रेडिओथेरेपीचे दुष्परिणाम आयुर्वेदाच्या नियंत्रणात !

मुख व गलभागाच्या कॅन्सरमध्ये आधुनिक वैद्यकशास्त्रात शस्त्रकर्म, रेडिओथेरॅपी, केमोथेरॅपी या प्रचलित चिकित्सापद्धती आहेत. यात रेडिओथेरॅपी ही महत्वपूर्ण चिकित्सा आहे. केमोथेरॅपीपेक्षा रेडिओथेरॅपीचे दुष्परिणाम कमी असले तरी मुख व गलभागाच्या कॅन्सरमध्ये तोंडाच्या आतील नाजूक त्वचेचा क्षोभ होतो. त्यामुळे रेडिओथेरॅपीच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी समन्वयात्मक आयुर्वेदिक चिकित्सा हितकारक ठरते.

Mumbai
रेडिओथेरॅपीचे दुष्परिण

२००३ साली ७० वर्षांच्या मोरे आजोबांना वरचेवर तोंड येणे, घशात जळजळ होणे, आवाज बसणे ही लक्षणे २-३ महिन्यांपासून जाणवत होती. हळूहळू त्यांना पाणी गिळण्यासही त्रास होऊ लागला. डी. एल्. स्कोपी व बायॉप्सी केली असता घशातील झ्ब्ठ्ठग्ट्टदठ्ठस् ट्टदछछ या भागातील तिसर्‍या ग्रेड व चौथ्या स्टेजमधील कॅन्सरचे निदान निश्चित झाले. निर्व्यसनी मोरे आजोबा व त्यांच्या कुटुंबियांसाठी हा मोठा धक्का होता.

मोरे आजोबांचा आयुर्वेदावर गाढा विश्वास होता. त्यामुळेच त्यांनी व त्यांच्या परिवाराने आधुनिक वैद्यकीय चिकित्सा व आयुर्वेद अशी समन्वयात्मक चिकित्सा घेण्याचे ठरविले. यासाठी मोरे आजोबांनी इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट व रिसर्च सेंटर, वाघोलीच्या मुंबई केंद्रात रेडिओथेरेपी सुरु करण्यापूर्वीच आयुर्वेदिक चिकित्सा सुरू केली. परिणामी त्यांना रेडिओथेरेपीचे तीव्र दुष्परिणामही जाणवले नाहीत. मोरे काकांनी पुढेही नियमित आयुर्वेदिक चिकित्सा घेणे चालू ठेवले. यामुळेे पुढे १० वर्षे मोरे काकांना कॅन्सरचा पुनरूद्भव झाला नाही. मोरे काकांचे निधन २०१४ साली झाले, पण कॅन्सरमुळे नाही तर हृदयविकाराच्या धक्क्याने !

मुख व गलभागाच्या कॅन्सरमध्ये आधुनिक वैद्यकशास्त्रात शस्त्रकर्म, रेडिओथेरॅपी, केमोथेरॅपी या प्रचलित चिकित्सापद्धती आहेत. यात रेडिओथेरेपी ही महत्वपूर्ण चिकित्सा आहे. केमोथेरॅपीपेक्षा रेडिओथेरेपीचे दुष्परिणाम कमी असले तरी मुख व गलभागाच्या कॅन्सरमध्ये तोंडाच्या आतील नाजूक त्वचेचा क्षोभ होत असल्याने रेडिओथेरेपीच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी समन्वयात्मक आयुर्वेदिक चिकित्सा हितकर ठरते.

आयुर्वेदानुसार मुख व गलभागाच्या कॅन्सरमध्ये पित्त व रक्तदुष्टीजन्य लक्षणे अधिक प्रमाणात आढळतात. यासाठी पित्तशमन व रक्तदुष्टी नष्ट करणारी गोड (मधूर) व कडू (तिक्त) चवीची, शीत गुणाची तसेच वाताच्या रुक्षगुणाचे शमन करणारी स्निग्ध गुणाची औषधे तसेच आहार या अवस्थेत उपयुक्त ठरतो. यासाठी जेष्ठीमध किंवा अडुळसा सिध्द तूप तसेच शतावरी कल्प, गुलकंद यांचा लाभ होतो. या काळात तोंडात व्रण झाल्यामुळे तसेच तोंडाला कोरडेपणा आल्याने रुग्णांना तोंड पूर्णत: उघडणे त्रासदायक असते. त्यामुळे तोंडाची स्वच्छता राखणे अवघड होते. अशावेळी आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी कडुनिंब, त्रिफळा यांच्या वस्त्रगाळ चूर्णाने दंतमंजन करावे किंवा त्रिफळा काढ्याने गुळण्या कराव्या. यामुळे तोंडातील कफाचा चिकटा कमी होतो. दिवसातून २ ते ३ वेळा अवस्थेनुसार जेष्ठीमध सिध्द तूप, जात्यादि तेल किंवा इरिमेदादि तेल रुग्णाने स्वत:च्या बोटाने संपूर्ण तोंडाच्या आतील बाजूस हळूवारपणे लावावे, मात्र बोटाची नखे वाढली नाहीत याची खात्री करुनच ! नियमितपणे गाईच्या तूपाचे २ ते ३ थेंब दोन्ही नाकपुड्यांत सोडल्यास रेडिएशनमुळे मानेच्या स्नायू शिरांवर येणारा ताण व रुक्षता कमी होते तसेच झोपही चांगली लागते.

रेडिएशनमुळे तोंडाची चव जाणे, तोंड येणे, तोंडात कोरडेपणा निर्माण होणे अशी लक्षणे दिसत असल्याने भाजी-पोळी-वरण-भात असा नेहमीचा घन आहार सेवन करणे अनेक रुग्णांना अशक्य होते. अशावेळी पचनास हलका, पोषक परंतु किंचित जाडसर असा द्रवाहार रुग्णाला देणे हितकर ठरते. सकाळी उठल्यावर रुग्णास १ चमचा मध व १ चिमूट हळद असे मिश्रण चाटवावे. सकाळच्या नाश्त्यात भाताची पेज,रव्याची पेज, नाचणीचे सत्व, गव्हाचे सत्व, दलियाची खीर, शिंगाड्याची खीर, आरारुटची पेज, साळीच्या लाह्यांचे सूप यांचा समावेश असावा. दुपारच्या व रात्रीच्या जेवणात मूगाचे कढण, तांदूळाची पेज, मूगाची तूप घातलेली पातळ खिचडी, बीट-गाजर-मूळा-दूधी-पडवळ-फरसवी-घेवडा यासारख्या भाज्यांचे सूप, मूगाचे पीठ लावलेली ताकाची कढी, गोड ताजे ताक, कोकमाचे सार असा किंचित कोमट द्रवाहार असावा.

सायंकाळी ताज्या व गोड फळांचा रस १ चिमूट सुंठ पावडर घालून द्यावा. पिण्यास उकळलेले किंचित कोमट पाणी असावे.
रेडिओथेरॅपी संपल्यावर पुढील काही काळ तोंड कोरडे पडणे, तोंड उघडण्यास त्रास होणे, तोंडास चव न जाणवणे असे दुष्परिणाम रहातात. अशावेळी आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने औषधी तेलाचे अथवा तुपाचे गुदमार्गाने एनिमा (बस्ति), नाकात औषधी तेल, तूप सोडणे (नस्य), कानात तेल घालणे (कर्णपूरण), डोक्यावर तेलाची धारा सोडणे (शिरोधारा), गुळण्या (गंडूष), तोंडाला आतून औषधी तेल अथवा तूप लावणे (प्रतिसारण) या उपचारांचा निश्चितच लाभ होतो.

मुख व गलभागाच्या कॅन्सरचा पुनरुद्भव होऊ नये म्हणून त्रिफळा चूर्ण, सूक्ष्म त्रिफळा, च्यवनप्राश, औषधी सिद्ध तूप अशा त्रिदोषशामक व रसायन औषधांचे दीर्घकाळ सेवन उपयुक्त ठरते.

याशिवाय कॅन्सर चिकित्सेतील महत्वाचा भाग म्हणजे समुपदेशन. मुखाचा व गलभागाचा कॅन्सर झाल्यावर खाणे-पिणे व बोलणे या महत्वाच्या क्रियांवरच बंधने आल्यामुळे रुग्ण मनाने खचून गेेलेले असतात. काहीवेळा शस्त्रकर्मामुळे बाह्यरूपावरही परिणाम होतो. त्यामुळे रुग्ण समाजात मिसळण्याचे टाळतात. अशावेळी एकटेपणा वाढल्याने नैराश्य अधिक प्रमाणात येते. म्हणूनच या आजारावर मात केलेल्या रुग्णांशी त्यांचा संवाद घडवून त्यांचा आत्मविश्वास वाढवावा. रुग्णांत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करावा. यामुळे चिकित्सेस अधिक चांगला प्रतिसाद मिळतो.

-वैद्य स. प्र. सरदेशमुख