घरताज्या घडामोडीएका हिंदू शेड्यूल्ड कास्ट भक्ताची गोष्ट

एका हिंदू शेड्यूल्ड कास्ट भक्ताची गोष्ट

Subscribe

अनुसूचित जातीच्या एका मोदी भक्ताची गोष्ट...

प्रदीप (नाव काल्पनिक आहे) एक सर्वसामान्य तिशीतला तरुण. वाणिज्य शाखेतून कसाबसा ग्रॅज्यूएट पूर्ण केलं. मग डेटा एंट्री ऑपरेटर, ऑफिस असिस्टंट असं करत एका मार्केटिंग कंपनीत बॅक ऑफिसला चिटकला. मुंबईतील एका स्लम वजा चाळीत मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रदिपचा आयक्यू हा जेमतेम म्हणजेच कोट्यवधी भारतीयांएवढा. आता भारतीय म्हटलं की धर्म आलाच, त्यानंतर आली जात, प्रदेश, भाषा. त्याशिवाय तो भारतीय कसा? म्हणजे संविधानात वगैरे आपण भारतीय आहोत वगैरे ठीक आहे. पण, सर्वसामान्यपणे धर्म आणि जातीशिवाय आपल्याकडं काम होतं नसतं. तर प्रदीप हा हिंदू. जात स्पेसिफाय करत नाही. संविधानाने प्रवर्ग बनवलेल्या शेड्यूल्ड कास्टमध्ये तो येतो. प्रदिपला जेव्हा जात आणि धर्म यापैकी एकाची निवड करायची असते तेव्हा तो धर्माला प्राधान्य देतो. कारण जातीचा उपभोग त्याने कॉलेजच्या अ‍ॅडमिशनला घेतला तेवढाच काय तो. जेमतेम बुद्धिमत्ता असल्यामुळे नोकरी वगैरेत जातीचा उपयोग नव्हता. चला एवढं इंट्रोडक्शन खूप झालं. आता गोष्टीची सुरुवात करुया.

तर गोष्टीच्या शीर्षकात भक्त असा शब्द आलाय. प्रदिप शेड्यूल्ड कास्ट हिंदू होताच. पण, २०१४ पासून तो भक्तही झाला. अर्थात देवाचा भक्त होताच, यावेळी तो मोदींचा भक्त झाला. देवाचे वार ठरलेले असतात, त्या त्या दिवशी आठवण काढली तरी चालतं. पण, मोदींची भक्ती निराळीच. प्रदीप घर, बस, ट्रेन, ऑफिस आणि स्वतःच्या पैशाने डेटा पॅक रिचार्ज केलेल्या मोबाईलमधून मोदींची भक्ती करू लागला. प्रदीपच्या भक्तीमागे त्याचा सामाजिक आणि आर्थिक स्तर कारणीभूत आहे. २०१४ पूर्वी तो आपल्या गरिबीला नशीब समजून जगत होता. पण, अचानक मोदींचे भाषण ऐकून त्याला आपल्या गरिबीचे कारण उमजले. काँग्रेस आदी पक्षांनी वर्षानुवर्ष केलेल्या भ्रष्टाचारामुळेच आपण पिछाडीवर असल्याचं त्याला समजलं. त्यामुळं काँग्रेस परिवार आणि त्यांच्या बगलबच्च्यांना सोशल मीडियावर झोडून काढणं, हे ध्येय प्रदीपला मिळालं. ध्येय मिळाल्यावर व्यक्तीमध्ये आमुलाग्र बदल होतात. तो एक साधारण व्यक्ती न राहता असाधारण व्यक्तिमत्व होण्याच्या दिशेने वाटचाल करतो. प्रदीप ही वाटचाल करत असताना मोदीजी त्याला प्रेरणा देत होते. नवनवीन विषय, व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड, इतिहासाची नव्याने मांडणी आणि योगआधारित दिव्य ज्ञानातून प्रदीप घडत होता आणि घडतोय.

- Advertisement -

२०१४ पासून प्रदीपने अनेक लढाया लढल्या. चारचौघात कधीही मतप्रदर्शन न करणारा प्रदीप नोटबंदी, जीएसटी, जीडीपी, कलम ३७० रद्द होणं, सर्जिकल स्ट्राईक, काँग्रेसने देश कसा पोखरून टाकलाय, शेतकर्‍यांना कर्जमाफीचे लाड यावर तावातावाने चर्चा करायचा. फेसबुकवरील त्याच्या स्टेटसना मिळणारी दाद बघून अंगावर मूठभर मांस चढायचं. मोदींचा कोणताही निर्णय मास्टरस्ट्रोक कसा आहे? याचे तंतोतंत विश्लेषण त्याच्याकडे असायचे. आता ट्रेनमधील गप्पांमध्येही त्याला मानाची चौथी सिट मिळायला लागली. ट्रेनमध्ये त्याचा ‘मोदी है तो मुमकीन है’ नावाचा ग्रुप देखील झाला होता. ट्रेनच्या गर्दीत हेलकावे खात, लोकांच्या बगलातून येणार्‍या घामाच्या नको असलेल्या दुर्गंधीचा वास घेत, कधी कधी इंचभर जागेसाठी वाद घालूनही आपलं जीवन कसं समृद्ध झालंय, हे सांगताना प्रदीप थकायचा नाही. कारण आपल्या सामाजिक, आर्थिक स्तराला काँग्रेस जबाबदार असल्याची त्याची ठाम समजूत. बघता बघता मोदी सरकारची एक टर्म संपली. प्रदीप जोमाने दुसर्‍यांदा मोदी सरकार निवडून आणण्यासाठी फुकट राबला. स्वखर्चातून डेटा पॅक रिचार्ज करत विरोधकांचे ट्रोलिंग करत राहिला. मेहनतीचं चीज झालं आणि २०१९ ला मोठ्या बहुमताने मोदी सरकार आलं.

प्रदीप काही दिवसभर मोदी मोदी नाही करायचा. तो नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही असायचा. मग नेटफ्लिक्सची लैला पाहताना त्याला वाटायचं, सर्वांची शुद्धी झाली पाहिजे. सेक्रेड गेम्स पाहताना त्याला वाटायचं, गुरुजी म्हणतात तसं तमस वाढत जाईल, तसा आताच्या व्यवस्थेचा विनाश होईल आणि त्यातून पुन्हा एकदा शुद्ध संस्कृती निर्माण होईल, अशा अनेक गोष्टी त्याच्या डोक्यात येत राहायच्या. मग मोदी सरकारनं आपल्या दुसर्‍या टर्मची दणक्यात सुरुवात केली. कलम ३७० हटवले. काश्मीर भारताला जोडले. आता आपल्याला काश्मीरमध्ये सफरचंदाची शेती आणि सोयरीक मिळणार या आनंदात प्रदीपला काय करू आणि काय नको? असं झालं होतं आणि मग अमित शहांनी आणखी एक मास्टरस्ट्रोक मारला. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडून पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील हिंदूंना न्याय दिला. पण, यावेळी काय भूमिका घ्यायची या संभ्रमात प्रदीप पडला होता. कारण इतके वर्ष ट्रेनच्या गर्दीत युपी, बिहारचा भैया आणि गुजराती देखील आपल्याला चालत नव्हते. शहा-मोदींमुळे गुजरात्यांबरोबर जुळवून घेतलं. पण, आता थेट बांगलादेशी, पाकिस्तानी, अफगाणिस्तानी मुस्लीम वगळून इतर आपल्या देशात येणार? राहणार कुठं? नाही म्हणजे मोदी है तो मुमकीन है… पण कसं? हा प्रश्न उरतोच की. या सगळ्या संभ्रमात प्रदीप सवयीप्रमाणे काँग्रेसला शिव्या घालतच होता. यांना आता कॅबमध्ये मुस्लीम कशाला पाहिजेत. विरोध अख्ख्या कॅबला केला पाहिजे, मुस्लीम कशाला त्यात अ‍ॅड करा, अशी त्याची भावना. त्याच्यातच एनआरसी नावाचंही झेंगाट असल्याचं त्याच्या कानावर आलं. तिकडं आसामात म्हणे १९ लाख लोक एनआरसीच्या बाहेर राहिले. सुरुवातीला ते बांगलादेशी असल्याचा आनंद व्यक्त करून झाला होता. मग नंतर कळलं की त्यात १२ लाखांच्यावर हिंदूच आहेत. आता काय? तरीही मोदी है तो मुमकीन है…हा दृढविश्वास कायम होताच.

- Advertisement -

जेमतेम असलेल्या प्रदीपचं मन संभ्रमित झालं होतं. मोटा भाई अमित शहा म्हणतायत २०२४ ला एनआरसी देशभर लागू होणार. आता प्रदीपला घाम फुटला. कारण एनआरसीमध्ये १९५० च्या आधीचा पुरावा पाहिजे (प्रदीप व्हॉट्सअॅप फॉरवर्ड वाचतो, आसाममध्ये १९७१ पुरावा मागितला गेला होता.) शेड्यूल्ड कास्टचे आरक्षण घेताना जात पडताळणी सर्टिफिकेट नसल्यामुळे प्रदीपला फ्रीशिप, स्कॉलरशिप मिळाली नव्हती. कारण काय तर १९५० च्या आधीचा एकही पुरावा त्याच्या कुटुंबाकडे नव्हता. अहो मराठवाड्यातील ऊसतोड कामगार ते. भटकंती करून पोट भरणारं कुटुंब. कसला आलाय जन्म नी मृत्यू दाखला. दुष्काळात प्रदीपच्या बापाने वैतागून गाव सोडलं आणि मुंबईची वाट धरली. मुंबईत वाढलेला प्रदीप स्वतःला गावाशी कनेक्ट करू शकला नव्हता. म्हणून शेतकर्‍यांना तो शिव्या घालायचा. मोदी सरकारात शेतकरी, कामगार, मुस्लीम नाडले जातायत. आज त्यांचा नंबर लागलाय, उद्या कुणाचा नंबर असेल काय माहिती? तरीही ‘मोदी है तो मुमकीन है’ असं म्हणत प्रदीप ट्रेनचे धक्के खातोय, विरोध करण्याची त्याची हिंमत नाही. प्रदीप पुन्हा २०१४ च्या भूमिकेत जायचा विचार करतोय. सध्या डेटा पॅक महाग झाल्यामुळे त्याने या महिन्यात रिचार्ज केलेला नाही. पण, पुढील लेखापर्यंत तो डेटा पॅक रिचार्ज करत आपली भूमिका मांडण्यासाठी पुन्हा येईल. पुढील लेखात प्रदीपचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान याबाबतच्या विचारांवर प्रकाश टाकू. (क्रमशः)

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -