लक्षवेधक ‘अनन्या’ !

मराठी नाटक गुजराथी, हिंदीमध्ये अवतरताना मराठी लेखकाच्या कलाकृतीवर हिंदी व गुजराथी लेखक आपल्या शैलीने हिंदी, गुजराथी प्रेक्षकांची आवड बघून नवे हिंदी-गुजराथीरूप लिहितात. हिंदीतही बरेचदा तेच होते. ‘अनन्या’ थाटामाटात, दिमाखात हिंदी रंगभूमीवर अवतरलं आहे. हिंदी ‘अनन्या’ प्रताप फडनं स्वतःच लिहून दिग्दर्शित केले आहे. ही बाब निश्चित कौतुकास्पद आहे. हिंदीमध्ये ‘श्वेता गुलाटी’ या अभिनेत्रीने ‘अनन्या’ साकारलं आहे. तिचं खूप कौतुक होत आहे.

Mumbai

मराठी रंगभूमीवर नुकतेच ‘महारथी’ नावाचे नाटक अवतरलं आहे. हे नाटक मुळचे गुजराथी रंगभूमीवरचे. प्रगल्भ-लोकप्रिय गुजराथी लेखक उत्तम गडा यांचे लेखन तर गुजराथी नाट्यक्षेत्र व हिंदी मालिका, चित्रपट नाटकांतला अभिनयसम्राट परेश रावल यांची जबरदस्त भूमिका हे त्याकाळी-सुमारे तीन दशकांपूर्वी गाजलेले समीकरण… हे नाटक मराठी रंगभूमीवर येत असतानाच मला ‘बहुभाषी मुंबई’ च्या गुजराथी-हिंदी-इंग्रजी रंगभूमीवर सध्या काय सुरू आहे याचे कुतुहूल वाटले… हा शोध घेताना सर्वात पहिल्यांदा लक्ष वेधून घेतलं ते ‘अनन्या’ या नाटकाने…

आजच्या पिढीचा जबरदस्त ताकदवर, गुणी प्रगल्भ नाटककार-दिग्दर्शक प्रताप फड यांची मुळची एकांकिका ‘अनन्या’ नावाने मराठीत आली. ऋतुजा बागवेच्या अप्रतिम अभिनयाने हे नाटक फार कमी वेळेत लोकप्रिय व व्यावसायिकदृष्ठ्या ‘हिट्ट’ झाले.मराठी नाटक गुजराथी, हिंदीमध्ये अवतरताना मराठी लेखकाच्या कलाकृतीवर हिंदी व गुजराथी लेखक आपल्या शैलीने हिंदी, गुजराथी प्रेक्षकांची आवड बघून नवे हिंदी-गुजराथीरूप लिहितात. हिंदीतही बरेचदा तेच होते. ‘अनन्या’ थाटामाटात, दिमाखात हिंदी रंगभूमीवर अवतरलं आहे. हिंदी ‘अनन्या’ प्रताप फडनं स्वतःच लिहून दिग्दर्शित केले आहे. ही बाब निश्चित कौतुकास्पद आहे. हिंदीमध्ये ‘श्वेता गुलाटी’ या अभिनेत्रीने ‘अनन्या’ साकारलं आहे. तिचं खूप कौतुक होत आहे.

तर मुळचे ‘लगोरी’ नावाचे गुजराथी नाटक ‘वन्समोहर’ नावाने भरत जाधव आणि ऋतुजा देशमुख या सर्वस्वी नव्या जोडीच्या अभियनाने मराठीत गाजले. आणखी एक सर्वस्वी वेगळी जोडी एका हिंदी नाटकाच्या निमित्ताने एकत्र आली आहे… सदाअत हुसेन मंटो यांच्या ‘एक हाँ’ नाटकाच्या निमित्ताने शेखर सुमन आणि गायिका अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती (तिहेरी भूमिकेत) ही नवी जोडी जमली आहे. या नाटकाने सर्वत्र कुतुहूल निर्माण केले आहे.

मराठी नाटक, मालिका, चित्रपट माध्यमातले अनेक गुणी, लोकप्रिय कलाकार मराठी व्यतिरिक्त गुजराथी, हिंदी, इंग्रजी रंगभूमीवर आपल्या अभिनयाने वेगळं स्थान निर्माण करताना दिसतात… मराठीतली सुप्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे ‘मोगले आझम’ या महानाट्यात अभिनेत्री म्हणून अलीकडे गाजली आहे, तर केदार शिंदे लिखित ‘राजा-राम रधम’ (सही रे सही) या हिंदी नाटकात शरमन जोशीबरोबर अनेक मराठी कलाकार गाजताहेत… या नाटकाने हिंदीमध्येही धमाल उडवली आहे.

सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्ना (होय तिच ती-अक्षय कुमारची बायको आणि डिंपल कपाडिया-राजेश खन्नाची मुलगी) हिच्या ‘सलाम नॉनी आपा’ या पुस्तकावर त्याच नावाचे नाटक सध्या अवतरले आहे. (जिच्या ‘पॅडमॅन’ कथेवर त्याच नावाचा चित्रपट अक्षय कुमारने केला होता) या नाटकाचे दिग्दर्शन लिलिएट दुबे यांनी केलं असून त्यांच्यासह आपल्या यतीन कार्येकरने त्यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

नाट्य, चित्रपट, मालिका क्षेत्रातील दादा अभिनेता नासिरुद्दीन शहा यांच्या मॉटली या नाट्य संस्थेने चाळीस वर्षे पूर्ण केली आहेत. सदाअत हुसेन, मॉटो, इस्मत चुगताई अशा काही लेखकांच्या हिंदी व इंग्रजी नाटकांमधून रत्ना पाठक शहा, नासिरुद्दीन शहा यांनी जगभर आपला असा एक प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे.‘एपीक गडबड’ या मकरंद देशपांडे लिखित-दिग्दर्शित नाटकाने मराठी रंगभूमीवर वेगळं यश मिळवलं. या मकरंद देशपांडेनं हिंदी रंगभूमीवर पन्नास नाटकं आपल्या वेगळ्या शैलीनं लिहून-दिग्दर्शित केली, अभिनित केली.. त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

‘तारे जमीन पर’ या आमिर खानच्या गाजलेल्या चित्रपटातल्या मुख्य भूमिकेमुळे ‘दर्शल साफ्री’ हे नाव घरोघरी पोहचलं आहेच… याच दर्शनच्या दोन पात्री नाटकाने शंभरी साजरी केली आहे. या नाटकामध्ये त्याच्यासोबत अभिषेक पटनाईक यांची भूमिका आहे. पृथ्वी थिएटर नावाची संस्था आणि पृथ्वीराज कपूर म्हणजे एक विद्यापीठच… राज, शम्मी, ऋषी कपूर त्यांच्यासोबत अनेकांनी या विद्यापीठातून शिक्षण घेऊन आपलं करिअर केलं…

पृथ्वी थिएटर्सची ओळख म्हणजे फाळणीवर आधारीत असलेले नाटक ‘दिवार’ होय… इंदरराज आनंद आणि पृथ्वीराज कपूर यांची ही आजही तेवढ्याच तीव्रतेनं काळजात भिडणारी कलाकृती सुनील शानभाग यांनी दिग्दर्शित केली आहे. लेखन प्रभावी असेल तर काळ बदलला तरी नाट्यकृती तेवढ्याच परिणामकतेनं स्वीकारली जाते हेच खरं.

आकर्ष खुराणा हे नाव हिंदी-इंग्रजी नाट्यसृष्टी व चित्रपटक्षेत्रात हळूहळू आपला ठसा उमटवून स्थिरावू लागले आहे. खलिद हुसैनी यांची जगभर ‘बेस्ट सेलर‘ म्हणून गाजलेली ‘द काईट रनर’ याच कादंबरीवर आधारीत त्याच नावाचे नाटक आकर्ष खुराणा घेऊन येत आहे.

मराठी रंगभूमीवर गुजराथी, हिंदी, इंग्रजी रंगभूमीवर नवं-जुनं काय काय चाललंय याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न…

अजितेम जोशी