घरफिचर्ससोन्यात जीव गुंतला !

सोन्यात जीव गुंतला !

Subscribe

सोन्याची क्रेझ कमी करण्याचे प्रयत्न होत असले तरी ‘मागणी’ मात्र मोठ्या प्रमाणावर वाढत राहणार आहे. तरुण-पिढी मात्र त्याकडे हळूहळू का होईना एक सकस गुंतवणूक ऑप्शन म्हणून त्याकडे पहात आहे. तुमचे-आमचे सोन्याशी असलेले भावनिक नाते अतूट असेच राहणार आहे, परंतु दागिन्यांचा सोस-हव्यास कमी झाल्यास आपले उत्पन्न सोनेस्वरूपात निद्रिस्त वा गोठलेले राहणार नाही. शिवाय अशा संपत्तीमुळे जीविताची हानी व चोरी होण्याची जोखीम तसेच टांगती तलवार राहणार नाही.

दसर्‍याला आपण नेहमी प्रतीकात्मक सोने लुटतो आणि दिवाळीला दागदागिने खरेदी करून आपण दिवाळ-सण साजरा करतो. ही तर आपली अनेक दशकांची-पिढ्यानपिढ्यांची वैभवशाली परंपरा आहे. आपण काही जुन्या प्रथा परंपरा आपल्या सोयीसाठी मोडल्या आणि वाकवल्या, पण सोन्याबाबतीत आपला ठामपणा हा सदैव चिरंतनच राहिला. सोने या मौल्यवान धातूचा मोह काही आजकालचा नाही, पार रामायण काळापासून सोन्याचे आकर्षण भुलवत राहिलेले आहे. सीतामाईने केलेला सुवर्ण-मृगासाठीचा हट्ट !! आजदेखील पाडवा किंवा बर्थडेच्या निमित्ताने बायका आपल्या पतीकडे सोन्याच्या नवनवीन दागिन्यांचा आग्रह कमी हट्ट धरतात. आणि गृहिणी आपल्या शिलकेतून भिशीतून, तर कमावत्या स्त्रिया आपल्या उत्पन्नातून हवे ते सोनेनाणे खरेदी करतात.

आता केवळ बायकाच नव्हे तर तरुण-मध्यमवयीन पुरुष छानपैकी चेन, अंगठ्या, सोन्याचे कडे घालून मिरवणे पसंद करतात. अशा वातावरणात सरकार किंवा अर्थ-पंडित सोन्याकडे गुंतवणूक साधन म्हणून पहा !! असे जरी सांगत असले तरीदेखील आपण सारे भारतीय सोनेरी विश्वात रमतो. सरकारने खास सुवर्ण रोखे आणले तरी व ते कितीही लाभदायक -मूल्यवर्धक असले तरीही आपला ‘सुवर्ण-हट्ट’ सोडत नाही. यंदाच्या दिवाळीत पुन्हा आपण छान छान दागिने घेणार आहोत, मात्र ‘एक क्षण’ आपण त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहूया.

- Advertisement -

पार्श्वभूमी – जगाच्या पाठीवर डोकावले तर असे लक्षात येते की अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा अनेक देशांत सोने -हिरे यांचा वापर होतो आहे. इजिप्तमध्ये फार पूर्वी म्हणजे सुमारे 5000 वर्षांपूर्वी सोने आणि सोन्याचे दागिने प्रचलित होते. आपल्या देशातही ‘सोने-संस्कृती ’ होतीच. फार पूर्वी सोन्याचा धूर निघत होता अशा दंतकथादेखील ऐकलेल्या आहेत. त्याकाळात आपण सोने निर्यात करत होतो आणि एक्सचेंज करत होतो अशी नोंद आहे. खाणींतून हिरे शोधणारा ‘पहिला देश ’म्हणून आपल्याकडे पाहिले जाते. अगदी प्राचीनकाळी म्हणजे 296 ख्रिस्त पूर्वमध्ये आपण प्रारंभ केला होता.

आजची स्थिती-व्यापार, मागणी आणि निर्यातीकडे एक दृष्टिक्षेप – आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत सोने, हिरे आणि दाग-दागिने यांचा बर्‍यापैकी वाटा आहे जिडीपीमध्ये. जेम्स ज्युवेलरी 7 टक्के आणि निर्यातीत 15 टक्के इतका वाट आहे. शिवाय रोजगार निर्मितीचे साधन म्हणून हे क्षेत्र महत्वाचे आहे.

- Advertisement -

जागतिक आकडेवारी पाहिली तर 2017 मध्ये जगातील दोन नंबरचा ग्राहक-देश म्हणून आपला नंबर लागतो. कारण आजदेखील आपल्याकडे सोन्याला, वेगवेगळ्या दागिन्यांना खूप मागणी आहे. सोन्याची -चांदीची क्रेझ काही कमी होताना दिसत नाही. उलट जसजसे समाजातील मध्यमवर्गीय -उच्चवर्गीय व्यक्तींचे उत्पन्न वाढते, तसतसे दागिने घेण्याची प्रवृत्ती अधिक वाढते. किंबहुना 2025 पर्यंत आपल्या देशातील माध्यम व उच्च मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याने सोने-खरेदी 547 मिलियनने वाढेल असे एका पाहणीत सांगितले गेले आहे. म्हणजेच सोने अंगावर वापरण्याची व मिरवण्याची इच्छादेखील तितकीच वाढेल असे अनुमान आहे. आजदेखील आपण पाहतो की, स्त्रियांना वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने घालायला आवडतात, तसेच पुरुषही काही तोळ्यांचे चेन, अंगठी आणि अन्य आभूषणे घालून मिरवताना दिसत आहेत. अन्य कोणत्याही धातूने इतका मोह निर्माण केलेला नाही, जितका सोन्याने करून ठेवलेला आहे.

सोन्याच्या किमती कितीही वाढल्या तरी जेव्हा सोने-दागिने घ्यावेसे वाटतात किंवा लग्नकार्य निघते तेव्हा खर्चाकडे न पाहता हवा तो दागिना घेतलाच जातो. हीच तर सोन्याची खास अशी खासियत आहे. म्हणून तर आपला देश अन्य असंख्य देशांच्या तुलनेत सर्वाधिक सोने-दागिने खरेदी करतो, सर्वाधिक मागणी करणारे जे काही ठळक देश आहेत, त्यात आपला नंबर टॉप टू मध्ये लागतो. आता ही बाब अभिमान बाळगण्याची आहे की, सोन्याच्याबाबतीत अतिरेक होतो आहे! हे मात्र सोने व्यापारी व अर्थतज्ञच सांगू शकतील. कारण आपण बहुसंख्य नागरिक स्वतःसाठी किंवा कुटुंबातील स्त्रियांसाठी काहीनाकाही निमित्ताने सोने -हिरे अन्य मौल्यवान धातू-खडे खरेदीच करत असतो. अहो, अगदी पितृपक्षातही सोने सहजपणे घेतले जातेपूर्वी तसे नव्हते, नवरात्री किंवा दसर्‍यापासून लगीनसराई आणि सोने खरेदीला सुरवात व्हायची आहे. पण मनोहरराव म्हणतात तसे- जमाना बदल गया है ! हेच खरे !!

सोन्यात गुंतवणूक – तसे पाहिले तर आपल्याकडे गुरुपुष्यामृताच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचा प्रघात आहे. सोन्याचे वळे किंवा नाणे विकत घेतले जाते. एरवी आपला सर्वांचा कल हा दागिने खरेदीचाच असतो. दागिने-आभूषणे घेणे हे आपल्याकडे लक्ष्मीचे व संपत्तीचे प्रतीक असते. घेतलेले सोने म्हणजेच वेगवेगळे दागिने हे जतन करण्यासाठी असतात. ते विकावेत किंवा गहाण ठेवून कर्ज काढावे असा विचार सहसा कोणाच्या मनात येत नाही. कारण आपल्या भावना या धातूमध्ये गुंतलेल्या असतात. एखादा दागिना जुना झाला तरी त्यात भर घालून नवीन डिझाईन करण्याकडे कल असतो. काळ बदलला त्यानुसार नवनवीन प्रकारचे दागिने बाजारात येत असतात, म्हणूनच सोन्याचे आकर्षण पिढानपिढ्याना मोहात पाडत आहे.

बदलत्या काळानुसार आणि अर्थव्यवस्थेच्या गरजेनुरूप ‘सोने’ विशेषतः मंदिरातील सोने ही निद्रिस्त संपत्ती आहे अशी विचारधारा लक्षात घेऊन ते धन प्रवाहित करण्यासाठी काही योजना आल्या. सोने ठेवून कर्ज मिळण्याची सुविधा निर्माण केली गेली. पूर्वी जसे सावकार गोरगरिबांना फसवायचे किंवा सोने हडप करायचे तसे प्रकार कमी झाले व नियंत्रित स्वरूपात सुवर्ण -कर्ज स्कीम्स चालू आहेत.

सोव्हरेन बॉण्ड म्हणजेच सुवर्ण रोखे-आपल्याकडे अनेक प्रकारचे रोखे असतात, परंतु सोने या धातूशी निगडित असा रोखे प्रकार आहे.

वैशिष्ठ्ये –
1) सरकारचे अधिष्ठान लाभलेले हे रोखे दुय्यम बाजारात उपलब्ध असतात
2) या रोख्यांचे मूल्य हे थेट सोन्याच्या वजनाशी -किंमतीशी निगडित असते.
3) प्रत्यक्षात सोने विकत घेणे, सांभाळणे अशी काही जोखीम संभवत नाही, जी अनेकदा धातुरूपातील सोन्याबाबत अनुभवाला येते.
4) नवीन बाजारात आलेला सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड योजनेतील रोखा हा आपल्याला ऑनलाईन पद्धतीने खरेदी करता येतो व तसे केल्याने प्रतिग्रॅम रु पन्नास इतकी सवलतही मिळते.
5) मुदत – 8 वर्षे
6) व्याजदर – 2.5 टक्के -वार्षिक व्याजदराने उत्पन्न मिळू शकते
7) करपात्र आहे, मात्र टीडीएस कापला जात नाही.

असे सुवर्णरोखे कोण विकत घेऊ शकतो-
1) कोणीही व्यक्ती
2) अविभक्त हिंदू कुटुंब
3) धर्मादाय संस्था

अन्य फायदे – अशा रोख्यांचा उपयोग तारण म्हणून करता येतो, त्याकारणाने बँक्स, बिगर बँकिंग कंपन्या यांच्याकडून कर्ज घेण्याची सुविधा मिळू शकते.

सोन्याच्या अन्य काही योजनांशी तुलना केल्यास म्हणजे बाजारात प्रचलित असलेल्या गोल्ड ईटीएफ, गोल्ड फंड्स व अन्य योजना असे लक्षात येते की या प्रकारातील सुवर्ण रोख्यांवर कॅपिटल गेन टॅक्स म्हणजेच ज्याला भांडवली नफा कर म्हणतात तो लावला जात नाही. जर तुम्ही हे रोखे मुदतीच्या कालावधीची पूर्तता होईस्तोवर ठेवलेत, तर तुम्हाला असा कर द्यावा लागत नाही. ही एक खास सवलत म्हणायला हवी, ज्यामुळे तुम्हाला अतिरिक्त कर भरावा लागत नाही. त्याचप्रमाणे जीएसटीसुद्धा लागत नाही. सोन्याचे दागिने, चिप किंवा नाणी खरेदी केल्यास तुम्हाला तीन टक्के जीएसटी द्यावा लागतो. अर्थात हे सर्व फायदे हे सरकारला बॉण्ड प्रकारातून लोकांनी सोन्यात गुंतवणूक करावी या हेतूसाठी दिलेले जणू प्रोत्साहनच आहे. गेली अनेक वर्षे सातत्याने सोने हे केवळ आभूषणे-दागिने खरेदी करण्याचा मौल्यवान धातू आहे, त्याकडे उत्तम उत्पन्न देणारे गुंतवणूक साधन म्हणून बघितले जावे असे सरकारला वाटते. म्हणून तर असे काही मार्ग काढून लोकांची दागिन्यांची हौस कमी करण्याचा एक सर्वसाधारण प्रयत्न केला जातो.

पण अर्थात गेली अनेक दशके की शतके ? चालत आलेली सोन्याबाबतची आसक्ती, समाजातील प्रतिष्ठा आणि सौंदर्यवर्धक अलंकार म्हणून पाहण्याची वृत्ती कायम असल्याने त्याकडे आपण दुसर्‍या कोणत्याच वापराच्या, उपयोगाच्या शक्यतोकडे, विनियोगाच्या दृष्टीने पाहूच शकत नाही. म्हणून तर कागदीरूपात किंवा ऑनलाईन स्वरूपात सोने बाळगणे व त्यावर व्याजरूपी उत्पन्न कमावणे ही संकल्पनाच आपल्या समाजाच्या पचनी पडत नाही. सरकारने कितीही प्रयत्न केले तरी सोन्याबाबतच्या परंपरागत मानसिकतेत आमूलाग्र बदल संभवत नाही. अर्थात म्हणून कोणी असे प्रयत्न करूच नयेत असे काही नाही. सोन्याचे दागिने घालणे ही मानसिकता इतरत्र म्हणजे अन्य देशांतदेखील आहे, पण आपल्याकडे त्याचे प्रमाण अधिक आहे. कारण सोन्याचा दर्जा हा उत्तमच असला पाहिजे, त्यात अशुद्धता, भेसळ व फसवणूक नसावी. बनावटपणाला थारा नसावा. म्हणून सरकारने दागदागिने प्रमाणित करण्यात पुढाकार घेतलेला आहे.

मात्र भेसळ किंवा अशुद्ध धातूचे प्रमाण कमी व्हावे याकरिता हॉलमार्कसारखी दर्जाप्रमाणीत करणारी यंत्रणा आपल्याकडे 2018 पासून अंमलात आलेली आहे. सरकारने जेम्स व जुवेलरी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने पावले टाकलेली आहेत कारण त्यातून निर्यात-वृद्धी अपेक्षित आहे व विदेशी चलनात उत्पन्न मिळू शकेल. म्हणूनच नवी मुंबई इथे ‘जुवेलरी पार्क ’ उभे केले जात आहे याचे मुख्य कारण म्हणजे जुवेलरी निर्यातीत मुंबईचा मोठा वाटा आहे -69 टक्के इतका, म्हणूनच हे मोठे पार्क उभारले जाते आहे. ज्यामुळे आपल्या प्रेशस स्टोन्स व दागिन्यांना जागतिक बाजारपेठेत अव्वल स्थान प्राप्त होईल व आपल्या तिजोरीत ‘परकीय धनाची’ भर पडेल.

धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदीची प्रचंड लगबग असते. आपल्याकडे एखादी गोष्ट परंपरा व प्रथेने बिंबवली की, त्याचा पगडा पिढ्यानपिढ्या चालू राहतो. दिवाळीच्या प्रारंभी म्हणजेच धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदी केलीच पाहिजे, ही जी इमोशनल गुंतवणूक झालेली असते त्यातून सुटका नाही. प्रत्येक घरातली एखादी तरी व्यक्ती भक्तिभावाने चढ्या भावात सोने नाणे/बिस्कीट/वळे /दागिने विकत घेऊन आपले कर्तव्य पार पाडत असतात. अशी भावनिक खरेदी केवळ बायकाच करतात असे नाही, तर अनेक पुरुषही ह्यात सहभागी झालेले दिसतात. परिणामी दरवर्षी ह्याच दिवशी सोने खरेदीचा उच्चांक गाठला जातो. कितीही महागाई असो, बोनस मिळालेला असो की, नसो श्रद्धेने सोने घेतले जाते. मग नाणे, बिस्किटे व आभूषणे यांची अधिक प्रमाणात खरेदी होते.

श्रीमंतांचे तर काय विचारूच नका ! पैसा कुठे ठेवायचा ? आता सरकार कोणत्या नोटा रद्दबातल करेल याची गॅरंटी नसल्याने जागा व सोन्यात पैसे अडकवलेले बरे अशी त्यांची व्यापारी नीती असते. परिणामी दरवर्षी अशा मुहूर्तावर बम्पर सोने खरेदी होते. एका माहितीनुसार गेल्या वर्षी पाचशे किलो सोने विकले गेले होते, तर यंदा किमान चारशे विकले जाईल असा कयास आहे. एकट्या दसर्‍याच्या दिवशी तीनशे किलो सोने बाजारातून घरी, दुकानात किंवा ऑफिसात किंवा अन्य कुठे कुठे गेले. आता तर सोन्याची ऑनलाईन खरेदीही काही प्रमाणात होऊ लागलेली आहे. गोल्ड ईटीएफ, गोल्ड बॉण्ड अशा स्वरूपात घेणारा ग्राहकवर्ग वाढू लागलेला आहे. सोन्याच्या पाठोपाठ चांदी विक्री होते, त्यात चांदीची उपकरणे, ताटे -वाट्या यांचीदेखील खरेदी केली जाते.

सोन्याची क्रेझ कमी करण्याचे प्रयत्न होत असले तरी ‘मागणी ’ मात्र मोठ्या प्रमाणावर वाढत राहणार आहे. तरुण-पिढी मात्र त्याकडे हळूहळू का होईना एक सकस गुंतवणूक ऑप्शन म्हणून त्याकडे पहात आहे. तुमचे -आमचे सोन्याशी असलेले भावनिक नाते अतूट असेच राहणार आहे, परंतु दागिन्यांचा सोस-हव्यास कमी झाल्यास आपले उत्पन्न सोनेस्वरूपात निद्रिस्त वा गोठलेले राहणार नाही. शिवाय अशा संपत्तीमुळे जीविताची हानी व चोरी होण्याची जोखीम तसेच टांगती तलवार राहणार नाही. आर्थिक साक्षरतेचा विचार करत आपण सोन्या-चांदीकडे आभूषण-धातू म्हणून न पाहता, एक पर्यायी गुंतवणूक म्हणून पाहूया. तरच आज नाही तर पुढे कधी तरी दसरा-धनतेरस-दिवाळी अशा सणांना विक्रमी खरेदी होणार नाही आणि भावदेखील आटोक्यात राहतील. दिवाळी म्हणजे फटाके हे समीकरण प्रदूषणामुळे कमी होत चाललेले आहे, तसे पुढे कधीतरी दिवाळी म्हणजे सोने-दागिने हे समीकरण कमी होईल अशी अपेक्षा करूया.

-राजीव जोशी- बँकिंग व अर्थ-अभ्यासक 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -