घरफिचर्स‘द गिल्टी’ नाविन्यपूर्ण थरारपट

‘द गिल्टी’ नाविन्यपूर्ण थरारपट

Subscribe

‘द गिल्टी’ची रचनाच अशी केली आहे की त्यात पदोपदी सूक्ष्मरीत्या नाट्य घडून येत राहतं. त्यात अंतर्भूत असलेली दृश्यं मानसशास्त्रीय पातळीवर प्रेक्षकांच्या सक्रिय सहभागाची अपेक्षा बाळगतात. आपत्कालीन सुविधा म्हणून आलेले फोन कॉल्स जेव्हा असगर उचलतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीचं बोलणं, त्या व्यक्तीची समस्या लक्षात घेत तिचं पुरेपूर आणि तात्काळ आकलन करणं हे त्याचं काम असतं.

रहस्यपूर्ण किंवा थरारक नाट्याच्या निर्मितीसाठी कार चेसेसची प्रदीर्घ दृश्यं, बंदुका घेऊन वावरणारे नायक-खलनायक, इत्यादी बाबींची गरज असतेच असं नाही. ‘द गिल्टी’च्या (२०१८) चित्रपटकर्त्यांना नेमकी हीच गोष्ट उमगलेली आहे. त्यामुळेच नाट्यनिर्मितीसाठी कॅमेर्‍याला डेन्मार्कमधील एका इमर्जन्सी कॉल सेंटर कार्यालयाच्या आवारातून बाहेर पडायची गरज भासत नाही. कारण, या कार्यालयात असलेल्या अधिकार्‍याला येणारे फोन कॉल्स, त्यातून फोन करणार्‍याविषयी आणि प्रत्यक्ष अधिकार्‍याविषयी मिळणारी माहितीच तणाव आणि नाट्यनिर्मिती करण्याची ताकद बाळगते.

असगर होम (जेकब सीडरग्रीन) हा डेन्मार्कमधील पोलीस अधिकारी आहे. त्याने नजीकच्या भूतकाळात केलेल्या काहीतरी कृतीचा परिणाम म्हणून अलीकडेच त्याची नियुक्ती डेस्क जॉबला झाली असल्याने तो सध्या कॉल डिसपॅचर म्हणून काम करतोय. प्रत्यक्ष घटनास्थळी काम करण्याची सवय असलेल्या होमला हे काम पटणारे नसले तरी त्याला त्याचा इलाज नाही. लवकरच त्याच्याकडून घडलेल्या (एव्हाना प्रेक्षकांना माहीत नसलेल्या) घटनेवरील चौकशी आणि खटला पूर्ण होणार आहे. त्याच्या कनिष्ठ सहाय्यकाची साक्ष घेतल्यानंतर चौकशी पूर्ण झाली आणि तो निर्दोष आहे हे सिद्ध झालं की तो या बंदिस्त कार्यालयातून बाहेर पडायला मोकळा. ‘पण तो खरंच निर्दोष आहे का?’ हा या निमित्ताने उद्भवणारा एक प्रश्न म्हणता येऊ शकतो, ज्याबाबत चित्रपट जसजसा पुढे जातो तशी अधिक माहिती मिळते.

- Advertisement -

‘द गिल्टी’ची रचनाच अशी केली आहे की त्यात पदोपदी सूक्ष्मरीत्या नाट्य घडून येत राहतं. त्यात अंतर्भूत असलेली दृश्यं मानसशास्त्रीय पातळीवर प्रेक्षकांच्या सक्रिय सहभागाची अपेक्षा बाळगतात. आपत्कालीन सुविधा म्हणून आलेले फोन कॉल्स जेव्हा असगर उचलतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीचं बोलणं, त्या व्यक्तीची समस्या लक्षात घेत तिचं पुरेपूर आणि तात्काळ आकलन करणं हे त्याचं काम असतं. त्या व्यक्तीकडून संक्षिप्त, पण उपयोगी माहिती घेणं, तिची समस्या खरी आहे की खोटी इथपासून ते तिला खरंच पोलीस वा रुग्णालयाची गरज आहे का इथपर्यंत निर्णय त्याला आणि त्याच्यासारख्या ऑपरेटर्सना घ्यावे लागतात. असगरची आजची शिफ्ट आता संपायला आली आहे. तो काहीसा निवांत असला तरी सुरुवातीला आलेल्या दोन तीन कॉल्सवरून त्याच्या कामाचं स्वरूप लक्षात येतं. त्याच्या रूपात आपत्कालीन सुविधेकरिता फोन केल्यावर येणार्‍या आवाजाला एक चेहरा लाभतो. त्या आवाजामागील व्यक्तीचं दर्शन होऊन एरवी महत्त्व लक्षात न येणार्‍या या कामाची उपयुक्तता आणि या ऑपरेटर्सवर असलेली जबाबदारी दिसून येते. त्यामुळे त्यांच्यावर असलेल्या संभाव्य आणि काहीशा स्वाभाविक ताणाचं चित्र असगरच्या रूपात स्पष्ट होतं.

दरम्यान, असगरची शिफ्ट संपायच्या काही काळ आधी त्याला एका महिलेचा फोन येतो. घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या आणि भयाच्या अंमलाखाली जुजबी बोलणार्‍या या महिलेचं नाव इब्सेन उबस्टर्गार (जेसिका डिने) असल्याचं समोरच्या संगणकावर दिसतं. ती आपल्या अपहरणकर्त्याच्या, आपल्याच पतीच्या शेजारी असल्याची माहिती असगर मोठ्या कल्पकतेने काढतो. घरी असलेल्या आपल्या लहान मुलीला फोन करत असल्याचं सांगत तिने पोलिसांना फोन केला असल्याचं त्याला कळतं. तिच्याकडे फारसा वेळ नसल्याने मोजकीच माहिती देत ती फोन ठेवते.

- Advertisement -

आता सगळं काही असगरच्या हातात असतं. इतरांना मदत करण्याचा उपजत स्वभाव, बरीच वर्षे प्रत्यक्ष घटनास्थळावर काम करण्याच्या अनुभवातून वाढीस लागलेली अंतःप्रेरणा यामुळे त्याने पुढची पावलं उचलणं स्वाभाविक असतं. इब्सेनच्या घराची माहिती मिळवत तिची मुलगी पोलिसांच्या देखरेखीखाली सुरक्षित राहील हे पाहणं, तिच्याशी आणि इब्सेनशी स्वतः फोनवरच संवाद साधणं, इब्सेनचा शोध लागेल हे पाहणं असं बरंच काही करणं त्याचं तात्कालिक का असेना, पण ध्येय बनतं. प्रत्येक क्षणानंतर वाढत जाणारा तणाव, असगरसोबत आपल्यालाही टोचणी देणारी हतबलता या भावना चित्रपटातील वाढत्या नाट्यासोबत उत्तरोत्तर वाढत जातात. सोबतच संभाव्य घटना आणि भयाची पुरेपूर कल्पना येऊन जलद पावलं उचलण्याची आवश्यकता दिसून येते.

चित्रपटात असगरच्या चेहर्‍यावर स्थिर असलेल्या कॅमेर्‍याच्या माध्यमातून त्याच्या चेहर्‍यावरील एकूण एक रेषा टिपली जाते. चित्रपटाच्या अप्रतिम ध्वनी आरेखनातून त्याला फोन कॉल करणारी समोरची व्यक्ती दिसत नसली तरीही तिचा प्रत्येक श्वास, प्रत्येक उच्छवास स्पष्टपणे ऐकू येतो. असगरची भूमिका करणार्‍या जेकबच्या चेहर्‍यावरील हावभाव, आणि फोनवर बोलत असणार्‍या व्यक्तीचा आवाज हीच मांडणी चित्रपटभर कायम राखली जाते. ज्यामुळे ‘द गिल्टी’ थरारपटाचा एक कल्पक आणि परिणामकारक नमुना बनतो. असगर हा अधिकारी त्याच्या कामाकडे किती गंभीरपणे पाहतो, तसेच एखाद्या गुन्ह्याच्या घटनेत आणि तपासात तो मानसिक पातळीवर किती खोलवर सहभागी होतो याची पुरेपूर जाणीव सदर चित्रपट पाहताना येते. त्याची ही कामाची पद्धत आणि त्याची सुरू असलेली चौकशी यांचा संबंध जसजसा उलगडत जातो तसे चित्रपटाला नवे आयाम प्राप्त होतात. सोबत इब्सेनच्या अपहरणाच्या केसचं उपकथानकही इथे महत्त्वाचं ठरतं. चित्रपटाच्या नावाचा गहन अर्थही हळूहळू लक्षात येत जातो.

मोजकी पात्रं (त्यातही पुन्हा काही पात्रं केवळ आवाजांच्या माध्यमातून उभी केलेली असणं) आणि अगदी काही तासांच्या कालावधीत घडणार्‍या कथेतून चित्रपट या अधिकारांच्या मानसिकतेचा आढावा ज्या पद्धतीने घेतो ते कौतुकास्पद ठरतं. परिणामी गुस्ताव्ह मॉलर दिग्दर्शित ‘द गिल्टी’ हा निःसंशयपणे अलीकडील काळातील काही नाविन्यपूर्ण थरारपटांमध्ये मोडतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -