घरफिचर्सभीतीला द्या मूठमाती !

भीतीला द्या मूठमाती !

Subscribe

घाबरणेच आपल्या आत्मसन्मानाला पायदळी तुडवू देते. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हीच कथा... हीच कथा. म्हणून कुठल्याही देवादेवीपेक्षा, पूजाप्रार्थनेपेक्षा स्वतःसाठी स्वतः न भीता उभं राहणं महत्त्वाचं आहे. माराल तरी बेहत्तर- अन्याय सहन करणार नाही हे एकच तत्त्व असं आहे की ते मनुष्यत्व वाचवतं. आणि या भावनेला ज्ञानाची आणि सत्याची जोड असेल तर कुठलाही बापसत्तेचा धुरंधर नरेंद्र आपल्याला पराभूत करू शकणार नाही.

चीनच्या तियानानमैन चौकात आंदोलकांवर चिनी कम्युनिस्ट सरकारने घातलेल्या रणगाड्यांच्या ताफ्यासमोर एक तरुण एकटाच उभा राहिला. असं म्हणतात रणगाड्यांसमोर अडवायला उभे राहिलेले आणखीही काही तरूण होते. पण फोटो मात्र या एकट्याचाच जगापर्यंत पोहोचला. आपल्या जुलूमशाहीच्या खर्‍या बातम्या जगापर्यंत पोहोचू नयेत, वास्तव चित्र जगाला कळू नये याची कसोशीनी काळजी घेणारी सरकारे कॅमेरे, शब्द आणि आता इंटरनेट यांच्यावर बंदी घालतात. तरीही सत्य कधीतरी उसळी घेऊन बाहेर येतेच- त्याचेच हे साक्षात चित्र होते.

अमेरिकेतील काळ्या लोकांवर होणार्‍या भेदभावावर पहिला आवाज उठवणार्‍या दोन स्त्रिया- क्लॉडेट कोल्विन आणि रोझा पार्क्स. रोझा पार्क्स हे नाव प्रसिद्ध आहे- पण तिच्याआधीही क्लॉडेट कोल्विन या अगदी किशोरवयीन मुलीने बसमध्ये आपली जागा गोर्‍या माणसाला द्यायला खंबीर नकार दिला होता. खटला चालला आणि तो तिने जिंकला. पण खटला चालू असतानाच एका गोर्‍याने तिच्यावर बलात्कार केला, आणि त्यातून तिला गर्भ राहिला. कुमारी माता म्हणून तिचा खटलाच खराब करून टाकला जाऊ नये म्हणून तिचे नाव हेतुतः अप्रसिद्ध ठेवले गेले. रोझा पार्क्सलाही हे माहीत होते. रोझाने क्लॉडेटच्या विरोधाची ध्वजा पुढे नेली.

- Advertisement -

अशाच बेडर प्रतिकाराची आणखी एक प्रतिमा होती रॅचेल कोरी, वॉशिंग्टनच्या ऑलिम्पिया कॉलेजची अवघ्या २३ वर्षाची विद्यार्थिनी. तिचा खून झाला तेव्हा तिने गडद केशरी निऑन जॅकेट घातले होते. ह्यूमन शील्ड म्हणून काम करणारे कार्यकर्ते आपण स्पष्टपणे नजरेत यावं म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने असली जॅकेट्स वापरतात. इजिप्तच्या सीमेलगतच्या गाझा पट्टीतल्या राफाह या गावात रोजच घरांना भुईसपाट करण्याची कारवाई होत असे. १६ मार्च २००३ रोजी एका पॅलेस्टिनी डॉक्टरच्या घरावर ही कारवाई होणार होती. ती थांबवण्यासाठी जे आठ अमेरिकन तरुण उभे होते, त्यातच रॅचेल होती. ते समोरून येणार्‍या शस्त्रसज्ज डी-नाईन बुलडोझरच्या ड्रायव्हरला मेगाफोनवरून थांबण्याची विनंती करत राहिले. तो थांबला नाही तेव्हा रॅचेल त्याच्या मार्गात गुडघे टेकून बसली… तरीही तो न थांबता तिच्या अंगावरून तिला चिरडून पुढे गेला. या घटनेवर जेव्हा इस्राएली न्यायालयात खटला चालला तेव्हा इस्राएली न्यायालयाने रॅशेलचा खून हा केवळ एक दुर्दैवी अपघात होता असा निकाल देऊन इस्राएल सरकारला आणि बुलडोझरच्या चालकाला दोषमुक्त केले.

रॅशेल कोरीइतकाच धैर्यशील असा एक तरूण भारतातही ब्रिटिशांविरुद्ध उभा राहिला होता. बाबू गेनू…
ट्रक्स अडवून उभ्या राहिलेल्या तरुणांमधला बाबू गेनू ट्रक अंगावर आला तरीही हटला नाही. हे धैर्य सारेच दाखवणार नाहीत हे स्पष्टच आहे. अनेकजण त्याला आणि रॅशेलला अव्यवहारी म्हणूनही मोकळे होतील. पण त्यांच्या धैर्याचा एक थेंबतरी अंतरी जोपासावा.

- Advertisement -

अशा बेडरपणाच्या घटना जगभर अगणित असतील. तरीही त्या एकंदर मानवी लोकसंख्येच्या मानाने, त्यांच्यावर होणार्‍या अत्याचारांविरोधात आवाज उठवण्याच्या संबंधात कमीच आहेत.

हे आज या वर्षीचा हा स्तंभ संपत असताना मी का लिहिते आहे.

१९ डिसेंबर रोजी या देशातील लाखो लोक बेडरपणे नागरिकत्वाच्या कायद्याचा वापर दुही माजवण्यासाठी करणार्‍या भाजप सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले. आणि या लाखो लोकांत खूप मोठ्या प्रमाणात युवतीही होत्या. रविशकुमारने जंतरमंतर येथे घेतलेल्या मुलाखतीत जामिया मिलिया विद्यापीठाच्या विद्यार्थिनी खणखणीत बोलत होत्या. पोलिसांना घाबरत नाही आम्ही. तेही आमच्यासारखीच माणसे आहेत. आणि त्यांना सरकारने आमच्यावर सोडले तरीही आम्ही मागे हटणार नाही, विरोध थांबवणार नाही, इतकी स्वच्छ प्रेरणा त्यांच्या बोलण्यात होती.

घरातल्या बापमाणसांसमोर नजरही वर उचलून बघायचे नाही, बोलायचे नाही, असले संस्कार सर्व धर्मांतून, जातींतून, स्तरांतून झिरपवलेल्या कालबाह्य संस्कृतीला झुगारून देऊन आज देशाच्या कठीण काळात हुकूमशाही, दुहीवादी सत्ताधार्‍यांच्या मुजोरीला आव्हान देत आम्ही स्त्रियाही उभ्या आहोत.

२००६ साली सुरू झालेल्या मी-टू आंदोलनाचे पडसाद अजूनही येथे उमटत रहाणार आहेतच. बलात्कार होण्याचे निर्लज्ज समर्थन करणार्‍यांच्या देशात आज एक चुकीचा स्पर्श, एक हलकट नजर किंवा एकही अश्लील शेरा सहन करणार नाही, असे म्हणणार्‍या स्त्रियांचीही संख्या वाढत चालली आहे.

आजच एका मित्राने एक घटना व्यथित होऊन सांगितली. बसमध्ये बसलेल्या एका बाईला तिच्या मागे बसलेला एक पन्नाशीतला टिळेवाला माणूस कडेने हात लावत होता. ते या मित्राने पाहिले. त्याने कंडक्टरला बोलावून सांगितले आणि दाखवले. मग दोघांनी मिळून त्याला खडसावले- तर तो म्हणे मी कसा दिसतो ते पहा. मी असे करणे शक्य तरी आहे का (तेच ते- कपड्यांवरून ओळखता येतेच… हा युक्तीवाद). या दोघांनी सांगितले की वाटण्याचा काही विषय नाही, आम्ही स्वतः पाहिलंय. त्या बाईला त्या सोद्याने जोरात विचारलं मी काय केलं काय तुम्हाला. ती इतकावेळ गप्प राहिली यावरून त्याने ती घाबरट आहे हे ताडलं होतं. ती घाबरून म्हणाली- काय नाय काय नाय- काय बी केलं नाय. खेडवळ तरुण बाई होती ती. पण या दोघांनी तिला म्हटलं आम्ही स्वतः पाहिलं नि तुम्ही काही नाही सांगता. तिचे डोळे भरून आले. ती मान खाली घालून बसून राहिली. मग या दोघांच्या मदतीला गाडीतली दुसरी मुलगी आली. आणि म्हणाली धरून बदडा त्याला. मग बाकीच्यांनी साथ दिली आणि टिळेवाल्याला सगळ्यांनी बुकलला. बस थांबवून पोलिसातही दिला. त्या बाईनेही सांगितलं हात लावत होता. तिला मित्राने नंतर विचारलं तुम्ही आधी का नाही म्हणालात हो- तेव्हा म्हणाली- आम्ही साधी मान्सं- घाबरले मी. या तिच्या उद्गारांनी डोळ्यात पाणी आलं? नको. अंगार उतरू दे. कुणी खिळवली आपल्या हाडीमाशी भीती?

सावित्रीबाई फुल्यांनी सार्‍या भयावर मात करून हे निर्भय ज्ञानाचे संपुट आपल्या हाती दिलं… तरीही आपण स्त्रियांनी घाबरून राहण्यात भूषण मानायचे? भगतसिंगांपासून महात्मा गांधींपर्यंत, आंबेडकरांपर्यंत जीव गेला तरी चालेल पण माफीवीर होणार नाही हे कृतीतून दाखवून दिले तरीही आपण बुळबुळीत तडजोडी करत दिवस ढकलायचे?
हे घाबरणेच आपल्या आत्मसन्मानाला पायदळी तुडवू देते. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हीच कथा… हीच कथा…
म्हणून कुठल्याही देवादेवीपेक्षा, पूजाप्रार्थनेपेक्षा स्वतःसाठी स्वतः न भीता उभं राहणं महत्त्वाचं आहे. माराल तरी बेहत्तर- अन्याय सहन करणार नाही हे एकच तत्त्व असं आहे की ते मनुष्यत्व वाचवतं. आणि या भावनेला ज्ञानाची आणि सत्याची जोड असेल तर कुठलाही बापसत्तेचा धुरंधर नरेंद्र आपल्याला पराभूत करू शकणार नाही.

प्रत्येक समस्येच्या, प्रत्येक अन्यायाच्या मुळाशी एक खात्री असते, की अन्यायित व्यक्ती अखेर घाबरून गप्प रहाणार आहे.

बेशरम खोट्याला घाबरून सत्य गप्प राहील.

झुंडीच्या प्रचारापुढे दबून वास्तवाचा स्वर सुन्न पडेल.
तुरुंगाला घाबरून लोक गप्प रहातील.
पगार थांबेल म्हणून नोकरदार तडजोडी करतील.
मरायचीच पाळी असली तरीही कच्च्याबच्च्यांकडे पाहून शेतकरी तोंडं मिटतील.
पंचतारांकित जगण्याला मुकू म्हणून पत्रकार चुपचाप राहतील किंवा सत्ताधार्‍यांची कुत्री बनून भुंकू लागतील…
आपल्यावरही बलात्कार झाला तर या भीतीने सेंगरच्या गुंडांना विरोध करायला ना स्त्रिया धजावतील ना त्यांच्या घरचे.
आपल्याला आपले मित्रमैत्रिणी इस्लामचाटोइस्ट म्हणतील या भीतीने डोळ्यादेखत चाललेल्या दहशतवादाकडे विवेकी हिंदूही कानाडोळा करतील.
शाळा-विद्यापीठांत ज्ञानाचा बोजवारा उडत असतानाही आपल्याला नापास करतील या भीतीने तरुण विद्यार्थी खालमुंडी रहातील…
धैर्याविना स्त्रीपुरुष दोघेही देशात आणि जगात विनाश ओढवून घेतील.
म्हणूनच धैर्य दाखवून धर्मवेडातून होणार्‍या अन्यायाच्या डोळ्याला डोळा भिडवून सामोरे जाण्याचे बळ आपल्याला मिळो, याच सर्व विवेकी भारतीय स्त्रीपुरुषांना नववर्ष २०२० साठी सदिच्छा.
देशात अंधाराच्या अंताची सुरुवात झाली आहे- तो अंत व्हावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -