घरफिचर्सदिनविशेष : राजाराम मोहन रॉय; आधुनिक भारताचे जनक

दिनविशेष : राजाराम मोहन रॉय; आधुनिक भारताचे जनक

Subscribe

थोर समाजसुधारक, पत्रकार आणि आधुनिक भारताचे जनक राजाराम मोहन रॉय यांचा आज जन्मदिन. ब्राम्हो समाजाचे संस्थापक, भारतीय प्रादेशिक भाषांमधील प्रेसचे संस्थापक म्हणून राजाराम मोहन रॉय ओळखले जातात. २२ मे १७७२ रोजी बंगालमधील एका ब्राह्मण कुटुंबात राजाराम मोहन रॉय यांचा जन्म झाला. वयाच्या १५ व्या वर्षापर्यंत त्यांनी बंगाली, संस्कृत, अरबी आणि फारसी भाषेवर प्रभुत्व मिळविले होते. किशोरवयीन असताना राजाराम मोहन रॉय यांनी खूप प्रवास केला. विशेष म्हणजे १८०३ ते १८१४ या कालावधीत त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीसाठी काम केले. मात्र, राष्ट्रप्रेमाखातर त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या कामावर पाणी सोडले आणि स्वतःला देशहिताच्या कामासाठी वाहून घेतले. त्यांनी केवळ भारताच्या स्वातंत्र्यासाठीच नव्हे तर सामाजिक स्वास्थ्यासाठीही कार्य केले.

तत्कालीन सामाजिक कुप्रथांच्या विरोधात त्यांनी आवाज उठविला. यामध्ये बालविवाह, सती प्रथा, जातीवाद, कर्मकांड, पडदा पद्धत आदी कुप्रथांविरोधात राजाराम मोहन रॉय यांनी आवाज उठवला. सती प्रथेसारख्या सामाजिक कुप्रथेच्या उच्चाटनात राजाराम मोहन रॉय यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. संवाद कौमुदी, बंगदूत आणि मीरत-उल-अखबार सारख्या वर्तमानपत्रांचे त्यांनी संपादन केले. राजाराम मोहन रॉय संपादित करत असलेले बंगदूत या सर्वांमध्ये थोडे वेगळे होते. बंगदूतमध्ये बंगाली भाषेसह हिंदी आणि फारसी भाषेचाही वापर होत असे. आपल्या वर्तमानपत्र, नियतकालिकांमधून त्यांनी तत्कालीन सामाजिक कुप्रथा, चालीरितींवर सडकून टीका केली. त्यामुळे समाजातील कुप्रथांचे उच्चाटन होऊन देशातील नागरिकांना राहणीमानाचा दर्जा सुधारण्यात मोठी मदत मिळाली. त्याकाळी वर्तमानपत्रात छापण्यात येणार्‍या मजकुरावर ब्रिटिश सरकारचे बारीक लक्ष असे.

- Advertisement -

वर्तमानपत्र, नियतकालिकांमध्ये छापण्यात येणारा मजकूर ब्रिटिश सरकराच्या डोळ्यांखालून जाणे बंधनकारक असे. ब्रिटिश सरकारच्या या धोरणाचा राजाराम मोहन रॉय यांनी निषेध केला. त्यांच्या मते वर्तमानपत्रांनी नेहमीच सत्याचा पुकार केला पाहिजे. केवळ सरकारला वर्तमानपत्रातील मजकूर आवडला नाही म्हणून तो मजकूर प्रसिद्ध करू नये, या ब्रिटिश सरकारच्या धोरणाचा त्यांनी कडाडून विरोघ केला. राजाराम मोहन रॉय यांनी भारतीय शिक्षण क्षेत्रातही मोलाची कामगिरी बजावली. भारतीयांना आधुनिक शिक्षणाचे धडे गिरवता यावेत यासाठी त्यांनी देशात इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या. वर्ष १८१७ मध्ये कलकत्तामध्ये (कोलकाता) पहिले हिंदू महाविद्यालय स्थापन करून राजाराम मोहन रॉय यांनी भारतीय शिक्षण क्षेत्रात क्रांतीकारक पाऊल टाकले. राजाराम मोहन रॉय यांनी भारतीय शाळांमध्ये विज्ञान विषयाच्या प्रसारार्थ कार्य केले. त्यासाठी त्यांनी भारतीय महाविद्यालय, शाळांमध्ये गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र सारख्या विषयांना शिकविण्यात यावे यासाठी प्रयत्न केले.

एवढ्यावरच न थांबता शाळा आणि महाविद्यालयांत तंत्रज्ञान आणि इंग्रजी विषयांना प्राधान्य देण्यात यावे असा अट्टाहासही राजाराम मोहन रॉय यांचा असे. तत्कालीन भारतीय समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देत, समाजातील कुप्रथांचे उच्चाटन करत आधुनिक भारताचे स्वप्न पाहिलेले थोर समाजसुधारक राजाराम मोहन रॉय यांचा २७ सप्टेंबर १८३३ रोजी ब्रिस्टोल येथे मृत्यू झाला. आज त्यांच्यासारख्याच समाजसुधारकांमुळे आपण आधुनिक शिक्षणाचे धडे गिरवत आहोत. मात्र, आजही भारतीय समाज कुप्रथांना बळी पडत आहे. राजाराम मोहन रॉय यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करून त्यांनी समाजाला दिलेल्या शिकवणीचे आचरण करूया. समाजातील कुप्रथांना तिलांजली वाहूया.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -