घरफिचर्सआठवणींच्या हिंदोळ्यातील ‘आम्रपाली’

आठवणींच्या हिंदोळ्यातील ‘आम्रपाली’

Subscribe

‘आम्रपाली’ या चित्रपटातील गाणी स्मरणीय असली, तरी हे रसिक या चित्रपटातील गाणे संपल्यानंतर चित्रपटगृहातून उठून जात नसत. कारण? वैजयंतीमाला. चित्रपटातील काही गाणी आणि नृत्ये तिच्यावर चित्रीत करण्यात आली होती, तेही साहजिकच… नायिकाच होती ना ती! आम्रपालीची भूमिका तिनेच केली होती. नायक होता सुनील दत्त. जसा आम्रपाली संस्मरणीय आहे, तितक्याच तो बनताना घडलेल्या विविध घटना संस्मरणीय आहेत.

काही चित्रपट केवळ गाण्यांमुळे ध्यानात राहतात. आजकाल मात्र अशा चित्रपटांची संख्या जवळ जवळ नगण्यच म्हणता येईल. त्या, म्हणजे भारतीय सिनेसृष्टीच्या सुवर्णकाळात असे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले होते की, प्रेक्षक केवळ त्यातील गाण्यांसाठीच चित्रपटगृहात जात. म्हणजे त्यांना रस असे तो केवळ त्या चित्रपटातील गाण्यांचा. त्यातही ते चित्रपट एकदा नाही, तर अनेकदा बघत असल्याने त्यांना गाणी केव्हा आहेत हे बरोबर ठाऊक झालेले असे. त्यामुळे एक गाणे संपले की, चक्क चित्रपटागृहातून बाहेर जात आणि नंतर पुढच्या गाण्याच्या अगोदर बरोबर आत येत. (काहीजण म्हणत की त्यांना सिगरेट ओढण्यासाठी वेळ मिळावा म्हणून ही गाणी चित्रपटांत असत. अर्थात असे म्हणणार्‍यांना गाण्याचा कानच नाही, ते औरंगजेबाच्या पंगतीतले असावेत असेही गाण्याचे शौकीन म्हणत. ते काहीही असो) एवढ्यावरून बुजुर्गांना अनेक चित्रपटांची नावे आठवतील.

- Advertisement -

पण याला एक अपवाद होता. आम्रपाली या चित्रपटातील गाणी स्मरणीय असली, तरी हे रसिक या चित्रपटातील गाणे संपल्यानंतर चित्रपटगृहातून उठून जात नसत. कारण? वैजयंतीमाला. चित्रपटातील काही गाणी आणि नृत्ये तिच्यावर चित्रीत करण्यात आली होती, तेही साहजिकच… नायिकाच होती ना ती! आम्रपालीची भूमिका तिनेच केली होती. नायक होता सुनील दत्त. सिनेमा प्राचीन काळच्या पाश्वर्वभूमीचा साधारण इसवी सन 500 च्या सुमाराचा होता. लिच्छवी (सध्याचे बिहार राज्य) या लोक-राज्यातील नगरवधू आम्रपाली. तिची कीर्ती ऐकून आणि तिच्या रूपाची भूल पडून, शेजारच्या मगध राज्याचा सम्राट अजातशत्रू हा तिच्या प्रेमात पडतो आणि तिला मिळवण्यासाठी लिच्छवीवर चढाई करतो. युद्धामध्ये विजयी होऊनही त्याच्या पदरी मात्र अपेक्षाभंगाची निराशाच येते. आम्रपाली त्याला मिळतच नाही. कारण दरम्यानच्या काळात आम्रपालीची भेट गौतम बुद्धाबरोबर झालेली असते. आणि त्यांच्या प्रभावाने ती गौतम बुद्धांची अनुयायी झालेली असते. परिणामी अजातशत्रूच्या वाट्याला निराशाच येते. अशी ही साधारण कथा.

अशी ही त्या इतिहासकाळातील कथा. त्यामुळे कला दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक आणि वेशभूषाकार यांना आवडणारे तरी आव्हानात्मक काम होते आणि त्यांनी ते किती अचूकपणे केले होते ते आजही ती गाणी पाहताना कळते. पण कसोटी होती ती संगीतकारांची. कारण त्या काळाला साजेशी रागदारीवर आधारित गीते हीच कथेची मागणी होती. आणि त्यासाठी बसंत बहारचे संगीतकार शंकर-जयकिशन यांची निवड करण्यात आली होती. जाओ रे जोगी, तुम्हे याद करते करते, तडप ये दिन रात की आणि नाचो गाओ नाचो, धूम मचाओ नाचो (लता मंगेशकर आणि कोरस) ही चार गाणी शैलेंद्र यांचीच (फक्त एक गाणे हसरत जयपुरी यांचे होत, ते म्हणजे नील गगन के छाओ में.) इतके सांगितल्यावर ती प्रसंगानुरूप होती हे वेगळे सांगण्याची आवश्यकताच राहू नये.

- Advertisement -

महत्त्वाचे म्हणजे या आम्रपालीमध्ये सर्व गाणी लता मंगेशकर यांनीच गायली होती. पुरुष पात्राच्या तोंडी गाणेच नव्हते. (अपवाद नाचो गाओ नाचो, धूम मचाओ नाचो.. या कोरससह म्हटलेल्या गाण्याचा). आकाशवाणीवरील एका मुलाखतीमध्ये शंकर यांनी त्यांचा साथीदार जयकिशन बाबतच्या आठवणी सांगताना त्यांनी आम्रपालीमधील जाओ रे जोगी तुम जाओ रेऽ या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळची एक खास आठवणही सांगितली होती. गाण्यांच्या आठवणी सांगताना शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार शंकर यांनी ही गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले होते.

आम्रपालीच्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळची ही गोष्ट आहे असे सांगून शंकर म्हणाले. आम्ही दोघांनी मिळून चाली बांधत होतो. असेच एक गाणे होते… जाओ रेऽ जोगी तुम जाओ रेऽऽ. आम्ही त्याला चाल लावली आणि आम्हीच त्यावर खूश झालो होतो. जय तर बेहद्द फिदा होता त्या गाण्यावर आणि चालीवरही. संगीत नियोजनही पूर्ण झाले आणि गाण्याची खुमारी आणखीच वाढली. गाणार होती लता. म्हणजे दुधात साखर आणि केशरही.

आता त्या चालीवर वाद्यवादकांना सारे समजावून देऊन या गाण्याची तालीम घेण्यात आलीे. ती समाधानकारक झाल्यावर ध्वनिमुद्रणाची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली. मग सार्‍या वादकांची रिहर्सलही पुन्हा एकदा झाली आणि त्यावेळी लता रेकॉर्डिंग स्टुडिओत आली. तिलाही गाण्याची चाल ऐकवण्यात आली व नव्याने पुन्हा गाण्याची तालीम झाली. यावेळी लताही त्यात सहभागी झाली होती. सर्वजणच अगदी मन लावून काम करत होते, त्यामुळे गाणे अधिकच सुंदर वाटत होते. एकंदर हे गाणे संस्मरणीयच ठरणार हे नक्की होते. तालीम संपल्यानंतर अर्थातच थोडी विश्रांती झाली आणि आता खरोखर गाण्याचे ध्वनिमुद्रण करायची वेळ आली. सारे वाद्यवादक, ध्वनिमुद्रण करणारे असे सारेजण जय्यत तयार झाले. लताही माईकपाशी येऊन उभी राहिली. आता ध्वनिमुद्रण सुरू होणार अशा तयारीत सारे जण तयार होते.

लता खुणेनेच आता सुरुवात करायची ना, असे विचारत होती. मी होकार देण्याच्या क्षणभर आधीच जय माईकपाशी गेला. कुणालाच काही कळेना की आता अचानक काय झाले. सारेजण त्या दोघांकडेच पहात होते. तेव्हा जय गंभीरपणे लताला म्हणाला, लतादीदी ये गाना बहुत अच्छा है और आपभी उसे बहुत अच्छी तरह गाओगी इसमें कोई संदेह नही। फिर भी मेरी एक बिनती है। आता लता प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहू लागली. जय मात्र गंभीरपणेच पुढे म्हणाला ः दीदी, गानेके बोल है, जाओ रेऽ जोगी तुम जाओ रेऽ। तुम बस इतना करना, ये गाते वक्त मेरी ओर न देखना। आता मात्र लतासकट कुणालाच हसू आवरेना. असा होता जय.

आणखी एक खास बात या आम्रपाली सिनेमामध्ये होती. आम्रपालीच्या नृत्य कौशल्यामुळे सारेच भारावून गेलेले असतात. अशातच एक प्रसंग पटकथेमध्ये होता तो नृत्याच्या जुगलबंदीचा. तोही कोणत्या गायकाबरोबर, मधुबनमे राधिका नाचे रे या गाण्याचे वेळी कोहिनूर या चित्रपटात आहे, त्याप्रमाणे नव्हता तर दुसर्‍या नर्तकीबरोबरच ही जुगलबंदी होती. मग प्रश्न आला की यासाठी निवड कोणाची करावी. तोवर पद्मिनी इ. नृत्यात प्रवीण नायिका मागे पडल्या होत्या. त्यामुळे वैजयंतीमालाच्या तोडीची नर्तकी कोण हेच कुणाला सुचेनासे झाले होते. आणि एका सुपीक डोक्यातून कल्पना निघाली की आपण गोपीकृष्ण (झनक झनक पायल बाजे फेम) या ख्यातकीर्त नर्तकालाच पाचारण करावे. पण प्रश्न होता की, कथेप्रमाणे आम्रपालीची स्पर्धक दुसरी नर्तकीच होती.

गोपीकृष्ण स्त्रीवेष धारण करायला तयार होती का, यावर खल झाला आणि प्रत्यक्ष त्यांनाच विचारावे असे ठरले. त्यांच्या भेटीत त्यांना कथा समजावून सांगण्यात आली आणि त्या जुगलबंदीचे महत्त्वही सांगण्यात आले. म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आहोत असेही स्पष्ट करण्यात आले. त्यावर मग अडचण काय आहे, तुम्ही असे का चाचरत आहात असे गोपीकृष्णने विचारले. तेव्हा त्यांनी ही जुगलबंदी दोन नृत्यांगनामध्ये आहे, असे सांगितले व त्यासाठी तुम्हाला स्त्रीरूप धारण करावे लागेल, असे सांगितले.

गोपीकृष्णने काही काळ विचार केला. तसे पाहता स्त्रीरूप धारण करण्यासाठी त्याला काही फार मेहनत करावी लागणार नव्हती. त्याचे केस लांबच होते आणि नृत्याच्या वेळी तो स्त्रियांचे विभ्रम अप्रतिम करत असे. प्रश्न होता तो फक्त स्त्रीरूपासाठी स्त्रीची वस्त्रे परिधान करावी लागणार होती. त्यावर तो काही काळ अस्वस्थ झालेला दिसला. पण त्याने दीर्घकाळ विचार केला. प्रस्ताव घेऊन आलेले अस्वस्थ आणि चिंतित होते. त्यांनी पैशाची तुमची अट आम्ही पुरी करू असे सांगून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला; पण प्रश्न पैशाचा नाही, असे सांगून गोपीकृष्ण पुन्हा विचारात दंग झाला. आणि त्या चिंतनातच त्या बहुधा नटराजाची आठवण झाली.

तो अर्धनारी नटेश्वर स्मरणात आला आणि त्यामुळे तो एकदम निश्चिंंत झाला. आपले आराध्य दैवतही स्त्रीरूप धारण करते तर मग आपल्याला काय हरकत आहे, असा विचार त्याच्या मनात आला असणार. त्याने लगेच होकार दिला. मात्र तयारीसाठी आणि रंगीत तालमीसाठी तुम्हाला मान्यता द्यावी लागेल म्हणजे मला वैजयंतीमालाच्या कलेचा अंदाज येईल आणि तिचे नृत्यकौशल्यही पाहायला मिळेल. वैजयंतीमालाही त्यासाठी तयार झाली.

तिलाही गोपीकृष्णबरोबर नृत्य करण्याची संधी मिळणार होती आणि नायिका असल्याने ती जुगलबंदीत विजयी झालेलीच दिसणार होती. प्रेक्षकांना तिचे अधिकच कौतुक वाटणार होते. अशा प्रकारे दोघांचीही संमती मिळाल्यावर सारेजण निश्चिंंत झाले. नृत्यदिग्दर्शन गोपीकृष्णकडेच सोपविण्यात आले. त्यांनी काय करायचे हे त्यांनी वैजयंतीमालाला नीटपणे सांगितले. तसे सांगण्याची खरे तर आवश्यकताही फारशी नव्हती; पण प्रत्यक्ष जुगलबंदी ठरलेल्या वेळेतच पुरी करायची असल्याने ते आवश्यक होते आणि अशा प्रकारे त्या जुगलबंदीचे चित्रण झाले आणि ती चित्रपटाचे एक आकर्षण ठरली.
अशा या आम्रपाली चित्रपटाच्या आठवणी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -