घरफिचर्सअंतर्यामी दृष्टी वळवणारे लेखन !

अंतर्यामी दृष्टी वळवणारे लेखन !

Subscribe

‘वधिकाच्या आठवणी’ ही त्रावणकोरच्या वधिकाच्या जीवनाची अस्वस्थ करणारी कहाणी आहे. ही कादंबरी वाचत असताना वाचक विलक्षण अस्वस्थ होत राहतो. जनार्दन पिल्लै या कादंबरीचे नायक आहेत. १९४० च्या मागेपुढे त्रावणकोर राजासाठी वधिकाच्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. स्वातंत्र्यानंतरच्या काळातही ते याच पदावर कार्यरत राहिले. तीन दशके त्यांनी या पदावर काम केले आणि पूजापूरच्या कारागृहात एकशे सतरा व्यक्तींना फासावर लटकावलं.

भाषांतरीत पुस्तकांनी मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले आहे. जीवनाचे न ऐकू आलेले आवाज, धडपड आणि कोलाहल, सुन्न करणारे अनुभव, तत्वज्ञानाची, भूमिकांची, बांधिलकीची ससेहोलपट, अपरिचित भावविश्व जगभरच्या लेखकांनी मांडले आहे, ही अभिव्यक्ती मराठी वाचकांपर्यंत पोहचली ती भाषांतरांमुळे. भाषांतरकार निव्वळ एका भाषेतील कथानक भिन्न भाषेत घेऊन जात नसतो किंवा सांस्कृतिक सेतू निर्माण करून थांबत नसतो तर तो भाषेला समृद्ध करत असतो. अनेक नवे शब्द, संकल्पना, विचारधारा यांना घडवत असतो. नवा आकार देत असतो. भाषांतरकार हा लेखकाला एका भिन्न भाषेत, भिन्न काळात पुनर्जन्म देत असतो.

शशि वारियर यांची ‘वधिकाच्या आठवणी’ ही कादंबरी वाचत असताना भाषांतरांनी मराठीला दिलेले भरीव योगदान पुन्हा लक्षात येत गेले. संध्या पेडणेकर यांनी या कादंबरीचा अत्यंत ओघवता आणि प्रवाही अनुवाद केला आहे.

- Advertisement -

‘वधिकाच्या आठवणी’ ही त्रावणकोरच्या वधिकाच्या जीवनाची अस्वस्थ करणारी कहाणी आहे. ही कादंबरी वाचत असताना वाचक विलक्षण अस्वस्थ होत राहतो. जनार्दन पिल्लै या कादंबरीचे नायक आहेत. १९४० च्या मागेपुढे त्रावणकोर राजासाठी वधिकाच्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. स्वातंत्र्यानंतरच्या काळातही ते याच पदावर कार्यरत राहिले. तीन दशके त्यांनी या पदावर काम केले आणि पूजापूरच्या कारागृहात एकशे सतरा व्यक्तींना फासावर लटकावलं. फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांना प्रत्यक्ष फासावर चढवणारा तो वधिक. हँगमॅन या इंग्रजी शब्दाचं वधिक हे मराठी रुप. अनुवादिकेनं हा शब्द या कादंबरीच्या निमित्ताने घडवला आहे. वधिक म्हणजे, वध करणारा, ठार मारणारा, मृत्यूची दोरी ओढणारा, कळीच्या दरवाजाआडच्या कुट्ट काळ्या आणि कधीही न संपणार्‍या अंधारात लोटणारा माणूस.

मराठीत या विषयावर पुस्तके नसावीत. कादंबरी तर नाहीच आहे. त्यामुळे मराठी वाचकांना ठाऊक नसणारं एक भयप्रद वास्तव ही कादंबरी आपल्यापर्यंत घेऊन येते. जनार्दन पिल्लै यांचे वडीलही राजाच्या पदरी वधिक होते. त्यांच्यानंतर वारसा हक्काने हे पद मोठ्या मुलाकडे जाणे शक्य होते; पण जनार्दनच्या वडीलबंधूंनी या कामासाठी नकार दिल्यानंतर वडिलांनी जनार्दनला विनंती केली. वधिक असल्यामुळे मिळणारे भत्ते आणि किमान वेतन यामुळे कुटुंब हालाकीच्या दिवसातही अन्नाला मोताद होणार नाही ही अभिलाषा, त्यामुळे जनार्दनने हे काम स्वीकारले आणि नंतर तीन साडेतीन दशके ते केले.

- Advertisement -

ही कादंबरी बहुपदरी आहे. प्रथम पुरुषी निवेदनाचा लेखकाने वापर केला आहे. मल्याळी भाषा लिहिणारा बोलणारा लेखक हा इंग्रजी प्रकाशकाच्या सांगण्यावरून वधिकाच्या संदर्भातील कादंबरी लिहिण्याचे स्वीकारतो, त्यासाठी तमीळ जाणणार्‍या मैत्रिणीला घेऊन शोध घेत दुरच्या गावातील जनार्दनला भेटतो. जनार्दनला स्वतःच्या आयुष्याची हकीकत कथन करण्याबद्दल सकारात्मक करतो. कुणा दुसर्‍याला आपल्या आठवणी सांगून त्याने त्या शब्दबद्ध करण्यापेक्षा आपणच आपले जीवन लिहावे असे जनार्दनला वाटते. त्यातून सुरू होतो जनार्दनचा लेखनप्रवास. स्वतःची गोष्ट लिहिणे हे वाटते तेवढे सोपे नाही असे जनार्दनला लवकरच लक्षात येते, म्हणून ‘काय लिहायचे?’ या प्रश्नावर लेखकाने सांगितलेल्या मुद्यांचा तो शोध घेऊ लागतो. एका विशिष्ट बिंदूवर जनार्दनला जाणवतं की आपण लेखनाच्या निमित्ताने जीवनाचा अत्यंत गंभीर विचार करू लागलो आहोत.

शाळेतील शिक्षक माश, पत्नी चेल्लामल, कॉफीवाला मुरुगन, दारू दुकानदार महालिंगम, गुरु रामय्यन, कारागृहातील कर्मचारी व अधिकारी, त्रावणकोरचा राजा या व्यक्तीरेखांमुळे कथानक पुढे सरकत जातं. लेखक आहेच पण त्याने केवळ प्रस्तावना लिहिली आणि उपसंहार केला. प्रत्यक्ष घडामोडी जनार्दन लिहीत आहे. त्याच्या सात वह्या तेवीस प्रकरणामधून लेखकाने मांडल्या आहेत. त्यामुळे एकाचवेळी वाचकाची दोन लेखकांशी भेट होत राहते. जनार्दन तमिळमध्ये लिहीत आहे. लेखक मल्याळी आहे. त्याने मूळ कादंबरी इंग्रजीत लिहिलेली आहे आणि वाचक म्हणून आपण ती मराठीत भाषांतर होऊन वाचत आहोत. भाषा चिंतनाचे तुकडे या कादंबरीतही भेटत राहतात. जनार्दनने एका ठिकाणी लेखकाला उद्देशून लिहिलं आहे. ‘तू माझी गोष्ट मला न वाचता येणार्‍या भाषेत लिहिणार आहेस, तेव्हा तिचा माझ्या भाषेत अनुवाद होईल यासाठी प्रयत्न कर’.

‘वधिकाच्या आठवणी’ एक प्रकारे जनार्दन पिल्लै यांची आत्मकथा आहे. एखाद्याला ठार मारणे हे कितपत उचित आहे? या प्रश्नाजवळ ते शोध घेता घेता येऊन पोहचतात आणि तिथे अडकून पडतात. ज्यांना आपण फासावर चढवलं ते आपल्याबद्दल काय विचार करत होते? ते खरोखरच दोषी होते का? केवळ पोटासाठी आपण त्यांना ठार मारलं का? असे अनेक प्रश्न त्याला पडतात आणि फारसा न शिकलेला जनार्दन या प्रश्नांचा एकाकी शोध घेत राहतो. जनार्दनाचे गाव, झोपडी, त्याचा प्रदेश, तेथील शेती, वातावरण आणि माणसे या कथानकात एवढे एकजीव झाले आहेत की त्यांचे स्वतंत्र अस्तित्व जाणवत नाही. हा ‘स्व’चा शोध एका क्षणी असह्य होतो तेव्हा जनार्दन लेखकाला आपल्या घरातून हाकलून देतो.

लिहिलेल्या वह्या आणि लेखकानं दिलेलं पेन त्याला परत करतो. पण पुढे लवकरच लक्षात येतं की स्वतःच्या आत सतत डोकावल्यामुळे आणि जीवनाचा पूर्वी कधीही केला नव्हता असा विचार केल्यामुळे आपण आता पूर्वीचे राहिलो नाहीत. पूर्वीसारखे आपण जीवनाला प्रतिसाद देऊ शकत नाहीत. जनार्दन पुन्हा लिहू लागतो आणि पुढे लवकरच त्याचा मृत्यू होतो. त्याने लिहिलेल्या वह्या मृत्यूपश्चात पत्नी चेल्लामल लेखकाला सुपूर्द करते. जनार्दनाचे विस्कळीत लेखन तसेच ठेऊन त्याला उपसंहार जोडून लेखकाने कादंबरी आकाराला आणली आहे.

‘वधिकाच्या आठवणी’ ही कादंबरी आपल्याला मृत्यूचं पदोपदी दर्शन घडवते. मृत्यू ही अशी एक जागा आहे जिथे असताना व्यक्ती खोटा असू शकत नाही. त्याचे डोळे आत वळलेले असतात. तो स्वत:च्या आत डोकावत असतो. शशि वारियर यांच्या या कादंबरीची दृष्टी ही अशी आत वळलेली आहे, अंतर्यामी डोकावणारी आहे. अनोखं चिंतन मांडणारी आहे. वेगळ्या विषयावरची टोकदार कादंबरी म्हणून ‘वधिकाच्या आठवणी’चा उल्लेख अपरिहार्य आहे.

-(प्रा. विद्या सुर्वे बोरसे, मराठी विभागप्रमुख, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, पंचवटी, नाशिक.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -