घरफिचर्सबन बन आज फुली बसंत बहार!

बन बन आज फुली बसंत बहार!

Subscribe

मृण्मयी परचुरे

ट्युलिप गार्डनमधील अविस्मरणीय फेरफटका

- Advertisement -

गेल्या आठवड्यात नेदरलँडच्या ट्युलिप गार्डन्सच्या लीस गावात दरवर्षी होणारी फ्लॉवर परेड पार पडली. अनेक मित्रमैत्रिणींनी फोटो टाकले होते आणि मला आमची गेल्या वर्षीची ट्रिप आठवली. Keukenhof Tulip Gardens या दरवर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालू असतात. ‘सिलसिलाङ्क आणि अजून काही बॉलीवूड चित्रपटांतून आपल्यासारख्या भारतीयांना त्यांची तोंडओळख झालेलीच असते. त्यामुळे या दरम्यान भारतीय पब्लिक भरपूर असतं तिथे. ट्युलिप्स बरोबरच डॅफोडिल्स, हायसिन्थ आणि काही प्रमाणात गुलाब या झाडांचीही त्या गार्डनमध्ये लागवड केलेली आहे. पण ट्युलिप्स जास्त प्रमाणात आहेत. वेगवेगळ्या रंगसंगती, फुलं यांचा फार चांगला वापर करून लागवड केलेली असल्याने डोळ्यांना ते अजुनच सुखद वाटतं. त्याच बरोबर गार्डन मधल्या वेगवेगळ्या हॉल्समध्ये काही छोटी छोटी फुलांशी निगडीतच प्रदर्शनं असतात. एप्रिलच्या साधारण शेवटच्या वीकेंडला म्हणजे जेव्हा सगळी फुलं ऐन बहरात असतात तेव्हा ट्युलिप गार्डन असलेल्या लीस गावातून फ्लॉवर परेड जाते. ती पहायला अनेक लोकं गोळा होतात. पण या परिसरात साधारणपणे या दिवशी फार गर्दी असते. त्यात पुन्हा लोक फुलं पहायच्या ऐवजी सेल्फीज घेण्यात गुंग असतात आणि गर्दी अडवत असतात(बारीक डोळेवाले चिनी आणि कोरियन यात अग्रेसर असतात अगदी!! आणि त्यांच्या जोडीला आपलं देसी पब्लिक असतंच भरभरून!). त्यामुळे पुरेसा वेळ असेल तर ट्युलिप गार्डन आणि फ्लॉवर परेड पाहून झाल्यावर, गार्डनच्या बाहेर सायकल्स भाड्याने मिळतात, त्या घेऊन सरळ लीस गावात चांगला ३-४ तास फेरफटका मारावा या मताची मी आहे(तेवढीच, या झुंबड गर्दीपासून काही वेळ सुटका! ). लांबच्या-लांब पसरलेले ट्युलिपचे मळे, वातावरणात भरून राहिलेला गोडसर वास, सुंदर, नेटके रस्ते-डोळ्यांची पारणं फिटतात अगदी! तुम्हाला अगदी ट्युलिपच्या मळ्यात जाऊन सगळ्याचा आनंद घेता येतो! अक्षरशः वेगवेगळ्या रंगाचे गालिचे जमिनीवर पसरावेत तसं दिसत असतं ते!

sakura by elentori
चेरी-ब्लॉसम्स

चेरी-ब्लॉसम्स जपानचं राष्ट्रीय-फुल

युरोपात साधारण मार्च संपत आलेला असताना हळूहळू वातावरण उष्ण व्हायला लागतं. छान उन्हं पडायला लागतात. हिवाळ्यात सर्व झाडांच्या अक्षरशः काठ्या झालेल्या असतात. पाऊस आणि बर्फाने वातावरण मलूल झालेलं असतं. मार्चच्या शेवटी डे-लाईट-सेविंग सुरू होतं आणि दिवससुद्धा मोठा होऊ लागतो. वसंत ऋतू पृथ्वीवर अवतरतो! मग ट्युलिप, डॅफोडिल्स, हायसिन्थ प्रमाणेच ब्लू बेल्स, लीलीज, गुलाबासारखी फुलं जिकडे- तिकडे दिसायला सुरुवात होते. त्याच बरोबर चेरी-ब्लॉसम्स, आल्मन्ड-ब्लॉसम्स, अॅपल-ब्लॉसम्स आणि मॅग्नोलिया सारख्या झाडांना बहर येऊन सगळी झाडं गुलाबी होतात पूर्णपणे! संपूर्ण झाड नुसतं फुलांनी डवरलेलं असतं. फुलांशिवाय दुसरं काही-काही दिसत नसतं त्यावर! चेरी-ब्लॉसम्स हे खरंतर जपानचं राष्ट्रीय-फुल! जपानमध्ये ज्याला ‘साकुरा’ म्हणतात! १९९० मध्ये जर्मनीच्या एकत्रीकरणाच्या आनंदात जपानने हे झाड भेट म्हणून जर्मनीला दिलं आणि बऱ्याच ठिकाणी त्या झाडाची त्यावेळेला लागवड करण्यात आली म्हणे. बॉन शहरात या चेरी-ब्लॉसम्सचं फेस्टिवल असतं. तिथे एका रस्त्यावर दोन्ही बाजुंनी चेरी-ब्लॉसम्सच्या झाडांची लागवड केलेली आहे. त्यामुळे एप्रिलच्या सुरवातीला, वसंत ऋतू सुरू होतो तेव्हा हा पूर्ण रस्ता गुलाबीच्या विविध छटांनी नटलेला असतो असं ऐकलंय. अजून त्यादरम्यान बॉनमध्ये जायचा योग आलेला नाही! याच सुमारास मग वेगवेगळ्या पक्षांचा किलबिलाट ऐकू येतो. वेगवेगळ्या प्रकारचे किडे बाहेर येतात. नवनिर्मितीचा उत्सवच असतो ना तो!

- Advertisement -
spring in africa
(फोटो प्रातिनिधिक आहे)

आफ्रिकेतील वसंत ऋतू

जसा युरोपमधला वसंत ऋतू रंगीबेरंगी तसा इतरही ठिकाणी असणारच ना! माझ्या इन्स्टाग्रामवरच्या सायली महाजन या चित्रकार मैत्रिणीला साऊथ आफ्रिकेत काही महिने राहण्याची संधी मिळाली होती. तिथला वसंत ऋतू साधारण ऑक्टोबरमध्ये येतो. आपल्या भारतात तर आपल्याला सगळ्या लहान-लहान गोष्टींचासुद्धा उत्सव करण्याची जन्मजातच सवय असते! आणि आपले सण-उत्सव हे सुद्धा निसर्गाच्या जवळ जाणारेच आहेत! हां, आता आपला उष्णकटिबंधीय देश असल्यामुळे, वातावरणात होणारे बदल युरोप इतके पटकन आपल्याकडे लक्षात येत नाहीत. पण हळूहळू बदल तर होतंच असतात ना. दुर्गा भागवतांनी त्यांच्या ‘ऋतुचक्र’ पुस्तकात निसर्गात असे प्रत्येक महिन्यात होणारे बदल इतके सूक्ष्मपणे टिपलेत. मग त्यात फक्त झाडं- फुलं-फळं नाहीत तर किडे, प्राणी, पक्षी, मुंग्या, एवढंच काय चंद्राचा प्रत्येक ऋतूमध्ये बदलणारा शीतलपणा, त्याच्या दिसण्यात होणार बदल याचं काय सुद्धा सुंदर वर्णन आहे! आपल्याकडे गुढी-पाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात करण्याचा मान वसंत ऋतूला दिलाय! वसंत ऋतूची सुरुवात आपल्याकडे युरोपापेक्षा थोडी लवकर, म्हणजे फेब्रुवारीतच होते! आणि संपतो ही लवकर, एप्रिलच्या सुरूवातीला साधारण! वसंतात अमलताश (किंवा ज्याला बहावा सुद्धा म्हणतात), गुलमोहोर बहरतात. आंब्याला मोहोर येऊन त्याचा घमघमाट सुटतो. शेवटी आंब्याच्या मोहोराला युरोपियन स्टाईलमध्ये ‘मँगो ब्लॉसम्सङ्क म्हणता येईल, नाही का? कारण चेरी, आल्मन्ड, अॅपल यांचा फळ धरण्याच्या आधीचा टप्पा म्हणजे ब्लॉसम्स. आपल्याकडचा आंब्याचा मोहोर हा सुद्धा तोच प्रकार आहे ना? त्याच बरोबर शेवरी, पळस, चाफा यांच्यासारखी अनेक फुलं बहरतात. या सगळ्या निसर्गात दिसणाèया रंगांचा उत्सव वसंतात असतो म्हणूनच तर रंगपंचमी सारखा सण याच सुमारास भारतात साजरा करतात.

निसर्ग संस्कृतीत मुरलायं

आपल्याकडचा निसर्ग हा इतका आपल्या संस्कृतीत मुरलायं की आपल्याकडच्या कलांमधूनसुद्धा हे सगळे ऋतू डोकावत असतात. संगीतात प्रत्येक ऋतूचे वर्णन करणारे, त्या ऋतूमध्ये गायले जाणारे असे राग किंवा गीतप्रकार आहेत. म्हणजे आत्ता आपण वसंताबद्दल बोलताना बसंत रागानेच सुरुवात करायला हवी नाही का? राजबिंडा राग आहे हा! तार सप्तकात उंच-उंच गायला जातो! (मी गाण्यातली फार काही जाणकार वगैरे नाही. बेसिक संगीत विशारदपर्यंतच शिक्षण घेतलंय फक्त! पण चांगल्या संगितामधील-रागांमधील भाव कळायला शिक्षण घ्यायला लागत नाही असं माझं मत आहे.) तर आपण बसंत रागाबद्दल बोलत होतो- मी बसंत राग शिकले तेव्हा सुदैवाने तोच ऋतू सुरू होता. हे असं झाल्यामुळे हा राग ना जरा जास्तच लाडका झालाय माझा! होळीचं वर्णन असलेली ‘फगवा ब्रिज देखन को चलो री! ही प्रसिद्ध बंदिश मला आमच्या सरांनी शिकवली होती! तसाच या ऋतूत गायला जाणारा अजून एक महत्त्वाचा राग म्हणजे ‘बहार! खरं तर जर बसंत आणि बहारची शास्त्रीयदृष्ट्या माहिती पाहिली तर दोघांमध्ये लागणारे स्वर खूपच वेगवेगळे आहेत. आहे की नाही गंमत! भारतीय संगीताची हीच तर मजा आहे. अगदी एकूण-एक स्वर सारखे असणारे भूप-देशकार ही रागांची जोडी! मात्र एक राग पहाटे गायला जातो तर एक तिन्हीसांजेला! आणि इथे बसंत आणि बहारमध्ये लागणारे स्वर वेगळे असून सुद्धा मजा अशी की दोन्ही राग एकाच ऋतूत गायले जातात! पण बसंतातला रुबाबदार, तरी विरागीपणा मात्र या बहार रागात नाही! तो वसंताचं चंचल, अवखळ रूप त्याच्या स्वभावातून दाखवतो. पण या दोन्हीचं अगदी एकजीव मिश्रण होऊन बसंत-बहारसारखा सुंदर राग निर्माण झालाच आहे! या अशा रागांप्रमाणेच होरी आणि चैतीसारखे ठुमरीचे गोड प्रकार बसंतात गायले जातात. थोडक्यात काय, तर युरोपमध्ये आल्यावर इथलं ऋतुचक्र ‘मी-मी’ म्हणून माणसाचं लक्ष त्याच्याकडे ओढूनच घेतं! म्हणून त्यातली मजा लक्षात आली आणि मग परत मागे भारताकडे वळून पाहिल्यावर असं जाणवलं की अरे! हे तिथे भारतात सुद्धा हे ऋतुचक्र, हा वसंत ऋतू आजूबाजुच्या निसर्गातून आपलं अस्तित्व का होईना पण जाणवून देत होताच की, आपण सण सुद्धा ऋतुचक्र आहे म्हणूनच साजरे करत होतो! पण रोजच्या कामाच्या धबडग्यात, निसर्गातले ते बदल पाहून न पाहिल्या सारखं करत होतो बहुदा! आजुबाजूच्या माणसांच्या कोलाहलात आपण ते काही समजूनच घेत नव्हतो!

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -