घरफिचर्सहेरखात्याच्या पुस्तकाने खळबळ

हेरखात्याच्या पुस्तकाने खळबळ

Subscribe

पाकच्या हेरखात्याचे माजी प्रमुख असद दुर्रानी आणि भारताच्या हेरखात्याचे माजी प्रमुख दुलाट यांच्या एका पुस्तकाने आजकाल पाक लष्करी नेतृत्वाची झोप उडवलेली आहे. भारतातही त्या पुस्तकावर उलटसुलट प्रतिक्रिया आलेल्या आहेत. दिर्घकाळ लपवलेले तपशील अशा पुस्तकात येत असतात आणि साहजिकच त्यातला थोडासा भाग जरी चव्हाट्यावर आला, तरी खळबळ माजवली जात असते. त्यात पुन्हा या पुस्तकाचे दोन्ही लेखक आपापल्या देशाच्या हेरखात्याचे माजी प्रमुख आहेत आणि त्यांनी अनेक बाबतीत एकमेकांच्या विरोधात डावही खेळलेले असतील. पण कितीही शत्रू देशाचे प्रतिनिधी असले, तरी त्या दोन व्यक्ती आहेत आणि त्यांच्यात कुठलेही व्यक्तिगत भांडण असत नाही. हेरखात्याचे काम प्रामुख्याने आपल्या देशाचे जागतिक हितसंबंध जपण्यासाठीच्या धोरणाशी निगडीत असते. त्यामुळे कुठल्याही परदेशाला कायमचा शत्रू वा मित्र मानायची जागा तिथे उपलब्ध नसते. साहजिकच काही बाबतीत अशा हेरखात्यांना आपसात हाणामाऱ्या कराव्या लागत असतात आणि त्याचवेळी अन्य काही बाबतीत एकमेकांशी हात मिळवूनही काम करावे लागत असते. त्यामुळेच त्यांच्यातले भांडण कायमस्वरूपी नसते. व्यवहारत: असे लोक नेमके काय काम करीत असतात, त्याची त्यांच्या वरिष्ठ व सरकारलाही कल्पना नसते. ज्यांच्या आयुष्यातला उमेदीचा कालखंड अशा कामात जातो, त्यांना उर्वरित आयुष्यातही त्यापासून अलिप्त होता येत नाही, की त्यातून निवृत्त होता येत नाही. त्यांचे देशही त्यांच्या अनुभवाचा वेगळ्याप्रकारे उपयोग करून घेतच असतात. साहजिकच आज दुर्रानी व दुलाट अशा दोन लेखकांचे हे पुस्तक खळबळ माजवणारे असले, तरी त्याचा नेमका उद्देश स्पष्ट होत नाही. त्यातून कोणाला काय साधायचे आहे, त्याचा अंदाजही अवघड आहे. शिवाय पाक लष्करी नेत्यांनी इतके विचलित होण्याचे कारणही लक्षात येत नाही.

कारगिल युद्धात पाकिस्तानची फसगत
दुर्रानी पाक हेरखात्याचे माजी प्रमुख आहेत आणि दुलाट हे भारतीय हेरखात्याचे माजी प्रमुख आहेत. दोघांनी संयुक्तपणे या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. त्यामध्ये हुर्रियत हे कसे पाकिस्तानचे पिल्लू आहे आणि कारगिल युद्धात पाकिस्तानची कशी फसगत झाली, त्याचा तपशील आला आहे. पाक हेरखात्याला भारताच्या पंतप्रधान पदावर मोदीच असायला हवे किंवा हिंदुत्ववादी पक्षच हवा होता, असाही गौप्यस्फोट दुर्रानी यांनी केला आहे. एवढ्या कारणाने पाक लष्कराने विचलित व्हायचे काही कारण दिसत नाही. कारण असे आरोप यापूर्वी अनेकदा झालेले आहेत आणि त्याला टोलवाटोलवीची उत्तरे पाकने यापूर्वीच दिलेली आहेत. प्रामुख्याने पाकच्या अशा उत्तरांचे खंडन भारताने वारंवार केलेले असले, तरी त्याचे समर्थन करणारा एक बुद्धीवादी वर्ग भारतात आहे. त्याच्यावर पाकचे हस्तक असल्याचा आरोप सरसकट झालेला आहे. प्रामुख्याने मणिशंकर अय्यर वा पाकिस्तानशी बोलणी करावीत, असा आग्रह धरणारा वर्ग आपल्याकडे आहे. त्यासाठी पाक राजदूताच्या प्रोत्साहनाने भारतावर दबाव आणणारा हा वर्ग अलिकडे उजळमाथ्याने पुढे आलेला आहे. गुजरात निवडणूक काळात मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी पाक राजदूतसह अनेक लोकांच्या भेटीगाठी झाल्या होत्या आणि त्याला काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, यशवंत सिन्हा यांच्यासह अनेकांवर तेव्हा गंभीर आरोप झाले होते. त्यातही दुलाट यांचा समावेश होता आणि आता या पुस्तकाच्या लेखकात दुलाट यांचाही सहभाग आहे. म्हणूनच हे प्रकरण वेगळाच प्रकार वाटतो. त्या पुस्तकाचा हेतू व त्यातला वादग्रस्त तपशील हे मोठे कोडे वाटते. त्यातून मिळणाऱ्या माहितीत उत्तरे कमी व प्रश्न अधिक निर्माण होतात. मात्र दोन देशांतील शत्रूत्व कमी होऊन त्यात सौहार्द निर्माण होण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा अशा लोकांचा दावा आहे.

- Advertisement -

भारतातले पाकप्रेमी लपलेले नाहीत
मजेची गोष्ट अशी असते, की सरकारी इतमाम बाजूला ठेवून अशी मंडळी जमत असतात आणि चर्चाही करीत असतात. त्यांची काही जाहीर विधाने व वक्तव्येही येत असतात. पण त्यातला तपशील या पुस्तकातून व्यक्त झालेला नाही. उदाहरणार्थ, मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानात जाऊन मोदी हटावची भूमिका राजरोस मांडलेली होती. भारतात मोदी हटवले जावेत आणि त्यासाठी पाकिस्तानने मदत करावी, असे स्फोटक विधान अय्यर यांनी केले होते. त्यासाठी त्यांच्यावर पाकचे हस्तक म्हणून आरोप झालेला आहे. त्याच मणिशंकरच्या घरी झालेल्या मेजवानीला हजर राहिलेले दुलाट, आता या संयुक्त पुस्तकात मात्र वेगळेच कथन करीत आहेत. अय्यर यांना मोदी नको असतील, तर पाक हेरखात्यालाही मोदी नकोच असायला हवे ना? मग या दोन गोष्टीतली तफावत कोणी उलगडून सांगायची? भारतातले पाकप्रेमी आजकाल लपून राहिलेले नाहीत. ते पाकचे हस्तक असले तर भारत सरकार त्यांच्या विरोधात कुठली कारवाई कशाला करत नाही? त्याचे कारण सरकारी कारवाई कायद्याच्या चौकटीत बसून करावी लागते. नुसत्या आरोपाने भागत नाही, तर पुराव्याच्या मार्गाने कारवाईची अंमलबजावणी होत असते. म्हणून मग अय्यर काय बोलतात, याला महत्त्व नसून प्रत्यक्षात व्यवहार कुठले होतात, याची दखल घ्यावी लागत असते. आताही बघितले तर सगळाच उफराटा प्रकार पुस्तकाने समोर आणला आहे. अय्यर मोदींना हटवण्यासाठी पाकची म्हणजे पर्यायाने पाक हेरखात्याची मदत मागत होते आणि त्याच हेरखात्याला भारतात मोदीच पंतप्रधान राहण्यात पाकचे हित दिसते आहे. या दोन परस्पर विरोधी तपशीलाची सांगड कशी घालायची? कुठेतरी गफलत आहे ना? म्हणून मग असे पुस्तक वा अशा मेजवान्या, यांच्या आयोजनातून कोणाला काय साध्य करायचे असते, त्याचा शोध घेणे अगत्याचे होऊन जाते.

काश्मीर धोरणावरही आसूड ओढले
‘द स्पाय क्रॉनिकल्स’या पुस्तकाच्या निमित्ताने जो गदारोळ झालेला आहे, त्यातल्या खळबळीकडे दुर्लक्ष करून नेमक्या गोष्टी बघितल्या, तर काय दिसते? मागल्या दोनचार वर्षांत म्हणजे मोदी सरकार आल्यापासून जे पुरोगामी व काँग्रेसचे नेते पाकिस्तानला झुकते माप देणाऱ्या जाहीर भूमिका घेत होते, त्यांना या पुस्तकाने मोठा धक्का दिलेला आहे. पण गंमत अशी आहे, की त्यापासून भारत सरकार वा भारतीय हेरखाते चार हात दूर आहे. पण भारतीय हेरखात्याने माजी प्रमुख दुलाट त्यातला एक हिस्सा आहेत. गेली दोनतीन वर्षे त्यांनी उत्साहाने अशा काँग्रेसी पुरोगामी उचापतीमध्ये सहभाग घेतला आहे. उघडपणे मोदी सरकारच्या पाक धोरणावर टीका केलेली आहे. काश्मीर धोरणावरही आसूड ओढलेले आहेत. पण पुस्तकातले दुर्रानींच्या मदतीने सादर केलेले तपशील मात्र अय्यर आदींच्या भूमिकेला छेद देणारे आहेत. मग शंका येते, की यातला हेतू पाकला उघडे पाडण्याचा आहे की काय? कारण त्या पुस्तकाने पाक सेना व पाक हेरखातेच सर्वाधिक विचलित झालेले आहे. पण त्यांचेच इथले समर्थक हस्तक त्यात पुढाकार घेणारे आहेत. याचा सरळ अर्थ असा, की इथल्या पाकप्रेमी, पाकधार्जिण्या वर्गामध्ये कोणीतरी घुसखोर आहे आणि त्याला पाकमधील भारतप्रेमींचे प्रोत्साहन मिळालेले आहे. भारतातल्या पाकप्रेमी कारवायांना शह देण्यासाठीच अशा पुस्तकाची निर्मिती झाली आहे काय? नकळत पाकप्रेमी वर्गाकडूनच ते काम उरकून घेण्यात आले आहे काय? कारण या पुस्तकाने अय्यर यांच्या लाडक्या हुर्रियतचा मुखवटा फाडला आहे आणि पाक हेरखात्याचे पितळ उघडे पाडलेले आहे. हे काम अशा वर्गात व गटात खूप आत घुसून बसलेल्या कोणा ‘डीप असेट’चे असू शकते आणि म्हणूनच तो डीप असेट कोण, त्याविषयी कुतूहल निर्माण होते. ‘स्पाय क्रॉनिकल्स’ दिसायला निर्जीव पुस्तक आहे. पण व्यवहारात तो अतिशय स्फोटक असा बॉम्ब आहे ना?

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -