घरफिचर्सशिंदेंचा गोंधळ आणि राहुलची बासरी!

शिंदेंचा गोंधळ आणि राहुलची बासरी!

Subscribe

भाजपाने अलीकडे विकृतीचे टोक गाठले आहे. लोकशाहीचे एकेक आधारस्तंभ उध्वस्त होत आहेत, सर्वत्र निराशा भरून गेली असताना शाहीन बागेतून भुपाळीचे नवे सूर अचानक कानावर येतात आणि गाई वासरांसह सारे गोकुळ कालिया मर्दनासाठी रस्त्यावर गोळा होताना दिसते आहे. फितुरी होत राहील, पण गोकुळ आता जागे होत आहे. तेव्हा सिंधीयांचे तिकडे जाणे म्हणजे कौरवांच्या सैन्यात आणखी एका जास्तीच्या बळीची नोंद होणे, एवढाच त्याचा अर्थ आहे. तात्पुरती चिंता वाटत असली तरी गोडसे विरुद्ध गांधी या लढाईत गांधींना पर्याय नाही. आणि म्हणूनच सिंधियांनी कितीही गोंधळ घातला तरी राहुल तिकडे निवांत बासरी वाजवण्यात मग्न आहेत.

दिमाखात पेले रिते पाहिले मी
तुझ्या प्रार्थनेच्या तिथे पाहिले मी
तुझे राष्ट्रपित्या कसे व्हायचे रे..
पुन्हा गोडसेला जिते पाहिले मी !

सध्या भारतीय राजकारणाची पातळी एवढी घसरली आहे की, हे पक्ष आहेत की राजकीय टोळ्या, असा संभ्रम निर्माण व्हावा. सामाजिक बांधिलकी, नीतिमत्ता, विश्वासार्हता या गोष्टींना आता कवडीचीही किंमत उरली नाही. पक्षांचे जाहीरनामे म्हणजे जनतेची टवाळी, असे समजण्याएवढा फालतूपणा राजकीय नेते आणि पक्ष यांच्या कृतीतून वारंवार अधोरेखित होताना दिसतो.

- Advertisement -

तत्वशून्य पक्षांतर हा राजकीय व्यभिचार आहे. मात्र तो सध्या कमालीचा प्रतिष्ठित झालेला आहे. तिकडचा डाकू इकडे आला की रातोरात साधू वगैरे होऊन जातो. तिकडचा बलात्कारी इकडे संन्यासी होऊन जातो. आमदार खासदारांची राजरोस खरेदीविक्री केली जाते. संसद म्हणावी की बाजार ? इतकं अधःपतन लोकशाहीचं झालेलं आहे.

काँग्रेस आणि भाजपा हे या देशातले दोन प्रमुख राष्ट्रीय पक्ष. एका पक्षाची मुळं स्वातंत्र्य संग्रामातील सहभागामुळे जनमानसात खोलवर रुजलेली आहेत. सध्या अवस्था केविलवाणी दिसत असली तरी, त्याच्या फांद्या इकडे तिकडे विविध नावानं अजूनही मूळ धरून आहेत, हे वास्तव लक्षात घ्यावे लागेल. हल्लीच्या काँग्रेसमध्ये असंख्य दोष आहेत, यात संशय नाही. मूळची काँग्रेस आणि आताची काँग्रेस यांची तुलनाच करायची झाली, तर उसाचा शुद्ध रस आणि उसाची मळी सडवून तयार झालेली देशी दारू, एवढा फरक दोन्हींमध्ये आहे. अनेक राजकीय घराणी म्हणजे विधिवत लायसन्स घेऊन चालणारे देशी दारूचे राजकीय अड्डे चालवत आहेत.

- Advertisement -

या तुलनेत 2014 नंतरची भाजपा म्हणजे नकली दारूचे अड्डे चालविणार्‍या लोकांचा महासंघ म्हणावा लागेल. एवढा मूल्यात्मक फरक या दोन्ही पक्षांमध्ये आहे. दुर्दैवानं देशाची सत्ता गेल्या सहा वर्षांपासून या दुसर्‍या प्रकारच्या लोकांकडे आहे. अनधिकृत अड्डा चालविण्यात जर एखादी व्यक्ती भूषण मानत असेल, तोच आपला धर्म मानत असेल आणि समाजही त्याला प्रतिष्ठा देत असेल, जयजयकार करत असेल, तर मग लोकशाहीचं नेमकं किती वस्त्रहरण होईल, याची कल्पनाही न केलेली बरी. सध्या ते आपण प्रत्यक्ष बघत आहोत.

या पार्श्वभूमीवर ज्योतिरादित्य सिंधिया यांची भाजपमध्ये सामील होण्याची कृती किळस यावी अशीच आहे. कारण त्यांना काँग्रेसनं काही कमी दिलं असं नव्हे. त्या बदल्यात त्याचं स्वतःचं योगदान समाजासाठी तर सोडाच पण निदान पक्षासाठी तरी नेमके काय आणि किती हा गंभीर प्रश्न आहे. पण आम्ही राजे आहोत, तेव्हा जनतेनं मतं देणं आणि पक्षानं सत्ता देणं हे त्यांचं कर्तव्य आहे, अशा गुर्मित काही लोक अजूनही वावरत असतात. महाराष्ट्रातही असे नमुने आहेतच. पण त्यासाठी त्यांना दोष देण्यात अर्थ नाही. तो दोष गुलामगिरीला भूषण समजणार्‍या आणि आमचे राजे, आमचे राजे.. म्हणून नाचणार्‍या लोकांचा आहे. महाराष्ट्रातही भोसले, विखे अशी बरीच उदाहरणं आपण पाहिली आहेत. माणसं सत्तेसाठी एवढी लाचार कशी काय होऊ शकतात, हे खरंच आश्चर्य आहे. आणि अशी माणसं भाजपासारख्या पक्षासाठी तर वरदानच आहेत.

कारण गावचा पाटील फडावरती गेला की आपोआपच फडाची इज्जत वाढून जाते. धंदाही उजळ माथ्याने करता येतो. ही आमच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची शोकांतिका आहे. गेल्या सत्तर वर्षात आपण कुठं येवून पोचलो, याची लाज वाटावा असा हा प्रवास आहे.

सामूहिक पक्षांतरे आधीही होत होती. त्यामुळेच पक्षांतर विरोधी कायदा आला. त्यात वेळोवेळी दुरुस्त्याही कराव्या लागल्या. पण तेव्हाची बंडखोरी किंवा पक्षातरांना काही प्रमाणात का होईना तात्विक, सामाजिक आधार होता. आणीबाणीच्या काळात किंवा व्ही. पी. सिंग यांची उदाहरणं या दृष्टीनं विचारात घेण्यासारखी आहेत.

महाराष्ट्राला तर बंडखोरीचा इतिहास काही नवा नाही. तो काही आजचा विषय नाही, पण तेव्हाची ती बंडखोरी शुद्ध राजकीय लालसेपोटी होती. त्यामुळे सत्ता बदल झाला असेल, लोकशाहीला तडे वगैरे गेले असतील, तरी देशाची एकात्मता वगैरे त्यामुळे धोक्यात आली नव्हती. त्यामुळे तेव्हाची बहुतेक पक्षांतर केवळ राजकीय फायद्यासाठी अशा मर्यादित अर्थाची घटना म्हणूनच बघायला हवीत.

2014 नंतरची आणि विशेषतः मोदी-शहा यांचे पराक्रम उघड्या डोळ्यांनी पाहिल्यानंतरच्या काळातली आणि भाजपाच्या बाजूनं जाणारी पक्षांतरे हा तर अतिशय भयंकर प्रकार आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या ऐन तोंडावर विखे, भोसले, राणे यांचं पक्षांतर म्हणजे कोडगेपणाचा कळस आहे. सिंधीयाच्या पक्षांतराचं ताजं उदाहरण म्हणजे.. बर्ड फ्लू झालेल्या कोंबडीची.. तंदुरी चिकन डिश बनवावी असा भन्नाट प्रकार आहे. भाजपा या पक्षाकडून नीतिमत्ता, लोकशाही असल्या मूल्यांची अपेक्षा करणं म्हणजे गाढवीकडून डायरेक्ट आइस्क्रीमची अपेक्षा करण्यासारखं आहे. जसा पूर्वीच्या काँग्रेसचा स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आहे, तसा भाजपा परिवाराचा तेव्हाचा इतिहास हा इंग्रजांना मदत करण्याचा आहे. स्वातंत्र्य लढ्याला विरोध करण्याचा आहे. तिरंग्याला विरोध करण्याचा आहे. आणि त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यात आपला कवडीचाही वाटा नाही, याची खदखद संघाच्या मनात काठोकाठ भरलेली आहे.

स्वतःला मुलं होऊ शकलं नाही आणि सवतीच्या मुलाचं गावभर कौतुक होते हे पाहवत नाही, अशा वेळी सुडानं पेटलेल्या बाईसारखी संघ-भाजपची सध्याची अवस्था आहे. सवतीच्या संसाराचा सत्यानाश आणि गावच्या शांततेचा बट्ट्याबोळ केल्याशिवाय तिचा मत्सर शांत होणार नाही. भाजपाला भारतीय समाज आणि लोकशाही दोन्ही उध्वस्त करायची आहेत. त्याचाच भाग म्हणून त्यांनी सीएएमध्ये केलेला पक्षपाती आणि घटनाविरोधी बदल, एनपीआरचे नवे कुटिल स्वरूप आणि नंतरचा सैतानी एनआरसी हा कायदा, हे भयंकर षड्यंत्र आहे. पण संसदेत त्यांना पाशवी बहुमत देऊन मतदारांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. आणि त्यांना साथ देवून नितीशकुमारसारख्या लोकांनीही त्या पापात आपले योगदान दिलेले आहे. ( आता पुन्हा त्यांची भूमिका बदलली असली, तरी किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहेच.)

इंग्रजांनी अनेक सोयी सुधारणा करत करत देशावर राज्य केलं, भाजपा मात्र देश उध्वस्त करत करत राज्य करत आहे. फळांनी लदबदलेल्या झाडावर माकडांचा कळप चढावा आणि नुसता धुमाकूळ घालावा अशी अवस्था सध्या देशाची झाली आहे. खाणं कमी आणि नासाडी जास्त. नोटबंदी ते एनआरसी.. हा असाच एक माकड प्रवास आहे. मोदी, शहा हे दुसरं काही करूही शकत नाहीत.

अशा पार्श्वभूमीवर सिंधिया यांच्या भाजपा प्रवेशाचा विचार करायला हवा. त्याला साधे रूटीन पक्षांतर समजता कामा नये. म्हणूनच ते भयंकर आहे. केवळ स्वार्थी, संधीसाधू नव्हे तर देशाशी बेइमानी करणारे आहे. स्वार्थासाठी लोकशाहीचा राजरोस आणि निर्लज्जपणे बळी देणारे आहे. तसाही सिंधिया घराण्याचा इतिहास फितुरीचाच राहिला असला, तरी तो बदलण्याची संधी ज्योतिरादित्य सिंधिया यांना होती. पण त्यासाठी रक्तामध्ये व्ही.पी. सिंग असावा लागतो.

यात काँग्रेस नेतृत्वाने सिंधियावर अन्याय केला का, या प्रश्नाचं उत्तर नकारात्मकच आहे. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं का, या प्रश्नाचं उत्तर मात्र होकारार्थी द्यावं लागेल. सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी नक्कीच दुर्लक्ष केलं आहे. किंवा त्यांची महत्त्वाकांक्षा फारच वाढून गेली असेल, हेही कारण असू शकते. मुळात राहुल गांधी यांच्या बाबतीत काँग्रेसची भूमिका आधीपासूनच चुकत गेली. एकतर त्यांना आधीच मंत्री करायला हवं होतं. निदान त्यातून अनुभव आला असता. अनुभवाने माणूस बर्‍यापैकी शहाणा होऊन जातो, ही शक्यता नाकारता येत नाही. एरवी राहुल गांधींमध्ये नावाचा महान वारसा सोडला तर दुसरं काहीही नाही. त्यांची फारसी शिकण्याची इच्छा पण दिसत नाही. आणि कृत्रिम पावसाच्या भरवशावर पर्मनंट शेती काही करता येत नाही.

पण तरीही गेल्या एक वर्षाच्या काळात अनेक राज्यात काँग्रेसची सरकारं आलीत. भाजपची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली. याची संगती कशी लावायची? तर पुन्हा आपल्याला मूळ मुद्याकडे परत जावे लागेल. काँग्रेसचा जुना इतिहास, जुनी पुण्याई आणि विशेषतः सर्वसमावेशक चारित्र्य. याचा तो विजय आहे. आणि बहुधा याची बर्‍यापैकी कल्पना गांधी घराण्याला आहे. त्यांना पुढचा पंतप्रधान म्हणून झाला तर राहुल गांधीच हवा आहे. प्रियांकासुद्धा नको. त्यामुळे इतरांना तिथे कुठपर्यंत पुढे येऊ द्यायचं, ही सीमारेषा सोनिया गांधी यांच्या डोक्यात पक्की आहे. ती रेषा ओलांडण्याची कळत नकळत शक्यता किंवा तसा साधा संभ्रम जरी निर्माण होण्याची शक्यता असेल, असे खेळाडू आधीच बाद करणे, हा त्यातला छुपा पण अनिवार्य नियम आहे.

म्हणूनच सिंधियांचा गेम होणार, अशी चिन्ह काँग्रेसच्या नव्या अध्यक्षपदासाठी पुढे आलेली नावं पाहिल्यावर दिसायला लागली होती. आणि ते आपल्या भारतीय राजकारणाचे अनिवार्य लक्षण आहे. असे अनेक पुरावे आहेत. उदा. लालू प्रसाद यादव यांचा मुलगा, मुलायम सिंग नंतर अखिलेश यादव किंवा महाराष्ट्रात सेनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासाठी राज ठाकरे यांची झालेली गोची किंवा केलेली अवस्था. राज ठाकरे सेनेमध्ये अतिशय फॉर्मात असताना मी त्यांच्या जवळच्या मित्रांना बोललो होतो, की तुमच्या राज साहेबांना शिवसेना सोडावी लागेल. त्यावर कुणीही विश्वास ठेवू शकत नव्हते. राजकीय विश्लेषकसुद्धा हे समजू शकले नव्हते. अजित पवार यांची फडणवीस यांच्यासोबतची ताजी पहाट भैरवीसुद्धा तशाच पंथातील होती, हे समजून घ्यावे लागेल.

हे सारे खरे असले, तरी सिंधिया यांच्या बंडखोरीचे समर्थन मात्र कुठल्याही प्रकारे करता येऊ शकत नाही. कारण एकतर त्यांचं काहीही कर्तृत्व नाही. त्यांना काँग्रेसनं जे काही दिलं ते त्यांच्या हिशेबाने खूप काही आहे. आणि या उपरही त्यांच्यावर अन्याय झाला असं त्यांना वाटतं असेल, तर त्यांनी जगनमोहन रेड्डीसारखा मर्दपणा दाखवायला हवा होता. स्वतःचा पक्ष स्थापन करायला हवा होता. ममता बॅनर्जी यांनी तर तो आधीच दाखवला आहे. मात्र भाजपासारख्या दंगेखोर पक्षात जाऊन सिंधिया यांनी काँग्रेसच नव्हे, तर या देशातल्या जनतेशी बेइमानी केली आहे. लोकशाहीचा सौदा केला आहे.

पण देश, जनता आणि लोकशाही यांच्याशी काहीही देणंघेणं नसलेली अशी बरीच अवसानघातकी मंडळी अजूनही काँग्रेसमध्ये आहेत. इतर पक्षातही आहेत. आणि वेळोवेळी ते आपले मूळ रंग दाखवत असतात. सध्याच्या काळात अशा लोकांची दिवाळी आहे. त्यामुळे गांधीच्या पायाशी बसून मनातल्या मनात गोडसेची आरती गाणारे असे जंतू वेळोवेळी उघडे पडतील यात संशय नाही.

भाजपाने अलीकडे विकृतीचे टोक गाठले आहे. लोकशाहीचे एकेक आधारस्तंभ उध्वस्त होत आहेत, सर्वत्र निराशा भरून गेली असताना शाहीन बागेतून भुपाळीचे नवे सूर अचानक कानावर येतात आणि गाई वासरांसह सारे गोकुळ कालिया मर्दनासाठी रस्त्यावर गोळा होताना दिसते आहे. फितुरी होत राहील, पण गोकुळ आता जागे होत आहे. तेव्हा सिंधीयांचे तिकडे जाणे म्हणजे कौरवांच्या सैन्यात आणखी एका जास्तीच्या बळीची नोंद होणे, एवढाच त्याचा अर्थ आहे. तात्पुरती चिंता वाटत असली तरी गोडसे विरुद्ध गांधी या लढाईत गांधींना पर्याय नाही.

आणि म्हणूनच सिंधियांनी कितीही गोंधळ घातला तरी राहुल तिकडे निवांत बासरी वाजवण्यात मग्न आहेत. कारण भाजपाच्या पापाचा घडा भरत आलेला आहे, काँग्रेस ही देशाची गरज आहे आणि सध्यातरी वेगळा पर्याय नजरेच्या टप्प्यात दिसत नाही..! तूर्तास एवढंच…

-ज्ञानेश वाकुडकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -