द लंचबॉक्स ,पात्रांना जोडणारी सुखद सेरेंडिपिटी

Mumbai
द लंचबॉक्स

‘द लंचबॉक्स’च्या कथेच्या अगदीच छोटेखानी स्वरूपामुळे दिग्दर्शक बत्राला त्यातील पात्रं, त्यांचा भोवताल अशा गोष्टी अधिक विस्तृतपणे टिपण्याची संधी मिळते. साजन, इला, तिची शेजारीण देशपांडे, साजन निवृत्त झाल्यावर त्याच्या जागी रुजू होणारा आणि सध्या त्याच्या कामाचे स्वरूप पाहण्यासाठी त्याच्यासोबत वावरणारा अस्लम शेख (नवाजुद्दीन सिद्दीकी) ही सारी पात्रं एक प्रकारे एककल्ली आयुष्य जगत आहेत.

लेखक-दिग्दर्शक रितेश बत्राचा दिग्दर्शकीय पदार्पण असलेला ‘द लंचबॉक्स’ प्रदर्शित झाला तेव्हा बहुतांशी लोकांना त्याच्या या अगदीच न्यूनतम घटनाक्रम असलेल्या कथानकाभोवती फिरणार्‍या पूर्ण लांबीच्या चित्रपटाने, त्यातील सखोल पात्रं आणि त्यांच्यातील तरल संबंधांच्या चित्रणामुळे भुरळ घातली होती. त्यानंतर दोन इंग्रजी आणि नुकताच प्रदर्शित झालेला ‘फोटोग्राफ’ हा हिंदी चित्रपट पाहता त्याची लेखन-दिग्दर्शनाची शैली आणि एकूणच त्याचे चित्रपट अधिक उमजू लागतात. मुंबईसारख्या गर्दीने वेढलेल्या शहरात आपलं खाजगीपण आणि आपली एकाकी असल्याची भावना उरी बाळगून वावरणारे लोक बत्राच्या (हिंदी चित्रपटांतील) कथांमध्ये दिसतात आणि तो त्यांच्या गोष्टी कशाप्रकारे उलगडत जातो हेदेखील समजतं.

तसं पहायला गेल्यास ही पात्रं एककल्ली आयुष्य जगत असली तरी त्यांच्या आयुष्याला एक अपरिपूर्णतेतून निर्माण झालेलं परिपूर्णत्व लाभलेलं आहे. त्यांच्या रोजच्या रटाळ दिनक्रमात क्वचितच का होईना, पण त्यांच्या इतर काही इच्छा-आकांक्षा दिसत असतात इतकाच काय तो अपवाद. त्यामुळे सहजासहजी उत्सुक व्हावं असं काही कारणच नसलेल्या या पात्रांच्या आयुष्यात अकस्मातपणे घडलेली लहानशी गोष्टही त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरू शकते. चित्रपटांच्या विश्वात या ‘सेरेंडिपिटी’ला, योगायोगाने घडणार्‍या गोष्टींना महत्त्व असतं. त्यातूनच काही वेळा अशा अशक्यप्राय वाटणार्‍या योगायोगांच्या निमित्ताने जोडल्या गेलेल्या पात्रांच्या कथा पहायला मिळत असतात.

लिखाणामध्ये, त्यातही पुन्हा मुख्यत्वे कादंबर्‍यांमध्ये ‘एपिस्टॉलरी’ नामक एक साहित्य प्रकार अस्तित्त्वात आहे. या प्रकारामध्ये त्या लिखाणातील घटनाक्रम सदर कथेतील पात्रांमध्ये देवाणघेवाण झालेल्या पत्रांमधून उलगडत असतो. मात्र या प्रकारात लेखकाला अगदी क्वचितच घटनाक्रम ओढूनताणून एकत्र न आणलेला आहे अशा तर्‍हेच्या नैसर्गिकपणाचा आभास निर्माण करता येतो. परिणामी हाताळण्यास अगदीच क्लिष्ट असलेला हा साहित्य प्रकार कुणीतरी प्रभावीपणे हाताळला आहे असं अगदीच दुर्मिळरित्या पहायला मिळतं. चित्रपटांमध्येही सदर प्रकार यशस्वीपणे हाताळल्याचे क्वचितच दिसून येते. नोरा एफ्रॉनचा ‘यू हॅव्ह गॉट अ मेल’ (१९९८) हा चित्रपट त्यातल्या त्यात चटकन आठवणारा ठरतो. ‘द लंचबॉक्स’मध्ये बत्रा नेमक्या याच प्रकारातून उलगडत जाणार्‍या कथेद्वारे काही पात्रांच्या विश्वात डोकावतो.

इला (निमरत कौर) ही एक गृहिणी आहे. ‘पतीच्या हृदयाचा मार्ग पोटाद्वारे जातो’ या विचारावर अवलंबून राहणारी इला आपल्या नात्यातील वाढणारा दुरावा नाहीसा करण्याच्या प्रयत्नात आहे. ती राहते त्याच इमारतीत वरच्या मजल्यावर राहणार्‍या सौ. देशपांडेंकडून (भारती आचरेकरचा आवाज) पाककौशल्याचे सल्ले घेत तिच्या पतीसाठी स्वयंपाक बनवण्यात आणि फावल्या वेळात त्यांच्याशी आपल्या सुख-दुःखांची चर्चा करीत तिचा दिवस व्यतीत होत असतो. तर सध्या निवृत्त होण्याच्या मार्गावर असलेला साजन फर्नांडिस (इरफान खान) हा एक सरकारी कर्मचारी आहे. दरम्यान, करोडोंमध्ये एखादी चूक होणार्‍या मुंबईतील डब्बेवाल्यांकडून इलाने आपल्या पतीसाठी बनवलेला डब्बा हा चुकून साजनला मिळतो. सदर चूक इलाच्या लक्षात येऊन ती दुसर्‍या दिवशी डब्यामध्ये एक पत्र पाठवून समोरील व्यक्तीला झालेली घटना सांगते. हळूहळू दोघांमध्ये पात्रांच्या देवाणघेवाणीची मालिका घडून येते, आणि त्यांच्यात निर्माण होत जाणार्‍या तरल नात्याच्या निमित्ताने चित्रपट उलगडत जातो.

‘द लंचबॉक्स’च्या कथेच्या अगदीच छोटेखानी स्वरूपामुळे दिग्दर्शक बत्राला ही पात्रं, त्यांचा भोवताल अशा गोष्टी अधिक विस्तृतपणे टिपण्याची संधी मिळते. साजन, इला, तिची शेजारीण देशपांडे, साजन निवृत्त झाल्यावर त्याच्या जागी रुजू होणारा आणि सध्या त्याच्या कामाचे स्वरूप पाहण्यासाठी त्याच्यासोबत वावरणारा अस्लम शेख (नवाजुद्दीन सिद्दीकी) ही सारी पात्रं एक प्रकारे एककल्ली आयुष्य जगत आहेत. त्याचं प्रमाण कमी-अधिक असलं तरी शेवटी नवर्‍याच्या प्रेमाची उणीव भासणारी इला, पत्नीच्या मृत्यूपश्चात अलिप्त आयुष्य जगत जगापासून दूर राहणारा साजन, आपल्या नवर्‍याला गेली बरीच वर्षं पाहिलं नसावं असं भासणारी (आणि चित्रपटभर केवळ आवाज ऐकू येणारी) देशपांडे, अनाथ असलेला शेख हे सारेच एका विशिष्ट प्रकारचं, साचेबद्ध आयुष्य जगणारे आहेत.

साजन अगदीच मितभाषी आहे, तर एकांत खायला उठू नये म्हणून इतकं बोलतो की काय असं भासणारा शेख त्याच्या अगदी विरुद्ध आहे. वरवर पाहता स्वभाव, वय, अनुभव अशा अनेक पातळ्यांवर एकमेकांपासून कोसो दूर भासणारी ही पात्रं भावनिक, मानसिक पातळीवर एकाच तर्‍हेचा कोलाहल घेऊन वावरत आहेत. ती आपल्या भूतकाळाच्या आठवणींची साठवण करत आपला वर्तमान शक्य तितका साधा, सरळमार्गी असावा याच प्रयत्नात आहेत. इला तिच्या पतीच्या संभाव्य विवाहबाह्य संबंधांच्या शक्यतेचा मनोमन अस्वीकार करत आपल्या नात्यातील वाढती दरी कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. आपल्या वैवाहिक, वैयक्तिक जीवनात पूर्वीसारखे नावीन्य किंबहुना मसालेदारपणा यावा याकरिता ती आपल्या जेवणात शब्दशः मसाल्यांची भर घालू पाहत आहे. आपली पत्नी जिवंत असताना आपण तिच्या क्षुल्लक गोष्टींचेही निरीक्षण करीत बसायला हवे होते, असा मनोमन विचार करणारा साजन तिच्या आठवणीत व्याकुळ आहे. तर काहीही करण्यास अक्षम भासणार्‍या आणि वायफळ बडबड करतो आहे असं वाटणार्‍या अस्लमच्या अंतरंगात डोकावून पाहिलं तर आयुष्यभर एकाकीपण आणि उपेक्षा वाट्याला आलेली एक व्यक्ती आढळेल.

बत्रा नेमका याच पात्रांच्या अपरिपूर्णतेतून निर्माण झालेली त्यांची स्वभाववैशिष्ठ्यं आणि त्यांच्या जीवनाचा आलेख ‘द लंचबॉक्स’मधून समोर मांडत जातो. असं करत असताना त्याच्या चित्रपटांमध्ये मूर्त गोष्टी आणि अमूर्त भावनांना महत्त्वाचे स्थान लाभून त्यांच्या निमित्ताने पात्रांचं भावविश्व उलगडलं जातं. इथे सौ. देशपांडे मिळवत असलेल्या कॅसेट्स, त्यामध्ये वाजणारी गाणी, घरातील पंखे, साजनच्या घरातील टीव्ही, त्यावर तो पाहत असलेली मालिका, लोकल ट्रेन, आणि तिच्यात प्रवास करत असताना साजन-अस्लममध्ये घडणारे संवाद या आणि अशाच इतर गोष्टी चित्रपटातील पात्रांना आणखी सखोल बनवतात. या मूर्त-अमूर्त गोष्टींशी निगडित असलेल्या त्यांच्या भावना पुरेशा विस्तृतपणे समजतील हे पाहिलं जातं. ज्यामुळे चित्रपटातील पात्रांना अधिक मानवी छटा प्राप्त करून देईलशी भावनिक किनार प्राप्त होते. बत्राला शब्दच्छल करत भारतीय चित्रपटांच्या चाहत्यांना समजतील असे संदर्भ देण्याची एक सवय आहे. उदाहरणार्थ, इथे एका ठिकाणी ‘मेरा दिल भी कितना पागल हैं’ वाजतं, जे ‘साजन’ (१९९१) चित्रपटातील आहे. इरफान खानने साकारलेल्या याच नावाच्या पात्राची मानसिक परिस्थिती समर्पकपणे रेखाटणारं याहून वेगळं गाणं ते कुठलं असणार!

रितेश बत्राची कथानकाच्या मांडणीवरील पकड ही त्याच्या चित्रपटातील महत्त्वाचं अंग मानता येईल. इथे साजन-इलाच्या कथेला जोडणार्‍या स्वरूपात देशपांडेंच्या कॅसेट्स आणि लोकलमध्ये कानावर पडणारी गाणी यांची सांगड कशा रीतीने घातली जाते, किंवा दोघांच्या विश्वात घडणार्‍या बाबी एखाद्या समान धाग्याद्वारे कशा जोडल्या जातात हे त्याची या माध्यमाची जाण अधोरेखित करतात. बर्‍याच अपारंपरिक स्वरूपाची ही गोष्ट तो तितक्याच अपारंपरिक आणि अपरिपूर्ण असूनही परिपूर्णता आणि समाधानाची भावना निर्माण करणार्‍या वळणावर कशी आणून सोडतो हेही इथे महत्त्वाचं ठरतं.