घरफिचर्सअस्वस्थ करणारे प्रेम निशब्द

अस्वस्थ करणारे प्रेम निशब्द

Subscribe

‘निशब्द’ हा चित्रपट आपल्याहून बर्‍याच लहान असलेल्या मुलीच्या प्रेमात पडलेल्या साठीच्या गृहस्थाची कहाणी आहे. त्यात अचानक उद्भवलेल्या प्रेमप्रकरणाने त्याची झालेली घालमेल अमिताभने उत्तम प्रकारे दाखवली होती. विषय खळबळजनक वाटला तरी त्याने तो कोठेही थिल्लर होऊ दिला नाही. त्याने साकारलेला विजय साठीतला, निसर्गरम्य केरळमध्ये राहणारा छायाचित्रकार आहे. त्याच्या घराचा परिसरच असा आहे की, कोणालाही त्याची भुरळ पडावी.

सर्वांच्या मनावर दीर्घकाळ राज्य करत असलेला अभिनेता अमिताभ बच्चन याने नुकतेच अठ्ठ्याहत्तराव्या वर्षात पदार्पण केलेेे असले, तरी त्याची नाविन्याची ओढ आजही कमी झालेली नाही. तो अजूनही वेगवेगळ्या प्रकारच्या, विविध छटा असणार्‍या भूमिका साकारत असतो. मग ते चित्रपट यशस्वी होवोत वा अयशस्वी, त्याची त्याला फिकीर नसते. जुन्या दिग्दर्शकांबरोबरच तो नव्या पिढीतील, काहीतरी वेगळे करून दाखवायची इच्छा असणार्‍या, तरुण दिग्दर्शकांबरोबरही काम करायला तयार असतो. तेही स्वतःचे मोठेपण विसरून, दिग्दर्शक सांगेल ते प्रमाण मानून! मिळालेली भूमिका पडद्यावर किती काळ असणार आहे, याचा तो विचार करत नाही, तर ती किती प्रभावी आहे, आपल्याला ती साकारण्यासाठी काहीतरी नवीन करता येईल का, याकडे त्याचे लक्ष असते.

त्यामुळेच एकेकाळी त्याची केवळ ‘अँग्री यंग मॅन’ अशी जनमानसात तयार झालेली प्रतिमा आजही असंख्य चाहत्यांच्या स्मरणात असली, तरी तिचा प्रभाव आता मात्र त्याच्यावर कोठेच जाणवत नाही, एवढ्या विविध व्यक्तिरेखा तो ताकदीने साकारत असतो. त्यामुळेच त्याचा नवा चित्रपट पाहणे आजही आनंददायक असते हे निर्विवाद.

- Advertisement -

त्याच्या रुपेरी कारकिर्दीचाही आता सुवर्णमहोत्सव सुरू झाला आहे. के. ए. अर्थात ख्वाजा अहमद अब्बास यांच्या ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातील लहानशा भूमिकेने तो रुपेरी पडद्यावर प्रथम अवतरला आणि नंतर काही फारशा मबन्सी-बिर्जूयसारख्या न गाजलेल्या (खरे तर आपटी खालेल्या) चित्रपटांतही दिसला. अर्थात त्यांची नावेही त्याच्या चाहत्यांना पाठ असणार. त्यामुळे ती देण्यात अर्थ नाही. ‘रेश्मा और शेरा’ या चित्रपटात त्याने एका मूक-बधिराची भूमिका साकारली तेव्हा सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तरी तो खर्‍या अर्थाने स्टार बनला ‘आनंद’मधील बाबू मोशायच्या भूमिकेने. राजेश खन्नाच्या तोडीसतोड असे काम त्याने केले. नंतर त्याची चढती कमानच राहिली. शशी कपूरबरोबर त्याची जोडी अशी जमली की, लोक गमतीने तिची तुलना राज-नर्गिस, धर्मेन्द्र-हेमा मालिनी अशा जोड्यांबरोबरच करू लागले होते.

नंतर एक काळ गंभीर आला. जीवावरील अपघात आणि नंतर ए. बी.सी.च्या चुकलेल्या गणितामुळे आलेली आपत्ती. पण मग ‘कौन बनेगा करोडपती’मुळे त्याला करोडपती नाही, अब्जाधीश बनवले. या चढ उताराच्या काळात त्याला मोठा आधार होता, त्याच्या चाहत्यांचा. कोणत्याही काळात त्यांनी त्याला कधीच एकटे सोडले नव्हते. आजारपणात त्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना केल्या, शुभेच्छांचा वर्षाव केला होता तर नंतरही ते त्याच्यामागेच राहिले होतेे. त्यामुळे अद्यापही त्यांच्या ऋणातच असल्याचे मानतो. हे सारे रसिकांना ठाऊकच आहे, पण त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने थोडी उजळणी केली.

- Advertisement -

एका तपापूर्वी त्याने एका चाकोरीबाहेरच्या चित्रपटात काम केले होते. त्याचे नाव होते ‘निशब्द’. आपल्याहून बर्‍याच लहान असलेल्या मुलीच्या प्रेमात पडलेल्या साठीच्या गृहस्थाची ही कहाणी. त्यात या अचानक उद्भवलेल्या प्रेमप्रकरणाने त्याची झालेली घालमेल अमिताभने उत्तम प्रकारे दाखवली होती. विषय खळबळजनक वाटला तरी त्याने तो कोठेही थिल्लर होऊ दिला नाही. त्याने साकारलेला विजय (किती चित्रपटांत त्याचे हेच नाव आहे, चाहत्यांनाच ठाऊक!) साठीतला, निसर्गरम्य केरळमध्ये राहणारा छायाचित्रकार आहे. त्याच्या घराचा परिसरच असा आहे की, कोणालाही त्याची भुरळ पडावी. मग विजयसारखा कलाकार छायाचित्रे काढण्यातच हरवून गेला तर काय नवल! त्याची तरुण मुलगी रितू सुटीसाठी घरी येताना तिची मैत्रिण जिया, हिला बरोबर घेऊन आली आहे. जिया स्वच्छंदी आणि मोकळ्या स्वभावाची आहे. तिची घटस्फोटित आई ऑस्ट्रेलियात आहे आणि जिया शिक्षणासाठी भारतात आहे. आईबरोबर राहाणे तिला आवडत नाही. रितू आणि तिची छान मैत्री आहे.

आल्यापासून दोघींची भटकंती सुरू होते, तेव्हा तिला प्रथम विजय दिसतो. त्याने काढलेली छायाचित्रे पाहून ती रितूला मला नाही आवडली, असे सांगते. रितू खट्टू होते. पण काही बोलत नाही. नंतर एकदा जिया बागेत पाणी घालण्याच्या नळीने स्वतःवरच पाणी उडवून घेत असते, तिचे ते मोहक रूप विजयला भावते. तो तिची छायाचित्रे काढतो. तिला ते कळते. नंतर ती स्वतःची छायाचित्रे बघून खूश होते. विजयला ती मला ही कला शिकवा असे म्हणते. तिला त्याच्याबद्दल ओढ वाटू लागलेली असते. विजय म्हणतो, रितूनं तर म्हटलं होतं तुला छायाचित्रं काढणं आवडत नाही. ती म्हणते, मी खोटंच सांगितलं होतं.

भुलवून टाकणार्‍या निसर्गरम्य भागात त्यांची शिकवणी सुरू होते. जियाला त्याच्याबाबत वाढणारी ओढ वाढतच जाते. अगदी अनावर वाटावी एवढी. एका क्षणी ती विजयला सांगते की, तिचे त्याच्यावर प्रेम आहे. ती त्याला आपला बॉयफ्रेंड म्हणते. विजयलाही तिच्याबाबत आकर्षण वाटू लागते आणि त्यामुळे एकीकडे तो अस्वस्थही होत असतो. एकदा त्यांच्या संभाषणाच्या भरात ती विजयचे चुंबन घेते. रितूने ते पाहिलेले असते. विजयच्या वागण्यातला फरकही तिला जाणवलेला असतो. त्यामुळे तिला आता जिया नकोशी होते, कारण तिच्यामुळेच वडील दुरावतील अशी भीती तिला वाटते. ती तिला ताबडतोब निघून जायला सांगते. विजयची बायको अमृताही त्याच्या आणि रितूच्या बदललेल्या वागण्याने भांबावून जाते. ती तसे विजयला विचारते. तो अस्वस्थ होतो. नक्की काय करावे हे त्याला सुचत नाही. पण अखेर तो आपल्याला जियाबद्दल बरेच काही वाटते, याची कबुली देतो. त्यामुळे अमृताला सारा प्रकार उमगतो. त्यामुळे ती खचून जाते.

अचानक जियाचा मित्र तिचा वाढदिवस असल्यामुळे तिला भेटायला येतो. तो विजयला त्यांच्या प्रेमाबद्दल सांगतो. जिया सनकी आहे, तिच्याबाबत गैरसमज करून घेऊ नका इ.सांगतो. विजय अधिकच अस्वस्थ होतो. अमृताचा भाऊ श्रीधर त्यांच्याकडे येतो, तेव्हा त्याला सारेच बदलल्यासारखे दिसते. तो बहिणीला विचारतो. पण तिलाही काही नीट आणि स्पष्टपणे सांगता येत नाही. विजयशी बोलताना त्याला काय ते उमगते. तो सांगतो की, अरे, हे तिचं वयच असं आहे की एखादी लहानशी कृतीही खूप समाधान देऊन जाते. आवडते. पण ते लहान वयातील प्रेम असतं त्याला तितकं गंभीरपणं घ्यायचं नसतं. पण आता ते फार पुढं जाण्याआधीच थांबवायला हवं.

कारण यामुळे तुम्हा सर्वांचंच जगणं अवघड होणार आहे. विजयला ते पटते. बायको आणि मुलीचा विश्वास गमावल्याने तो सैरभैर झालेला असतो. त्याला असे का होते आहे, हे उमगते. तो जियाला जायला सांगतो. ती निघून जाते. पण आता अमृता आणि रितूचाही त्याच्यावर विश्वास राहिलेला नसतो. तो हताश होतो. तरीही जगत असतो. दररोजच त्याला त्याला आत्महत्या करावीशी वाटते, असे तो सांगतो. पण करत नाही. कारण तो मरणाला घाबरलेला नसतो. हळूहळू तो सावरतो कारण आता त्याला जियाच्याच आठवणींवर जगायचे असते.

शेवटी तो सांगतो, नंतर एकदा घरच्या मित्रमंडळींना जेवणासाठी बोलावलं होते. त्यांच्याबरोबर त्यांची तरुण मुलगीही होती. ती मला म्हणाली, अंकल, मला तुमचा परिसर दाखवा. अमृता आणि मी एकमेकांकडं पाहिलं. तिला जियाला विसरता येत नव्हते. कशी विसरणार?

असा हा छोटेखानी चित्रपट कोणत्याही प्रकारचा नेहमीचा मालमसाला नसलेला. पण त्याची जरूरच भासून नये एवढा तो कलाकारांनी प्रभावी केला आहे. निर्माता दिग्दर्शक राम गोपाल वर्माने केले आहे. त्याने अमेरिकन ब्यूटी (1999) आणि अनोखा रिश्ता (1986) या चित्रपटांपासून स्फूर्ती घेतली असे म्हणतात. काहींना तो नोबोकोव्हच्या लोलितावर आधारलेला वाटला. प्रत्यक्षात मात्र त्याचे साम्य आहे ते ब्लेम इट ऑन रिओ या चित्रपटाशी. त्यात फरक एवढाच, की तेथे दोन मुलींचे वडील त्यांना घेऊन सहलीला जातात आणि एक जण दुसर्‍याच्या मुलीच्या प्रेमात पडतो. तेथेही मित्र शेवटी त्याला सुनावतो आणि तो मार्गावर येतो. इ. कथानक आहे.

निशब्दची रचना वेगळ्या पद्धतीने करण्यात आली आहे. विजय खिन्नपणे बसलेला असून आपल्याच विचारात, खरे तर गतस्मृतींमध्ये हरवला आहे आणि चित्रपटभर अधून मधून त्याच्याच आवाजात त्याने केलेले निवेदन आपल्याला ऐकू येत राहाते. अधून मधून असलेल्या त्याच्या या निवेदनामुळे कथानक पुढे मागे असे झुलले तरी त्यात खंड तर पडत नाहीच, उलट ते पुढेपुढेच जाते व त्यामुळेच त्याचा परिणामही वाढला आहे.

हरवलेला भाव, निवेदनाचा बाज आणि वयाला शोभेशा संथ हालचाली यामुळे अमिताभने चित्रपट तोलून धरला आहे. वयपरत्वे क्षणात बदलणारा मूड त्याने झकास रंगवला आहे. लहान वयाच्या जियावरचे प्रेम जाणवल्यानंतरचा अस्वस्थपणा आणि त्याला समोरेजाण्यातील अपरिहार्यता, त्याने अचूक दाखवली आहे आणि श्रीधरने चुकीची जाणीव करून दिल्यानंतर पश्चात्तापाच्या भावनेने खचून उद्विग्न झालेला विजय तर सहज विसरताच येणार नाही. जिया बरोबरचे मोकळेपणाचे वावरणे, तिच्या प्रेमामुळे आलेली अस्वस्थता, मुलीवरचे प्रेम आणि समजूतदार बायकोबरोबरचे वागणे सहजपणे आलेले आहे.

अमृताच्या भूमिकेत रेवती आहे. जियाच्या भूमिकेत नवोदित जिया खान आहे. आणि तिने भमिका पूर्णपणे वास्तव वाटावी एवढ्या ताकदीने वटवली आहे. त्यासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. श्रद्धा आर्यने रितूचे मैत्रीण आणि वडिलांवरील प्रेम, आईबरोबरचे खास नाते, तसेच रागावल्यानंतर जियाबाबत वाटणारा तिरस्कार प्रभावीपणे दाखवला आहे. श्रीधरच्या भूमिकेत नास्सर शोभून दिसला आहे आणि छोट्याशा भूमिकेतही त्याची छाप आढळते. ऋषीच्या भूमिकेत पाहुणा कलाकार अफताब शिवदासानी आहे.

संगीत विशाल भारद्वाजचे आहे आणि गाण्यांपेक्षाही पार्श्वसंगीताचा परिणामकारकपणा जाणवतो. कथेचा मूड त्याने अचूक पकडला आहे. त्यामुळे वातावरण निर्मितीला खूपच हातभार लागला आहे. हिरव्यागार डोंगरांच्या सुंदर परिसराचे चित्रण छायाचित्रकार अमित रॉयने केले आहे. त्याबरोबरच कलाकारांचे भाव, त्यातींल बारकावेही नीट पकडले आहेत. या सार्‍यामुळे चित्रपट खिळवून ठेवतो. बॉक्स ऑफिसवर त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही आणि प्रेक्षकाच्या प्रतिक्रियाही संमिश्र होत्या. कारण कथेचा वेगळेपणा. तर तुम्हीच बघा आणि तुमचे मत ठरवा.

-आ. श्री. केतकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -