भाजी आणि भायखळा: मुंबईच्या माळव्याचा इतिहास

इंग्रजांच्या मान्यतेनंतर भायखळ्याच्या मेहेर मार्केटमधील भाजीला कमालीची मागणी आली. अनेकजण भाजी खरेदीसाठी येऊ लागले. मात्र काही काळाने खरेदीच्या तुलनेत भाजी अपुरी पडत असल्याचे लक्षात आल्यावर भायखळा ते महालक्ष्मी स्थानकापर्यंत जमिनीवर भाज्यांची लागवड सुरू झाली. यानंतर जुन्नर येथील काही शेतकरी या व्यवसायात रुजू झाले. त्या काळी दादर, परळ, घाटकोपर, माहिम, वरळी, कुर्ला या ठिकाणी भाजी पिकवली जात होती. त्यानंतर मात्र ही मंडई विस्तारत गेली आणि इतर जिल्ह्यातूनही भाज्यांची विक्री सुरू झाली. त्या वेळी मेहेर कुटुंबीयांची ही खासगी मालमत्ता असल्याने हे मार्केट मेहेर मंडई म्हणून ओळखले जात होते. मात्र त्यानंतर ही मंडई सहकारी तत्त्वावर सुरू झाल्यानंतर याचे नाव भायखळा मार्केट म्हणून प्रसिद्ध झाले.

Mumbai
भायखळा मार्केट

मुंबईतील सर्वात जुने भाजी मार्केट म्हणून भायखळा मार्केट प्रसिद्ध आहे. हे मार्केट जरी भायखळा मार्केट म्हणून ओळखले जात असले तरी त्याचे खरे नाव मेहेर मंडई असे आहे. या मार्केटचा इतिहास खूपच रोचक आहे. साधारणतः 1846 साली या भागात भाजी लागवड होत असे, असे म्हणतात की जुन्नर येथील मूळचे धोंडिबा कृष्णाजी मेहेर यांनी येथे भाजी लागवड सुरू केली. ते भाजी पिकवायचे आणि तेथेच विकायचे. आजूबाजूच्या गरीब वस्तीतून त्यांचा भाजीपाला विकला जायचा. भायखळा रेल्वे स्टेशन 1857 साली तयार झाले. या स्टेशनबाहेर मेहेर आणि त्यांचे गावातील सहकारी यांनी भाजी विकायला सुरुवात केली. मुंबईकरला भायखळा स्टेशनबाहेर स्वस्त आणि ताजी भाजी मिळू लागली आणि तेथे मार्केटची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्याकाळी मुंबईतील श्रीमंत लोक, इंग्रज हे क्रॉफर्ड मार्केटमधूनच भाजी विकत घ्यायचे, तर भायखळा परिसरात राहणारे भायखळा मार्केटमधून. क्रॉफर्ड मार्केटमध्ये होणारा भाजी पुरवठा हा ससून डॉकमधून व्हायचा.

अलिबाग, मांडवा अशा भागातून येणार्‍या भाज्या तेथे विकल्या जायच्या. त्या श्रीमंतांच्या भाज्या मानल्या जायच्या, तर भायखळापासून महालक्ष्मी पर्यंतच्या भागात तयार होणार्‍या भाज्या या खचर्‍यातल्या भाज्या म्हणून त्याला श्रीमंत नाव ठेवायचे. पण अलिबाग, मांडवा येथून येणार्‍या भाज्यांबाबत एक अडचण होती, हा भाज्यांचा पुरवठा पावसाळ्यात ठप्प व्हायचा, त्यानंतर मात्र क्रॉफर्ड मार्केटमध्येही याच भाज्या मिळायच्या. हे लक्षात घेऊन इंग्रजांनी भायखळा परिसरातील भाज्या कायमच्या अधिकृत करून टाकल्या, म्हणजे मेहेर यांना भाजी मार्केट उभारण्यासाठी राणी बागेसमोर सुमारे साडेतीन एकर जागा दिली. काही म्हणतात ती जागा मेहेर यांनी विकत घेतली तर काहीजणांच्या मते ती जागा इंग्रजांनी त्यांना इनाम दिली, पण ही जागा धोंडिबा मेहेर यांच्या नावे, खाजगी मालमत्तेची होती. यात शंका नाही.

इंग्रजांच्या मान्यतेनंतर मेहेर मार्केटमधील भाजीला कमालीची मागणी आली. अनेकजण भाजी खरेदीसाठी येऊ लागले. मात्र काही काळाने खरेदीच्या तुलनेत भाजी अपुरी पडत असल्याचे लक्षात आल्यावर मेहेर यांच्या मुलाने भायखळा ते महालक्ष्मी स्थानकापर्यंत जमिनीवर भाज्यांची लागवड सुरू केली. यानंतर जुन्नर येथील काही शेतकरी या व्यवसायात रुजू झाले. त्या काळी दादर, परळ, घाटकोपर, माहिम, वरळी, कुर्ला या ठिकाणी भाजी पिकवली जात होती. त्यानंतर मात्र ही मंडई विस्तारत गेली आणि इतर जिल्ह्यातूनही भाज्यांची विक्री सुरू झाली. त्या वेळी मेहेर कुटुंबीयांची ही खासगी मालमत्ता असल्याने हे मार्केट मेहेर मंडई म्हणून ओळखले जात होते. मात्र त्यानंतर ही मंडई सहकारी तत्त्वावर सुरू झाल्यानंतर याचे नाव भायखळा मार्केट म्हणून प्रसिद्ध झाले.

1985 साली मुंबई महानगरपालिकेने हे मार्केट विकत घेण्याचा ठराव केला. मात्र त्या वेळी काही नेत्यांनी एकत्र येत हे मार्केट 60 लाख रुपयांना सहकारी तत्त्वावर खरेदी केले. सध्या मंडईत 333 भाजी विक्रेते आहेत. हा बाजार भायखळा स्थानकापासून अगदी नजीक असल्यामुळे येथे कायम गर्दी असते. त्याशिवाय हे मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे व्यापार्‍यांसाठी ही मंडई सोयीची आहे. वर्षांचे 365 दिवस ही मंडई खुली असते. साधारण सकाळी 3 ते 4 च्या सुमारास सातारा, सांगली, पुणे, बंगलोर या भागांतून रात्रभराचा प्रवास करून आलेले भाज्यांचे मोठमोठे ट्रक भायखळ्याच्या मंडईत दाखल होतात. दिवसाला साधारण 150 भाज्यांचे ट्रक या मंडईत येतात. जोपर्यंत वाशी मार्केट अस्तित्वात आले नव्हते तोपर्यंत हे भाजी मार्केट आणि येथील भाजी विक्रेत्यांची शान होती. मुंबईत भाज्यांचे आणि फळांचे भाव काय असणार हे भायखळा मार्केट ठरवायचे. त्या काळात कोकणातून हापूस आंब्याच्या पेट्या या मार्केटमध्ये खाली कराव्या लागायच्या.

मग येथील दलाल त्याचा भाव निश्चित करायचे. तीच परिस्थिती इतर फळे आणि भाज्यांची होती. पण वाशी मार्केट सुरू झाले आणि भायखळा मार्केटची रयाच निघून गेली. आज भायखळा मार्केट अस्तित्वात आहे पण पूर्वीची गर्दी कमी झाली आहे. त्याची शान निघून गेली आहे, असे खुद्द येथील व्यापारीच काबुल करतात. लहानपणी आणि कॉलेजात असताना कोकणातून आलेली आंब्याची पेटी उतरून घ्यायला या मार्केटमध्ये जायचो. त्यामुळे मार्केटचे रागरंग अगदी जवळून पाहिले आहेेत, व्यापारी ठरवतात तो भाव त्यामुळे शेतकर्‍याची होणारी चलबिचल जवळून पाहिली आहे. भाजी हा नाशवंत घटक असल्याने बर्‍याचदा जास्त आवक झाली की एखाद्या भाजीचे दर अचानक प्रचंड कोसळतात. पण खरे सांगू शेतकर्‍यांपेक्षा व्यापारीच पैसे जास्त कमावतात हे तेव्हाही खरे होते आणि आजही आहे.