिर्मित कारणेच होती. ओडिशातील हत्ती मृत्यूची वार्षिक सरासरी ७० झाली आहे. अशा भयान परिस्थितीत आता हत्ती वाचवण्यासाठी स्वतंत्र मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. केवळ हत्तीच नाही तर इतर प्राण्यांच्या संवर्धनासाठी आता उपाययोजना कराव्या लागणार आहेत. अन्यथा कधी माणसाच्या क्रूर वर्तनातून तर कधी मानवनिर्मित व्यवस्थेतून ते मरतील. अशा वेळी समाज माध्यमांवर भावनिक संदेश पाठविण्याशिवाय आपल्या हाती काहीही उरणार नाही, इतकेच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -