घरफिचर्सगाना सेंटी हो रहा हैं!

गाना सेंटी हो रहा हैं!

Subscribe

इतिहास हे सांगतो की लता मंगेशकरांच्या भावविवश सुरांतलं, ‘ऐ मेरे वतन के लोगो’ ऐकताना पंडित जवाहरलाल नेहरूही तितकेच भावविवश झाले होते आणि त्यांचे डोळे पाणावले होते. ते गाणं, त्यातले शब्द, त्यातलं कारूण्य याने त्यांचं मन हेलावून गेलं होतं...आणि हल्लीची ही तरुण पोरं म्हणताहेत, गाण्यात करूण भावना औषधालाही नको! गाना बहोत सेंटी हो रहा हैं !

काही दिवसांपूर्वीची गोेष्ट आहे, एका जिंगलला चाल लावून एक संगीतकार आपला लॅपटॉप घेऊन स्टुडिओत आला होता. त्याने लावलेली चाल त्या लॅपटॉपमध्ये बंदिस्त होती आणि त्याला ती चाल सगळ्यांना ऐकवायची होती. काही वेळातच त्याने आपला लॅपटॉप उघडला आणि जिंगलला लावलेली स्वत:च्या आवाजातली चाल ऐकवून दाखवली. संपूर्ण जिंगल संपताच त्याने आजुबाजूच्यांकडे विजयी मुद्रेने पाहिलं. पण आजुबाजूचे सगळे कोर्‍या चेहर्‍याने बसले होते. त्यांचा कोरा चेेहरा ही एकालाही ती जिंगल पसंत पडली नसल्याचं लक्षण होतं. एक-दोन मिनिटं शांततेत गेल्यानंतर एका कोर्‍या चेहर्‍याने बाकीच्या कोर्‍या चेहर्‍यांच्या वतीने त्या संगीतकाराला आपला जिंगलवरचा अभिप्राय सांगण्याचं धाडस केलं. ‘बिलकूल सेंटी ट्युन लगती हैं‘, तो संगीतकाराला म्हणाला. सेंटी म्हणजे भावनाप्रधान, करूण, हृदयाला स्पर्श करणारं.

खरंतर लहान बाळासाठीच्या ज्या प्रॉडक्टची जाहिरात करण्यासाठी आईच्या दृष्टीकोनातून जे शब्द लिहिण्यात आले होते त्याला ती चाल अतिशय योग्यच होती; पण त्या जाहिरातीच्या एजन्सीतल्या त्या संबंधित तरूण महाभागांंना ती चाल करूण आहे, मानवी मनाला, हृदयाला स्पर्श करणारी आहे हेच खटकत होतं. त्यांचा हा कोरा आणि कडवट अभिप्राय ऐकून तो संगीतकार निराशेने महेश भटसारखे आपल्या हाताचे कोपरे खाजवू लागला आणि जागच्या जागी गप्प बसला. दुसरं बिचारा करणार तरी काय होता तो!

- Advertisement -

खरंतर गेल्या सात-आठ वर्षांत असा प्रकार मी किमान पाच-सहा वेळा तरी जाहिरात क्षेत्रात काम करताना अनुभवला होता. जिंगलमधल्या सुरात किंचित जरी कारूण्य आलं तरी या नव्या मंडळींचं डोकं ठणकत होतं. मी एक-दोनदा या नव्या मंडळींना त्याबद्दल भीत भीतच विचारण्याचं धाडस केलं. त्यावरचं त्यांचं उत्तर होतं, आजकल ये चलता नही, वो सेंटी, आर्टी पिछले जमाने में चलता था!

मी मनातल्या मनात म्हटलं, हे असलं कोरडं स्पष्टीकरण देणार्‍या या मुलाच्या मनाला कधीच काही स्पर्शून गेलं नसेल का? त्याच्या आयुष्यात कधीच एखादा चटका लावून जाणारा प्रसंग घडला नसेल का? गाण्यातल्या एखाद्या करूण सुराचं याला इतकं वावडं का? की मागच्या काळात तसं एकही भावगंभीर गाणं याने ऐकलं नाही की चूकून याच्या कानावर पडलं नाही?
इतिहास हे सांगतो की लता मंगेशकरांच्या भावविवश सुरांतलं, ‘ऐ मेरे वतन के लोगो’ ऐकताना पंडित जवाहरलाल नेहरूही तितकेच भावविवश झाले होते आणि त्यांचे डोळे पाणावले होते. ते गाणं, त्यातले शब्द, त्यातलं कारूण्य याने त्यांचं मन हेलावून गेलं होतं…आणि हल्लीची ही तरुण पोरं म्हणताहेत, गाण्यात करूण भावना औषधालाही नको!

- Advertisement -

त्या एका काळात गाणं ऐकताना सोडा, गाणं गातानाही गायक-गायिकांचे डोळे ओलावायचे, त्यामुळे एखाद्या गाण्याचं रेकॉर्डिंग थांबवायला लागायचं. ‘कळत-नकळत’ या सिनेमातलं ‘नकळता असे मागून येते, सुखाची पुन्हा दु:ख चाहूल घेते’ हे अशोक पत्कींच्या संगीत-दिग्दर्शनातलं गाणं गाता गाता आशा भोसलेंना अचानक मध्ये रडू कोसळलं. ते कवी सौमित्र म्हणजे किशोर कदमनी लिहिलेलं गाणं होतं. डोळे पुसता पुसता आशाताई म्हणाल्या, त्या किशोरला म्हणावं, काळजाला डसणारे असे शब्द लिहू नकोस रे बाबा!…आशाताईंच्या मनाला गाता गाता स्पर्श करून गेलेले त्या गाण्यातले पुढचे शब्द होते – कितीदा हसुनी नव्याने जगावे, नवे रंग या जीवनाचे पहावे!…बरं, अशोक पत्कींनी त्या गाण्याला लावलेली चालही कवी सौमित्रच्या तरल शब्दांइतकीच तरल होती. त्यामुळे गाणं गाता गाता आशाताईंना राहवलं नाही. आसवांचा बांध फुटला आणि रेकॉर्डिंग काही काळ अपरिहार्यपणे थांबवावं लागलं. गाण्यातल्या कारूण्याचं काळजाला हात घालण्याचं ते सामर्थ्य होतं.

अशीच एक गोष्ट आहे किशोरकुमारच्या ‘कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन’ या ओतप्रोत आर्जवाने भरलेल्या गाण्याची. ‘कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन’ या पहिल्या ओळीनंतर वाजलेले बासरीचे सूर हे त्या गाण्यातल्या शोकात्मकतेचं पहिलं ठिकाण. ते सूरच मुळी काळीज कातरून टाकतात…आणि नंतर किशोरदांच्या उदासवाण्या स्वरात शब्द उमटतात-बिते हुए दिन जो मेरे प्यारे पल छिन. माणूस उतारवयाकडे झुकू लागला की त्याला त्याचे मागच्या काळातले, मागे पडलेले सोनेरी-रूपेरी क्षण आठवतात, हातातून वाळू निसटून जावी तसे निसटून गेलेले क्षण, त्यांचा अख्खा पटच त्याच्या डोळ्यासमोर उभा राहतो…आणि मग ते गेलेले, निसटलेले, हरवलेले गोडगुलजार दिवस कुणी तरी आपल्याला जसेच्या तसे परत करील काय, असं त्याला कधीमधी वाटत राहतं.

‘कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन’ हे त्याचं भावनांचं शब्दांकन. मला आठवतंय, एका ऑर्केस्ट्रात हे गाणं एका गायकाने किशोरदांचा तो दर्दभरा सूर जसाच्या तसा पकडून गायलं आणि त्यानंतर स्टेजवर एक अपंग व्यक्ती आली. तिने हे गाणं म्हणजे आपलं आयुष्य असल्याचं सांगितलं. ती व्यक्ती म्हणाली, मी तुमच्या सगळ्यांसारखा असा छान धडधाकट होतो. पण एका अपघातात माझा एक पाय गमावून बसलो. मी खरंतर एक अ‍ॅथलिट होतो, चांगला धावपटू होतो, जिल्हा पातळीवर पहिला क्रमांक पटकावायचो, पदकं मिळवायचो, मला खरंतर याच्याही पुढची मजल गाठायची होती; पण अपघातात पाय गमावून बसलो आणि सगळं स्वप्न ठप्प झालं. आज किशोरदांचं ‘कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन’ हे गाणं ऐकलं की मला मी भाग घेतलेल्या त्या स्पर्धांचे दिवस आठवतात. हे गाणं मला माझ्या आयुष्यावर बेतलेलं गाणं वाटतं.

पुढच्या काळात हेच गाणं श्रध्दांजली या कॅसेटमध्ये स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांनी गायलं. आपल्याला सोडून गेलेल्या सहकलाकारांनी गायलेली गाणी लता मंगेशकरांनी त्यांना श्रध्दांजली म्हणून गायची अशी ती संकल्पना होती. किशोरकुमारना श्रध्दांजली म्हणून लता मंगेशकरांनी हे गाणं निवडलं होतं. लता मंगेशकरांनी किशोरदांचं हे गाणं गाताना किशोरदांपेक्षा काहीसं मंद लयीत गायलं; पण त्या गाण्यातल्या त्या करूण भावभावना इतक्या आर्त सुरांत पोहोचवल्या की स्वत:चं मीपण गळून पडावं. विशेषत: अंतर्‍यावरून अस्थायीवर येताना ‘बिते हुए दिन जो हाय प्यारे पल छिन’ ही जी ओळ आहे ती गाताना त्यातला ‘हाय’ हा शब्द लता मंगेशकरांनी असा काही उच्चारला आहे की काळजाचं पाणी पाणी व्हावं. लता मंगेशकरांनी गायलेल्या त्या एका शब्दासाठी तर ते गाणं खरंच पुन्हा पुन्हा ऐकावं, ऐकत राहावं. त्या गाण्यातल्या त्या एका शब्दाच्या उच्चारणावर ते अख्खं गाणं ओवाळून टाकावं. हे गाणं सकाळी सकाळी ऐकल्यावर तर दिवसभर हे गाणं मनात तरळत राहतं. दरवळत राहतं. त्यातलं कारूण्य, ती उदासीनता मनावर पसरून राहते. हवीहवीशी वाटत राहते…आणि आजची तरुण मंडळी म्हणतात की गाणं सेंटी नको!

गेलेल्या दिवसांबद्दलची अशीच खंत व्यक्त करणारं मराठी भावगीतातलं गाणं म्हणजे ‘गेले ते दिन गेले.’ ते गाणं म्हणजे तर हळव्या भावनेचं ओथंबून येणं. श्रीनिवास खळेंच्या संगीतातलं, हृदयनाथ मंगेशकरांनी गायलेलं, पंडित भवानीशंकरांनी ‘वेगवेगळी फुले उमलली, रचुनी त्यांचे झेले, एकमेकांवरी उधळले, गेले ते दिन गेले’ अशा शब्दांत लिहिलेलं. हे गाणं ऐकल्यानंतर तर कुणालाही क्षणभर का होईना ते अंतर्मुख करणारं. हे गाणं त्या काळात तर ऐकणार्‍याच्या मनाला आरपार स्पर्शून गेलंच; पण आज इतकी वर्षे उलटून गेल्यावरही ऐकणार्‍याला तितकंच हळवं करून जातं. ज्यांनी ज्यांनी हे गाणं जेव्हा जेव्हा गायलं आहे तेव्हा तेव्हा प्रेक्षकांमध्ये हे गाणं एक अफाट शांतता, सन्नाटा पसरवून गेलं आहे. हे गाणं कालच्याच नव्हे तर आजच्याही पिढीला हवंहवंसं वाटतं, वाटताना तसं स्पष्ट दिसतं. आजचे बहुसंख्य तरूण हे गाणं आपल्या गायकीसाठी पसंत करतात…आणि गंमत पहा, त्याच काळातले काही तरुण आज म्हणतात, आमच्या तारुण्याच्या काळात कारूण्य नको!

एके काळी कारूण्याचा बादशहा मुकेशच्या गाण्यातल्या कारूण्याने कोट्यवधी मनं शहारायची. ‘मेरा नाम जोकर’ मधल्या, शिवरंजनी रागातल्या ‘जाने कहाँ गये वो दिन’ या गाण्याने अंगावर सर्रकन काटा यायचा. ‘संगम’मधल्या त्याच मुकेशच्या आवाजातल्या ‘दोस्त दोस्त ना रहा’ या गाण्यातला दर्द अंगावर यायचा. मुकेश म्हणजे कारूण्य, मुकेश म्हणजे दर्द हे समीकरण हळव्या लोकांमधलं हळवेपण जागवायचं. अर्थात, त्या दिवसांत कुणाची मनं गहिवरायची, कुणाची पावलं जड व्हायची, कुणाचा कंठ दाटायचा. आज ती प्रक्रियाच बंद झाली असेल तर कुणाला कशाला लागेल त्यांच्या गाण्यात कारूण्य! ते म्हणणारंच ना तुम्हारा गाना सेंटी हो रहा हैं…कोण काय करणार त्याला!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -