घरफिचर्सब्रह्मचर्याचे पालन, व्याधीमुक्त जीवन

ब्रह्मचर्याचे पालन, व्याधीमुक्त जीवन

Subscribe

ब्रह्मचर्य पालनाचा कॅन्सर प्रतिबंध दृष्टीने विचार करता विशेषत: स्त्रियांमध्ये गर्भाशयमुख कॅन्सर, योनीमार्गाचा कॅन्सर तसेच पुरुषांमध्ये शिश्न कॅन्सर अशा अवयवांच्या कॅन्सर प्रतिबंधासाठी आयुर्वेदानुसार सांगितलेल्या ब्रह्मचर्य पालनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

मागील सदरात आपण आरोग्य रक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या तसेच शरीररूपी इमारतीला आधारभूत अशा तीन उपस्तंभांपैकी आहार व निद्रा या दोन उपस्तंभांबद्दल माहिती जाणून घेतली. आज आपण ब्रह्मचर्य या तिसर्‍या उपस्तंभाबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

- Advertisement -

सर्वप्रथम आपण ब्रह्मचर्य या शब्दांचा अर्थ समजून घेऊ. ब्रह्म नाम ज्ञान, तस्य चर्या सा ब्रह्मचर्या। म्हणजेच ब्रह्म किंवा आत्मतत्वाच्या प्राप्तीसाठी आचरावयाची सत्वगुणप्रधान चर्या हा ब्रह्मचर्य शब्दाचा मूळ अर्थ आहे. मात्र व्यवहारात स्त्रीसमागमापासून अलिप्त राहणे म्हणजे ब्रह्मचर्य हाच अर्थ रुढ झाला आहे.

ब्रह्म शब्दाच्या अनेक अर्थापैकी ब्रह्म म्हणजे तप असा एक अर्थ आहे. अर्थात तपाचे आचरण करताना जे नियम पाळावे लागतात ते सर्व ब्रह्मचर्य शब्दाने गृहीत धरले पाहिजेत. गृहस्थाश्रमी ऋतुकाळी पत्नीशी अपत्यप्राप्तीसाठीच समागम करणे हेदेखील ब्रह्मचर्य पालनच आहे. ब्रह्मचर्य पालनामुळे मनाला अपूर्व आनंद प्राप्त होतो. कांती व चेहरा तेजस्वी होऊन वाणी ओजस्वी होते. शरीराची संपूर्ण अंग-प्रत्यंगे व संधीस्थाने दृढ होतात. व्यक्तिमत्व प्रभावी बनण्यास मदत होते.

- Advertisement -

खरे तर, आहार-निद्रा याप्रमाणेच शरीरातील रस-रक्त-मांसादी सर्व धातुंची परिपक्वता झाल्यानंतर स्त्री समागमाची इच्छा होणे ही देखील एक नैसर्गिक प्रेरणा आहे. आपल्या समाजात वर्षानुवर्षे हा विषय उपेक्षित राहिला आहे. बरेचदा पौगंडावस्थेतील मुला-मुलींमध्ये लैंगिक ज्ञानाविषयीची अनभिज्ञता असल्यामुळे अनेक प्रश्न उभे राहतात. आयुर्वेदाने मात्र याविषयी निर्भीड दृष्टीकोन बाळगून स्त्री-समागम विषयक अनेक नियमांचे मार्गदर्शन केले आहे. संतती मर्यादित राहील याची दक्षता घेऊनच गृहस्थाश्रमी ऋतुकाळी पत्नीशी समागम करावा, तहान व भूकेने पीडित असताना, दु:खी अवस्थेत, मल-मूत्र वेगांची संवेदना आली असताना मैथुन करू नये, मैथुनानंतर जननेंद्रियाची स्वच्छता राखावी इ. अनेक नियमांचे मार्गदर्शन केले आहे. व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे लक्षात ठेवून विधीयुक्त मैथुनकर्म करणे हे शरीर व मनाचे आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक आहे. अतिनिग्रहाने मैथुनेच्छा दाबून टाकण्याचा प्रसंग आल्यास त्याने मनाचा क्षोभ होतो. यामुळे मन:स्थिती बिघडून मानसिक विकार उद्भवू शकतात. अतिमैथुनही टाळणे आवश्यक आहे.

स्त्री-समागमाची इच्छा होणे हे नैसर्गिक असले तरी समागमाने आहारापासून रस-रक्तादी धातू उत्पत्ती क्रमाने निर्माण झालेल्या सारभूत शुक्र धातूचा क्षय होतो. शुक्र धातू हा ओज, कांती, बल देणारा असल्यामुळे जेवढ्या प्रमाणात शुक्र धातूचा क्षय होतो. त्याप्रमाणात या गोष्टींचा र्‍हास होणे उघड आहे. यासाठीच आयुर्वेदाने ब्रह्मचर्य पालनाबाबत सांगितलेल्या मार्गदर्शक नियमांचा अवलंब करणे हितकारक आहे. या नियमांच्या पालनाने जननेंद्रियाच्या अनेक आजारांना आळा घालणे सहज शक्य होईल.

सुखपूर्वक जीवन व्यतीत करण्यासाठी गृहस्थाश्रमात आयुर्वेदाने सांगितलेल्या मार्गदर्शक नियमावलीनुसार ब्रह्मचर्येचे पालन करावे. वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम या कालखंडात अपेक्षित असणारे ब्रह्मचर्य म्हणजे मोक्षासाठी करावयाचे आचरण होय. यासाठी आत्मस्वरुपात लीन होणे, सगळ्या भौतिक विषयांचा त्याग करणे, मैथुन-निग्रह करणे आवश्यक आहे. इंद्रिय-संयमन हा त्यावरील उत्तम मार्ग आहे.

ब्रह्मचर्य पालनाचा कॅन्सर प्रतिबंध दृष्टीने विचार करता विशेषत: स्त्रियांमध्ये गर्भाशयमुख कॅन्सर, योनीमार्गाचा कॅन्सर तसेच पुरुषांमध्ये शिश्न कॅन्सर अशा अवयवांच्या कॅन्सर प्रतिबंधासाठी आयुर्वेदानुसार सांगितलेल्या ब्रह्मचर्य पालनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार या कॅन्सर प्रकारांमध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचा (एच.पी.व्ही.)संसर्ग हे एक प्रमुख कारण सांगितले आहे.

एकापेक्षा अधिक व्यक्तींशी शारीरिक संबंध ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या (एच.पी.व्ही.)संसर्गास एक महत्त्वाचे कारण आहे. आधुनिक वैद्यकशास्त्र तसेच आयुर्वेदानुसार गर्भाशयमुखाच्या कॅन्सरमध्ये क्लॅमीडिया या जीवाणूचा संसर्ग, गणोरियासारखे शारीरिक संबंधातून संक्रमित होणारे आजार, प्रतिकारशक्ती कमी करणारे एड्ससारखे आजार, योनीची स्वच्छता न राखणे, अतिमैथुन, बहुप्रसव हीदेखील संभाव्य कारणे सांगितली आहेत. म्हणूनच आयुर्वेदाने ब्रह्मचर्य पालनासाठी सांगितलेल्या नियमावलीचे पालन करणे आवश्यक ठरते.

-वैद्य स. प्र. सरदेशमुख
-ए. व्ही. पी., पीएच्. डी. (आयुर्वेद)
-संचालक, इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, वाघोली, पुणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -