विश्वाला एकसूत्रात बांधते नाटक

नाटक बघून प्रेक्षकांचे हे म्हणणे होते की ही एक शक्ती आहे जी आमच्या मनापर्यंत पोहोचली ..भारतीय नदी आणि पाण्याविषयी वाचलेल्या पुस्तकांची वास्तविकता अनुभवली.. या नाटकात शेवटी आम्ही प्रेक्षकांना आमच्या सोबत रंगमंचावर सामील करायचो .. आनंदाने आमच्यात मिसळून ते एक व्हायचे.. एक नाटक आमच्यातले बंध जोडत होते.. सगळे भेद दूर होऊन समभाव निर्माण होत होता ...

Mumbai
नाटक

वैश्विक स्वीकार्यतेच्या हुंकारापासून सुरुवात झालेला आमचा कारवा युरोपच्या चार देशात निघाला …युरोपमध्ये एका देशातून दुसर्‍या देशात स्थलांतर .. म्हणजेच एका समृद्धीतून, एका लोक संस्कृतीतून दुसर्‍या समृद्धीत, लोक संस्कृतीत आम्ही प्रवेश करत होतो …भारतातून जर्मनी, जर्मनीतून स्लोव्हेनिया मग तिथून ऑस्ट्रिया, इटली … आणि या प्रवासात आमच्या सोबत होती थिएटर ऑफ रेलेवन्स या तत्वाची प्रकिया जी या प्रवासाला, अनुभवाला आमच्या आत झिरपवत होती..
सहासष्ट दिवसात २९ नाटकांचे प्रयोग आणि २७ कार्यशाळा झाल्या …सुमारे दहा हजार कि.मी.चा प्रवास आणि जवळजवळ 5000 लोकांचा प्रत्यक्ष प्रक्रियेत सहभाग झाला.. विद्यार्थी, शिक्षक, कलाकार, सामान्य जनता यांचा सहभाग होता… छोट्या छोट्या गावापासून मोठ्या शहरापर्यंत, शाळेपासून मोठ्या थिएटरपर्यंत, व्यक्तीपासून ते समुदायापर्यंत आम्ही या तत्वाचा प्रवास केला आणि लोकांमध्ये चेतना पेटवली.

‘ड्रॉप बाय ड्रॉप वॉटर’ या नाटकाच्या पहिल्याच प्रयोगानंतर हॅम्बर्ग येथील लोकांमध्ये ती जागृती निर्माण झाली तिथे पाण्याचे खाजगीकरण करण्यासाठी येणार्‍या एका कंपनीविरोधात तेथील जनतेने या नाटकामुळे प्रेरित होऊन आंदोलन केले आणि खाजगीकरणाच्या विरोधात उभे राहिले. कलेला सीमेचे, भाषेचे बंधन नसते … कलेची एकच भाषा ती म्हणजे माणुसकी .. ही आमची कलात्मक प्रतिबद्धता, आत्मसात केलेले तत्व जाणून घेण्यासाठी युरोपियन उत्सुक होते… याची नोंद ते वेळोवेळी घेत होते .. युरोपियन वर्तमानपत्राच्या माध्यमातून आम्ही पहिल्या पानावर झळकत होतो .. माणुसकीचे तत्व जपणारी कृती आपल्याकडे भारतात पहिल्या पानावर छापली जात नाही. आपल्याकडे मीडिया व्यक्तीची प्रसिद्धी, तिचे पद बघून जागा देते; पण मला स्वतःविषयी अभिमान वाटत होता की तिथे माझ्यातल्या कलात्मक प्रतिबद्धतेची त्यांनी नोंद घेतली. आमची कलात्मक प्रतिबद्धता आणि भारतीय नाट्यकलेतील व्यापकता त्यांना जाणवली त्याबद्दल त्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. जो पुरोगामी म्हणवणार्‍या भारतीय रंगकला जगतात अभावाने आढळतो ..

जर्मनीमधील शाळा अप्रतिम होत्या … त्यांचे वर्ग, हॉल, इनडोअर, आऊटडोअर खेळांची मैदाने, तेथील रंगमंच, lights, जेवणासाठी खास बांधलेले मोठे प्रशस्त हॉल, कॅन्टीन, जेवणासाठी तयार असलेले पौष्टिक पदार्थ …तेथील लहान मुलांची एक गोष्ट माझ्या लक्षात राहिली ती म्हणजे जेवण झाल्यावर आपापली ताटे धुण्याच्या ठिकाणी नेणे आणि फडके व पाणी घेऊन टेबल साफ करणे हे ते स्वतः करत होते ..स्वावलंबी बनत होते. लहान मुलांचे शिबीर म्हणजे मोठी जबाबदारी होती .. कारण लहान मुलांना गुंतवून ठेवणे आणि त्यांना सतत नवीन देणे यात कसरत होत होती..त्यात एक लहान मुलगा होता ‘निकितान’ नावाचा .. प्रचंड मस्तीखोर.. एका जागी बसेचना. मंजुल सर म्हणाले, त्याला त्याच्या मर्जीने राहू दे, बळजबरीने शिकवण्यापेक्षा मुलांच्या कलेने घेणे गरजेचे आहे .. त्यांना मोकळीक आणि space देणे जरुरी आहे .. आपण दिलेली मोकळीक आणि space ची जाणीव त्यांना मजबूत करते..

मुलांसाठी शिबीर घेताना मुलांमध्ये झालेल्या परिवर्तनाला बघून तिथल्या शिक्षकांनी त्यांच्या स्वतःसाठी शिबीर घेण्याची इच्छा जाहीर केली ..त्यांचे प्रश्न होते की कठीण विद्यार्थ्याला कसे हाताळावे ? कुठले तंत्र, पद्धती, सूत्र वापरू शकतो ? प्रत्येक विद्यार्थी हा वेगळ्या मानसिकतेचा, वेगळ्या पार्श्वभूमीचा, वेगळ्या विचारांचा असतो आणि आमच्यासाठी तर आम्ही वेगळ्या खंडात होतो हे आव्हान होते.. मंजुल सरांनी एका विद्यार्थिनीला उभे केले आणि शिक्षकांना सांगितले की, “हिला तुमच्या मनासारखा आकार द्या” .. आणि त्या विद्यार्थिनीला सांगितले की, “यांचे अजिबात ऐकू नको” .. शिक्षकांनी त्यांच्या मनासारखे आकार देण्याचे खूप प्रयत्न केले पण जमले नाही .. यावरून हे समजले की विद्यार्थी म्हणजे नुसते दगड किंवा वस्तू नसतात जे केवळ शिक्षकांच्या विचारांनी चालतील.. त्यांना वेगळे व्यक्तिमत्व असते .. त्यांना गृहीत धरणे चुकीचं आहे… आपल्या विचारांशी त्यांच्या विचार प्रवाहाशी जोडून नीतीगत दिशा दाखवणे शिक्षकांचे काम असते .. आदेश देण्यापेक्षा विद्यार्थ्यांशी जुळवून घेणे, मनाने नाते जोडणे, विश्वास निर्माण होणे जरुरी आहे .. विद्यार्थ्यांचा हा विश्वास असतो की शिक्षक त्याच्यासाठी नेहमी चांगलाच विचार करतो .. विद्यार्थी वस्तू नसून माणूस आहे ..त्यांच्या स्वतःच्या कल्पनेत उंच भरारी घेण्याची शक्ती त्यांच्यात असते .. ती शक्ती वाढवणे चांगल्या शिक्षकांनाच जमू शकते .. सुरक्षित स्पर्शाची भाषा विद्यार्थ्यांना कळते ..सुरक्षित वातावरणात विद्यार्थी कधी प्रश्नोत्तरे, कधी संवाद-विवाद तर कधी खेळून नवीन प्रयोग करतात … शिक्षकाची भूमिका नेहमी ‘मला’ हे करायचे आहे विद्यार्थ्याला हे दाखवायचे, शिकवायचे आहे, विद्यार्थ्याने असे करावे अशी असते .. पण खरा शिक्षक ‘मला’ हा शब्द न वापरता ‘आपल्याला’ काय शिकायचे आहे या प्रक्रियेला पाहतो.. शिकणे आणि शिकवणे हे दोन्ही बाजूने सुरू असते ..शिक्षकांच्या मानसिकतेला, स्पंदनांना त्यांच्या तणावाला विद्यार्थी अचूक पकडतात.. शिस्तीच्या नावाखाली कधी कधी बुद्धीला बंद केले जाते … इकडे तिकडे बघू नका, बोलू नका, प्रश्न विचारू नका यामुळे त्यांच्या जिज्ञासेला आपण मारतो … शिकणे ही विद्यार्थ्याची जबाबदारी आहे हे त्यांना जाणीव करून देणे गरजेचे आहे…शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या भूमिकेत जाऊन ते कसे शिकतात हे पाहणे गरजेचे आहे .. विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून मुलांच्या सकारात्मक ऊर्जेला दिशा देणे शिक्षकांवर असते..

नाटक बघून प्रेक्षकांचे हे म्हणणे होते की ही एक शक्ती आहे जी आमच्या मनापर्यंत पोहोचली ..भारतीय नदी आणि पाण्याविषयी वाचलेल्या पुस्तकांची वास्तविकता अनुभवली.. या नाटकात शेवटी आम्ही प्रेक्षकांना आमच्या सोबत रंगमंचावर सामील करायचो .. आनंदाने आमच्यात मिसळून ते एक व्हायचे.. एक नाटक आमच्यातले बंध जोडत होते.. सगळे भेद दूर होऊन समभाव निर्माण होत होता …

प्रत्येक प्रक्रिया तत्वाने सुरू होते मग प्रयोग असो किंवा कार्यशाळा.. त्या तत्वाला ध्येयाची जोड असणे महत्त्वाचे .. या प्रवासात माझ्या देशाबद्दल भारताबद्दल कुतूहल अजून वाढले.. परदेशात जाऊन आपल्या देशाला त्रयस्थ म्हणून बघण्याची दृष्टी लाभली.. काय पुढे न्यायचे, काय बदलायचे याचा अंदाज आला…

एक नाटक, एक विचार, एक परिवर्तन हेच आमच्या कलात्मक साधनेचे ध्येय आमच्या भरारीसाठी प्रेरित करते .. आणि या विश्वाला एकसूत्रात बांधण्यासाठी प्रोत्साहित करते. रंगभूमी मग ती माझ्या मातीतली असो किंवा संसाधन संपन्न युरोपमधील असो ती माझ्यातल्या कलाकारामध्ये माणुसकीचे बीज रोवते आणि प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात, विचारात अंकुरित होऊन या विश्वाला माणुसकीचे नंदनवन बनवते…

– अश्विनी नांदेडकर (रंगकर्मीं)