घरफिचर्सजात्यावरच्या ओव्या !

जात्यावरच्या ओव्या !

Subscribe

चार आठ दिवसांची रजा गावी घालवल्यानंतर मुंबईला निघताना, नंदाकाकी निदान दोन तीन बारकी गटली बांधून द्यायची, एका गटलीत कुळथाचं पीठ असायचं आणि दुसरीत ओले काजू नाहीतर कोकमं असायची. त्यापैकी कुळथाच्या पिठाच्या गटलीचा वास संपूर्ण घरात घमघमत असे. बॅगेतून ती गठली काढली की, त्या वासावरून ओळखायला यायचं की यात कुळथाचं पीठ आहे. या पिठावरून एक किस्सा आठवला. मुंबईत कुठेतरी मालवणी जत्रोत्सव भरला होता, बरोबरच्या चार-पाच मित्रांनी जत्रेतून कुळथाच्या पिठाची पाकिटं घेतली म्हणून मी पण घेतली. घरी येऊन ती पाकिटं आईकडे दिली. दुसर्‍या दिवशी “खयसून हाडलास कुळथाचा पीठ?” त्यावर जत्रेतून पीठ आणल्याचे सांगितलं.

” ह्या पिठाची पिटी म्वोप खाशा?”
” काय झालं पीठ बरोबर नाय का?”
” रे कसला पीठ! त्याका नाय चव ना रव”
“अगं पण लोक तेच नेऊन खातात ना?”

- Advertisement -

“लोका काय, त्यांनी जात्यावरच्या पिठाची चव म्हायती नाय म्हनान खाती, पण तुमी नकावडे असल्यापासून चुलती जात्यावरचा पीठ पाठवून देता ना!”

आईचं खरं होतं, नंदा काकी असो किंवा आता माझ्या गावच्या भावजया असो, आजही मुंबईत निघालो की जात्यावर दळून भाकरीचं आणि कुळथाचं पीठ पाठवतात. या जात्यावरच्या दळणावरून मला ओव्या आठवल्या.

- Advertisement -

मी लहान असताना, वळईत किंवा लोट्यावर झोपलो असताना, आतल्या खोलीतून जात्याची घरघर ऐकू यायची आणि त्याबरोबर जात्यावरच्या ओव्या ऐकू यायच्या, आमची वासंती तोरस्करिण तर

“राम राजो थोर कसो,
त्याना शितेक वनीं धडल्यानं
कृष्ण देव थोर राजो त्यांना
सोळा सहस्त्र वरीलयान”

अशी ओवी आपल्या गोड गळ्याने म्हणायची. या ओव्यामध्ये पुरुष (नवरा) कसा असावा, सून कशी, भाऊ कसा, सासर-माहेर कसं असावं, त्या शेतकरी-कष्टकरी मायबहिनी कोणतं दुःख सोसत होत्या, त्यांच्या वेदना काय होत्या या जात्यावर बसल्या की सुचत होत्या. या जात्याला त्या आपला जवळचा नातेवाईक मानत होत्या, घरात-शेतात-रानात या स्त्रियांचा इतका वावर असायचा की त्यांना शेजारी जाऊन कोणाकडे मन मोकळं करायलादेखील सवड नसायची. रांधा, वाढा आणि उष्टी काढा यातच त्यांचे दिवस जात होते, मग आपलं सर्व मन, वेदना त्या जात्यापुढे व्यक्त करत.

” जाता दगड दगड
त्याका नाय डोळे-त्वांड,
जाता दगड दगड
पण त्याका मोटा मन”

जात्याला कान, डोळे जरी नसले तरी त्या जात्याला मोठं मन आहे याबद्दल त्या माऊलीला खात्री असे. हे लोकसंचित या अशिक्षित माय माऊलींनी आपल्या जबरदस्त स्मरणशक्तीच्या जोरावर जपलं. वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या ते हे संचित जपत आल्या आहेत.

सकाळी जात्यावरची घरघर ज्या घरातून ऐकू येई ते घर सधन म्हणावे असाच हा रिवाज होता, सासुरवाशीण स्त्री दूरच्या गावी असणार्‍या आपल्या आईबाबांना आपण सुखी आहोत, एक समृद्ध घरी आहोत हे सांगण्यासाठी या जात्याच्या घरघरींचा दाखला देते, ते एका ओवीत म्हणते

“आये घरघर ऐकुक येता
माझ्या घरच्या जात्याची
गुदस्तापरी या वर्षी भात
पिकला खनडी दोन खनडीची”

घरात एकटी स्त्री असली की ती अशा खूप ओव्या एकटीच म्हणे त्यात ती राग, प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा, पती जर दूर कुठे नोकरीच्या निमित्त बाहेर असेल तर विरहवेदना या ओवीत येत.

” देवा रामेश्वरा तूच
त्याचो पाटीराखो.
पोटा-पाण्याक लेक गेलो
हाती पायी त्याक राख.

हाती पायी धड येवो
बाबलो तुझो गुणाचो
नारळ-कपडो ठेवीन
सोमवार येतो मानाचो”

आपला मुलगा परदेशी शिक्षणासाठी, नोकरीसाठी गेला असता ती ग्रामीण स्त्री आईची वेदना या जात्यावरच्या ओवीतून व्यक्त करते. या ओव्यांना एक सांस्कृतिक संदर्भ आहे, त्यात काव्यशक्यता असतीलच असे नाही, पण एक जे आहे त्यात नक्की एक देशीसंस्कृती आहे. या स्त्रिया फार शिकल्या नव्हत्या; पण आपल्या प्रदेशाची संस्कृती तेथील घरंदाजपणा या ओव्यातून त्या व्यक्त करत होत्या, या ओव्यांमध्ये सहजता होती, त्या सहजपणाला लय, गेयता होती. या स्त्रियांना काव्य छंद माहीत नव्हते; पण या ओव्या मात्र प्रचंड लिरीकल (छंदोबद्ध) आहेत याचं विशेष आश्चर्य वाटतं.

काही जात्यावरच्या ओव्यांमध्ये गंमतशीरपणा आहे. म्हणजे जास्तच दळण दळायला एकीला सोबत म्हणून दुसरी आली की दोघींचा संवाद हा ओवीतून प्रकट झाल्याचे आढळून येईल.

१- तुझा सासर कसा ग्ये
तुझा सासर कसा ?
२- माझा सासर थोरला ग्ये
माझा सासर थोरला.
१-तुझो घोव कसो ग्ये
तुझो घोव कसो
२ माझो घोव असा
गडी सात मण
गडी सात मण
१ तुझी सासू कशी
ग्ये तुझी कशी?
२. सासू माझी खमकी
ग्ये सासू माझी खमकी
एक डोळो पते रयात
दुसरो डोळो रवळेत

अशाप्रकारे दोन सासुरवाशीण स्त्रियांमध्ये ओवीच्या रूपाने संवाद चालायचा. पण हा संवाद म्हणजे एकीने विचारावं आणि दुसरीने उतरावं अशाप्रकारे चालायचा.

काही ओव्यामधून सण-वार- तिथी- महिने सहजपणे प्रकट होताना दिसतात. उदाहरण द्यायचे झाले तर

सावणात कृष्ण येता
भादव्यात गणपती
मागोमाग म्हाळवस
आणि मग दियाची दिवाळी।

हे जसे सण-वारांच्या बाबतीत असते तसेच कोण कोण पाहुणेमंडळी, मुंबईचे चाकरमानी कधी गावी येणार, हेदेखील

ओवीतून सांगताना
सावणात बेबी येता
पोवत्याच्या पुनवेक
भादव्यात शिरी येयत
टकलेवर गणू घेवणं
दिवाळेक आत्याबाय
आणि शिमग्याक मामीबाय

या ओव्यांनी त्या काळातल्या माय-बहिणीच्या कष्टकरी आयुष्यात जगण्याची उमेद आणली, वर्षानुवर्ष चालत आलेलीे ही गाणी, ही पदं, या ओव्या या त्यांच्या सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य भाग होता आणि राहिलं.

आज खेडेगावातसुद्धा फ्लोअर मिल्स झाल्यात. त्यामुळे जात्यावर बसून कोणी दळत नाही. त्यामुळे जात्यावरच्या ओव्या इतिहासजमा झाल्या. आजही तळकोकणात आणि इतर ग्रामीण भागात वृद्ध स्त्रिया आहेत ज्यांनी या ओव्या, हे लोकसंचित जपून ठेवलंय. गरज आहे हे त्यांना बोलतं करण्याची. कोण म्हणेल की आज जातं नाही, मग जात्यावरच्या ओव्या तरी कशाला हव्या? पण एक गोष्ट लक्षात येतेय का! की काळाच्या ओघात गतिमान होत असताना आमचं लोकसंचित उपेक्षित होत आहे. आपल्या आधी तीस-चाळीस वर्षांपूर्वी ज्या संचिताच्या बळावर स्त्रियांनी आपलं आयुष्य काढलं तो धागाच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जे ज्ञानेश्वरीच्या बाबतीत म्हणतात की “एकतरी ओवी अनुभवावी” तसेच या ओव्यादेखील एक विलक्षण अनुभव आहे हे मात्र खरे!

– प्रा. वैभव साटम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -